चालू घडामोडी - ०६ सप्टेंबर २०१८

Date : 6 September, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘आधार’ नाही म्हणून विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारू नका, यूआयडीएआयने बजावले :
  • आधार कार्ड नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश नाकारता येणार नाही अशा शब्दांमध्ये आधार कार्ड बनविणाऱ्या युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (यूआयडीएआय) देशातील शाळा आणि शैक्षणिक संस्थांना बजावले.

  • बहुतांश शाळांनी विद्यार्थ्य़ांना आधार कार्डची सक्ती केली होती, यामुळे बऱ्याच मुलांना शिक्षणापासून लांब रहावे लागत होते. आता यूआयडीएआईने याविरोधात पाऊल उचलले असून केवळ आधारकार्ड नाही म्हणून देशातील एकाही विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा हक्क नाकारला जाऊ नये असे आमचे धोरण आहे असं युआयडीआयने स्पष्ट केलं आहे.

  • कोणत्या विद्यार्थ्याकडे आधार कार्ड नसेल तर त्याची ओळख पटवण्यासाठी अन्य कागदपत्रांचा वापर करावा, पण कोणत्याही विद्यार्थ्याला त्याच्या मुलभूत अधिकारांपासून दूर ठेवू नये, अशा प्रकारची शाळांची मनमानी बेकायदेशीर आहे, असंही यूआयडीएआयने म्हटलं आहे.

  • शाळा आणि शैक्षणिक संस्थांनी विभागातील बँका, पोस्ट कार्यालये, राज्याचा शिक्षण विभाग आणि जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधावा आणि आधारकार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष शिबिरे आयोजित करावीत, असंही यूआयडीएआयने सांगितलं.मुलांना आधार नसल्यामुळे प्रवेश नाकारणे बेकायदेशीर असल्याचे यूआईडीएआईने म्हटले आहे. याबाबतचे पत्र सर्व राज्यांच्या सचिवांना पाठविण्यात आले आहे.

सुहास बहुळकर यांना सांस्कृतिक जीवनगौरव पुरस्कार :
  • मुंबई : चतुरंग प्रतिष्ठानचा सांस्कृतिक जीवनगौरव पुरस्कार यंदा चित्रकार सुहास बहुळकर यांना जाहीर झाला आहे. डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखालील डॉ. उदय निरगुडकर , डॉ. कविता रेगे, दीपक घैसास, चंद्रकांत कुलकर्णी, सुधीर जोगळेकर आणि रवींद्र पाथरे यांच्या निवड समितीने यंदाच्या सांस्कृतिक क्षेत्रीय पुरस्कारासाठी एकमताने ही निवड केली आहे.

  • चतुरंग प्रतिष्ठानतर्फे १९९१ पासून दरवर्षी सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक यापैकी स्वीकृत क्षेत्रात मौलिक कार्याने लक्षणीय भर घालून देशाचे नाव समृद्ध करणाऱ्या व्यक्तीला जीवनगौरव पुरस्कार देण्यात येतो. मानपत्र, सन्मानचिन्ह आणि तीन लाख रुपयांचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या जीवनगौरव पुरस्काराच्या प्रदानाचा दोन दिवसीय रंगसंमेलन सोहळा डिसेंबर २०१८मध्ये मुंबईत करण्याचा संस्थेचा मानस आहे.

  • चित्रकलेसारख्या अभिजात, ललित कलाशाखेत अखंड कार्यरत राहून केवळ आंतरराष्ट्रीय ख्यातीचा चित्रकार हा सन्मानच मिळविला. या पुरस्काराविषयी सुहास बहुळकर यांनी सांगितले की, हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या अंगभूत आणि निष्ठापूर्ण कलाप्रेमाला रसिक समाजाचे कृतज्ञ वंदन आहे.

कलम ३७७ समलिंगी संबंध: सुप्रीम कोर्टाकडे देशाचं लक्ष :
  • Section 377 Verdict नवी दिल्ली: समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणारं कलम 377 च्या वैधतेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या महत्त्वपूर्ण निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलं आहे. 2009 मध्ये दिल्ली हायकोर्टाने समलैंगिक संबंध हा गुन्हा नसल्याचं म्हटलं होतं.

  • मात्र 2013 मध्ये सुप्रीम कोर्टाने हा निर्णय फिरवल्याने अनेकांची निराशा झाली. समलैंगिकतेला गुन्हा ठरवणाऱ्या या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाल्या. 17 जुलैला त्यावरची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर खंडपीठाने हा निर्णय राखून ठेवला आहे. आता पाच न्यायमूर्तींचं खंडपीठ यावर निर्णय देणार आहे.

  • सरन्यायाधीश दीपक मिश्रा दोन ऑक्टोबरला निवृत्त होण्याच्या आधी आधार वैधता, शबरीमला, राम मंदिर डे-टु-डे सुनावणी यासारख्या अनेक महत्त्वाच्या केसेसचा निकाल देणार आहेत. त्या रांगेतली ही आजची पहिली केस आहे.

  • 1860 पासून आयपीसीमध्ये कलम 377 अंतर्गत समलैंगिकता हा गुन्हा ठरवला गेला आहे. जवळपास दीडशे वर्षे झाली तरी कायदा बदलला नाही.

वाघांच्या मृत्यूबाबत पहिल्यांदाच सीबीआय चौकशीचे आदेश :
  • नैनीताल : कॉर्बेट व्याघ्र प्रकल्पात गेल्या पाच वर्षांत वाघांच्या झालेल्या मृत्यूची तसेच त्यात वाघांच्या शिकारीत वन अधिकाऱ्यांच्या असलेल्या सहभागाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश उत्तराखंड उच्च न्यायालयाने दिले आहेत. हंगामी मुख्य न्यायाधीश राजीव शर्मा व न्या. लोकपाल सिंह यांनी मंगळवारी हे आदेश जारी केले.

  • न्यायालयाने सांगितले, की वाघांच्या शिकारीत वन अधिकाऱ्यांचे असलेले संबंधही शोधून काढा. या बाबत चौकशी करून प्राथमिक अहवाल तीन महिन्यांत सीलबंद पाकिटात न्यायालयास सादर करण्यात यावा. यात सीबीआय वन्यजीव विभागाची मदत घेऊ शकते.

  • न्यायालयाला असे सांगण्यात आले, की एकूण नऊ वाघांचे मृत्यू झाले, त्यातील सहा नैसर्गिक होते. ‘न्यायालय सहसा अशा प्रकरणात सीबीआय चौकशीचे आदेश देत नाही, पण ही दुर्मिळात दुर्मिळ प्रकरण असल्याने त्यात सीबीआयच्या तज्ज्ञतेची आवश्यकता तपास प्रक्रियेत आहे त्यामुळे असे आदेश देण्यात आले आहेत’  असे न्यायालयाने स्पष्ट केले.

  • न्यायालयाने मांडलेल्या निरीक्षणानुसार अडीच वर्षांत ४० वाघ व २७२ बिबटय़ांचा राज्यात मृत्यू झाला आहे. वृत्तपत्रातील बातम्यांनुसार हरयाणातील बावरिया टोळी ही उत्तराखंडमध्ये शिकारीत सक्रिय आहे. पोलीस महासंचालकांनी या बाबत विशेष तपास पथक वरिष्ठ पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली नेमून या टोळीचा बंदोबस्त करावा असा आदेशही न्यायालयाने दिला आहे.

  • कॉर्बेट व्याघ्र प्रकल्पात धुलवा व धुमंदा येथील ३१८.८० हेक्टर जमीन समाविष्ट नाही. त्याची दखल न्यायालयाने घेतली असून तो भाग एक महिन्यात व्याघ्र प्रकल्पात समाविष्ट करण्यास सांगितले आहे.

देशांतर्गत हवाई प्रवाशांच्या संख्येत जुलै महिन्यात १८ टक्क्यांची वाढ :
  • मुंबई : भारतातील देशांतर्गत हवाई प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत १८.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या १३ महिन्यांतील ही १२व्या वेळी सातत्याने झालेली वाढ आहे. दुहेरी आकड्यात झालेली ही वाढ सलग ४७व्या महिन्यात झाली आहे.

  • आशिया खंडात भारतापाठोपाठ चीनच्या देशांतर्गत हवाई प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली असून चीन दुसºया क्रमांकावर आहे. चीनमध्ये झालेली वाढ १४.८ टक्के आहे. इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन (आयएटीए) च्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. जुलै २०१७च्या तुलनेत जुलै २०१८मध्ये झालेली ही वाढ आहे.

  • जागतिक पातळीवर प्रति किलोमीटर प्रवासी महसूल वाढीच्या दरात गेल्या वर्षाच्या जुलैपर्यंतचा दर ६.२ टक्के आहे. जूनच्या तुलनेत त्यामध्ये घट झाली आहे. जूनमध्ये हा दर ८.१ टक्के होता.

  • जागतिक पातळीवर जानेवारी ते जुलै या २०१७च्या तुलनेत यामध्ये वाढ झाली असून यंदा ६.९ टक्के दर गाठण्यात यश आले आहे. आशिया पॅसिफिक क्षेत्रामध्ये गेल्या तीन महिन्यांत प्रथमच वाढ झाली आहे. जागतिक पातळीवर देशांतर्गत हवाई प्रवाशांच्या संख्येत मात्र काहीशी घट झाली आहे. जून महिन्यात ही वाढ ८.० टक्के होती ती जुलैमध्ये ७.८ टक्के झाली आहे.

  • जागतिक पातळीवर एकूण हवाई क्षेत्रापैकी ६३.८ टक्के हिस्सा आंतरराष्ट्रीय प्रवासाचा आहे तर ३६.२ टक्के हिस्सा देशांतर्गत प्रवासाचा आहे. एकूण हवाई प्रवासाच्या ६३.८ टक्के असलेल्या आंतरराष्ट्रीय

  • प्रवास भागामध्ये सर्वाधिक हिस्सा युरोप खंडाचा २३.७ टक्के आहे, तर त्याखालोखाल आशिया पॅसिफिक विभागाचा १८.५ टक्के आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १९३९: दुसरे महायुद्ध – दक्षिण अफ्रिकेने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.

  • १९५२: कॅनडातील पहिले दूरचित्रवाणी केंद्र माँट्रिअल येथे सुरू झाले.

  • १९६५: पहिल्या भारत पाकिस्तान युद्धाची सुरुवात झाली.

  • १९६६: दक्षिण आफ्रिकेच्या पंतप्रधान हेन्ड्रिक व्हेरवोर्डची संसदेत भोसकून हत्या.

  • १९६८: स्वाझीलँड हा देश स्वतंत्र झाला.

  • १९९३: ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांची कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या जनस्थान पुरस्कारासाठी निवड.

  • १९९७: अमेरिकेच्या नॅशनल एन्डाऊमेंट फॉर द आर्टस संस्थेची सरोदवादक अमजद अली खाँ यांना नॅशनल हेरिटेज फेलोशिप मिळाली.

जन्म

  • १८८९: स्वातंत्र्यसेनानी, सुभाषचंद्र बोस यांचे वडील बंधू बॅ. शरदचंद्र बोस यांचा जन्म. (मृत्यू: २० फेब्रुवारी १९५०)

  • १८९२: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ सर एडवर्ड ऍपलटन यांचा जन्म.

  • १९०१: भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार कमलाबाई कामत तथा कमलाबाई रघुनाथ गोखले यांचा जन्म. (मृत्यू: १८ मे १९९७)

  • १९२१: बार-कोड चे सहसंशोधक नॉर्मन जोसेफ व्हाउडलँड यांचा जन्म. (मृत्यू: ९ सप्टेंबर २०१२)

  • १९२३: युगोस्लाव्हियाचे राजा पीटर (दुसरा) यांचा जन्म.

  • १९५७: पोर्तुगालचे पंतप्रधान जोशे सॉक्रेटिस यांचा जन्म.

मृत्यू

  • १९३८: नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच लेखक सली प्रुडहॉम यांचे निधन.

  • १९६३: कन्नड कवी व श्रेष्ठ भाषा संशोधक मंजेश्वर गोविंद पै यांचे निधन. (जन्म: २३ मार्च १८८३)

  • १९७२: जगप्रसिद्ध सरोदवादक व संगीतकार अल्लाउद्दीन खाँ यांचे निधन.

  • २००७: इटालियन ऑपेरा गायक लुसियानो पाव्हारॉटी यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.