चालू घडामोडी - ०६ जुलै २०१८

Date : 6 July, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
देशातील ५० कोटी गरिबांना ‘आयुष्मान’ :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी म्हणून देशाच्या जवळपास ५० कोटी जनतेला आरोग्य विम्याच्या छत्राखाली आणण्याचे ठरविले आहे. ही संख्या दक्षिण अमेरिकेच्या लोकसंख्येएवढी आहे. मात्र, या योजनमागे मोठी राजकीय महत्वाकांक्षा असल्याने या योजनेच्या यशाबाबत विमा क्षेत्रातील तज्ज्ञ शाशंक आहेत.

  • गरीब रुग्णांना विविध आजारांवर मोफत उपचार मिळावेत म्हणून मोदी यांनी ओबामा केअरच्या धर्तीवर भारतातील गरीब जनतेला आरोग्य सेवा मिळावी यासाठी पाच लाखांचा विमा देण्याची घोषणा केली होती. येत्या १५ ऑगस्टपासून त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. यासाठी विविध विमा कंपन्या आणि या योजनेमध्ये समाविष्ट होऊ इच्छिणारी हॉस्पिटल्स यांच्याशी चर्चा सुरू आहे.

  • दारिद्रय़रेषेखाली असलेल्या ४० टक्के नागरिकांसाठी ही योजना कार्यान्वित होणार आहे. अशी मोठी योजना पुरविण्यासाठी खासगी क्षेत्राच्या मदतीशिवाय कोणताही पर्याय नव्हता. विमा कंपन्यांशी बोलणी सुरू असून अद्याप ठरायचे आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी इंदू भूषण यांनी सांगितले.

  • प्रत्येक कुटुंबाला ५ लाखांचे विमा कवच पुरविण्यात येणार आहे. यापूर्वीच्या आरोग्य विमा योजनांद्वारे गेल्या दहा वर्षांत केवळ ६१ टक्के नागरिकांनाच विम्याचा फायदा मिळाला होता असे आकडेवारी सांगते. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार भारतात दरवर्षी ५२ कोटी गरीब नागरिक आरोग्य समस्यांवर पैसे खर्च करतात.

रेल्वेच्या किचनमधून लाईव्ह स्ट्रीमिंग, जेवण कसं बनतं हे प्रवाश्यांना दिसणार :
  • नवी दिल्ली : रेल्वेत मिळणाऱ्या खाद्यपदार्थांची स्वच्छता, दर्जा यांसारख्या अनेक गोष्टींवर नेहमीच प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे. याच पार्श्र्वभूमीवर आयआरसीटीसीकडून लाईव्ह स्ट्रीमिंग मॅकेनिझम तयार केलं आहे. यामुळे प्रवाशांना आता रेल्वेत मिळणारे खाद्यपदार्थ कसे बनवले जातात हे लाइव्ह स्ट्रीमिंगद्वारे पाहता येणार आहे.

  • रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी याबद्दलची माहिती दिली. तर बुधवारी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्विनी लोहानी यांनी आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरील लाईव्ह स्ट्रीमिंग सेवेचं उद्घाटन केलं.

  • या लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे सर्वसामांन्यांना रेल्वेत मिळणारे खाद्यपदार्थ कसे बनवले जातात हे पहायाला मिळणार आहे. आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर हे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येणार असल्याची माहिती रेल्वेने दिली.

१ डॉलर = ६८.९५ रुपये; ऐतिहासिक नीचांकावर भारतीय चलन :
  • डॉलरच्या तुलनेत रूपयाची घसरण सुरूच आहे. गुरूवारी रूपयांत २१ पैशांची घसरण होऊन तो डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या ६८.९५ या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. क्रूड ऑईलच्या किंमती आणि त्यामुळे जागतिक बाजारपेठेतील घडामोडीचा रूपयावर परिणाम होताना दिसतोय.

  • दिवसभरातल्या उलाढालीत रुपयाने ६९ ची पातळी ओलांडली होती, मात्र बाजार बंद होताना तो या पातळीच्या जेमतेम खाली स्थिरावला. यापूर्वी पाचवर्षांपूर्वी म्हणजे २८ ऑगस्ट २०१३ रोजी रूपया ६८.८० पर्यंत आला होता.

  • दिवसभरात रूपयाने ६९ ची पातळी ओलांडली होती. कच्च्या तेलाचे भाव वाढल्याने गुंतवणूकदारांनी भांडवल बाजारातून पैसे काढण्यास सुरूवात केल्याचा फटका रूपयाला बसला. बुधवारी रूपया ६८.८१ रूपयांवर बंद झाला होता.

  • पण आज बाजार सुरू होताच रूपयात पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळाली. ज्या पद्धतीने रूपयाची घसरण सुरू झाली. ती पाहता रूपया विक्रमी ६९ रूपयांच्या निचांकी स्तरावर जाईल अशी शक्यता होती. परंतु, अखेरच्या टप्प्यात यात थोडीफार सुधारणा झाली.

‘टाटा नॅनो’चे उत्पादन बंद होणार :
  • मुंबई  : रतन टाटा यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ‘नॅनो’ गाडीचा प्रवास थांबण्याची शक्यता आहे. कारण जून महिन्यात ‘टाटा नॅनो’ कंपनीच्या अवघ्या तीन गाड्या विकल्या गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा प्रोजेक्ट बंद पडणार असल्याची चर्चा रंगली आहे.

  •  टाटा मोटर्सने जून महिन्यात ‘नॅनो’च्या केवळ एका युनिटचे उत्पादन केले, तर अवघ्या तीन गाड्यांची भारतात विक्री होऊ शकली. तसंच ‘नॅनो’ची निर्यात झाली नसल्याची माहितीही समोर आली आहे. यामुळे कंपनीचे शेअर्सही मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत.

  • मागच्या वर्षीही ‘नॅनो’च्या फक्त 167 गाड्यांची विक्री झाली होती. “नॅनो चे उत्पादन कमी झाल्याची आम्हाला जाणीव आहे, परंतु गाडीचे उत्पादन बंद करण्याबाबत अजून कोणताही निर्णय झाला नाही,”असं नॅनोच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे.

  • सर्वसामान्यांचं चारचाकी गाडी घेण्याचं स्वप्न पूर्ण व्हावं, यासाठी रतन टाटांनी 2007 साली ‘नॅनो’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लॉन्च केला होता. ‘सर्वात स्वस्त चारचाकी गाडी’ अशी ‘नॅनो’ची जाहिरात केली होती. परंतु ‘स्वस्त गाडी’ अशी ‘नॅनो’ची जाहिरात करण्याचा आमचा निर्णय चुकीचा होता,असं 2013 साली रतन टाटा यांनी मान्य केलं होतं.

  • सुरुवातीपासूनच या गाडीला ग्राहकांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. गरीबांची गाडी असा शिक्का बसल्यामुळे ‘टाटा नॅनो’ला मोठा फटका बसला.

भावी ‘सुपरस्टार’ कोण :
  • कोण होऊ शकतो उद्याचा सुपरस्टार? अर्जेंटिना आणि पोर्तुगालच्या गच्छंतीनंतर लिओनेल मेस्सी आणि रोनाल्डो यांचा वारसदार कोण? या दोघांनी निराश केले तरी तिसरा सुपरस्टार नेमार अजूनही रिंगणात आहे. मात्र त्याने आपल्या ‘नाटकी’ वृत्तीमुळे बरीच लोकप्रियता गमावताना फुटबॉल चाहत्यांचा रोष ओढवून घेतला आहे.

  • सुपरस्टारपदाला पोहोचण्यासाठी कष्ट करावे लागतात व त्यासाठी वेळही लागतो. तेव्हा नाव प्रथम समोर येते लुईस सुआरेझचे. २०१२चे लंडन आॅलिम्पिक आणि तिसरा विश्वचषक असा त्याचा प्रवास. वयाच्या ३१व्या वर्षी १०२ आंतरराष्ट्रीय सामन्यांत ५३ गोल केल्यानंतर त्याचा दावा प्रबळ दिसतो.

  • पण चार वर्षांपूर्वी त्याने जॉर्जियो चिएलिनीचा घेतलेला ‘चावा’ त्याला निश्चित सतावत असणार. त्याच्या कारकिर्दीवरचा तो सहजासहजी पुसला न जाऊ शकणारा ‘डाग’! तो पुसण्यासाठी त्याला उरुग्वेला विजेतेपद मिळवून द्यावेच लागेल. त्याचा सहकारी एडिन्सन कॅव्हानीसुद्धा तेथे पोहोचू शकतो. त्यानेही ४५ आंतरराष्ट्रीय गोल केले आहेत. ही लहानसहान कामगिरी नव्हे! एक संधी साधणारा व फ्री-किक्सचा बादशाह अशी त्याची ओळख आहे.

  • या पंक्तीत क्रोएशियाचे ल्युका मॉद्रिक आणि आयव्हन रॅकिटीच बसू शकतात. त्यांना रिआल माद्रिद आणि बार्सिलोनामध्ये बड्यांच्या सावलीत राहावे लागले हे त्यांचे नशीब! कल्पक खेळ करणारा मॉद्रिक एक चांगला ‘स्कोअरर’ आहे. आपले कौशल्य आणि बुद्धिमत्ता यांच्या जोरावर त्याने आपल्या शारीरिक कमजोरीवर मात केली आहे. रॅकिटीच आहे दणकट, तो गोलही करतो; पण तो मॉद्रिकपेक्षा किंचित मागे आहे. 

  • बेल्जियमचे ईडन हॅझार्ड, रोमेलू लुकाकू, ब्राझीलचे विलियन सिल्वा, फिलिफ कुटिन्हियो या तरुणांनी आपले भविष्य उज्ज्वल असल्याचे सिद्ध केले आहे. त्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी ते उत्सुक आहेत. आम्ही वरच्या ‘क्लास’मधले आहोत हे दाखविण्यासाठी ते मेहनत घेत आहेत. पॉल पॉगबा (फ्रान्स) आणि स्पर्धेमध्ये आतापावेतो सर्वाधिक गोल करणारा हॅरी केन (इंग्लंड) यांनीदेखील आपली छाप पाडली आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १७३५: मल्हारराव होळकर आणि राणोजी शिंदे राजपुतान्यात विजयी होऊन पुण्यास परतले.

  • १७८५: डॉलर हे अमेरिकेचे अधिकृत चलन बनले.

  • १८९२: ब्रिटिश संसदेत पहिले भारतीय दादाभाई नौरोजी यांची निवड झाली.

  • १९०८: रॉबर्ट पियरी यांची उत्तर ध्रुवावर जाण्यासाठीची मोहीम निघाली.

  • १९१७: भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेची पुणे येथे स्थापना.

  • १९३९: जर्मनीतील ज्यू व्यक्तींचे उरले सुरले उद्योगधंदे बंद करण्यात आले.

  • १९८२: पुणे – मुंबई मार्गावरील खंडाळा ते मंकी हिल दरम्यान रेल्वेचा भारतातील सर्वात जास्त लांबीचा (त्याकाळातील) वाहतुकीस खुला झाला.

  • २००६: चीन युद्धापासून बंद असलेली भारत तिबेट जोडणारी नाथू ला ही खिंड ४४ वर्षांनंतर व्यापारासाठी खुली झाली.

जन्म 

  • १७८१: सिंगापूरचे संस्थापक सर थॉमस स्टॅम्फोर्ड रॅफल्स यांचा जन्म. (मृत्यू: ५ जुलै १८२६)

  • १८३७: प्राच्यविद्या संशोधक सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑगस्ट १९२५)

  • १८६२: मानववंशशास्रज्ञ एल. के. अनंतकृष्ण अय्यर यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १९३७)

  • १८८१: विदर्भातील संत गुलाबराव महाराज यांचा जन्म. (मृत्यू: २० सप्टेंबर १९१५)

  • १८९०: भारतीय वंशाचे लेखक आणि विद्वान धन गोपाळ मुखर्जी जन्म. (मृत्यू: १४ जुलै १९३६)

  • १९०१: केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुकर्जी यांचा जन्म. (मृत्यू: २३ जून१९५३)

  • १९०५: राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका लक्ष्मीबाई केळकर यांचा जन्म. (मृत्यू: २७ नोव्हेंबर १९७८)

  • १९१४: डब्ल्यूडब्ल्यूई (WWE) चे संस्थापक विन्स मॅकमोहन सिनियर यांचा जन्म. (मृत्यू: २४ मे १९८४)

  • १९२७: लेखक, चित्रकार व्यंकटेश माडगूळकर यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑगस्ट २००१)

  • १९३५: चौदावे दलाई लामा तेनेझिन ग्युत्सो यांचा जन्म.

  • १९४६: अमेरिकेचे ४३वे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांचा जन्म.

  • १९५२: मराठी साहित्यिक रेखा शिवकुमार बैजल यांचा जन्म.

  • १९६१: भारतीय राजकारणी आणि वकील वंदना चव्हाण यांचा जन्म.

  • १९७५: अमेरिकन रॅपर, निर्माते आणि अभिनेते ५० सेंट यांचा जन्म.

  • १९८६: तम्ब्लर चे संस्थापक डेव्हिड कार्प यांचा जन्म.

मृत्यू 

  • १८५४: जर्मन गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ जॉर्ज ओहम यांचे निधन. (जन्म: १६ मार्च १७८९)

  • १९८६: भारताचे ४थेउपपंतप्रधान बाबू जगजीवनराम यांचे निधन. (जन्म: ५ एप्रिल १९०८)

  • १९९७: हिंदी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक चेतन आनंद यांचे निधन. (जन्म: ३ जानेवारी १९२१)

  • २००२: रिलायंस उद्योगसमूहाचे संस्थापक धीरुभाई अंबानी यांचे निधन. (जन्म: २८ डिसेंबर १९३२)

  • २००४: ऑस्ट्रियाचे १०वे राष्ट्राध्यक्ष थॉमस क्लेस्टिल यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.