चालू घडामोडी - ०६ जानेवारी २०१९

Updated On : Jan 06, 2019 | Category : Current Affairs‘नितीन गडकरींना उपपंतप्रधान करा, पक्षाचे नेतृत्व शिवराजसिंह चौहान यांना द्या’ :
 • केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उपपंतप्रधान द्यावे. गृहमंत्री राजनाथ सिंह यांना उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान करावे आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे पक्षाच्या नेतृत्वाची धुरा द्यावी, असा सल्ला भाजपाचे ज्येष्ठ नेते संघप्रिय गौतम यांनी पक्षाला दिला आहे. त्याचबरोबर पक्षाचे सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी राज्यसभेवरच ‘फोकस’ करावा असे त्यांनी सांगितले आहे.

 • उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धार्मिक कार्यास पाठवले पाहिजे, असेही त्यांनी माध्यमांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. नरेंद्र मोदी हे देशातील सर्वांत मोठे नेते आहेत. पण २०१९ मध्ये ‘मोदी लाट’ येण्याबाबत शंका असल्याचे ते म्हणाले. आगामी सार्वत्रिक निवडणुकीत ‘मोदी मंत्र’ पुन्हा काम करण्याची शक्यता कमीच आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही हे मान्य आहे. पण ते बोलू शकत नाहीत.

 • केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात राग पसरला आहे. परिस्थिती इतकी वाईट आहे की, जर आता निवडणुका झाला तर भाजपा काही राज्य वगळता सर्व ठिकाणांहून सत्तेबाहेर जाईल, असा इशारा त्यांनी दिला. योजना आयोगाचे नाव बदलणे, सीबीआय, आरबीआयच्या कार्यात सरकारच्या हस्तक्षेपाबाबत सांगत गौतम यांनी आपल्याच पक्षाच्या कार्यशैलीवर टीका केली. उत्तराखंडमध्ये निवडून आलेले सरकार पाडण्याचा प्रयत्न करणे योग्य नव्हते. त्याचबरोबर मणिपूर आणि गोव्यातही अशाच पद्धतीने सरकार स्थापन करणे ठीक नव्हते.

 • तत्पूर्वी, महाराष्ट्रात राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले किशोर तिवारी यांनी संघप्रमुख मोहन भागवत यांना पत्र लिहून गडकरी यांना पंतप्रधान करण्याची मागणी केली होती. जर पक्षाला २०१९ मध्ये निवडणुका जिंकायच्या असतील तर त्यांनी गडकरींना पंतप्रधान केले पाहिजे. गडकरी हे दशकांपासून भाजपा आणि संघाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. पंतप्रधानपदासाठी ते अत्यंत योग्य आहेत, असे तिवारी यांनी म्हटले आहे.

किंमत 6 लाख, विद्यार्थ्यांनी बनवली देशातील पहिली विनाचालक सौर उर्जेवरील बस :
 • पंजाबच्या ‘लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी’च्या (एलपीयू) विद्यार्थ्यांनी देशातील पहिली स्मार्टबस बनवली आहे. ही बस केवळ सौर उर्जेवरच धावणार असं नाही तर या बसमध्ये चालकाची गरजच नाहीये. 106 व्या ‘इंडियन सायंस काँग्रेस’मध्ये ही बस सादर करण्यात आली. पूर्णतः प्रदूषणमुक्त असलेल्या या बसची किंमत जवळपास 6 लाख रुपये आहे.

 • ‘गेल्या पाच वर्षांपासून या प्रकल्पावर काम करत होतो, बसचा सगळा प्रोग्रॅम सेट करण्यास 12 महिन्यांचा वेळ लागला, यामध्ये अनेक स्मार्ट फिचर्स अॅड करण्यात आलेत.  बसच्या वरच्या भागात कॅमेरा लावण्यात आला आहे. या कॅमेऱ्याच्या सहाय्याने बसच्या मार्गावरील अडथळ्यांची किंवा मार्गाची माहिती गोळा होते, त्यानुसार बस धावते. जवळपास 300 विद्यार्थ्यांचा या प्रकल्पात सहभाग होता’ अशी माहिती या प्रकल्पाचे प्रमुख मनदिप सिंग यांनी दिली. द विकने याबाबतचं वृत्त दिलं आहे. 

 • बसमधील मोटर सौर उर्जेच्या सहाय्याने सुरू होते आणि याद्वारे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. चालकाशिवाय 30 किलोमीटर प्रतितास वेगाने ही बस धावू शकते. तसंच चालकासह बस चालवण्याचा पर्यायही यामध्ये आहे. बसच्या मागील आणि पुढील बाजूला सेंसर लावण्यात आले आहेत. त्यामुळे मार्गात काही अडथळा असल्यास ही बस आपोआप थांबेल किंवा 10 मीटर आधीच अलर्ट देईल.

 • एकदा पूर्ण चार्ज झाल्यानंतर या बसने 10 ते 30 प्रवाशांसह 70 किमीपर्यंतचा प्रवास करता येईल. नेव्हिगेशनसाठी जीपीएस आणि ब्ल्यूटुथचा वापर केला जातो. 10 मीटरच्या परिसरातूनही या बसवर कंट्रोल करता येणं शक्य आहे.

महिला संशोधकांनाही समान संधी मिळावी :
 • ‘महिला संशोधक हा देशातील सर्वात मोठा अल्पसंख्याक समुदाय असून देशभरातील अडीच लाख संशोधकापैकी अवघ्या चौदा टक्के महिला आहेत. बहुतेक महिला संशोधकांना पदोन्नती, वेतन यांबाबत समान वागणूक मिळत नसल्याचे दिसून येते. त्यांनाही समान संधी मिळावी,’ असे मत केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांनी शनिवारी व्यक्त केले.

 • फगवाडा येथील भारतीय विज्ञान काँग्रेसमधील महिला वैज्ञानिक संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात  इराणी बोलत होत्या. संशोधनक्षेत्रात महिलांचे प्रमाण कमी असण्यामागे सामाजिक मानसिकता कारणीभूत असल्याचा मुद्दा मांडून त्या म्हणाल्या, ‘मुले आणि मुली यांना खेळण्यासाठी आपण काय देतो त्यावरूनही नकळतपणे लिंगभेदाची मानसिकता तयार होत असते.

 • मुलींना खेळायला बाहुली आणि मुलांना मेकॅनो दिला जातो तेव्हा विशिष्ट विषय मुलांसाठी किंवा मुलींसाठी असल्याचे समज तयार होत असतात. एखादे क्षेत्र महिलांच्या आकलनापलीकडे असते, एखादा प्रकल्प महिलांच्या आवाक्याबाहेर असतो, अशा अनेक समजांमधून तयार झालेली महिलांची ही प्रतिमा विकासासाठी मारक आहे.’

 • ‘संशोधन क्षेत्राचे उत्तम भाविष्य असावे असे वाटत असेल तर संशोधनक्षेत्रातील महिलांचे वर्तमान आणि भविष्य उज्ज्वल करण्याला पर्याय नाही. संशोधन क्षेत्रातील प्रगतीसाठी उत्तम संशोधन पत्रिका, शोध निबंध हे स्थानिक भाषांमधून उपलब्ध करून देण्यात यावेत’, असेही इराणी म्हणाल्या. या वेळी संशोधक विजयलक्ष्मी सक्सेना यांची २०२० मध्ये होणाऱ्या विज्ञान काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणून निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.

शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये १० हजार रुपये भरणार :
 • शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासह कृषी क्षेत्रासाठी मोठय़ा प्रमाणावर सवलती देण्याचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार करीत आहे. त्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. सरकार प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये १० हजार रुपये जमा करण्याच्या विचारात असून ही रक्कम बियाणे, शेती साहित्यासाठी देण्यात येणार आहे. योजनेची घोषणा २६ जानेवारी रोजी होण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले.

 • ओदिशा सरकारच्या या प्ररूपावर मोदी सरकार गांभीर्याने विचार करीत आहे, वित्त आणि कृषी मंत्रालयात यावर चर्चा सुरू आहे. ओदिशामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात दरवर्षी १० हजार रुपये राज्य सरकारकडून भरण्यात येतात, त्यापोटी राज्य सरकारवर १.४ लाख कोटी रुपयांचा बोजा पडतो. मात्र केंद्राच्या योजनेमध्ये सरसकट सर्वच शेतकऱ्यांचा समावेश होणार नसल्याची शक्यता आहे.

 • या योजनेतून भूमिहीन शेतकऱ्यांना वगळण्यात येणार आहे. भूमिहीन शेतकऱ्यांवर कर्ज नसल्याचे कारण त्यासाठी देण्यात येत आहे. मोदी सरकारने प्रत्येक राज्यातून आणि मंत्रालयांकडून शेतकऱ्यांची आकडेवारी मागितली आहे. तेलंगण प्रारूपाचाही विचार होत आहे.

राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धा - महाराष्ट्राची विजयी सलामी :
 • महाराष्ट्राच्या पुरुषांनी संघर्षपूर्ण लढतीत जम्मू-काश्मीरचा ७३-५१ असा पराभव करून भावनगर येथे शनिवारपासून सुरू झालेल्या ६९व्या राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत विजयी सलामी दिली.

 • पूर्वार्धात अडखळत खेळणाऱ्या महाराष्ट्राच्या संघाने शेवटच्या सत्रात आपला खेळ उंचावला आणि आपल्या अभियानाची यशस्वी सुरुवात केली.

 • कर्णधार सिद्धांत शिंदे, अश्रफ आणि फरदीन आक्रमणात फारसे प्रभावी ठरले नसताना अजिंक्य माने आणि शुभम यादवने गुणफलक हलता ठेवण्याची जबाबदारी पार पाडली. आता हरयाणाविरुद्ध रविवारी होणाऱ्या महत्त्वपूर्ण सामन्यात महाराष्ट्राला विजय मिळविण्यासाठी नियोजनपूर्व खेळ करण्याची आवश्यकता आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचा आणीबाणीचा इशारा :
 • मेक्सिको सीमेवर कोटय़वधी डॉलर्स खर्च करून भिंत बांधण्याच्या प्रस्तावावर आपण ठाम असून त्यासाठी अमेरिकी सरकार टाळेबंदीमुळे वर्षभर बंद राहिले तरी त्याची तयारी आहे, असे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांबरोबरच्या बैठकीनंतर सांगितले की, भिंत बांधण्यासाठी तरतुदीवर आपण ठाम असून त्यासाठी सरकारची वर्षभर टाळेबंदी झाली तरी आपण मागे हटणार नाही.

 • अमेरिकेत डेमोक्रॅटिक पक्षाचा भिंतीसाठी विधेयकातील तरतुदीपेक्षा जास्तच निधी देण्यास विरोध असून त्यामुळे सरकारच्या आर्थिक तरतुदी रोखण्यात आल्या असून टाळेबंदीचा दोन आठवडे सुरू असलेला पेच अजून मिटलेला नाही. वर्षभर टाळेबंदी होईल असे वाटत नाही पण त्यासाठी माझी तयारी आहे असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

 • सीमेवरील सुरक्षा महत्त्वाची असून आज ना उद्या लोकांना याचा विचार करावा लागणार आहे. आम्हाला जे करणे गरजेचे आहे ते आम्ही करूच असे ते म्हणाले. अनेकांना वेतनाविना काम करावे लागत असून अनेक जण बिनपगारी रजेवर आहेत तरी या संघराज्य कर्मचाऱ्यांचा अमेरिकी सरकारच्या भूमिकेला पाठिंबा आहे असा दावा करून ते म्हणाले की, या  लोकांना सध्या कामाचे पैसे मिळत नाहीत पण त्यातील अनेक जण आमच्या भूमिकेचे समर्थक आहेत, असे ते म्हणाले. प्रतिनिधिगृहात आता डेमोक्रॅटिक पक्षाचे संख्याबळ वाढले असून टाळेबंदीवर कोणताही तोडगा सध्या दृष्टिपथात नाही. अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प  कुठल्याही सवलती देण्यास तयार नाहीत.

उज्ज्वल निकम यांना राष्ट्रवादीकडून लोकसभा उमेदवारीची चर्चा :
 • मुंबई : विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभेची उमेदवारी देण्याबाबत चर्चा सुरु आहेत. निकम यांना जळगाव मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीच्या गोटातून सुरु आहेत, अशी माहिती समोर येत आहे.

 • राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षाच्या प्रमुख नेत्यांची आज मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत उज्ज्वल निकम यांच्या नावाची चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र याबाबत उज्ज्वल निकम यांना विचारलं असता त्यांनी मौन बाळगणचं पंसत केलं.

 • आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण जोर लावून भाजपला कडवं आव्हान देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. राज्यातील प्रतिष्ठित आणि समाजात चांगली प्रतिमा असलेल्या व्यक्तींना उमेदवारी देण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे उज्ज्वल निकम यांना जळगावातून उमेदवारी देण्याबाबतचा प्रस्ताव पुढे आल्याचं समजतं.

 • उज्ज्वल निकम यांच्या उमेदवारीबाबत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना विचारलं असता त्यांनी याबाबत कल्पना नसल्याचं म्हटलं आहे. उज्ज्वल निकम यांची सामाजिक प्रतिमा चांगली आहे. ते राजकारणात येतील का हे माहित नाही. मात्र ते येत असतील तर त्यांच स्वागत आहे, असं छगन भुजबळ म्हणाले.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

 • १६६५: शिवाजी महाराजांनी सूर्यग्रहणाच्या निमित्ताने राजमाता जिजाऊ व सोनोपंत विश्वनाथ डबीर यांची सुवर्णतुला केली..

 • १८३२: पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी इंग्रजी व मराठीतील पहिले साप्ताहिक वृत्तपत्र दर्पण सुरू केले.

 • १९०७: मारिया माँटेसरी यांनी पहिली माँटेसरी शाळा सुरूकेली. त्यांच्या शाळांमुळे पूर्वप्राथमिक शिक्षणात आमूलाग्र बदल झाला.

 • १९२४: राजकारणात भाग न घेणे व रत्‍नागिरी जिल्ह्यातच राहणे या अटींवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मठेपेतुन सशर्त मुक्तता.

 • १९२९: गोरगरिब व रुग्णांची सेवा करण्यासाठी मदर तेरेसा यांचे कोलकाता येथे आगमन.

जन्म 

 • १४१२: फ्रान्सला परकीय जोखडातून मुक्त करणाऱ्या संत जोन ऑफ आर्क यांचा जन्म.(मृत्यू: ३० मे १४३१)

 • १७४५: बलूनच्यासहाय्याने आकाशात उडण्याचे प्रयोग करणाऱ्या जाक्कास एलियन माँटगोल्फिएर यांचा जन्म.

 • १८१२: मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म. (मृत्यू: १८ मे १८४६)

 • १८२२: उत्खनन करून ट्रॉय आणि मायसेनी या नगरीचा शोध लावणाऱ्या हेन्रीचा श्लीमन यांचा जन्म.

 • १८६८: आधुनिक संतकवी गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ दासगणू महाराज यांचा जन्म. (मृत्यू: २५ नोव्हेंबर १९६२)

 • १९२७: प्रवासवर्णनकार, कथाकार आणि विनोदी लेखक रमेश मंत्री यांचा जन्म. (मृत्यू: १९ जून १९९७)

 • १९२८: नाटककार, चित्रपटकथालेखक, पत्रकार व साहित्यिक विजय तेंडुलकर यांचा जन्म. (मृत्यू: १९ मे २००८ – पुणे, महाराष्ट्र)

 • १९३१: पर्यावरण क्षेत्रातील शा’स्त्रज्ञ, महाराष्ट्र असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्सचे (आघारकर रिसर्च इन्स्टिट्युट) अध्यक्ष डॉ. आर. डी. देशपांडे यांचा जन्म.

मृत्यू 

 • १८४७: दाक्षिणात्य संगीतकार त्यागराज यांचे निधन. (जन्म: ४ मे १७६७)

 • १८५२: अंधांना उपयोगी पडणाऱ्या ब्रेल लिपीचे जनक व शिक्षक लुई ब्रेल यांचे निधन. (जन्म: ४ जानेवारी १८०९)

 • १८८५: आधुनिक हिंदी साहित्याचे जनक भारतेंदू हरीश्चंद यांचे निधन. (जन्म: ९ सप्टेंबर १८५०)

 • १९१९: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकेचे २६वे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रूझवेल्ट यांचे निधन. (जन्म: २७ ऑक्टोबर १८५८)

 • १९७१: जादूगार प्रफुल्लचंद्र तथा पी. सी. सरकार यांचे निधन. (जन्म: २३ फेब्रुवारी १९१३)

 • १९८४: महामहोपाध्याय, वैदिक साहित्याचे अभ्यासक व मराठी कोशकार विद्यानिधी सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव यांचे निधन. (जन्म: १ फेब्रुवारी १८८४)

 • २०१०: लेखक आणि इंग्रजीचे प्राध्यापक प्रल्हाद इरबाजी सोनकांबळे यांचे निधन. (जन्म: १६ जुलै १९४३)

Marathi Newspapers


लोकसत्ता महाराष्ट्र टाईम्स सकाळ लोकमत
पुढारी माझा पेपर सामना ABP माझा
झी २४ तास प्रहार सर्व मराठी वर्तमानपत्र >>

टिप्पणी करा (Comment Below)