चालू घडामोडी - ०७ ऑगस्ट २०१८

Date : 7 August, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
जगातील सर्वात गरीब राष्ट्राध्यक्षाबद्दल तुम्हाला माहिती आहे का :
  • माँटेव्हिडिओ- साधी राहणी उच्च विचारसरणी अशी जडजड वाक्यं फेकून जगभरातील नेतेमंडळी आपण किती साधे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. एखाद्या नेत्याला रांगेत उभं राहावं लागलं किंवा एखाद्या नेत्याने स्वतः गाडी चालवली तर भारतीयांना ते आश्चर्य वाटतं. पण आपल्या जगात एका देशाचे राष्ट्राध्यक्ष खरोखर अत्यंत साधे जीवन जगायचे त्यांच्या देशाचा कारभारही चांगल्या पद्धतीने चालवत असत.

  • 2015 साली राष्ट्राध्यक्ष पद सोडल्यानंतरही त्यांच्या साधेपणात काही कमी झालेले नाही.  विशेष म्हणजे त्यांच्या वागण्यात कोठेही तुम्ही सर्वांनी माझ्याप्रमाणे साधेपणानेच वागलं पाहिजे असा आग्रह नसून 'हा मी निवडलेला पर्याय आहे 'असा भाव असतो.

  • हे आहेत उरुग्वेचे माजी राष्ट्राध्यक्ष जोस म्युजिका. जोस वर्षाला केवळ १२ हजार डॉलर इतके वेतन घ्यायचे आणि त्यातील ९०% रक्कम दान देऊन टाकायचे.  उरुग्वेचे ते ४० वे अध्यक्ष होते. जोस हे कधीही राष्ट्रपती भवनामध्ये राहिले नाहीत. पत्नीबरोबर ते एका अत्यंत साध्या फार्महाऊससारख्या घरात राहायचे. ते कोणत्याही प्रकारचा मोटारींचा ताफा वापरत नसत. एका पिटुकल्या गाडीमधूनच ते प्रवास करुन आपली कामे व जबाबदाऱ्या पार पाडत. ही गाडी १९८७ साली तयार केलेली असून जोस स्वतःच ती चालवतात. 

  • जोस पती पत्नी यांची एकत्रित संपत्ती केवळ २ लाख १५ हजार डॉलर इतकी आहे. जोस यांंच्या मते ते गरिब नाहीत. जे लोक महागडी जीवनशैली मिळवण्यासाठी पैसे मिळवण्याच्या स्पर्धेत स्वतःला अडकवतात ते गरिब असं त्यांचं मत आहे. पैसे मिळवण्यासाठी अनेक प्रकारची कामं एकाचवेळी करत राहिल्यामुळे स्वतःसाठी फारच कमी वेळ मिळतो. मी पत्करलेला मार्ग यातून स्वातंत्र्य मिळवून देणारा आहे असे जोस म्हणतात.

स्वातंत्र्यदिनासाठी ‘हे’ मंत्री तयार करणार पंतप्रधानांच्या या कार्यकाळातील शेवटचे भाषण :
  • त्यामुळे यंदाचे हे भाषण लोकांच्या कायमचे स्मरणात रहावे यासाठी सरकार पूर्णतः प्रयत्न करीत आहे. त्यानुसार, सरकारने एक वरिष्ठ मंत्री गटाची स्थापना केली असून त्यांच्यावर महत्वाचे मुद्दे आणि मायन्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह या गटाचे नेतृत्व करणार आहेत.

  • सुत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींचे हे महत्वाचे भाषण तयार करण्यासाठी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी, कार्यकारी अर्थमंत्री पीयुष गोयल तसेच गृहमंत्री राजनाथ सिंह हे काम करणार आहे. त्याचबरोबर इतर महत्वाच्या प्रकरणीही संबंधीत मंत्र्यांशी संवाद साधला जाऊ शकतो. सर्वसाधारणपणे कॅबिनेट सचिवालय सर्व मंत्र्यांकडून त्यांच्या विभागाची कामगिरी आणि यशाची माहिती घेऊन त्याचा पंतप्रधानांच्या भाषणात उल्लेख केला जातो.

  • पंतप्रधानांच्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी होणाऱ्या भाषणावर संपूर्ण देशाचे लक्ष असते. या भाषणामध्ये नव्या योजनांच्या घोषणेशिवाय राष्ट्र हिताच्या अनेक मुद्द्यावरही सरकारच्यावतीने पंतप्रधान भाष्य करतात. यापूर्वी पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणांमध्ये अनेक योजनांच्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये ‘स्वच्छ भारत’ मोहिमेचा समावेश आहे. केवळ मंत्र्यांकडूनच नव्हे तर मोदी गेल्या दोन तीन वर्षांपासून जनतेकडूनही सूचना मागवत आहेत. यंदाच्या भाषणासाठीही त्यांनी ३१ जुलै रोजी आपल्या ट्विटर हँडलवरुन नागरिकांना सूचना पाठवण्याचे आवाहन केले होते.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे यंदाचे भाषण यासाठीही महत्वपूर्ण मानले जात आहे. कारण हे भाषण २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीतील भाजपाची नीति आणि दिशा निश्चित करणारे असेल. या भाषणात मोदी पुढील निवडणुकीपूर्वी देशातील राजकीय सार आणि आपल्या चार वर्षांतील कामगिरीची महिती जनतेला देण्याचा प्रयत्न करतील.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आर. के. धवन यांचे निधन :
  • माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजिंदर कुमार धवन (वय ८१) यांचे सोमवारी सांयकाळी निधन झाले. त्यांच्यावर दिल्लीतील बी एल कपूर रूग्णालयात उपचार सुरू होते. सांयकाळी सातच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

  • माजी राज्यसभा सदस्य असलेले आर के धवन हे माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांचे अत्यंत निकटवर्तीय होते. गत मंगळवारी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

  • धवन यांच्या मृत्यूवर काँग्रेसने शोक व्यक्त केला आहे. पक्षाने अत्यंत मौल्यवान सदस्य गमावला आहे, असे ट्विट काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. काँग्रेसचे माध्यम समन्वयक रणदीप सुरजेवाला यांनी धवन यांना श्रद्धांजली वाहिली आहे. काँग्रेस त्यांचे योगदान कधीच विसरू शकणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे३

  • धवन यांनी इंदिरा गांधी यांचे स्वीय सहाय्यक म्हणून १९६२ मध्ये आपली कारकीर्द सुरू केली. इंदिरा गांधी यांच्या अखेरच्या क्षणापर्यंत म्हणजे १९८४ पर्यंत ते त्यांच्याबरोबर होते. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांच्या निकटवर्तीयांमध्ये अंबिका सोनी आणि कमलनाथ यांच्यासह धवन यांचाही समावेश होता.

१७ लाख राज्य सरकारी कर्मचारी आजपासून तीन दिवसीय संपावर :
  • मुंबई : सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी आजपासून पुढील तीन दिवस संपावर जाणार आहेत. राज्य सरकारी कर्मचारी समन्वय संघटनांच्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला. एकूण 17 लाख कर्मचारी या संपात सहभागी होतील.

  • सातवा वेतन आयोग, पाच दिवसांचा आठवडा, जुन्या निवृत्तिवेतन योजनेचे पुनरुज्जीवन इत्यादी मागण्या सरकारी कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत.

  • दरम्यान 14 महिन्यांचा थकित महागाई भत्ता देण्यासंदर्भातला निर्णय काल घेण्यात आला. कर्मचाऱ्यांना ही रक्कम ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत रोख स्वरुपात मिळणार आहे.

  • या संपात मंत्रालय कर्मचारी, जिल्हा परिषद, नगरपालिका कर्मचारी, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी यांचा समावेश असेल. सरकारने वारंवार फसवणूक केल्याने आम्हाला हा निर्णय घ्यावा लागतोय, अशी कर्मचाऱ्यांची भावना असल्याचं संघटनेकडून सांगण्यात आलं.

'पेप्सिको'च्या सीईओ इंद्रा नूयी पदावरुन पायउतार :
  • मुंबई : 'पेप्सिको'च्या पहिल्या महिला अध्यक्षा आणि सीईओ इंद्रा नूयी पदावरुन पायउतार होत आहेत. तब्बल 12 वर्षांनंतर इंद्रा नूयी अध्यक्षपद सोडणार आहेत.

  • 3 ऑक्टोबर 2018 रोजी नूयी आपल्या पदाची सूत्रं ग्लोबल ऑपरेशन्सचे प्रमुख रेमन लॅगार्ता यांच्याकडे सुपूर्द करतील. गेल्या 24 वर्षांपासून त्या 'पेप्सी'मध्ये कार्यरत आहेत. अध्यक्षपद सोडल्यानंतरही त्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सच्या प्रमुख म्हणून काम पाहतील.

  • 62 वर्षीय इंद्रा नूयी यांना उद्योगविश्वात मोठा मान आहे. त्यांनी 'पेप्सी' या ब्रँडची ख्याती जगभरात पसरवली. जगातल्या सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत फॉर्च्युन मॅगझिननं त्यांचा सातत्यानं समावेश केला आहे.

  • पेप्सिकोच्या अध्यक्ष आणि सीईओ या नात्यानं त्यांच्यावर फूड अँड बेव्हरेज विभागाची जागतिक जबाबदारी होती. त्यामध्ये 22 ब्रँड्सचा समावेश असून प्रत्येक ब्रँडच्या उद्योगात वर्षाला अंदाजे एक अब्ज डॉलर्सची उलाढाल होत असते.

  • जून महिन्यात इंद्रा नूयी यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल (आयसीसी) च्या पहिल्या संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आयसीसीच्या संचालकपदाचा स्वतंत्र कार्यभार एका महिलेच्या हाती सोपवण्याचा निर्णय आयसीसी कौन्सिलनं गेल्या वर्षी घेतला होता.

'ऑस्ट्रेलियातील प्रमुख शहरे हवाई सेवेने थेट मुंबईशी जोडणार' :
  • मुंबई - मुंबई आणि ऑस्ट्रेलियातील प्रमुख शहरे थेट हवाई मार्गाने जोडल्यास उभय देशांमधील पर्यटन, व्यापार आणि संस्कृतिक देवाणघेवाणीला चालना मिळेल. यादृष्टीने उभय देशांमध्ये थेट हवाई सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने संसदीय शिष्टमंडळ प्रयत्न करेल असे आश्वासन ऑस्ट्रेलियन संसदेच्या संधी व करारविषयक संयुक्त स्थायी समितीचे अध्यक्ष स्टुअर्ट रॉबर्ट यांनी राज्यपाल विद्यासागर राव यांना दिले. स्टुअर्ट रॉबर्ट यांच्या अध्यक्षतेखाली संसद सदस्यांच्या एका शिष्टमंडळाने सोमवारी राज्यपाल विद्यासागर राव यांची राजभवन येथे भेट घेतली.

  • ऑस्ट्रेलियाने भारताशी आर्थिक सहकार्य वाढविण्याकरिता शिक्षण, कृषीव्यवसाय, पर्यटन, उर्जा, आरोग्य, पायाभूत सुविधा यांसह दहा क्षेत्रे निर्धारित केली आहेत. 

  • ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या 24 दशलक्ष इतकी असली तरीही ऑस्ट्रेलियाची अर्थव्यवस्था जगात बाराव्या क्रमांकाची असून भारत हा ऑस्ट्रेलियाचा महत्वाचा भागीदार आहे. भारतातून ऑस्ट्रेलियात येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. जवळ जवळ 80 हजार भारतीय विद्यार्थी ऑस्ट्रेलियाच्या विविध विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत आहेत.

  • ऑस्ट्रेलियाच्या लोकसंख्येपैकी 7 लाख लोक मुळचे भारतीय आहेत. या पार्श्वभूमीवर उभय देशांमधील संबंध वाढविणे गरजेचे असल्याचेस्टुअर्ट रॉबर्ट यांनी सांगितले. संसदीय शिष्टमंडळाचे स्वागत करताना, महाराष्ट्र फलोत्पादनात अग्रेसर राज्य असून थेट प्रवासी विमानसेवेसोबतच थेट मालवाहू विमानसेवा सुरु झाल्यास फलोत्पादन निर्यातीस चालना मिळेल. महाराष्ट्रात पर्यटनाची अनेक वैविध्यपूर्ण स्थळे असून थेट विमानसेवेमुळे ऑस्ट्रेलियातून अधिक पर्यटक महाराष्ट्राला भेट देऊ शकतील, असेही राज्यपालांनी शिष्टमंडळाला सांगितले.

  • महाराष्ट्र आणि न्यू साउथ वेल्स या राज्यांमध्ये सामंजस्य करार असून ऑस्ट्रेलियाने महाराष्ट्राला क्रीडा विद्यापीठ स्थापनेसाठी सहकार्य करावे अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी सांसदीय समितीचे सदस्य मिशेल डयांबी व श्रीमती नोला मेरीनो आणि ऑस्ट्रेलियाचे मुंबईतील वाणिज्यदूत टोनी ह्यूबर यांसह इतर सदस्य उपस्थित होते.   

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १९४२: दुसरे महायुद्ध – प्रशांत महासागरातील ग्वाडेल कॅनाल येथे अमेरिकन सैन्य उतरले व दुसर्‍या महायुद्धातील एक भीषण लढाई खेळली गेली. या घटनेतुनच जपानच्या माघारीस सुरुवात झाली.

  • १९४७: मुंबई महानगरपालिकेने बेस्ट (Bombay Electricity Supply and Transport) कंपनी आपल्या ताब्यात घेतली.

  • १९४७: थोर हायरडल व त्याच्या सहकाऱ्यांनी बाल्सा लाकडापासुन तयार केलेल्या कॉन टिकी या तराफ्यातुन १०१ दिवसात पॅसिफिक महासागरात ७,००० किमी प्रवास केला.

  • १९८१: सलग १२८ वर्षे प्रकाशित झाल्यावर द वॉशिंग्टन स्टार हे वृत्तपत्र बंद पडले.

  • १९८५: जपानचे पहिले अंतराळवीर म्हणून ताकाओ दोई, मोमोरू मोहरी आणि चीकी मुकाई यांची निवड केली गेली.

  • १९९१: जमिनीवरुन हवेत मारा करणार्‍या पृथ्वी या क्षेपणास्त्राची श्रीहरिकोटा येथे तिसर्‍यांदा यशस्वी चाचणी झाली.

  • १९९७: चित्रपट निर्माते गौतम घोष यांना इटालियन दिग्दर्शक सिका यांच्या नावाने दिला जाणारा व्हिट्टोरिओ डी सिका हा सन्मान जाहीर.

  • १९९८: अतिरेक्यांनी दार-ए-सलाम, टांझानिया व नैरोबी, केनिया येथील अमेरिकन वकिलातींवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात २१२ लोक ठार झाले.

जन्म

  • १८७१: जलरंगचित्रकार, रविंद्रनाथ टागोर यांचे काका अवनींद्रनाथ टागोर यांचा जन्म. (मृत्यू: ५ डिसेंबर १९५१)

  • १८७६: पहिल्या महायुद्धात गाजलेली डच नर्तिका, सौंदर्यवती व गुप्तहेर माता हारी यांचा जन्म. (मृत्यू: १५ ऑक्टोबर १९१७)

  • १९१२: हृदयरोगतज्ञ केशवराव कृष्णराव दाते यांचा जन्म.

  • १९२५: पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषण भारतीय शेतीतज्ञ, हरितक्रांतीचे जनक आणि केन्द्रीय कृषी मंत्री डॉ. मनकोम्बू साम्बसिवन तथा एम. एस. स्वामीनाथन यांचा जन्म.

  • १९३६: दोन वेळा अश्डन पुरस्कार विजेते डॉ. आनंद कर्वे यांचा जन्म.

  • १९४८: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू व प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांचा जन्म.

  • १९६६: विकिपीडियाचे सह-संस्थापक जिमी वेल्स यांचा जन्म.

मृत्यु

  • १९३४: जॅक्वार्ड लूम चे शोधक जोसेफ मॅरी जाकॉर्ड यांचे निधन. (जन्म: ७ जुलै १७५२)

  • १८४८: स्वीडीश रसायनशास्त्रज्ञ जेकब बर्झेलिअस यांचे निधन. (जन्म: २० ऑगस्ट १७७९)

  • १९४१: रवींद्रनाथ टागोर जगप्रसिद्ध भारतीय कवी, कलावंत, शिक्षणतज्ञ, तत्वचिंतक, थोर पुरुष व पहिले भारतीय नोबेल पुरस्कार विजेते यांचे निधन. (जन्म: ७ मे १८६१)

  • १९७४: भेंडीबाजार घराण्याच्या शास्त्रीय गायिका अंजनीबाई मालपेकर यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.