चालू घडामोडी - ०६ मे २०१८

Date : 6 May, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या 'नीट' परीक्षेला १३ लाख परीक्षार्थी :
  • मुंबई : देशभरात आज वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ‘नीट’ परीक्षा घेतली जात आहे. परीक्षेसाठी यंदा 13.36 लाख विद्यार्थी बसत असून ड्रेसकोडचा नवा नियम यावेळी लागू होत आहे.

  • वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय महाविद्यालयांमधील पदवी अभ्यासक्रमांच्या (एमबीबीएस आणि बीडीएस) प्रवेशांसाठी घेतल्या जाणाऱ्या ‘नीट’ परीक्षेला बसणाऱ्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन लाखांनी अधिक आहे.

  • यावर्षी बीड, बुलडाणा, लातूर, जळगाव, सोलापूर, मुंबई उपनगर या शहरात पहिल्यांदा नीट परीक्षा घेतली जात आहे. 'नीट'ची केंद्र वाढवल्यामुळे परीक्षार्थींची धावपळ कमी होणार आहे.

  • केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) ही परीक्षा देशभरातील 150 शहरांमध्ये घेतली जात आहे. देशात सरकारी आणि खासगी महाविद्यालयांमध्ये मिळून पदवी अभ्यासक्रमाच्या 60 हजार जागा आहेत. या जागांच्या तुलनेत 20 पट अधिक विद्यार्थी ‘नीट’ परीक्षा देणार असल्याने यंदा प्रवेशांमधील स्पर्धा अधिक तीव्र होणार आहे.

संगीत क्षेत्रातला 'शुक्रतारा' निखळला - मुख्यमंत्री :
  • मुंबई: ज्येष्ठ गायक अरूण दाते यांच्या निधनानं मराठी भावविश्वाला शब्दस्वर देणारा एक श्रेष्ठ भावगीत गायक आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

  • मराठी रसिकांमध्ये भावगीतं लोकप्रिय करण्यात श्री. दाते यांचं मोलाचं योगदान आहे. त्यांच्या भावस्पर्शी मखमली आवाजाचा साज ल्यालेली अनेक गाणी अजरामर झाली असून त्यात विशेषतः  भातुकलीच्या खेळामधली  राजा आणिक राणी, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, शुक्र तारा मंद वारा, स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला अशी अनेक गीते संस्मरणीय ठरली आहेत.  त्यांच्या निधनाने मराठी भावगीतांच्या क्षेत्रातील एक शुक्रतारा जणू  निखळला आहे, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी अरुण दाते यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. 

  • ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांचं निधन झालंय. आज सकाळी सहा वाजता कांजूरमार्ग येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी 2 वाजता सायन स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. 4 मे रोजी त्यांचा 84 वा वाढदिवस होता. या निमित्तानं पुण्यात एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र प्रकृती ठिक नसल्यानं ते या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत. 

नॅशनल रेसिंग कार स्पर्धा : पटेल अभियांत्रिकी भारतात तिसरा क्रमांक :
  • शिरपूर (धुळे)  : आर.सी.पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकेल इंजिनिअरिंग शाखेच्या विद्यार्थ्यांनी ‘सोसायटी आॅफ आॅटोमोटिव्ह इंजिनिअर्स’ अंतर्गत घेण्यात येणाऱ्या ‘बाहा -२०१८ नॅशनल रेसिंग कार’ या स्पर्धेत इलेक्ट्रिकल आणि इंजिन बेस कार तयार करुन स्पर्धेत भारतात तिसरा क्रमांक मिळविला.

  • एम बाहा व ई बाहा इव्हेंट ‘बाहा’ ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा भारतामध्ये बाहा सी इंडिया व्यवस्थापित करते़ दरवर्षी भारतातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालय मधील विद्यार्थी या स्पर्धेत सहभाग घेतात. या स्पर्धेत ‘एम बाहा’ व ‘ई बाहा’ असे दोन इव्हेंट असतात.

  • पेट्रोल व इलेक्ट्रीक वाहनाची निर्मिती ‘एम बाहा’ या स्पर्धेतील गाडी पेट्रोल इंजिनवर चालते तर ‘ई बाहा’तील गाडी इलेक्ट्रीक मोटारवर चालते़ आऱसी़ पटेल अभियांत्रिकी महाविद्यालया मधील विद्यार्थी दरवर्षी या दोन्ही स्पर्धांमध्ये सहभाग घेतात. महाविद्यालयाच्या वर्कशॉपमध्ये निर्मिती ‘एम बाहा’ टीमचे नेतृत्व प्रतिक सोनवणे तर ‘ई बाहा’चे नेतृत्व सोहील दोशीने केले होते़ व्हर्च्यूअल फेज ही स्पर्धा चंदीगड येथे झाली होती़ या फेजमध्ये कॉम्प्युटर ग्राफीक्सचा उपयोग करून गाडीचे डिझाईन व कॅक्युलेशन करून गाडीचे मॉडेल सादर केले जाते. 

  • व्हर्च्यूअल फेजनंतर विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातच स्वत: बनवलेली ही गाडी पूर्णत: महाविद्यालयाच्या वर्कशॉपमध्ये तयार केली गेली़ ‘एम बाहा’ ही गाडी आॅल ट्रेरीन व्हेईकल या प्रकारात मोडते. याचा अर्थ, ती कुठल्याही परिस्थित आणि कुठल्याही रस्त्यावर धावण्यास सक्षम असते. ही गाडी पाच विभागात विभागली जाते. सस्पेशन डिपार्टमेंट, डिझाईन, ब्रेक, स्ट्रेअरींग व ट्रॉन्समिशन विभाग असे पाच विभाग असतात. ही गाडी पेट्रोलवर चालते़ या गाडीत अ‍ॅडव्हान्स टेक्नोलॉजीचा वापर केला आहे.

मंगळ अभ्यासासाठी ‘नासा’चे यान झेपावले :
  • वॉशिंग्टन : मंगळ ग्रहावर भविष्यात प्रत्यक्ष माणसाला पाठविण्याआधी तेथील वातावरण व भूगर्भरचनेचा सखोल अभ्यास करण्यासाठी ‘नासा’ने शनिवारी ‘इनसाइट’ हे नवे यान रवाना केले. सन २०१२ मधील ‘क्युरिआॅसिटी रोव्हर’नंतर मंगळावर सोडलेले हे दुसरे यान आहे.

  • कॅलिफोर्नियातील व्हेंडेनबर्ग हवाईदल तळावरून, ‘अ‍ॅटलास-५’ हा अग्निबाण या यानास घेऊन झेपावला. अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरून ‘नासा’ने केलेले हे पहिलेच प्रक्षेपण होते. सर्व नीट झाल्यास ‘इनसाइट’ २६ नोव्हेंबरला मंगळावर उतरेल. तिथे त्यातून एक यांत्रिक हात बाहेर येईल व तोे ‘सेस्मोमीटर’ नावाचे उपकरण मंगळाच्या पृष्ठभागावर ठेवेल.

  • ‘सेस्मोमीटर’ हे उपकरण मंगळावरील भूकंपांचा अभ्यास करेल. दुसरे उपकरण हे खोदकाम करणारे असेल. ते १० ते १६ फूट खणून ग्रहाच्या आतील वातावरणाच्या नोंदी करेल.

चार वर्षांमध्ये किती रोजगार, लवकरच सांगणार मोदी सरकार :
  • नवी दिल्ली: केंद्रातील मोदी सरकार लवकरच चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे. चौथ्या वर्षपूर्तीनिमित्तानं सरकारकडून रोजगार निर्मितीची आकडेवारी जाहीर करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014 मध्ये निवडणूक प्रचारादरम्यान 2 कोटी रोजगार देण्याचं आश्वासन दिलं होतं.

  • मात्र यामध्ये मोदी सरकार अपयशी ठरल्याची टीका काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी अनेकदा केली आहे. त्यामुळेच गेल्या चार वर्षांमध्ये रोजगाराच्या किती संधी निर्माण झाल्या, याची माहिती सरकार देणार आहे. 

  • सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व मंत्रालयांना त्यांच्या विभागांकडून प्रत्यक्ष आणि प्रत्यक्षपणे निर्माण झालेल्या रोजगारांची आकडेवारीची माहिती जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मोदी सरकारच्या चौथ्या वर्षपूर्तीची योजना तयार करणारी समिती या माहितीला प्राधान्य देत असल्याची माहितीदेखील सूत्रांनी दिली.

  • 'सर्व मंत्रालयं आणि संबंधित विभाग ठराविक कालावधीत त्यांच्या कामाची माहिती देत असतात. आता सर्व मंत्रालयं आणि विभागांना रोजगार निर्मितीची आकडेवारी देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. संघटित क्षेत्रातील रोजगाराच्या संधी नेमक्या किती वाढल्या, याची माहिती सरकारच्या विशेष समितीकडून गोळा केली जात आहे,' अशी माहिती सूत्रांनी दिली.

दिनविशेष :
  • आंतरराष्ट्रीय आहार नाही दिन

महत्वाच्या घटना

  • १६३२: शहाजहान बादशहा व आदिलशहा यांच्यामधे शहाजीला पराभूत करण्याबद्दल तह झाला.

  • १८१८: राजधानी रायगड लढवत असताना शेवटच्या बाजीरावाची पत्‍नी वाराणशीबाई इंग्रजांकडून पराभूत झाली.

  • १८८९: पॅरिसमधील आयफेल टॉवरचे उद्‍घाटन झाले.

  • १९४९: ईडीएसएसी पहिले इलेक्ट्रॉनिक डिजिटल संचयित संगणक सॉफ्टवेअर सुरु झाले.

  • १९५४: रॉजर बॅनिस्टर हे १ मैल चार मिनिटांच्या आत धावणारे पाहिले व्यक्ती ठरले.

  • १९८३: अडोल्फ हिटलर यांच्या डायरीचा लबाडी म्हणून खुलासा केला गेला.

  • १९९४: इंग्लिश खाडी खालून जाण‍ाऱ्या आणि इंग्लंड फ्रान्स यांना जोडण‍ाऱ्या युरो टनेलचे इंग्लंडची राणी एलिझाबेथ (दुसरी) आणि फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकॉइस मित्राँ यांच्या हस्ते  उद्‍घाटन झाले.

  • १९९७: बँक ऑफ इंग्लंड ला स्वायत्तता देण्यात आली.

  • १९९९: महाराष्ट्र राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांत महिलांसाठी तीस टक्के आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला.

  • २००१: पोप जॉन पॉल (दुसरे) यांनी सिरीयातील एका मशिदीस भेट दिली. मशिदीस भेट देणारे ते पहिलेच पोप होत.

  • २००२: भूपिंदर नाथ किरपाल यांनी भारताचे ३१ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

  • २०१५: सलमान खान यांना सदोष मनुष्यवधाच्या आरोपास दोषी ठरवून ५ वर्ष्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच सलमान खान यांची हायकोर्टात अपील दाखल करून, जामिनावर सुटका.

जन्म

  • १८६१: मोतीलाल गंगाधर नेहरु भारतीय राजनीतीज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: ६ फेब्रुवारी १९३१)

  • १९२०: जुन्या पिढीतील संगीतकार गायक बुलो सी. रानी यांचा जन्म. (मृत्यू: २४ मे १९९३ – मुंबई)

  • १९४०: प्रसिद्ध महिला तबलावादक, गायिका आणि संगीतज्ञ अबन मिस्त्री यांचा जन्म.

  • १९४३: लेखिका वीणा चंद्रकांत गावाणकर यांचा जन्म.

  • १९५१: भरतनाट्यम नर्तिका, नृत्यदिग्दर्शिका लीला सॅमसन यांचा जन्म.

  • १९५३: ब्रिटनचे पंतप्रधान आणि मजूर पक्षाचे अध्यक्ष टोनी ब्लेअर यांचा जन्म.

मृत्यू

  • १५८९: अकबराच्या दरबारातील एक नवरत्‍न रामतनू पांडे ऊर्फ मोहमाद आट्टा खान तथा संगीतसम्राट तानसेन येथे निधन.

  • १८६२: अमेरिकन लेखक व विचारवंत हेन्‍री थोरो येथे निधन. (जन्म: १२ जुलै १८१७)

  • १९२२: सामाजिक सुधारणांचे कृतिशील पुरस्कर्ते, कला, नाटक, संगीत यांचे प्रोत्साहक छत्रपती शाहू महाराज यांचे निधन.

  • १९५२: इटालियन डॉक्टर शिक्षणतज्ञ मारिया माँटेसरी यांचे निधन. (जन्म: ३१ ऑगस्ट १८७०)

  • १९६६: उदारमतवादी समाजसुधारक, नेमस्त पुढारी आणि शिक्षणज्ज्ञ रँगलर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांचे निधन. (जन्म: १६ फेब्रुवारी १८७६)

  • १९९९: पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथालयाचे पहिले ग्रंथपाल व संस्थापक सदस्य कृष्णाजी शंकर हिंगवे येथे निधन.

  • २००१: विख्यात मराठी कादंबरीकार, लेखिका मालतीबाई बेडेकर यांचे पुणे येथे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.