चालू घडामोडी - ०६ नोव्हेंबर २०१८

Date : 6 November, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
देशाची पहिली आण्विक पाणबुडी आयएनएस अरिहंतचं गस्त अभियान पूर्ण :
  • नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची पहिली आण्विक पाणबुडी आयएनएस अरिहंतचं लोकार्पण केलं. देशवासियांसाठी हे धनत्रयोदशीची भेट असल्याचा उल्लेख यावेळी मोदींनी केला. अरिहंत सोमवारीच आपलं पहिलं गस्त अभियान पूर्ण करुन परतली.

  • अरिहंत या शब्दाचा अर्थ शत्रूचा नायनाट करणारा. आयएनएस अरिहंत ही देशाच्या सुरक्षेची हमी आहे. भारताच्या शत्रूला ही पाणबुडी खुलं आव्हान असल्याचं यावेळी मोदी म्हणाले.

  • आयएनएस अरिहंत ही पाणी, जमीन आणि आकाश अशा तिन्ही स्तरांवर अण्वस्त्राचा मारा करण्यास सक्षम आहे. अरिहंत यापूर्वीच मिराज-2000 आणि अग्नि बॅलेस्टिक मिसाईलने सज्ज होती. मात्र आतापर्यंत नसलेली पाण्यात मारा करण्याची क्षमताही अरिहंतला प्राप्त झाली.

  • पाण्यात मारा करण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी अरिहंतची अनेक परीक्षणं झाली. अरिहंतप्रमाणेच आयएनएस अरिधमानही जवळपास तयार आहे. पुढच्या वर्षी या पाणबुडीचं लोकार्पण होईल.

  • सर्वाधिक पाणबुड्या असलेली अमेरिका (70 पेक्षा जास्त) पहिल्या क्रमांकावर आहे, तर दुसऱ्या स्थानी असलेल्या रशियाकडे 30 पाणबुड्या आहेत. यूके आणि फ्रान्सकडे प्रत्येकी 12 पाणबुड्या आहेत.

पतंजलीची आता कापड उद्योगातही उडी, दिल्लीत पहिल्या शोरुमचं उद्घाटन :
  • नवी दिल्ली : योगगुरु बाबा रामदेव यांची कंपनी पतंजली आता कापड उत्पादन उद्योगामध्येही उतरली आहे. दिवाळीच्या मुहुर्तावर बाबा रामदेव यांनी 'पतंजली परिधान' या नावाने आपल्या पहिल्या शोरुमचं उद्धाटन केलं आहे.

  • दिल्लीतील नेताजी सुभाष प्लेसमध्ये आयोजित उद्धाटन कार्यक्रमात कुस्तीपटू सुशील कुमार, दिग्दर्शक मधुर भंडारकर यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते. येत्या डिसेंबर महिन्यात देशात जवळपास 25 नवीन 'पतंजली परिधान' हे स्टोअर सुरु करण्यात येणार आहेत. 'पतंजली परिधान'मध्ये भारतीय वेशभूषेसह पश्चिम पोशाख आणि इतर एक्सेसरीज मिळणार आहेत.

  • दिल्लीत सुरु करण्यात आलेल्या 'पतंजली परिधान'मध्ये जीन्स 1100 रुपयांना मिळत आहे. मात्र, दिवाळीच्या मुहूर्तावर 15 टक्कयांची सवलतही पतंजलीकडून देण्यात आल्याची घोषणा बाबा रामदेव यांनी केली आहे.

नेट, पेट परीक्षा एकाच दिवशी, विद्यार्थ्यांची पंचाईत :
  • मुंबई  - नेट व पेट परीक्षा एकाच दिवशी असल्याने, पेट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांसह आंबेडकर स्टुडन्ट्स असोसिएशने मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे केली आहे. नेट व पेट परीक्षा देणारे विद्यार्थी एकच असून, दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांची तारांबळ उडण्याची शक्यता संघटनेने व्यक्त केली आहे.

  • संघटनेचे अध्यक्ष सचिन यांनी सांगितले की, नेट (राष्टÑीय पात्रता परीक्षा) व पेट (कला, वाणिज्य, विज्ञान, विधि आणि अभियांत्रिकी शाखेतील पीएच.डी पूर्वपरीक्षा) देणारे विद्यार्थी हे एकच असूनही दोन्ही परीक्षांचे आयोजन १६ डिसेंबरला करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे. नेटची परीक्षा आधीच जाहीर झाल्याने, मुंबई विद्यापीठाने पेट परीक्षा वेगळ्या तारखेला ठेवणे अपेक्षित होते, असे मत सचिन यांनी व्यक्त केले.

  • गेल्या काही दिवसांपासून मुंबई विद्यापीठाला परीक्षा सातत्याने पुढे ढकलाव्या लागत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नव्या कुलगुरूंमुळे विद्यापीठात परिवर्तन होईल, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली होती. मात्र, मागील काही घटना पाहता, हे कुलगुरूही या आधीच्या कुलगुरूंचाच कित्ता गिरवत असल्याची विद्यार्थ्यांची खात्री झाल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

अनुसूचित जातींसाठीच्या उत्पन्न मर्यादेत वाढ :
  • मुंबई  - मान्यताप्राप्त खासगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शिक्षण संस्थांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी पालकांच्या उत्पन्न मर्यादेत वाढ करण्यात आली आहे.

  • या आधी पालकांची उत्पन्न मर्यादा वार्षिक दोन लाख रुपये इतकी होती. आता २.५० लाख वार्षिक उत्पन्न असलेल्या पालकांच्या पाल्यांनाही या योजनेचा फायदा मिळेल. त्यामुळे या योजनेची व्याप्ती वाढणार आहे. सामाजिक न्याय विभागाने सोमवारी या बाबतचा आदेश काढला.

  • दुष्काळसदृष्य परिस्थिती असलेल्या १८० तालुक्यांमध्ये तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारितील अभ्यासक्रमांकरता विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा आदेश उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सोमवारी काढला.

  • ज्या विद्यार्थ्यांना शासनाच्या अन्य शैक्षणिक सवलतीनुसार १०० टक्के परीक्षा शुल्क माफी मिळालेली आहे, जे विद्यार्थी त्याच परीक्षेस दुसऱ्यांदा बसलेले आहेत, बहिशाल आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांचे पालक शहरात राहतात, नोकरी-व्यवसाय करतात परंतु, त्यांच्या नावे गावी शेतजमीन आहे त्यांना ही सवलत लागू नसेल.

आयबी, सीबीआय, रॉमध्ये होणार फेरबदल, हालचालींना वेग :
  • नवी दिल्ली - लवकरच पंतप्रधान कार्यालय (पीएमओ)आणि टॉपच्या तीन गुप्तचर व तपास संस्थांमध्ये मोठे फेरबदल अपेक्षित आहेत. रॉ, आयबी आणि सीबीआय या संस्थांमध्ये प्रमुख पदाच्या व्यक्तींचा शोध सुरू आहे.

  • उच्चसूत्रांनी सांगितले की, ३० नोव्हेंबर रोजी अर्थ व महसूल सचिव हसमुख अधिया सेवानिवृत्त होत आहेत. त्यांना ओएसडी म्हणून पुन्हा घेतले जाऊ शकते. सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत त्यांना मुदतवाढ मिळू शकते. अर्थ मंत्रालयातील व्यवस्था सरकार विस्कळीत करू इच्छित नाही. कॅबिनेट सचिव पदासाठीही त्यांचे नाव चर्चेत होते. मात्र, मोदी यांनी त्यांची नियुक्ती अर्थ मंत्रालयात केली. दरम्यान, १९८५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले जी. सी. मुर्मू यांना महसूल सचिव केले जाऊ शकते.

  • रिसर्च अँड अ‍ॅनालिसिस विंगचे (सचिव अनिल धस्माना जानेवारीत निवृत्त होत आहेत. रॉमध्ये दोन नंबरवर असलेल्या समत कुमार गोयल यांच्या नावाचा विचार पदोन्नतीसाठी होत होता. मात्र, अस्थाना प्रकरणाशी संबंधित सीबीआय वादात त्यांचे नाव आल्यानंतर त्यांच्या पदोन्नतीबाबत अनिश्चितता आहे.

  • आयबीचे संचालक राजीव जैन जानेवारीत निवृत्त होणार आहेत.तेथील विशेष संचालक अरविंद कुमार हे त्यांचे उत्तराधिकारी होऊ शकतात. ते आसामच्या १९८४ च्या बॅचचे अधिकारी आहेत.

  • आलोक वर्मा यांना सीबीआयमध्ये पुन्हा आणले तरी ते १ फेब्रुवारी २०१९ रोजी निवृत्त होतील. या पदासाठी क्रमांक दोनचे अधिकारी राकेश अस्थाना हे स्पर्धेत आहेत. बीएसएफचे प्रमुख रजनीकांत मिश्रा आणि महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक व दिल्लीचे पोलीस आयुक्त अमुल्य पटनायक हे या पदासाठी स्पर्धेत आहेत.

पंडित नेहरूंच्या 'त्या' पत्राने मोदींना आधार, काँग्रेसची बोंब होणार :
  • नवी दिल्ली : आरबीआयसोबत केंद्र सरकारचे उडालेले खटके आणि गव्हर्नर उर्जित पटेल यांना पाठविलेल्या नोटिसीवरून काँग्रेससह विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. मात्र, नोटाबंदीप्रमाणेच यावेळीही मोदी सरकारने काँग्रेसच्या काळातील पुराव्यांचा आधार घेतला आहे. यामुळे काँग्रेस पुन्हा अडचणीत येणार असून निवडणुकीतील आणखी एक मुद्दा हातचा जाण्याची शक्यता आहे. 

  • बऱ्याचदा सध्या उद्भवलेल्या अडचणींतून बाहेर पडण्याचा मार्ग भूतकाळात सापडतो. मोदी सरकारही आरबीआयसोबतच्या वादावर इतिहासात डोकावत आहे. आरबीआय आमि सरकारमध्ये तणावाची ही काही पहिलीच वेळ नाही, तर 1937 मध्येही वाद निर्माण झाले होते. सर जॉन ऑब्सबॉर्न यांनी व्याज आणि विनिमय दरांवरून मतभेद झाल्यानंतर राजीनामा दिला होता. याबाबतची माहिती टाईम्स ऑफ इंडियाने दिली आहे.

  • भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनीही तत्कालीन आरबीआय गव्हर्नर सर बेनेगल रामा राव यांच्याशी वाद घालून त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले होते. हाच मुद्दा काँग्रेसला उर्जित पटेल यांच्याशी झालेल्या मोदी सरकारच्या वादावरून तोंडघशी पाडणार आहे. काँग्रेस भाजपवर आरबीआय या स्वतंत्र संस्थेची प्रतिष्ठा धुळीस मिळवत असल्याचा आरोप करत आहे. 

  • सर बेनेगल रामा राव हे मुलकी खात्यातील अधिकारी होते. यानंतर ते भारताचे चौथे गव्हर्नर बनले. त्यांनी 7.5 वर्षांच्या सेवेनंतर 1957 मध्ये राजीनामा दिला होता. मात्र, तेव्हा नेहरू यांनी अर्थमंत्री टीटी कृष्णमाचारी यांच्या सुरात सूर मिसळत आरबीआय ही सरकारच्या विविध प्रशासनांसारखीच एक भागीदार आहे. 

मालिका विजयासाठी भारत उत्सुक, विंडीजविरुद्ध दुसरी लढत आज :
  • लखनौ - कसोटी आणि वन-डे क्रिकेटमध्ये वर्चस्व कायम राखल्यानंतर आपल्या प्रतिस्पर्ध्याला त्यांच्या आवडीच्या स्वरूपामध्ये पहिल्या लढतीत पराभूत करणारा भारतीय संघ मंगळवारी वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट लढतीत विजयी मोहीम कायम राखत मालिकेत विजयी आघाडी घेण्यास उत्सुक आहे.

  • भारताचा विंडीजविरुद्ध टी-२०मध्ये चार सामन्यांतील पराभवाचा क्रम रविवारी कोलकातामध्ये खंडित झाला. विंडीज संघासाठी हा दौरा आतापर्यंत चांगला ठरलेला नाही. त्यामुळे दुसºया टी-२० सामन्यात भारतीय संघ विजयाचा प्रबळ दावेदार म्हणून मैदानात उतरेल.

  • भारताने रविवारी विजयापूर्वी विंडीजविरुद्ध अखेरचा विजय २३ मार्च २०१४ मध्ये बांगलादेशमध्ये विश्व टी-२० स्पर्धेदरम्यान मिळवला होता. भारताने ईडन गार्डन्सवर पाच विकेट राखून विजय मिळवल्यानंतर विद्यमान विश्व चॅम्पियनविरुद्ध आपला जय-पराभवाचा रेकॉर्ड ५-३ असा केला आहे. ईडन गार्डन्सवर भारताला लक्ष्याचा पाठलाग करताना संघर्ष करावा लागला; पण विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अशा प्रकाराचा विजय महत्त्वाचा ठरतो.

  • महेंद्रसिंह धोनी न खेळलेला हा पहिलाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामना होता. कारण त्याला संघातून वगळण्यात आले आहे. त्याला फलंदाजीमध्ये लौकिकाला साजेशी कामगिरी करता येत नसली तरी यष्टिरक्षण करताना त्याची चपळता आणि त्याला असलेली क्रिकेटची जाण संघासाठी महत्त्वाची ठरते.

  • कोहलीच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व करीत असलेला रोहित शर्मा पहिल्या लढतीत अपयशी ठरला. तो दुसºया लढतीत हे अपयश पुसून टाकण्यासाठी प्रयत्नशील राहील. या स्टेडियममधील हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना राहील.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १६६५: सर्वात जुने जर्नल लंडन गॅझेट पहिल्यांदा प्रकाशित झाले.

  • १८७५: सुजलाम् सुफलाम्, मलयज शीतलाम्, साश्यशामलाम्, मातरम् वंदे…! वंदे मातरम् असे भारतमातेचे वर्णन करणारे गीत बंकिमचंद्र यादावचंद्र चटर्जी यांनी लिहिले.

  • १८७९: वासुदेव बळवंत फडके यांना जन्मठेप (काळ्यापाण्याची) शिक्षा ठोठवण्यात आली.

  • १९१७: पहिले महायुद्ध – गाझाच्या तिसर्‍या लढाईत ब्रिटिश फौजांनी गाझा ताब्यात घेतले.

  • १९३६: प्रभात चा संत तुकाराम हा चित्रपट पुण्यातील प्रभात चित्र्पटगृहात रिलीज झाला.

  • १९४४: फ्रँकलिन डी. रूझवेल्ट चौथ्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले.

  • १९५१: एम. पातंजली शास्त्री यांनी भारताचे २ रे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

  • १९९०: मेरी रॉबिन्सन या आयर्लंडच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनल्या.

  • २००१: बेल्जियमची राष्ट्रीय विमान वाहतुक कंपनी सबीना (SABENA) दिवाळखोरीत गेली.

जन्म 

  • १८५८: लाल-बाल-पाल या त्रयीतील स्वातंत्र्यसेनानी बिपिन चंद्र पाल यांचा जन्म. (मृत्यू: २० मे १९३२)

  • १८६७: नोबेल पारितोषिक विजेत्या पोलिश-फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ मेरी क्यूरी यांचा वाॅर्सा पोलंड येथे जन्म. (मृत्यू: ४ जुलै १९३४)

  • १८६८: व्याकरणकार व निबंधकार मोरो केशव दामले यांचा जन्म. (मृत्यू: ३० एप्रिल १९१३)

  • १८७९: रशियन क्रांतिकारक लिऑन ट्रॉट्स्की यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑगस्ट १९४०)

  • १८८४: क्रांतिकारक, विद्वान, कृषीतज्ञ, इतिहासकार आणि गदर पार्टी चे शिल्पकार डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचा जन्म. (मृत्यू: २२ जानेवारी १९६७)

  • १८८८: नोबेल पारितोषिक विजेते भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकट रमण यांचा जन्म. (मृत्यू: २१ नोव्हेंबर १९७०)

  • १९००: स्वातंत्र्यसैनिक, संसदपटू, शेतकरी चळवळीतील नेते आणि काँग्रेसचे पुढारी प्रा. गोगिनेनी रंगा नायकुलू ऊर्फ एन. जी. रंगा यांचा जन्म. (मृत्यू: ९ जून १९९५)

  • १९०३: शिक्षणशास्त्र, मानस व बालमानस या विषयांचे लेखक भास्कर धोंडो कर्वे यांचा जन्म.

  • १९१५: महाराष्ट्रातील विचारवंत व शिक्षणतज्ञ गोवर्धन धनराज पारिख यांचा जन्म..

मृत्यू 

  • १८६२: दिल्लीचा शेवटचा बादशहा बहादूरशहा जफर यांचे निधन. (जन्म: २४ ऑक्टोबर १७७५)

  • १९०५: आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाणारे एक श्रेष्ठ कवी कृष्णाजी केशव दामले तथा केशवसुत यांचे हुबळी येथे निधन. (जन्म: ७ ऑक्टोबर १८६६)

  • १९२३: भारतीय शिक्षक अश्विनीकुमार दत्ता यांचे निधन. (जन्म: २५ जानेवारी १८५६)

  • १९४७: भारतीय-श्रीलंकेचे पत्रकार आणि राजकारणी के. नतेसा अय्यर यांचे निधन.

  • १९६३: मराठी लघुकथाकार व प्रसाद मासिकाचे संपादक यशवंत गोपाळ तथा य. गो. जोशी यांचे निधन. (जन्म: १७ डिसेंबर १९०१)

  • १९८०: हॉलिवूड अभिनेता स्टीव्ह मॅकक्‍वीन यांचे निधन. (जन्म: २४ मार्च १९३०)

  • १९८१: अमेरिकन इतिहासकार व तत्त्वज्ञ विल डुरांट यांचे निधन. (जन्म: ५ नोव्हेंबर १८८५)

  • १९९८: शास्त्रीय गायक, संगीतकार व शास्त्रीय संगीताचे अभ्यासक पं. जितेंद्र अभिषेकी यांचे निधन. (जन्म: २१ सप्टेंबर १९२९)

  • २०००: ज्येष्ठ गांधीवादी नेते, माजी केंद्रीयमंत्री, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आणि हरितक्रांतीचे अध्वर्यू सी.सुब्रह्मण्यम यांचे निधन. (जन्म: ३० जानेवारी १९१०)

  • २००९: लेखिका व स्वातंत्र्यसैनिक सुनीता देशपांडे यांचे निधन. (जन्म: ३ जुलै १९२६)

  • २०१५: भारतीय दिग्दर्शक आणि कवी बाप्पादित्य बंदोपाध्याय यांचे निधन. (जन्म: २८ ऑगस्ट १९७०)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.