चालू घडामोडी - ०६ जानेवारी २०१८

Date : 6 January, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर होणार, अनंतकुमार यांची माहिती :
  • नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्प येत्या 1 फेब्रुवारी रोजी सादर केला जाणार असल्याची माहिती केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री अनंतकुमार यांनी शुक्रवारी दिली. येत्या 29 जानेवारी ते 6 एप्रिलदरम्यान दोन टप्प्यात नव्या वर्षातील (2018-19) संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. 

  • केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री अनंतकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन टप्प्यात यंदाचे संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार असून 29 जानेवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान पहिला टप्पा पार पडणार आहे. तर 5 मार्च ते 6 एप्रिल या काळात दुसरा टप्पात सुरु होणार आहे.

  • केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली येत्या 1फेब्रुवारीला संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. येत्या 29 जानेवारीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या दोन्ही सभागृहांना उद्देशून भाषण करतील. तसेच, याचदिवशी संसदेत आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात येईल, असे अनंतकुमार यांनी सांगितले. 

  • दरम्यान, ब्रिटिश परंपरेनुसार देशात आजवर फेब्रुवारीच्या अखेरीस अर्थसंकल्प सादर केला जातो. मात्र, या परंपरेला छेद देऊन अर्थमंत्री अरुण जेटली  येत्या एक फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 

सरकारी कार्यालयात आता पत्रकारांना नो एंट्री :
  • डेहराडून- उत्तराखंड सरकारनं सरकारी कार्यालयांत पत्रकारांना प्रवेशाच मज्जाव केला आहे. उत्तराखंड सरकारच्या आदेशानुसार पत्रकारांना आता सरकारी कार्यालयांमध्ये प्रवेश करता येणार नाही. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, महत्त्वाच्या प्रसंगी पत्रकारांना काही माहिती हवी असल्यास ते थेट सरकारी कार्यालयांत जात असत.

  • परंतु उत्तराखंड सरकारच्या निर्णयामुळे त्यांना आता रिसेप्शन काऊंटरवर येऊन माहिती मागावी लागणार आहे, असं उत्तराखंड सरकारच्या आदेशात म्हटलं आहे. सरकारी माहिती सार्वजनिक होऊ नये यासाठी उत्तराखंडचे मुख्य सचिव उत्पल कुमार सिंह यांनी 27 डिसेंबरला हा आदेश जारी केला असून, तो आता राज्यातील सगळ्या अधिकाऱ्यांना पाठवण्यात आला आहे.

  • त्यामुळे आता उत्तराखंडमध्ये पत्रकारांना थेट सरकारी कार्यालयांत प्रवेश करणं शक्य होणार नाही. उत्तराखंड सरकारचे मुख्य सचिव उत्पल कुमार सिंह यांनी घेतलेल्या वरिष्ठ अधिका-यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

  • प्रसारमाध्यमांपर्यंत योग्य माहिती पोहोचवणे हा त्यामागील उद्देश असल्याचं मुख्य सचिवांनी स्पष्ट केलं आहे. रोज संध्याकाळी 4 वाजता सरकारच्या महत्त्वाच्या निर्णयांची माहिती प्रसारमाध्यमांना दिली जाणार असल्याचं उत्पल कुमार म्हणाले आहेत.

परदेशांतील भारतीय लोकप्रतिनिधींना बनविणार सदिच्छादूत, सरकारची योजना; ९ जानेवारीला संमेलन :
  • नवी दिल्ली - भारतीय परराष्ट्र धोरणाची मुद्रा जगात प्रभावीपणे उमटावी यासाठी मोदी सरकार आगळीवेगळी योजना राबविण्याच्या विचारात आहे. अन्य देशांतील भारतीय वंशाच्या लोकप्रतिनिधींना भारताचे अघोषित राजदूत म्हणजे सदिच्छादूत बनविण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे.

  • मूळ भारतीय वंशाचे वा पूर्वी भारतीय नागरिक असलेल्यांपैकी जे आता विविध देशांत लोकप्रतिनिधी आहेत, त्यापैकी निवडक लोकप्रतिनिधींचे एक संमेलन दिल्लीमध्ये ९ जानेवारी रोजी मोदी सरकारने आयोजित केले आहे. या संमेलनात २२ देशांतील १२४ लोकप्रतिनिधी तसेच १५ महापौर सहभागी होणार आहेत.

  • अमेरिकेतील दोन महापौरही याप्रसंगी उपस्थित राहाणार आहेत. मात्र अमेरिकेतील भारतीय वंशाच्या लोकप्रतिनिधींनी या संमेलनात सहभागी होण्याबाबत आपला होकार अद्याप कळविलेला नाही. अमेरिकन सिनेटमध्ये सुरु असलेल्या कामकाजामुळे त्यांना संमेलनाला येणे शक्य होणार नाही असे सांगितले जात आहे.

  • या लोकप्रतिनिधींद्वारे भारताच्या परराष्ट्र धोरणाबाबत त्या त्या देशांमध्ये सकारात्मक वातावरण तयार करणे शक्य होईल, असे मोदी सरकारला वाटत आहे. देशोदेशांतील भारतीय वंशाचे लोकप्रतिनिधी आपल्या मातृभूमीविषयी मनात ममत्व बाळगून असतात. नेमका याच गोष्टीचा उपयोग मोदी सरकारला करुन घ्यायचा आहे.

भारत-चीन मैत्री ही जगाची गरज -मिंग शियांगफंग : 
  • मुंबई - भारत आणि चीन यांच्यातील नाते सुदृढ, स्थिर आणि विश्वासाचे असणे हे फक्त या दोन्ही देशांसाठीच नव्हे, तर दक्षिण आशियाच्या समृद्धतेसाठी आणि मानवी समाजाच्या भल्यासाठीही आवश्यक आहे, असे मत चीनच्या सत्ताधारी चायनीज कम्युनिस्ट पार्टी (सीपीसी)चे सदस्य मिंग शियांगफंग यांनी व्यक्त केले.

  • गेल्या वर्षी आॅक्टोबर महिन्यात बीजिंग येथे झालेली ‘सीपीसीची नॅशनल कॉन्फरन्स आणि त्याचे भारत-चीन संबंधावरील परिणाम’या विषयावर ते गुरुवारी मुंबईत बोलत होते.

  • आॅब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन, मुंबई आणि चीनचा मुंबईतील दूतावास यांनी संयुक्तरीत्या आयोजित केलेल्या या कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. या वेळी चीनचे मुंबईतील कौन्सिल जनरल झेन झियुआन, ओआरएफ मुंबईचे अध्यक्ष सुधींद्र कुलकर्णी यांच्यासह दोन्ही देशांतील विविध मान्यवर उपस्थित होते.

  • भारत-चीन या दोन्ही देशांमधील संबंध दृढ करण्यासाठी सर्वांत आधी परस्परांवरील राजकीय विश्वास आणि यूएन, ब्रिक्स, एससीओ अशा जागतिक व्यासपीठावरील सहकार्य याकडे लक्ष द्यायला हवे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शि जिनपिंग यांनी या दिशेने पाऊल उचलले असून, त्यात दोघांनाही फायदाच होईल, असा विश्वास मिंग यांनी व्यक्त केला.

अमेरिकेला हिमवादळाचा तडाखा; हजारो विमान उड्डाणे रद्द :
  • अमेरिकेच्या पूर्व भागाला हिमवादळाने जोरदार तडाखा दिला असून, संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. न्यूयॉर्क शहरावर पूर्णपणे बर्फाची चादर पसरली गेली आहे. न्यूयॉर्कचे जॉन एफ केनडी आंतरराष्ट्रीय विमानतळही काही काळासाठी बंद करावे लागले आहे.

  • -न्यूयॉर्कच्या जेएफके आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणारे जगातील सर्वांत मोठे प्रवासी विमानही स्टेवर्ट येथील एका छोट्या विमानतळावर आपत्कालीन स्थितीत उतरवावे लागले. यातील ३२५ प्रवासी सुखरूप आहेत.

  • ५००० विमानांचे उड्डाण संपूर्ण अमेरिकेत रद्द करावे लागले असल्याचे फ्लाइटवेअर नावाच्या संकेतस्थळावर म्हटले आहे.

  • ०८ इंच बर्फाचे थर अमेरिकेच्या पूर्व भागातील अनेक शहरांमध्ये साठलेले आहेत. त्यामुळे सर्व प्रकारची वाहतूक विस्कळीत झाली आहे. - 17 जणांचा आतापर्यंत या बर्फवृष्टीने बळी गेला आहे.

विविध क्षेत्रांत प्रथम पाऊल टाकणाऱ्या महाराष्ट्रातील १५ महिलांचा राष्ट्रीय गौरव! :
  • विविध क्षेत्रांत प्रथम पाऊल टाकत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या देशातील ११३ महिलांचा केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयातर्फे ‘फर्स्ट लेडी पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात येणार आहे. त्यात महाराष्ट्रातील १५ महिलांचा समावेश आहे. राष्ट्रपती भवनात २० जानेवारी रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.

  • समाजातील दमनकारी प्रवृत्तींचा विरोध झुगारून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या, विविध क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या, वेगळी वाट चोखाळणाऱ्या महिलांची या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे.

  • भारतीय चित्रपट क्षेत्रातील पहिल्या अभिनेत्री दुर्गाबाई कामत आणि देशातील पहिल्या महिला तबला वादक डॉ. अबन मिस्त्री यांना हा पुरस्कार मरणोत्तर जाहीर झाला आहे. दुर्गाबाई कामत यांनी दादासाहेब फाळके यांच्या ‘मोहिनी भस्मासूर’  (१९१३) या चित्रपटात पार्वतीचे काम केले होते. त्यांची कन्या कमलाबाई कामत (विवाहोत्तर- कमलाबाई गोखले) यांनी या चित्रपटात नायिकेची भूमिका केली होती.

  • मदर तेरेसा, कल्पना चावला, बछेंद्री पाल, ऐश्वर्या राय बच्चन, पी. व्ही. सिंधु, सानिया मिर्झा, गीता फोगट, सायना नेहवाल, साक्षी मलिक, दीपा कर्माकार, मिताली राज आदी कर्तृत्ववान महिलांचाही पुरस्काराच्या यादीत समावेश आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १६६५: शिवाजी महाराजांनी सूर्यग्रहणाच्या निमित्ताने राजमाता जिजाऊ व सोनोपंत विश्वनाथ डबीर यांची सुवर्णतुला केली.

  • १६७३: कोंडाजी फर्जद यांनी फक्त ६० मावळ्यांच्या मदतीने पन्हाळा किल्ला जिंकला आणि महाराजांचे १३ वर्षाचे स्वप्न पूर्ण झाले.

  • १८३८: सॅम्युअल मॉर्स यांनी तारयंत्राचा शोध लावला.

  • १९०७: मारिया माँटेसरी यांनी पहिली माँटेसरी शाळा सुरूकेली. त्यांच्या शाळांमुळे पूर्वप्राथमिक शिक्षणात आमूलाग्र बदल झाला.

  • १९१२: न्यू मेक्सिको हे अमेरिकेचे ४७वे राज्य बनले.

  • १९२४: राजकारणात भाग न घेणे व रत्‍नागिरी जिल्ह्यातच राहणे या अटींवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मठेपेतुन सशर्त मुक्तता

  • १९२९: गोरगरिब व रुग्णांची सेवा करण्यासाठी मदर तेरेसा यांचे कोलकाता येथे आगमन.

  • १९४४: दुसरे महायुद्ध – रशियन सैन्य पोलंडमध्ये शिरले.

जन्म

  • १७४५: बलूनच्यासहाय्याने आकाशात उडण्याचे प्रयोग करणाऱ्या जाक्कास एलियन माँटगोल्फिएर यांचा जन्म.

  • १८१२: मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म. (मृत्यू: १८ मे १८४६)

  • १८२२: उत्खनन करून ट्रॉय आणि मायसेनी या नगरीचा शोध लावणाऱ्या हेन्रीचा श्लीमन यांचा जन्म.

  • १८६८: आधुनिक संतकवी गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ दासगणू महाराज यांचा जन्म. (मृत्यू: २५ नोव्हेंबर १९६२)

  • १८८३: लेबनॉनमधे जन्मलेले अमेरिकन कवी, लेखक व कलाकार खलील जिब्रान यांचा जन्म. (मृत्यू: १० एप्रिल १९३१)

  • १९२७: प्रवासवर्णनकार, कथाकार आणि विनोदी लेखक रमेश मंत्री यांचा जन्म. (मृत्यू: १९ जून १९९७)

  • १९२८: नाटककार, चित्रपटकथालेखक, पत्रकार व साहित्यिक विजय तेंडुलकर यांचा जन्म. (मृत्यू: १९ मे २००८ – पुणे, महाराष्ट्र)

  • १९३१: पर्यावरण क्षेत्रातील शा’स्त्रज्ञ, महाराष्ट्र असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्सचे (आघारकर रिसर्च इन्स्टिट्युट) अध्यक्ष डॉ. आर. डी. देशपांडे यांचा जन्म.

  • १९५५: विनोदी अभिनेते व पटकथालेखक रोवान अ‍ॅटकिन्सन यांचा जन्म.

  • १९६६: सुप्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांचा जन्म.

मृत्यू.

  • १८४७: दाक्षिणात्य संगीतकार त्यागराज यांचे निधन. (जन्म: ४ मे १७६७)

  • १८५२: अंधांना उपयोगी पडणाऱ्या ब्रेल लिपीचे जनक व शिक्षक लुई ब्रेल यांचे निधन. (जन्म: ४ जानेवारी १८०९)

  • १८८४: जनुकांची (genes) संकल्पना मांडणारा जर्मन जीवशास्त्रज्ञ ग्रेगोर मेंडेल यांचे निधन. (जन्म: २० जुलै १८२२)

  • १८८५: आधुनिक हिंदी साहित्याचे जनक भारतेंदू हरीश्चंद यांचे निधन. (जन्म: ९ सप्टेंबर १८५०)

  • १९१८: जर्मन गणितज्ञ जी. कँटर यांचे निधन. (जन्म: ३ मार्च १८४५)

  • १९१९: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकेचे २६वे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रूझवेल्ट यांचे निधन. (जन्म: २७ आक्टोबर १८५८)

  • १९७१: जादूगार प्रफुल्लचंद्र तथा पी. सी. सरकार यांचे निधन. (जन्म: २३ फेब्रुवारी १९१३)

  • १९८४: महामहोपाध्याय, वैदिक साहित्याचे अभ्यासक व मराठी कोशकार विद्यानिधी सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव यांचे निधन. (जन्म: १ फेब्रुवारी १८८४)

  • २०१०: लेखक आणि इंग्रजीचे प्राध्यापक प्रल्हाद इरबाजी सोनकांबळे यांचे निधन. (जन्म: १६ जुलै १९४३)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.