चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०७ एप्रिल २०१९

Date : 7 April, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
मिशन शक्तीमुळे उद्ध्वस्त उपग्रहाचे अवशेष ४५ दिवसांत नष्ट होतील - डीआरडीओ प्रमुख :
  • नवी दिल्ली -  भारताने मिशन शक्ती चाचणीद्वारे अंतराळातील उपग्रह नष्ट केला होता. मात्र भारताच्या या चाचणीमुळे अंतराळात कचरा पसरला असून, त्यामुळे अंतराळ स्थानकाला धोका निर्माण झाल्याचा आरोप नासाने केला होता. या आरोपाला आता डीआरडीओ प्रमुखांनी प्रत्युत्तर दिले आहे. मिशन शक्तीच्या चाचणीमुळे निर्माण झालेला कचरा 45 दिवसांमध्ये नष्ट होईल, अशी माहिती डीआरडीओप्रमुख जी. सतीश रेड्डी यांनी दिली. 

  • आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना डीआरडीओप्रमुख जी. सतीश रेड्डी यांनी सांगितले की, ''भारताने या चाचणीसाठी वापरलेल्या उपग्रहविरोधी क्षेपणास्त्राची क्षमता  एक हजार किमीपर्यंत मारा करण्याची होती.

  • मात्र इतर देशांच्या उपग्रहांना धोका पोहोचू नये यासाठी आम्ही ही चाचणी करण्यासाठी लोअर ऑर्बिटची निवड केली होती. या चाचणीमुळे निर्माण झालेला अंतराळ कचरा ४५ दिवसांत नष्ट होईल''

यूएईकडून मोदींना सर्वोच्च नागरी सन्मान; 'झाएद पदका'नं गौरव होणार :
  • नवी दिल्ली: संयुक्त अरब अमिरातकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'झाएद पदका'नं सन्मान करण्यात येणार आहे. दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठी मोदींनी केलेल्या प्रयत्नांची दखल घेऊन त्यांना हा सर्वोच्च नागरी सन्मान दिला जाणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये दोन्ही देशांमधील संबंध एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचले.

  • यामध्ये मोदींचा मोठा वाटा असल्यानं त्यांना हा सन्मान जाहीर करण्यात आल्याची माहिती अबूधाबीचे क्राऊन प्रिन्स शेख मोहम्मद बिन जायद यांनी ट्विट करुन दिली. याआधी महाराणी एलिजाबेथ, जॉर्ज डब्ल्यू बुश, व्लादिमीर पुतिन, निकोलस सरकोजी, क्षी जिनपिंग आणि अँजेला मर्केल यांना 'झाएद पदका'नं गौरवण्यात आलं आहे. 

  • संयुक्त अरब अमिरातकडून दिलं जाणारं 'झाएद पदक' बहुतांशवेळा पी-5 देशांच्या प्रमुखांना दिलं गेलं आहे. पी-5 मध्ये चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिकेचा समावेश होतो. मात्र आता या राष्ट्रप्रमुखांच्या यादीत मोदींच्या नावाचा समावेश झाला आहे. दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ झाल्यानं हा सन्मान मोदींना दिला जात असल्याचं यूएईनं म्हटलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये दोन्ही देशांमधील व्यापारी आणि सामरिक संबंध अधिक घनिष्ठ झाले आहेत. विविध क्षेत्रांमधील सहकार्यदेखील वाढीस लागल्याचा उल्लेख यूएईनं केला आहे. 

  • याआधी फेब्रुवारीत मोदींचा सेऊल शांतता पुरस्कारानं गौरव करण्यात आला. दक्षिण कोरियाकडून हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कारानं सन्मानित होणारे ते पहिले भारतीय ठरले. आर्थिक आणि ऍक्ट ईस्ट धोरणांसाठी दक्षिण कोरियाकडून मोदींचा सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार म्हणजे 130 कोटी देशवासीयांचा सन्मान असल्याची भावना मोदींनी बोलून दाखवली होती. संयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान आणि बान की मून यांचा मोदींआधी हा पुरस्कारानं गौरव करण्यात आला होता.

इम्रान खान यांचा मोदींवर हल्लाबोल, निवडणूक जिंकण्यासाठी F-16 विमानाच्या मुद्द्याचा वापर :
  • इस्लाबामादः पाकिस्तानच्या ताफ्यात असलेली सगळी अमेरिकी एफ-16 विमाने सुरक्षित असल्याचा अमेरिकन मासिकाने केलेला दावा भारतीय हवाई दलाने फेटाळून लावला होता. भारताच्या एअर स्ट्राइकनंतर दुसऱ्या दिवशी 27 फेब्रुवारीला पाकिस्तानने केलेला प्रतिहल्ला परतवून लावत असताना विंग कमांडर अभिनंदन यांनी एफ-16 विमान पाडले होते. त्यानंतर आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या मुद्द्यावर ट्विट करत मोदींवर हल्लाबोल केला आहे. सत्याचा नेहमीच विजय होतो, हीच खरी नीती आहे.

  • युद्धजन्य परिस्थिती निर्माण करून आणि पाकिस्तानचं एफ 16 विमान पाडण्याच्या मुद्द्यांवरूनच भाजपाला निवडणुका जिंकायच्या आहेत. परंतु अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोदींचे हे प्रयत्न हाणून पाडले आहेत. पाकिस्तानच्या ताब्यातील कोणतंही एफ 16 विमान गायब नसल्याचं अमेरिकेनं सांगितल्याची आठवणही इम्रान खान यांनी करून दिली आहे.

  • भारतावर हल्ला करण्यासाठी आलेल्या एफ-16 विमानांपैकी एक विमान परत माघारी फिरले नसल्याचे पाकिस्तानी हवाई दलाच्या रेडिओ संभाषणातून उघड झाले आहे, असा दावा हवाई दलाच्या सूत्रांनी केला होता. 27 फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तानच्या लढाऊ विमानांमध्ये झालेल्या हवाई चकमकीत एक-16 विमान कोसळलेच नसल्याचा तसेच पाकिस्तानच्या ताफ्यातील सगळी एफ - 16 विमाने सुरक्षित असल्याचा दावा एका मासिकाने केल्याने खळबळ उडाली होती. मात्र भारतीय हवाई दलाने हा दावा फेटाळून लावला आहे.

  • ''विंग कमांडर अभिनंदन यांनी पाकिस्तानी हवाई दलाचे एफ-16 विमान पाकव्याप्त काश्मीरच्या 7 ते 8 किमी आत असलेल्या सब्झकोट भागात पाडले होते. तसेच पाकिस्तानी हवाई दलाचे रेडिओ संभाषण आम्ही रेकॉर्ड केले असून, त्या संभाषणामधून भारतावर हल्ला करणाऱ्या  एफ-16 विमानांपैका एक विमान माघारी आले नसल्याचे स्पष्ट होत आहे , असा दावा भारतीय हवाई दलामधील सूत्रांनी केला आहे.

नौदलाला मिळणार अत्याधुनिक २४ ‘रोमियो’ सीहॉक हेलिकॉप्टर्स :
  • वॉशिंग्टन : जगातील सर्वात प्रगत, शक्तिशाली व बहुद्देशीय अशी २४ एमएच-६० ‘रोमियो’ सीहॉक हेलिकॉप्टर भारतास विकण्यास अमेरिका सरकारने मंजुरी दिली आहे. ही हेलिकॉप्टर भारतीय नौदलात दाखल झाल्यावर हिंदी महासागरातील चीनचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी ती अत्यंत उपयुक्त ठरतील, असे मानले जाते.

  • लॉकहीड मार्टिन कंपनीची ही हेलिकॉप्टर विकत घेण्याचा सौदा सुमारे २.४ अब्ज डॉलरचा असेल. भारतीय सागरी हद्दीत वावरणाऱ्या पाणबुड्या शोधून त्यांचा अचूक वेध घेऊ शकणाऱ्या प्रबळ ‘हंटर’ हेलिकॉप्टरची भारतीय नौदलास गेल्या एक दशकाहून काळ भासणारी निकड या हेलिकॉप्टरने पूर्ण होईल.

  • सध्या नौदलाकडे यासाठी ब्रिटनकडून घेतलेल्या ‘सी किंग हेलिकॉप्टरचा ताफा आहे; परंतु ती जुनी झाल्याने त्यांची जागा आता ही नवी ‘सीहॉक’ हेलिकॉप्टर घेतील. या हेलिकॉप्टर विक्रीच्या सौद्यास मंजुरी देण्यात आल्याचे ट्रम्प प्रशासनाने मंगळवारी काँग्रेसला अधिकृतपणे कळविले.

  • इंडो-पॅसिफिक आणि दक्षिण आशिया क्षेत्रातील राजकीय स्थैर्य, शांतता व आर्थिक विकास सुनिश्चित करण्याच्या अमेरिकेच्या धोरणात महत्त्वाचा भागीदार असलेल्या भारताच्या सुरक्षेस या सौद्यामुळे बळकटी मिळेल, असे अमेरिकी सरकारने नमूद केले. भारत या नव्या साधनाचा वापर स्वसंरक्षणासोबतच क्षेत्रीय धोक्यांना तोंड देण्यासाठी करेल, अशी ग्वाहीही ट्रम्प प्रशासनाने संसदेस दिली. 

‘स्पेशल ३००’, देशभरात ५० ठिकाणी आयकरचे छापे; कोट्यवधींची रोकड जप्त :
  • लोकसभा निवडणुकांच्या तोंडावरच ३०० आयकर आधिकाऱ्यांनी देशभरात ५० ठिकाणी छापे मारत कोट्यवधींची रोकड जप्त केली आहे. दिल्लीच्या आयकर विभागाने आज मध्य प्रदेशमध्ये प्रवीण कक्कर यांच्या घरावर छापा टाकत आतापर्यंत ९ कोटींची रोकड जप्त केली आहे.

  • प्रवीण कक्कर हे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे स्वीय सचिव म्हणून काम पाहतात. प्रवीण कक्कर यांच्या इंदूरमधील घरावर रविवारी पहाटे तीन वाजता अचानक आयकर विभागाने छापा टाकला.

  • प्रवीण कक्कर यांच्याकडे बेहिशेबी मालमत्ता असल्याचा संशय आहे. कक्कर यांच्या घराची १५ अधिकारी झाडाझडती घेत आहेत. कमलनाथ मुख्यमंत्रिपदी झाल्यानंतर भुपेंद्र गुप्ता यांच्याजागी कक्कर यांची नियुक्ती करण्यात आली होती.  

  • कक्कर यांना उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रपती पदकानं सन्मानित केलं होतं. इंदोरशिवाय दिल्ली, भोपाळ आणि गोव्यामध्ये आयकर विभागाने तब्बल ५० ठिकाणी आज रविवारी छापेमारी केली आहे.

अमेरिकेच्या ‘एच १ बी’व्हिसासाठी ६५ हजार अर्ज :
  • अमेरिकी काँग्रेसने एच १ बी व्हिसासाठी ठरवून दिलेल्या ६५ हजारांच्या मर्यादेइतके अर्ज दाखल झाले असल्याची माहिती अमेरिकेच्या नागरिकत्व व स्थलांतर सेवा विभागाने दिली आहे.  २०२० या वर्षांसाठी हे अर्ज असून भारतीय व्यावसायिकांसह इतर देशांच्या लोकांचेही अर्ज आले आहेत.

  • एच १ बी हा अस्थलांतरित व्हिसा असून त्यामुळे परदेशी लोकांना अमेरिकी कंपन्यात काम करण्याची संधी मिळते. त्यासाठी त्यांची सैद्धांतिक व तांत्रिक निपुणता हा महत्त्वाचा निकष मानला जातो. अमेरिकेतील तंत्रज्ञान कंपन्या या व्हिसामार्फत देशात येणाऱ्या कु शल कर्मचाऱ्यांवर अवलंबून असतात. भारत व चीन या दोन देशांचे कर्मचारी यात सर्वाधिक प्रमाणात असतात.

  • अमेरिकी नागरिकत्व व स्थलांतर सेवेने म्हटले आहे की, एच १बी व्हिसासाठी ६५ हजारांची अर्ज मर्यादा असली तरी २०२० या आर्थिक वर्षांसाठी पुरेसे अर्ज आलेले आहेत. हे वर्ष १ ऑक्टोबर २०१९ पासून सुरू होणार आहे. अमेरिकी नागरिकत्व व स्थलांतर विभागाने १ एप्रिलपासून अर्ज मागवले होते. एप्रिलच्या पहिल्या पाच दिवसात नेमके किती अर्ज प्राप्त झाले याची माहिती  या सेवा विभागाने अजून दिलेली नाही.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १८७५: आर्य समाजाची स्थापना झाली.

  • १९०६: माऊंट व्हेसुव्हियस ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे नेपल्स शहर बेचिराख झाले.

  • १९३९: दुसरे महायुद्ध – इटालीने अल्बेनिया पादाक्रांत केले.

  • १९४०: पोस्टाच्या तिकिटावर चित्र असणारे बुकर टी. वॉशिंग्टन हे पहिले कृष्ण्वर्णीय अमेरिकन ठरले.

  • १९४८: जागतिक आरोग्य संघटना (WHO) स्थापना झाली.

  • १९८९: लठ्ठा नावाच्या विषारी दारूने बडोदा येथे १२८ जणांचा बळी गेला.

  • १९९६: श्रीलंकेचे क्रिकेटपटू फलंदाज सनथ जयसूर्या यांनी सिंगरकरंडक स्पर्धेत १७ चेंडूंत अर्धशतक करण्याचा विश्वविक्रम केला.

जन्म 

  • १५०६: ख्रिस्ती धर्मप्रसारक सेंट फ्रान्सिस झेविअर यांचा जन्म. (मृत्यू: ३ डिसेंबर १५५२ – साओ जोआओ, चीन)

  • १७७०: स्वच्छंदतावादाचे प्रणेते आणि इंग्लिश कवी विल्यम वर्डस्वर्थ यांचा जन्म. (मृत्यू: २३ एप्रिल १८५०)

  • १८६०: केलॉग्ज चे मालक विल केलॉग यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑक्टोबर १९५१)

  • १८९१: जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार सर डेविड लो यांचा जन्म. (मृत्यू: १९ सप्टेंबर १९६३ – लंडन, इंग्लंड)

  • १९२०: भारतरत्‍न सतार वादक पंडित रविशंकर यांचा जन्म. (मृत्यू: १२ डिसेंबर २०१२)

  • १९२५: केंद्रीय कृषिमंत्री व कामगार नेते चतुरानन मिश्रा यांचा जन्म. (मृत्यू: २ जुलै २०११)

  • १९३८: भाजपाचे लोकसभा सदस्य काशीराम राणा यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑगस्ट २०१२)

  • १९४२: हिंदी चित्रपट अभिनेते जितेंद्र यांचा जन्म.

  • १९५४: हाँग काँगचे प्रसिद्ध चित्रपट अभिनेते जॅकी चेन यांचा जन्म.

  • १९८२: भारतीय वंशाचा अमेरिकन व्यावसायिक कुस्तीगीर सोंजय दत्त यांचा जन्म.

मृत्यू 

  • १४९८: फ्रान्सचा राजा चार्ल्स (आठवा) यांचे निधन. (जन्म: ३० जून १४७०)

  • १९३५: भारतीय शास्त्रज्ञ डॉ. शंकर आबाजी भिसे यांचे निधन. (जन्म: २९ एप्रिल १८६७)

  • १९४७: फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड यांचे निधन. (जन्म: ३० जुलै १८६३)

  • १९७७: चित्रपट अभिनेते, लेखक आणि गीतकार राजा बढे यांचे निधन. (जन्म: १ फेब्रुवारी १९१२)

  • २००१: जगप्रसिद्ध जैवभौतिक शास्त्रज्ञ गोपालसमुद्रम नारायण अय्यर रामचंद्रन तथा डॉ. जी. एन. रामचंद्रन यांचे निधन. (जन्म: ८ ऑक्टोबर १९२२ – एर्नाकुलम, केरळ)

  • २००४: प्रसिद्ध ओडिसी नर्तक केलुचरण महापात्रा यांचे निधन. (जन्म: ८ जानेवारी १९२६)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.