चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०६ मे २०१९

Date : 6 May, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
फनी चक्रीवादळाने ओडिशामध्ये हाहाकार, मदतकार्य सुरू :
  • भुवनेश्वर - फनी या चक्रीवादळाने ओडिशामध्ये हाहाकार माजवला आहे. या चक्रीवादळात आतापर्यंत 30 हून अधिक जणांना जीव गमवावा लागला आहे. ओडिशातल्या पुरी आणि भुवनेश्वरसह अनेक भागांत विजेचे खांब आणि झाडं उन्मळून पडले आहेत. वीज पूरवठा खंडीत झाला आहे. चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या भागात मदतकार्य सुरू आहे.

  • मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी मदतीची घोषणा केली आहे. पुरीतील सर्व कुटुंबांना आणि खुर्दा जिल्ह्यातील ज्या भागांना फनी चक्रीवादळाचा जास्त फटका बसला आहे, तेथील कुटुंबांना (अन्न सुरक्षा कायद्याचे संरक्षण असल्यास) 50 किलो तांदूळ, 2 हजार रुपये आणि पॉलिथिन शीट्स मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. 

  • नवीन पटनायक यांनी ''तीव्र' फटका बसलेल्या खुर्दा जिल्ह्याच्या उर्वरित भागातील कुटुंबांना तांदळाचा एक महिन्याचा कोटा, 1 हजार रुपये आणि पॉलिथिन शीट्स मिळणार आहेत. वादळाचा 'कमी' फटका बसलेल्या कटक, केंद्रपाडा व जगतसिंगपूर हे जिल्हे तांदळाचा एक महिन्याचा कोटा आणि 500 रुपये मिळण्यास पात्र राहतील' असे म्हटले आहे.

  • तसेच फनी या चक्रीवादळामुळे पूर्णपणे नष्ट झालेल्या घरांसाठी  95100 रुपये तर कमी नुकसान झालेल्या घरांसाठी 5200 रुपये आणि किरकोळ नुकसान झालेल्या घरांसाठी 3200 रुपयांची मदत देण्याचीही घोषणा पटनायक यांनी केली आहे.

‘निकालाची तारीख लवकर जाहीर करू, अफवांवर विश्वास ठेवू नका’ :
  • सीबीएसईच्या दहावीच्या निकालाची तारीख लवकर अधिकृतपणे जाहीर होणार आहे. सोशल मीडियात येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका असे आव्हान सीबीएसई बोर्डाचे जनसंपर्क अधिकारी रमा शर्मा यांनी रविवारी केले आहे.

  • सीबीएसई बोर्डाचा 10वी चा निकाल आज (रविवार)जाहीर होणार आहे अशी अफवा असल्याची घोषणा बोर्डाकडून करण्यात आली आहे. साधारणतः सीबीएसीई बोर्डाचा 12वीचा निकाल लागल्यानंतर दोन ते तीन दिवसांपर्यंत 10वीचा निकाल ही जाहीर करण्यात येत असतो. पण यावेळी मात्र कोणत्याही प्रकारची सूचना सीबीएसीई बोर्डाकडून देण्यात आलेली नाही आहे.

  • सीबीएसई बोर्डाच्या पीआरओ रमा शर्मा यांनी सांगितले की, “सोशल मिडीयावर निकालासंदर्भात पसरवण्यात येणाऱ्या सर्व बातम्या ह्या खोट्या आहेत. सीबीएसई बोर्डाचा 10वी चा निकाल आज जाहीर होणार नाही आहे.” बोर्डाकडून निकालासंदर्भात योग्य ती माहिती पुरवण्यात येईल असे त्या म्हणाल्या. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दहावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. असे सीबीएसीईच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मात्र अद्यापही निश्चित तारीख सांगण्यात आलेली नाही.

Facebook ची 'ही' सुविधा लवकरच होणार बंद :
  • नवी दिल्ली - फेसबुक आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर आणत असतं. मात्र आता फेसबुकने त्यांची एक सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रुप व्हिडिओ चॅटचा प्रमुख अ‍ॅप 'हाऊसपार्टी' चं एक क्लोन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • द वर्जने दिलेल्या रिपोर्टनुसार,  'बोनफायर' या क्लोनिंग अ‍ॅपच्या माध्यमातून फेसबुकने ही सुविधा युजर्सना उपलब्ध करून दिली होती. मात्र या महिन्यात हे अ‍ॅप बंद करण्याचा निर्णय फेसबुकने घेतला आहे. या अ‍ॅपचं टेस्टिंग फेसबुकने 2017 मध्ये सुरू केलं होतं.

  • 'बोनफायर' हे क्लोन अ‍ॅप मे महिन्यात बंद होणार असल्याची माहिती फेसबुकने दिली आहे.  या अ‍ॅपच्या माध्यमातून ज्या काही चांगल्या गोष्टी आम्हाला शिकता आल्या, त्यांचा उपयोग भविष्यात लाँच होणाऱ्या अन्य गोष्टींसाठी आम्ही करू, असं फेसबुकने म्हटलं आहे. फेसबुकवर 'हाऊसपार्टी' नावाची एक ग्रुप व्हिडिओ चॅटिंग सुविधा आहे.

  • जी ओपन केल्यावर युजर्सना कोण-कोण ऑनलाईन आहे हे कळतं आणि ऑनलाईन असलेल्या हव्या त्या व्यक्तीसोबत व्हिडीओ चॅट करता येतं. फेसबुक इन्स्टाग्राम आणि मेसेंजरसारख्या अन्य प्लॅटफॉर्मवर पण ग्रुप व्हिडीओ चॅटसारखे फीचर जोडत आहे. 

फोनी धडकण्यापूर्वी १३ दिवस आधी दिला होता हवामान खात्याने इशारा :
  • नवी दिल्ली : ओडिशामध्ये हाहाकार माजविणारे फोनी चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकण्याच्या आधी १३ दिवस हवामान खात्याने याचा इशारा दिला होता. बंगालची खाडी व विषुववृत्तीय हिंद महासागरात तयार होणारा कमी दाबाचा पट्टा भीषण चक्रीवादळाचे रौद्र रूप घेईल, अशा इशारा देत यावर बारकाईने लक्ष ठेवले होते. त्यामुळेच राज्य सरकारने पुरेपूर खबरदारी घेतली होती व कमीत कमी नुकसान कसे होईल, याकडे लक्ष पुरवत सज्जता ठेवली होती.

  • हवामान खात्याने २१ एप्रिल रोजी मिळालेल्या माहितीच्या आधारावर चक्रीवादळाचे भाकीत केले होते. कमी दाबाचा पट्टा तयार होणे, ही चक्रीवादळाची पहिली पायरी समजली जाते.

  • चक्रीवादळाचे तज्ज्ञ असलेले हवामान खात्याचे अतिरिक्त महासंचालक (सेवा) मृत्युंजय महापात्रा यांनी फोनीच्या हालचालींबाबत माहिती देण्यात व अचूक अंदाज काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. त्यांनी सांगितले की, आमच्या सर्व मानकांनुसार कमी दाबाचा पट्टा भयंकर चक्रीवादळात रूपांतरित होणार आहे, हे सिद्ध होत होते. यासाठी २५ एप्रिलपासून आम्ही विशेष बुलेटिन जारी करणे सुरू केले होते.

  • पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अन्य संस्थांनी केलेल्या मदतीमुळे चक्रीवादळाबाबत अचूक अंदाज वर्तविण्यात आला. नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ ओशन टेक्नॉलॉजी, चेन्नईची बंगालची खाडी व अरबी समुद्रात २० पेक्षा अधिक उपकरणे बसवलेली आहेत. त्यांनी दिलेले पाऊस, समुद्राच्या तापमानातील चढ-उतार व हवेची गती याबाबतचे आकडे एकत्रित करण्यात आले.

  • हवामान खात्याचे महासंचालक के. जे. रमेश यांनी सांगितले की, समुद्रावरील ढगांसह विविध आकड्यांनी कमी दाबाच्या प्रणालीवर निगराणी ठेवण्यासाठी विविध उपग्रहांची मदत मोलाची ठरली. चेन्नई, करिकल, मछलीपट्टणम, विशाखापट्टणम, गोपालपूर, पारादीप, कोलकाता, अगरतलामध्ये लावलेल्या रडारची निरीक्षणेही उपयोगी पडली. फोनी धडकण्यापूर्वी १२ तास आधी हवामान खात्याने संबंधित ठिकाणी प्रत्येक अर्ध्या-अर्ध्या तासाला ताजी माहिती दिली व याशिवाय प्रत्येक तासाला बुलेटिन जारी केले. फोनीने २८ एप्रिल रोजी चक्रीवादळाचे रूप धारण केले. पुढे चालून ते भीषण चक्रीवादळ तीन मे रोजी १७५ ते २०० किलोमीटर वेगाने ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकले; परंतु आधीच मिळालेल्या इशाऱ्यामुळे ओडिशा सरकारने खबरदारी घेतली होती व किनारपट्टीवरील सुमारे ११ लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवले होते.

अकरावीसाठी नवा अभ्यासक्रम :
  • अकरावीसाठी यंदाच्या वर्षांपासून, तर पुढील शैक्षणिक वर्षांपासून बारावीसाठी पुनर्रचित अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे. त्याबाबतचे मसुदे जाहीर करण्यात आले आहेत. लवकरच त्याला अंतिम स्वरुप दिले जाणार आहे.

  • पाठय़पुस्तक मंडळाने अकरावीसाठी शैक्षणिक वर्ष २०१९-२० आणि बारावीचे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून लागू होणारा पुनर्रचित अभ्यासक्रम तयार करताना विषयावर क्षमता विधानांची मांडणी केली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने प्रत्येक विषयाची इयत्तावार चढत्या श्रेणीने मांडणी केली आहे.

  • शिक्षणाचे दैनंदिन व्यवहारात कृतिशील उपयोजन तसेच पुढील शिक्षण संशोधन उद्योग व्यवसाय यासाठी आवश्यक कौशल्याची पायाभरणी, प्रगल्भ आणि जबाबदार नागरिकत्वाचे भान, नवनिर्मिती आणि सर्जनशीलतेचा विकास, भारतीयत्वाचा सार्थ अभिमान, विवेकनिष्ठ दृष्टिकोनाची जोपासना आणि उच्च शिक्षणासाठीची पूर्वतयारी, या नऊ बाबींवर ही मांडणी केली आहे. पाठय़पुस्तक मंडळाच्या संकेतस्थळावर त्याचे मसुदे जाहीर करण्यात आले आहेत.

  • पाठय़पुस्तक मंडळांचे संचालक डॉ. सुनील मगर यांनी याबाबत सांगितले की,  प्रत्येक इयत्तेच्या अखेर आणि उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यावर विद्यार्थी नेमके काय शिकले,याची एक सुस्पष्ट मांडणी करण्याच्या अनुषंगाने क्षमता विधाने तयार करून हा मसुदा तयार करण्यात आला आहे.

  • क्षमता विधानांच्या मसुद्यावर समाजातील जाणकार आणि सर्व संबंधित यांचे अभ्यासपूर्ण अभिप्राय पाठय़पुस्तक मंडळाने मागितला आहे. येत्या १० मेपर्यंत मंडळाच्या संकेतस्थळावर येणाऱ्या अभिप्राय आणि सूचनांचा विचार करून या पुनर्रचित अभ्यासक्रमाच्या मसुद्याला अंतिम स्वरूप दिले जाणार आहे. 

चौकशी समिती प्रमुखांना दोन न्यायाधीश भेटले नाहीत :
  • सर्वोच्च न्यायालयातील माजी महिला कर्मचाऱ्याने सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपाची चौकशी करणाऱ्या अंतर्गत समितीचे प्रमुख न्या. शरद बोबडे यांची न्या. आर. एफ.नरिमन व धनंजय चंद्रचूड यांनी  भेट घेतल्याच्या प्रसारमाध्यमातील बातम्या चुकीच्या असल्याचे रविवारी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

  • सर्वोच्च न्यायालयाच्या महासचिवांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की एका प्रसिद्ध वृत्तपत्राने दोन न्यायाधीश शुक्रवारी सायंकाळी न्या. बोबडे यांना भेटल्याचे वृत्त दिले आहे. सरन्यायाधीशांवरील आरोपाबाबत चौकशी करणाऱ्या अंतर्गत समितीने त्यांच्याकडे आलेल्या माहितीवर चौकशी सुरू केली असून त्यात इतर न्यायाधीशांकडून आलेल्या माहितीचा काही संबंध नाही. न्या. नरिमन व न्या.चंद्रचूड यांनी समितीचे प्रमुख न्या. बोबडे यांची भेट घेतल्याची माहिती खरी नाही. या समितीने एकतर्फी माहितीवर विसंबून पुढे जाऊ नये, असे न्या. नरिमन व न्या. चंद्रचूड यांनी तीन सदस्यीय समितीची भेट घेऊन सांगितल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. माजी महिला कर्मचाऱ्याने सरन्यायाधीशांवर लैंगिक छळाचे आरोप केले असून त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाची विश्वासार्हताच वादात आली आहे.

  • सदर तक्रारदार महिलेने या समितीसमोर पहिले काही दिवस उपस्थित राहिल्यानंतर पुन्हा उपस्थित राहण्यास नकार दिल्यानंतर एकतर्फी निकाल देण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता. न्या. बोबडे यांनी वृत्तसंस्थेला असे सांगितले होते, की ही अंतर्गत प्रक्रिया असून त्यात सदर महिलेस वकिलाची मदत घेता येणार नाही, कारण ही न्यायालयीन सुनावणी नाही तर अंतर्गत चौकशी आहे. अंतर्गत समितीने न्यायमित्र म्हणून एका वकिलाची नेमणूक करावी, अशी सूचना न्या. बोबडे यांची भेट घेणाऱ्या दोन न्यायाधीशांनी केल्याचे सदर वृत्तपत्राने म्हटले होते. या अंतर्गत चौकशी समितीत. न्या. इंदू मल्होत्रा, न्या. इंदिरा बॅनर्जी यांचा समावेश आहे.  ३ मे रोजी सायंकाळी न्या. नरिमन व चंद्रचूड यांनी न्या. बोबडे यांची भेट घेतल्याची बातमी संबंधित वृत्तपत्राने दिली होती.

‘नीट’परीक्षेसाठी कडक नियम नाहकच :
  • नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत देशपातळीवर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची पूर्वपरीक्षा (नीट) रविवार, ५ मे रोजी दुपारी दोन ते पाच या वेळेत होत आहे. देशपातळीवर होत असणाऱ्या परीक्षेचे गांभीर्य टिकवण्यासाठी अतिशय कडक नियम घालून देण्यात आले असून परीक्षेच्या तयारीत अभ्यासाबरोबर पेहराव कसा असावा, यावरही मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली आहेत. ‘अंगापेक्षा बोंगा भारी’ असे त्याचे स्वरूप आहे.

  • देशपातळीवर समान बौद्धिक परीक्षा घेतली जावी या उद्देशाने अकरावी व बारावी विज्ञान शाखेच्या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमावर आधारित ही परीक्षा घेतली जाते. या परीक्षेच्या गुणावर एमबीबीएस, बीएएमएस, बीडीएस, बी.फार्मसी अशा सर्व शाखांचे प्रवेश अवलंबून आहेत.

  • दोन वषार्ंच्या अभ्यासक्रमावर आधारित ही परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ताण असतो. परीक्षा बौद्धिक पातळीची आहे की त्याच्या पेहरावाची आहे हेही कळेनासे व्हावे या पद्धतीने परीक्षेला येताना परीक्षार्थीनी कोणता पेहराव अंगावर ठेवावा यासंबंधीच्या बारीकसारीक सूचना दिल्या आहेत. त्यात विद्यार्थ्यांने बूट वापरू नयेत, त्याऐवजी पायात स्लीपर किंवा साध्या चपला असाव्यात, अंगावर रंगीबेरंगी कपडे असू नयेत, शर्टला कॉलर नसावी, पूर्ण बाहय़ांचा अंगरखा नको, तो अध्र्या बाहय़ाचा असावा, शक्यतो पांढऱ्या रंगाचा असावा, पातळ असावा, अंगरख्याचे बटन मोठे व जाड नकोत, पँट जीनची नको, साधी असावी, विद्याíथनींनी भडक रंगांचे कपडे वापरू नयेत, डोळय़ाला त्रास होणार नाही अशा फिक्या रंगाचे कपडे असावेत, बटन जाड असू नयेत, डोक्याला लावायची पीन बारीक असावी, इतक्या कडक सूचना कशासाठी आहेत, याबद्दलही तपशील देण्यात आलेला नाही.

  • परीक्षेत गरप्रकार होऊ नयेत यासाठीच्या या सूचना असल्या तरी त्याचा मोठा अतिरेक होत असल्याची भावना परीक्षार्थीच्या मनात आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर चार पोलीस, एक पोलीस उपनिरीक्षक अशी पोलिसांची कुमक तनात करण्यात आली आहे.

  • परीक्षा केंद्राच्या परिसरातील मंडळींना विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळात त्रास होणार नाही असे आवाज करू नयेत याबद्दलच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. एकूण लातूर शहरात नीट परीक्षेचे वातावरण जोरदार तयार झाले असून ‘नीटची नाटके’ हा लोकांत चच्रेचा विषय बनला आहे.

दिनविशेष :
  • आंतरराष्ट्रीय आहार नाही दिन

महत्वाच्या घटना 

  • १५४२: सेंट फ्रान्सिस झेव्हिअर तत्कालीन पोर्तुगीज गोव्याची राजधानी ओल्ड गोवा येथे पोहोचला.

  • १६३२: शहाजहान बादशहा व आदिलशहा यांच्यामधे शहाजीला पराभूत करण्याबद्दल तह झाला.

  • १८१८: राजधानी रायगड लढवत असताना शेवटच्या बाजीरावाची पत्‍नी वाराणशीबाई इंग्रजांकडून पराभूत झाली.

  • १८४०: पेनी ब्लॅक नावाचे जगातील पहिले टपाल तिकीट प्रसारित झाले.

  • १८८९: पॅरिसमधील आयफेल टॉवरचे उद्‍घाटन झाले.

  • १९४९: ईडीएसएसी पहिले इलेक्ट्रॉनिक डिजिटल संचयित संगणक सॉफ्टवेअर सुरु झाले.

  • १९५४: रॉजर बॅनिस्टर हे १ मैल चार मिनिटांच्या आत धावणारे पाहिले व्यक्ती ठरले.

  • १९८३: अडोल्फ हिटलर यांच्या डायरीचा लबाडी म्हणून खुलासा केला गेला.

  • १९९४: इंग्लिश खाडी खालून जाण‍ाऱ्या आणि इंग्लंड फ्रान्स यांना जोडण‍ाऱ्या युरो टनेलचे इंग्लंडची राणी एलिझाबेथ (दुसरी) आणि फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकॉइस मित्राँ यांच्या हस्ते  उद्‍घाटन झाले.

  • १९९७: बँक ऑफ इंग्लंड ला स्वायत्तता देण्यात आली.

  • १९९९: महाराष्ट्र राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांत महिलांसाठी तीस टक्के आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला.

  • २००१: पोप जॉन पॉल (दुसरे) यांनी सिरीयातील एका मशिदीस भेट दिली. मशिदीस भेट देणारे ते पहिलेच पोप होत.

  • २००२: भूपिंदर नाथ किरपाल यांनी भारताचे ३१ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

  • २०१५: सलमान खान यांना सदोष मनुष्यवधाच्या आरोपास दोषी ठरवून ५ वर्ष्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच सलमान खान यांची हायकोर्टात अपील दाखल करून, जामिनावर सुटका.

जन्म 

  • १८५६: ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ, आधुनिक मानसशास्त्राचे जनक सिग्मंड फ्रॉइड यांचा जन्म. (मृत्यू: २३ सप्टेंबर१९३९)

  • १८६१: मोतीलाल गंगाधर नेहरु भारतीय राजनीतीज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: ६ फेब्रुवारी १९३१)

  • १९२०: जुन्या पिढीतील संगीतकार गायक बुलो सी. रानी यांचा जन्म. (मृत्यू: २४ मे १९९३ – मुंबई)

  • १९४०: प्रसिद्ध महिला तबलावादक, गायिका आणि संगीतज्ञ अबन मिस्त्री यांचा जन्म.

  • १९४३: लेखिका वीणा चंद्रकांत गावाणकर यांचा जन्म.

  • १९५१: भरतनाट्यम नर्तिका, नृत्यदिग्दर्शिका लीला सॅमसन यांचा जन्म.

  • १९५३: ब्रिटनचे पंतप्रधान आणि मजूर पक्षाचे अध्यक्ष टोनी ब्लेअर यांचा जन्म.

मृत्यू 

  • १५८९: अकबराच्या दरबारातील एक नवरत्‍न रामतनू पांडे ऊर्फ मोहमाद आट्टा खान तथा संगीतसम्राट तानसेन येथे निधन.

  • १८६२: अमेरिकन लेखक व विचारवंत हेन्‍री थोरो येथे निधन. (जन्म: १२ जुलै १८१७)

  • १९२२: सामाजिक सुधारणांचे कृतिशील पुरस्कर्ते छत्रपती शाहू महाराज यांचे निधन.

  • १९४६: भुलाभाई देसाई राजनीतीज्ञ यांचे निधन. (जन्म: १३ ऑक्टोबर १८७७)

  • १९५२: इटालियन डॉक्टर शिक्षणतज्ञ मारिया माँटेसरी यांचे निधन. (जन्म: ३१ ऑगस्ट १८७०)

  • १९६६: उदारमतवादी समाजसुधारक, नेमस्त पुढारी आणि शिक्षणज्ज्ञ रँगलर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांचे निधन. (जन्म: १६ फेब्रुवारी १८७६)

  • १९९५: प्रवचनकार, संत वाङ्‍मयाचे गाढे अभ्यासक, हैदराबाद मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक आचार्य गोविंदराव गोसावी येथे निधन.

  • १९९९: पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथालयाचे पहिले ग्रंथपाल व संस्थापक सदस्य कृष्णाजी शंकर हिंगवे येथे निधन.

  • २००१: विख्यात मराठी कादंबरीकार, लेखिका मालतीबाई बेडेकर यांचे पुणे येथे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.