चालू घडामोडी - ०७ डिसेंबर २०१७

Date : 7 December, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
जेरुसलेमला आता इस्रायलच्या राजधानी, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा :
  • वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जेरूसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देत असल्याचं बुधवारी रात्री उशिरा जाहीर केलं आहे. अमेरिकी दूतावास तेथे हलवण्याची प्रक्रियाही सुरू केली जाणार आहे. या घडामोडींमुळे  मध्यपूर्वेत हिंसक उलथापालथ होईल, असा इशारा अनेक अरब नेत्यांनी दिला आहे.

  • ‘जेरूसलेमला अधिकृतपणे इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्याची वेळ आली आहे, असं आपल्याला ठामपणे वाटतं आणि ती कृती योग्यच ठरेल’, असं डोनाल्ड ट्रम्प त्याबाबतची घोषणा करताना म्हणाले आहेत.

  • 2016 साली राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या वेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्ती आता केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या वादग्रस्त निर्णयामुळे  मध्यपूर्वेत तसंच जगात इतर ठिकाणी व्यापक निदर्शनं होण्याची भीती अरब नेत्यांनी व्यक्त केली आहे.

  • व्हाइट हाऊसमध्ये ही घोषणा करण्याच्या निर्णयावर ट्रम्प कायम राहतील, असं त्यांच्या प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं.  डोनाल्ड ट्रम्प याबाबीकडे ‘ऐतिहासिक वस्तुस्थितीला मान्यता’ या दृष्टिकोनातून पाहतात, असं एका अधिकाऱ्याने पत्रकारांना सांगितलं

रेपो दर जैसे थे , रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर :
  • नवी दिल्ली: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बुधवारी दुपारी द्वैमासिक पतधोरण जाहीर करताना व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. आरबीआयने रेपो तसेच रिव्हर्स रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. रेपो आणि रिव्हर्स रेपो दर जैसे थे ठेवले आहेत. रेपो दर 6 टक्के तर, रिव्हर्स रेपो दर 5.75 टक्के कायम ठेवला. 

  • आर्थिक वर्षात विकास दर 6.7 टक्के राहील असा अंदाज वर्तवला आहे. विकास दर आणखी वाढेल अशी आशाही व्यक्त करण्यात आली आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे किरकोळ महागाई दरात वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्र आणि राज्य सरकारने घरभाडे भत्त्यांमध्ये वाढ  केल्याने, महागाई दरात वाढ होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

  • ऑगस्ट महिन्यात आरबीआयने रेपो दरात 25 पाँईटसनी कपात केली होती. आरबीआयने ऑगस्ट महिन्यात 2017-18 आर्थिक वर्षात विकास दर 7.3 टक्के राहील असे म्हटले होते. ऑगस्ट महिन्यात महागाईचा दर 3.36 टक्के होता.

कोरियन द्विपकल्पातील तणाव वाढला, अमेरिकी लढाऊ विमानांनी केले उड्डाण :
  • सोल - उत्तर कोरिया आणि अमेरिकेमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांना धमक्या देण्याचे सत्र सुरू असून, उत्तर कोरियाचा हुकूमशहा वारंवार शक्तिप्रदर्शन करून आपल्या विरोधी देशांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे.

  • आता प्योंगयोंगवर दबाव आणण्यासाठी अमेरिका आणि दक्षिण कोरियाने  युद्धसरावास सुरुवात केली आहे. दरम्यान, आज या कवायतींमध्ये अमेरिकेची लढाऊ बी-१बी विमाने सहभागी झाली होती. दरम्यान अमेरिकेने उचललेल्या या पावलानंतर उत्तर कोरिया बिथरला असून, याचे गंभीर परिणाम भोगण्याची धमकी त्यांनी दिली आहे.  

  • उत्तर कोरियाने या युद्धसरावाविरोधाक तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हा युद्धसराव कोरियव द्विपकल्पाला युद्धाच्या दिशेने घेऊन जाईल, असे उत्तर कोरियाने म्हटले आहे. अमेरिकेच्या विमानांनी गुआम येईल हवाईहद्दीतून उड्डाण केले होते.

  • या संयुक्त सरावामध्ये अमेरिकेची एफ-२२ आणि एफ-३५ स्टील्थ फायटर विमाने सहभागी झाली आहेत. काही दिवसांपूर्वी उत्तर कोरियाने केलेल्या क्षेपणास्त्र चाचणीनंतर हा युद्धसराव करण्यात येत आहे.  

योगी गुजरातमध्ये, मोदी-शाहांची रॅली, प्रचार तोफा थंडावणार :
  • अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावणार आहेत. प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपचे अनेक नेते रॅली काढणार आहेत. तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यासह काँग्रेसचे नेते पत्रकार परिषद घेतील. पहिल्या टप्प्यातील मतदान 9 डिसेंबर रोजी होणार आहे.

  • सूरतमध्ये मोदींची सभा- पंतप्रधान मोदी सूरतमध्ये प्रचार सभा घेतील. ही सभा बुधवारी होणार होती, मात्र ओखी वादळाच्या पार्श्वभूमीवर ही सभा रद्द करण्यात आली होती. मोदी 8 आणि 9 डिसेंबर रोजी एकूण 8 सभा घेणार आहेत. मोदींच्या सूरतमधील सभेपूर्वी बाईक रॅली काढली जाणार आहे.

  • अमित शाहांच्या तीन रॅली - भाजपाध्यक्ष अमित शाह गुजरातमध्ये तीन सभांना संबोधित करतील. सकाळी 11 वाजता महिसागर जिल्ह्यातील कडाना येथे, दुपारी एक वाजता मेहसाणा जिल्ह्यातील खेरालू कॉलेजमध्ये आणि तीन वाजता पाटन जिल्ह्यातील सिद्धपूर येथील सन प्लाझा कॉम्प्लेक्समध्ये तिसरी सभा होईल.

  • योगी आदित्यनाथ यांच्या सहा रॅली- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री दिवसभर प्रचार करणार आहेत. राजकोट, भावनगर, सुरेंद्रनगर, आणंद आणि बडोद्यात ते सभा घेतील.

गुजरात निवडणुकीच्या तोंडावर सरकारने जाहीर केली 8,500 कोटींची निर्यात प्रोत्साहन योजना :
  • नवी दिल्ली - जीएसटीवरुन व्यापारी वर्गामध्ये असलेली नाराजी कमी करण्यासाठी तसेच निर्यातीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने 8,500 कोटींचा निर्यात प्रोत्साहन भत्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. कृषी क्षेत्र, चामडयाच्या वस्तू, गालीचे आणि सागरी उत्पादनांचा या निर्यात प्रोत्साहन भत्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. 

  • गुजरात निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने हा 8500 कोटींचा निर्यातीसंबंधीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. गुजरातमधल्या छोटया व्यापा-यांमध्ये जीएसटीवरुन नाराजी आहे. निर्यातीसंबंधीच्या सरकारी धोरणांवरुन निर्यातदार केंद्र सरकारवर मोठया प्रमाणावर टीका करत होते. 

  • नोव्हेंबर महिन्यापासून 8,540 कोटींची निर्यात प्रोत्साहन भत्त्याची ही योजना लागू होत आहे. या योजनेतून तयार कपडयांच्या व्यवसायाला2,743 कोटी रुपयांपर्यंत लाभ मिळतील. नव्या योजनेमागे प्रक्रिया अधिकाधिक सोपी करुन निर्यातीला चालना देण्याचा उद्देश आहे. 

 

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • भारतीय लष्कर ध्वज दिन

  • आंतरराष्ट्रीय नागरी विमानसेवा दिन

महत्वाच्या घटना

  • १८५६: पहिला उच्चवर्णीय विधवा विवाह कोलकात्यात झाला.

  • १९३५: प्रभातचा धर्मात्मा हा अस्पृष्योद्धारावरचा चित्रपट मुंबईतील कृष्ण सिनेमात प्रदर्शित झाला.

  • १९४१: दुसरे महायुद्ध – जपानने पर्ल हार्बरवर तुफानी हल्ला केला.

  • १९७५: इंडोनेशियाने पूर्व तिमोरवर हल्ला केला.

  • १९९४: कन्‍नड साहित्यिक यू. आर. अनंतमूर्ती यांना ज्ञानपीठ पारितोषिक जाहीर.

  • १९९५: फ्रेन्च गयानातील कोऊरू प्रक्षेपण केन्द्रावरुन इन्सॅट-२सी या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले.

  • १९९८: ७२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी वसंत बापट यांची निवड.

  • २०१६: पाकिस्तान इंटरनॅशनल एरलाईन्स चे पीके ६६१ विमान कोसळले. यात ४७ लोकांचा मृत्यू.

जन्म

  • १९०२: भारतीय क्रिकेटपटू जनार्दन नवले यांचा जन्म. (मृत्यू: ७ सप्टेंबर १९७९)

  • १९२१: स्वामीनारायण पंथातील अध्यात्मिक गुरू प्रमुख स्वामी महाराज यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट२०१६)

  • १९५७: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू जिऑफ लॉसन यांचा जन्म.

मृत्य

  • १९४१: कविवर्य भास्कर रामचंद्र तथा भा. रा. तांबे यांचे निधन. (जन्म: २७ ऑक्टोबर १८७४)

  • १९८२: संगीतशिक्षक बाबूराव विजापुरे यांचे निधन. (जन्म: १७ जून १९०३)

  • १९९३: इव्होरी कोस्ट आयलंडचे पहिले अध्यक्ष फेलिक्स हॉफॉएट-बोजि यांचे निधन. (जन्म: १८ ऑक्टोबर १९०५)

  • १९९७: ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी शांतानंद सरस्वती यांचे अलाहाबाद येथील अलोपी आश्रमात निधन. (जन्म: १६ जुलै १९१३ – अच्छाती, बस्ती, उत्तर प्रदेश)

  • २००४: अॅमवे चे सहसंस्थापक जय व्हॅन ऍन्डेल यांचे निधन. (जन्म: ३ जुन १९२४)

  • २०१३: ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक विनय आपटे यांचे निधन.

  • २०१६: पाकिस्तानी गायक आणि इस्लाम धर्मप्रचारक जुनैद जमशेद यांचे विमान अपघातात निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.