चालू घडामोडी - ०६ ऑक्टोबर २०१८

Date : 6 October, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
डेनिस मुकवेगे आणि नादिया मुराद यांना शांततेसाठीचा नोबेल जाहीर :
  • स्टॉकहोम | शांततेसाठी दिल्या जाणाऱ्या 2018 सालच्या नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहेत. यावर्षी डेनिस मुकवेगे आणि नादिया मुराद यांना शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार दिला जाणार आहे. या दोघांनीही  युद्धभूमीवर लैंगिक अत्याचारांचा वापर शस्त्रासारखा करण्याविरोधात लढा सुरु केला होता.

  • यावर्षीच्या शांततेसाठीच्या नोबेलसाठी एकूण 331 जणांना नामांकन देण्यात आलं होतं. यात 216 व्यक्ती तर 115 संघटनांचा समावेश आहे. 2016 साली शांततेसाठीच्या नोबेलसाठी 376 व्यक्तींना नामांकन देण्यात आलं होतं, त्यामुळे यावर्षी नामांकनासाठीची दुसरी सर्वात मोठी संख्या होती.

  • आतापर्यंत शांततेसाठी 98 नोबेल पुरस्कार देण्यात आले आहेत.  ज्यात 104 व्यक्ती आणि 27 संघटनांचा समावेश आहे. एकूण 104 नोबेल विजेत्यांपैकी 16 महिलांना हा पुरस्कार मिळाला आहे.

  • 2017 साली ICAN संस्थेला शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. ही संस्था आण्विक शस्त्रांविरोधात काम करते. इंटरनॅशनल कँपेन टू एबोलिश न्यूक्लीअर वेपन्स असं या संस्थेचं पूर्ण नाव आहे.

अमेरिकेला न घाबरता भारत-रशियामध्ये महत्वाचा शस्त्रास्त्र करार :
  • नवी दिल्ली : भारत आणि रशिया या दोन देशांच्या जुन्या मैत्रीचा एक नवा अध्याय आज दिल्लीत लिहिला गेलाय. रशियाची ‘एस-400’ ही जगातली सर्वात आधुनिक मिसाईल सिस्टीम या करारानुसार आता भारत खरेदी करणार आहे. 39 हजार कोटी रुपयांत पाच मिसाईल भारताला मिळणार आहेत.

  • खरंतर असे द्विपक्षीय करार अनेकदा होत असतात, मात्र आजच्या कराराचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे आहे की अमेरिकेच्या  धमकीला भीक न घालता भारतानं हे पाऊल उचललंय. अमेरिकेनं रशियावर निर्बंध लादलेत आणि इतर देशांनीही रशियाकडून कुठल्याही पद्धतीची शस्त्रास्त्र खरेदी करु नये यासाठी कालच अमेरिकेनं चेतावणी जाहीर केलीय. पुतीन भारतात येण्याच्या एक दिवस आधीच अमेरिकेने हा इशारा दिलेला.

  • संरक्षण आणि अवकाश मोहीम या दोन क्षेत्रात रशियाची मोठी मदत आजच्या करारानं होणार आहे. त्यातही ‘एस-400’ ही मिसाईल सिस्टीमची खरेदी भारताची सुरक्षा आणखी भक्कम करणार आहे.

  • देशात सध्या राफेल डीलवरुन राजकीय वातावरण पेटलेलं असतानाच संरक्षण क्षेत्रातली ही अजून एक महत्वाची डील पार पडतेय. 2020 पर्यंत या एस-400 मिसाईलची डिलिवरी भारताला होणार आहे. त्याआधी सप्टेंबर 2019 मध्येच राफेल विमानं भारतात दाखल होणं अपेक्षित आहे. या दोन्हीमुळे भारतीय हवाई दलाची ताकद काही पटींनी वाढणार आहे.

काय आहे रशियाची S-४०० वायु संरक्षण प्रणाली :
  • मुंबई : रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या भारत दौऱ्याकडे जगाचं लक्ष आहे. याचं कारण म्हणजे अमेरिकेच्या इच्छेविरोधात जाऊन भारत एस-400 ही वायु संरक्षण प्रणाली खरेदी करणार आहे. भारत 39 हजार कोटींपेक्षा जास्त किंमतीत पाच S-400 सिस्टम घेणार आहे, ज्याची डिलीव्हरी 2020 पर्यंत होणं अपेक्षित आहे.

  • भारतासारख्या देशाला हवाई क्षेत्राचं संरक्षण हे मोठं आव्हान आहे. विशेष म्हणजे चीन आणि पाकिस्तानसारखे सतत कुरापती करणारे देश शेजारी असताना भारताला सज्ज असणं ही काळाची गरज आहे. भारतीय वायु सेनेची ताकद आणखी वाढवणारी एस-400 ही सिस्टम एक 'बूस्टर डोस' असेल, असं खुद्द एअर चीफ मार्शल बी. एस. धानोआ यांचं म्हणणं आहे.

  • काय आहे S-४०० - ही एक एअर डिफेन्स मिसाईल सिस्टम म्हणजे वायु संरक्षण प्रणाली आहे, जी जमिनीवरुनच शत्रूचं विमान 400 किमी अंतरावर पाडू शकते. 30 किमी उंची आणि 400 किमी दूर क्षेत्रातील कोणतंही लढाऊ विमान पाडण्याची यामध्ये क्षमता आहे.

  • S-400 एकाच वेळी 100 लक्ष्य ट्रॅक करु शकते, तर 36 लढाऊ विमानांवर एकाच वेळी हल्ला करु शकते. रशियाची ही सर्वात अद्ययावत टेक्निक आहे, जी जमिनीवरुन जमीन, हवा आणि पाण्यातही शत्रूवर वार करु शकते.

  • S-400 ही S-300 या वायु संरक्षण प्रणालीचं पुढचं व्हर्जन आहे, जे रशियात 2007 पासून कार्यरत आहे. रशियाच्या पूर्वीच्या सिस्टमपेक्षा S-400 ही दुप्पट शक्तीशाली आहे, जी फक्त पाच मिनिटात कार्यरत होऊ शकते, असं आर्मी टेक्नॉलॉजी या वेबसाईटने म्हटलं आहे.

राज्यात दुष्काळ आहे की नाही - ३१ ऑक्टोबरनंतर जाहीर होणार :
  • मुंबई : केंद्र शासनाच्या निकषांवर राज्यात दुष्काळबाबत आढावा घेण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. तीन टप्प्यात हा आढावा घेतला जाणार असून, दुष्काळ जाहीर करण्याबाबत 31 ऑक्टोबरनंतर निर्णय घेतला जाईल. आज याबाबत महसूल आणि कृषी विभागाची मंत्रालयात महत्वपूर्ण बैठक पार पडली.

  • दुष्काळाबाबत तीन महत्त्वाचे निकष केंद्राने निश्चित केले असून त्यापैकी पहिल्या टप्प्यातील आढावा घेण्याचे काम पूर्ण झालं आहे. सध्या दुसऱ्या टप्प्यातील आढावा घेण्याचं काम युद्धपातळीवर सुरु असून तो पुढील आठवड्यात पूर्ण होणार आहे. तर तिसऱ्या टप्प्याचे काम 31 ऑक्टोबरपर्यंत पुर्ण होईल. या आढाव्यानंतर राज्यात किती जिल्ह्यात आणि तालुक्यात दुष्काळ आहे हे जाहीर केलं जाणार आहे.

  • विशेष म्हणजे, दुष्काळाच्या परिस्थितीच्या विश्लेषणासाठी  'महामदत' नावाचे एक अॅप आज लाँच करण्यात आलं. या माध्यमातून राज्य सरकार जिल्हाधिकर्यांमार्फत माहिती केंद्राकडे पोहचवली जाणार.

  • राज्यातल्या अनेक ठिकाणी कमी पाऊस पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे सरकारी सर्वेक्षणानंतर मदत मिळण्याच्या आशेवर बळीराजा आहे.

दहावी-बारावी बोर्ड परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर :
  • पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक (इयत्ता दहावी) आणि उच्च माध्यमिक (बारावी) बोर्डाच्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी 2019 ते 20 मार्च 2019 या कालावधीत घेतली जाणार आहे, तर दहावीची परीक्षा 1 मार्च 2019 ते 22 मार्च 2019 दरम्यान घेण्यात येईल.

  • विद्यार्थ्यांच्या मनावरचा ताण कमी व्हावा आणि अभ्यासक्रमाचं नियोजन करता यावं, यासाठी यावर्षी दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या संभाव्य तारखा लवकर जाहीर करण्यात आल्याचं शिक्षण मंडळातर्फे सांगण्यात आलं.

  • गुरुवार 21 फेब्रुवारी 2019 ते बुधवार 20 मार्च 2019 या कालावधीत बारावीची, तर शुक्रवार 1 मार्च 2019 ते शुक्रवार 22 मार्च 2019 दरम्यान दहावीची लेखी परीक्षा घेण्यात येईल. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांतर्फे ही परीक्षा घेण्यात येईल.

  • 5 ऑक्टोबर 2018 रोजी www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.

रेल्वे, अवकाश कार्यक्रमासह भारत-रशियामध्ये आठ करार :

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात हैदराबाद हाऊस येथे झालेल्या बैठकीनंतर दोन्ही देशांनी संयुक्त निवेदन जारी केले.

  1. भारत आणि रशियामध्ये एकूण आठ करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

  2. संरक्षणासह रेल्वे, अवकाश, अण्वस्त्र सहकार्यासंबंधी दोन्ही देशांमध्ये महत्वाचे करार झाले.

  3. भारत-रशिया संबंधांचे हे नवे युग आहे – पंतप्रधान मोदी

  4. भारताने नेहमीच रशियासोबतच्या संबंधांना प्राधान्य दिले आहे. भारताच्या प्रगतीमध्ये नेहमीच रशियाचा वाटा राहिला आहे – पंतप्रधान मोदी.

  5. दहशतवादाविरोधात लढण्यात दोन्ही देशांचा फायदा आहे. एससीओ, ब्रिक्स, जी २० आणि आशियन या आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये दोन्ही देश परस्परांना सहकार्य करतील – पंतप्रधान मोदी.

  6. पुतिन यांनी मोदींनी रशियात होणाऱ्या व्हलादिव्होस्तोक परिषदेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले.

  7. मी पंतप्रधान मोदींना सीरियामधल्या परिस्थितीची माहिती दिली. अमेरिकेने इराण बरोबरच्या करारातून माघार घेतल्यामुळे जी परिस्थिती निर्माण झालीय त्यावर आम्ही दोघांनी चर्चा केली – पुतिन

  8. दोन्ही देशांची विशेष रणनितीक भागीदारी नव्या उंचीवर पोहोचेल – पंतप्रधान मोदी

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १९४९: पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते खडकवासला येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (NDA) इमारतीची कोनशिला बसवण्यात आली.

  • १९६३: पुणे आकाशवाणी केंद्राचे सांगली हे उपकेंद्र सुरू झाले.

  • १९८७: फिजी प्रजासताक बनले.

  • २००७: जेसन लुइस याने वल्ह्याच्या होडीतुन पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.

जन्म 

  • १९१२: अणूरसायन शास्त्रज्ञ, प्राध्यापक डॉ. हरी जीवन तथा एच. जे. अर्णीकर यांचा जन्म. (मृत्यू: २२ नोव्हेंबर२०००)

  • १९१३: कवी केशवसुत पारितोषिक विजेते कवी वामन रामराव तथा वा. रा. कांत यांचा जन्म. (मृत्यू: ८ सप्टेंबर१९९१)

  • १९१४: नॉर्वेजियन दर्यावर्दी व संशोधक थोर हेअरडल यांचा जन्म. (मृत्यू: १८ एप्रिल २००२)

  • १९४३: संत साहित्याचे गाढे अभ्यासक, साक्षेपी समीक्षक व संशोधक डॉ. रत्‍नाकर मंचरकर यांचा जन्म. (मृत्यू: २० फेब्रुवारी २०१२)

मृत्यू 

  • १६६१: शिखांचे ७ वे गुरू गुरू हर राय यांचे निधन. (जन्म: २६ फेब्रुवारी १६३०)

  • १९७४: भारताचे संरक्षणमंत्री व्ही. के. कृष्ण मेनन यांचे निधन. (जन्म: ३ मे १८९६)

  • १९७९: इतिहासकार, लेखक, वक्ते आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू, पद्मविभूषण महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांचे निधन. (जन्म: ५ ऑगस्ट १८९०)

  • २००७: महाराष्ट्राचे ९ वे मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांचे निधन. (जन्म: १५ जानेवारी १९२१)

  • २००७: लोकसभा सदस्य, कायदेपंडित, विद्वान, मुत्सद्दी व भारताचे इंग्लंडमधील राजदूत एल. एम. सिंघवी यांचे निधन. (जन्म: ९ नोव्हेंबर १९३१)

  • २०१५: हंगेरी देशाचे पहिले अध्यक्ष अरपॅड गॉन्कझ यांचे निधन. (जन्म: १० फेब्रुवारी १९२२)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.