चालू घडामोडी - ०६ फेब्रुवारी २०१९

Updated On : Feb 06, 2019 | Category : Current Affairs‘चीन-अमेरिकेतील व्यापार युद्धाचा भारतीय अर्थव्यवस्थेला फायदा’ :
 • अमेरिका आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या व्यापार युद्धाचा भारतीय अर्थव्यवस्थेला फायदा होणार असून यामुळे देशाच्या निर्यातीत ३.५ टक्क्यांची तेजी निर्माण होईल, असे संयुक्त राष्ट्राच्या एका अभ्यासात समोर आले आहे.

 • या व्यापार युद्धाचा सर्वाधिक फायदा हा युरोपीयन संघाला होईल. त्यांच्याकडे अतिरिक्त ७० अब्ज डॉलरचा व्यवसाय जाईल, असेही या अभ्यासात म्हटले आहे.

 • यूएन कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हल्पमेंट (यूएनसीटीएडी) च्या अहवालात म्हटले आहे की, वॉशिंग्टन आणि पेईचिंग यांच्यादरम्यान सुरू असलेल्या टेरिफ युद्धाचा (एकमेकांच्या साहित्यावर शूल्क लावणे) फायदा अनेक देशांना होईल. यामध्ये ऑस्ट्रेलिया, भारत, फिलीपाईन्स, ब्राझील, पाकिस्तान आणि व्हिएतनाम यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

इस्त्रोची आणखी एक भरारी, GSAT-31 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण :
 • भारताने अंतराळात आणखी एक मोठे यश प्राप्त केले आहे. भारताचे संदेशवाहक उपग्रह जीसॅट-३१चे (GSAT-31) युरोपीयन कंपनी एरियन स्पेसच्या एरियन रॉकेटने बुधवारी पहाटे अडीचच्या सुमारास फ्रेंच गयाना येथील अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. प्रक्षेपणाच्या ४२ व्या मिनिटानंतर ३ वाजून १४ मिनिटांनी उपग्रह जिओ-ट्रान्सफ ऑर्बिटमध्ये स्थापित झाला. भारताने यापूर्वी अनेक उपग्रह फ्रेंच गयानातून प्रक्षेपित केले आहेत.

 •  

 • एरियनस्पेसने दिलेल्या माहितीनुसार, या रॉकेटमध्ये भारताच्या जीसॅट-३१ सह सौदी जियो स्टेशनरी उपग्रह १/ हेलास उपग्रह ४ यांचेही प्रक्षेपण करण्यात आले आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) सांगितलेल्या माहितीनुसार, या उपग्रहाचे वजन २५३५ किलोग्रॅम आहे. जीसॅट-३१ ४० वा संदेशवाहक उपग्रह आहे. यामुळे भू-स्थैतिक कक्षेत कू-बँड ट्रान्सपाँडर क्षमता वाढवेल. जीसॅट-३१ चा कार्यकाळ १५ वर्षे आहे.

 • जीसॅट-३१ आता भारताचा जुना संदेशवाहक उपग्रह इनसॅट-४ सीआरची जागा घेईल. प्रक्षेपणात कोणतीच समस्या आली नाही. जीसॅट ३१ इनसॅट उपग्रहाची जागा घेईल. या यशस्वी प्रक्षेपणासाठी एरियन स्पेस आणि इस्त्रोचे अधिकारी जे जानेवारीपासून येथे उपस्थित होते त्यांचे अभिनंदन अशा शुभेच्छा फ्रेंच गयाना येथे उपस्थित असलेले सतीश धवन स्पेस सेंटरचे संचालक एस पांडियन यांनी दिल्या.

हॉकी विश्वचषकाच्या आयोजनासाठी भारत पुन्हा उत्सुक :
 • पुढील हॉकी विश्वचषकाच्या आयोजनासाठी भारताने पुन्हा एकदा दावेदारी पेश केली आहे. १३ ते २९ जानेवारी २०२३ मध्ये होणाऱ्या हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनाच्या शर्यतीत एकूण सहा देश असल्याचे आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) मंगळवारी जाहीर केले.

 • भारताने २०२३ साली होणाऱ्या पुरुष आणि महिला अशा दोन्ही स्पर्धासाठी आपला दावा केला आहे. मात्र या स्पर्धासाठी सध्या तरी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे देश आघाडीवर आहेत. भारताने गतवर्षी झालेल्या विश्वचषकाचे यजमानपद भूषवले होते. भुवनेश्वर येथे झालेल्या या विश्वचषकात भारतीय संघ लवकर बाहेर पडल्याने भारतीय हॉकीप्रेमींची निराशा झाली होती.

 • पुढील विश्वचषकासाठी अन्य दावेदारांमध्ये स्पेन, मलेशिया आणि जर्मनी या देशांचा समावेश आहे. ज्या देशांना विश्वचषक आयोजनासाठी दावा करायचा आहे, त्यांनी ३१ जानेवारी २०१९ आधी आपली दावेदारी सादर करावयाची असून ते कोणत्या कालावधीत विश्वचषकाचे आयोजन करू इच्छितात, याबाबतची माहिती नमूद करावयाची आहे. हॉकी विश्वचषक ही जगभरातील हॉकीप्रेमींच्या आवडीची स्पर्धा असल्यामुळेच या स्पर्धेच्या आयोजनासाठी मोठमोठय़ा देशांनी दावेदारी केल्याचे समोर आले आहे.

आता Netflix वर दिसणार ‘क्रिकेट गेम्स’ :
 • सध्याचा काळ हा वेब सिरीजचा काळ आहे. छोट्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सारेच वेब सीरिजचे प्रेमी आहेत. त्यामुळे हल्ली चित्रपटगृहांपेक्षा वेब सिरीजचा प्रेक्षक वर्ग अधिक दिसून येतो. क्रिकेटवर आधारित अनेक वेब सिरीजदेखील लोकप्रिय ठरल्या. ‘इनसाइड एज’, ‘सिलेक्शन डे’ या वेब सिरीज चांगल्याच गाजल्या. यात भर म्हणून आता IPL आणि मुंबई इंडियन्स यांचावर एक वेब सिरीज ‘नेटफ्लिक्स’वर येत आहे. IPL मध्ये मुंबईचा संघ एक यशस्वी संघ आहे. या संघावर नेटफ्लिक्स एक वेब सिरीज बनवणार आहे. नेटफ्लिक्सने मंगळवारी याबाबतची घोषणा केली.

 • याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नेटफ्लिक्सच्या वेब सीरिजमध्ये ‘Cricket Fever: Mumbai Indians’ या नावाने मुंबई इंडियन्सवर डॉक्युमेंटरी/ वेब सिरीज तयार केली जात असून १ मार्चला त्याचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात मुंबई इंडियन्सचा IPL मधील प्रवास दाखवण्यात येणार आहे.

 • या आठ भागांमध्ये मुंबई इंडियन्सच्या (२०१३, २०१५ व २०१७) या तीन विजेतेपदांचा प्रवास विशेष पद्धतीने दाखवण्यात येईल. याबरोबरच मैदानाबाहेर घडलेल्या घटनांबाबतही या ८ भागात दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे ही वेब सिरीज मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांची उत्सुकता वाढवत आहे.

मराठा आरक्षणाबाबत याचिकांवर आजपासून अंतिम सुनावणी :
 • मुंबई : मराठा आरक्षणा संदर्भात उच्च न्यायालयात दाखल विविध याचिकांवर आजपासून अंतिम सुनावणी सुरु होणार आहे. राज्य सरकारकडून ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी उच्च न्यायालयात बाजू मांडणार आहेत.

 • मराठा आरक्षणाविषयी मागास प्रवर्ग आयोगाचा तयार केलेला अहवाल जसाच्या तसा कोर्टात मांडण्याचे आदेश हायकोर्टानं दिले होते. त्यानंतर 29 जानेवारीला हा अहवाल कोर्टासमोर मांडण्यात आला.

 • त्यात मराठा ही वेगळी जात नसून ती कुणबी जातीतच मोडते, असं मागास प्रवर्ग आयोगाकडून सादर केलेल्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची मागणी रास्त असून त्यांना 16 टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याची शिफारस राज्य सरकारनं त्यांच्या अहवालातून केली आहे.

 • दोन्ही सभागृहात मराठा समाजासाठी 16 टक्के आरक्षणाचा विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर मराठा आरक्षणाच्या विरोधात आणि समर्थनात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. यावर आजपासून अंतिम सुनावणी सुरु होईल.

अखेर सात दिवसांनंतर अण्णा हजारे यांचं उपोषण मागे :
 • राळेगणसिद्धी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अखेर सातव्या दिवशी उपोषण मागे घेतंल आहे.आपल्या सर्व मागण्या मान्य झाल्याने उपोषण मागे घेत असल्याची घोषणा अण्णांनी केली आहे. . मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन अण्णांनी आपलं उपोषण सोडलंय. लोकपाल नियुक्तसाठी उपोषणावर असलेल्या अण्णा हजारेंच्या मनधरणीचे सरकारचे प्रयत्न सफल ठरले आहेत.

 • लोकपाल, लोकनियुक्ती आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव यांसारख्या अनेक मागण्या अण्णा हजारेंनी केल्या होत्या. या मागण्यांसाठीच त्यांनी गेल्या सात दिवसांपासून अण्णा उपोषणावर होते. मुख्यमंत्र्यांनी अण्णांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून त्या पूर्ण करण्याचं आश्वासन देण्यात आलंय.

 • लोकपालची अंमलबजावणी आणि लोकायुक्त नेमण्यासंदर्भातल्या कायद्याची नव्याने पुनर्रचना या दोन प्रमुख मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. तर इतर मागण्यांवरही सरकारने सहमती दर्शवली आहे. मी यावर समाधानी असून उपोषण मागे घेतो आहे अशी घोषणा अण्णा हजारे यांनी केली.

 • दरम्यान अण्णांची मनधरणी करताना मुख्यमंत्र्यांसोबत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचाही 6 तास उपवास घडला.

 • दरम्यान त्यापूर्वी  मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय कृषि मंत्री राधा मोहन सिंह यांची अण्णा हजारेंबरोबर बंद दाराआड चर्चा संपन्न झाली आहे. मुख्यमंत्र्यांकडून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या मनधरणीचे प्रयत्न केले गेले. मात्र सर्व मागण्या जोपर्यत मान्य होत नाहीत तोवर उपोषण सोडणार नसल्याचा पवित्रा अण्णांनी घेतला होता. त्यामुळे मुख्यमंत्री अण्णांच्या मागण्या मान्य करतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होतो. अखेर मुख्यमंत्र्यांनी अण्ण्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत.

दिनविशेष :

महत्वच्या घटना 

 • १९१८: ३० वर्षे वयावरील ब्रिटिश महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. १९२८ मध्ये हे वय २१ करण्यात आले.

 • १९३२: कलकत्ता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात छत्री संघाची सदस्य असलेल्या बीना दास या विद्यार्थिनीने बंगालचे राज्यपाल स्टॅन्ले जॅक्सन यांच्यावर गोळया झाडल्या.

 • १९३२: प्रभातचा अयोध्येचा राजा हा बोलपट मुंबईच्या कृष्णा या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.

 • १९५२: इंग्लंडचा राजा जॉर्ज (सहावा) यांचे निधन झाले आणि एलिझाबेथ (दुसरी) गादीवर बसली.

 • १९६८: फ्रांसमध्ये ग्रेनोबल येथे दहावे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.

जन्म 

 • १९११: अभिनेते आणि अमेरिकेचे ४० वे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांचा जन्म. (मृत्यू: ५ जून २००४)

 • १९१५: आधुनिक राष्ट्रकवी रामचंद्र नारायण द्विवेदी ऊर्फ कवी प्रदीपरामचंद्र नारायण द्विवेदी ऊर्फ कवी प्रदीप यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर १९९८)

 • १९५२: ऑस्ट्रेलियन हॉकीपटू, हॉकी प्रशिक्षक, क्रिकेटपटू आणि राजकारणी डॉ. रिक चार्ल्सवर्थ यांचा जन्म.

 • १९८३: क्रिकेटपटू श्रीशांत यांचा जन्म.

मृत्यू 

 • १८०४: इंग्लिश रसायनशास्रज्ञ जोसेफ प्रिस्टले यांचे निधन. (जन्म: १३ मार्च १७३३)

 • १९३१: भारतीय स्वातंत्र्यसेनानी, स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य, कायदेपंडित मोतीलाल गंगाधर नेहरू यांचे निधन. (जन्म: ६ मे१८६१)

 • १९३९: बडोद्याचे महाराज सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांचे निधन.(जन्म: १० मार्च १८६३)

 • १९५२: इंग्लंडचा राजा जॉर्ज (सहावा) यांचे निधन. (जन्म: १४ डिसेंबर १८९५)

 • १९९३: अमेरिकन टेनिस खेळाडू आर्थर अ‍ॅश यांचे निधन. (जन्म: १० जुलै १९४३)

 • २००१: केन्द्रीय नभोवाणी मंत्री व काँग्रेसचे प्रवक्ते बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांचे निधन.

टिप्पणी करा (Comment Below)