चालू घडामोडी - ०७ डिसेंबर २०१८

Updated On : Dec 07, 2018 | Category : Current Affairsभविष्यात जगात वेगाने वाढणाऱ्या शहरांमध्ये सूरत नंबर १, मुंबई लोकसंख्येत टॉप :
 • भविष्यात जगातील वेगाने वाढणाऱ्या शहरांमध्ये भारताचे वर्चस्व असेल. ग्लोबल इकोनॉमिक रिसर्चच्या अहवालामधून ही माहिती समोर आली आहे. भविष्यातील जीडीपी दराची तुलना केल्यास चित्र वेगळे असेल. २०१९ ते २०३५ दरम्यान जगातील वेगाने वाढणाऱ्या २० शहरांपैकी १७ शहरे एकटया भारतातील असतील असे या अहवालात म्हटले आहे.

 • बंगळुरु, हैदराबाद आणि चेन्नई या शहरांची कामगिरी उत्तम असेल असे ऑक्सफर्ड इकोनॉमिक्सने आपल्या अहवालात म्हटले आहे. २०१९ ते २०३५ दरम्यान जगातील वेगाने वाढणाऱ्या १० शहरांमध्ये सूरत पहिल्या स्थानावर असेल. त्याखालोखाल आग्रा, बंगळुरु, हैदराबाद या शहरांचा क्रमांक असेल. नागपूर, तिरुपूर, राजकोट, तिरुचिरापल्ली, चेन्नई आणि विजयवाडा ही शहरे सुद्धा टॉप टेनमध्ये आहेत.

 • सूरत हे सध्या हिरा उद्योगाचे मुख्य केंद्र असून भविष्यात आयटी उद्योगही येथे स्थिरावेल. सध्या बंगळुरु, हैदराबाद आणि चेन्नई ही शहरे टेक्नोलॉजी उद्यगासाठी ओळखली जातात तसेच या शहरांमध्ये वित्तीय सेवा देणाऱ्या अनेक कंपन्याही आहेत.

 • भारताबाहेर नोम पेन्ह तसेच आफ्रिकेतील दार अस सलाम ही शहरे वेगाने वाढणाऱ्या शहरांमध्ये आघाडीवर असतील. लोकसंख्येच्या बाबतीत २०३५ साली मुंबई पहिल्या १० मध्ये असेल. २०३५ मध्ये भारतातील शहरांचा एकत्रित जीडीपी चीन, युरोप आणि उत्तर अमेरिकेतील शहरांच्या तुलनेत कमीच असेल.

आयकर परताव्याची ही कटकट संपणार, नवी सेवा आणण्याची सरकारची तयारी :
 • आयकर परताव्याचा अर्ज भरताना अनेक करदात्यांना समस्यांचा सामना करावा लागतो, त्यामुळे ही क्लिष्ट पद्धत संपवण्याचा सरकारचा विचार आहे. लोकांची ही समस्या दूर करण्यासाठी एका वेगळ्या पर्यायाबाबत सरकारचा विचार सुरू आहे. नव्या योजनेनुसार, आयटीआर भरताना केवळ तुम्हाला स्वाक्षरी करण्याची गरज असेल, उर्वरित काम आयकर विभाग करेल. केंद्रीय कर संचालक मंडळाचे(सीबीडीटी) चेअरमन सुशील चंद्रा यांनी याबाबत माहिती दिलीये.

 • यानुसार, आयकर परतावा भरणाऱ्यांना लवकरच आधीपासूनच भरलेला फॉर्म मिळेल, त्यामुळे परतावा भरण्याची प्रक्रिया सरळ आणि सोपी होईल. आयकर विभागाकडून कर्मचारी किंवा बँकेसारख्या अन्य संस्थांद्वारे टीडीएसच्या आधारे आधीपासूनच भरलेल्या फॉर्मची प्रणाली तयार करण्यावर काम सुरू आहे. फॉर्म भरणाऱ्या करदात्याला जर आधीपासूनच भरलेल्या फॉर्ममध्ये काही बदल करण्याची आवश्यकता वाटल्यास त्यात एडिटचा पर्याय देखील मिळेल, त्यामुळे आवश्यक बदल करुन त्याला परतावा भरता येईल.

 • ‘अशाप्रकारच्या एखाद्या व्यवस्थेने जे नागरीक आताच्या कठीण प्रक्रियेचं कारण देत आयकर परतावा भरत नाहीत ते आयकर भरण्यासाठी प्रेरित होतील. करदात्यांना सोपी-साधी प्रक्रिया उपलब्ध करुन देण्याचा आय़कर विभागाचा प्रयत्न आहे. आयकर परताव्याची प्रक्रिया अत्यंत जलदगतीने करण्याचा आमचा विचार आहे. या बदलासाठी एक वर्षाचा कालावधी लागू शकतो’, असं चंद्रा म्हणाले.

श्रीमंत पर्यटकांची ‘डेक्कन ओडिसी’ ४४ कोटींनी तोटय़ात :
 • पर्यटन सहलीसाठी साडेसहा ते साडेनऊ लाख रुपये भाडे आकारल्या जाणाऱ्या ‘डेक्कन ओडिसी’चा तोटा साधारणत: ४४ कोटी रुपयांपर्यंत गेला आहे. गेल्या चार वर्षांतील तिकीट आरक्षणाची सरासरी ५३.५ टक्के एवढी आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाने ही रेल्वे एका खासगी कंपनीला २०१४ पासून पुढील १० वर्षे चालविण्यासाठी दिली आहे. त्यामुळे पर्यटन महामंडळाचे नुकसान नसले, तरी ऐषआरामी रेल्वेचा तोटा वर्षनिहाय वाढतोच आहे, याबद्दलची माहिती महाराष्ट्र पर्यटन विभागातील सूत्रांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

 • मुंबईवर झालेल्या २६/११च्या हल्ल्यानंतर पर्यटनाला सर्वाधिक फटका बसला. या काळात होणारे डेक्कन ओडिसीचे नुकसान आणि मनुष्यबळावर होणारा खर्च लक्षात घेता ही रेल्वे खासगी कंपनीला चालवायला देण्याशिवाय गत्यंतर नव्हते. जागतिक स्तरावर निविदा काढून एका खासगी कंपनीला या रेल्वेच्या सहली आयोजित करण्यासाठी नेमण्यात आले. दरवर्षी महाराष्ट्र सरकारला १ कोटी १२ लाख ते १ कोटी २० लाख रुपये मिळतात खरे. या श्रीमंतांच्या सहली परवडणाऱ्या नसल्याचे दिसून येत आहे.

 • जगभरात अशा प्रकारच्या अत्याधुनिक ऐषआरामी रेल्वे चालविणाऱ्यांना साधारणत: चार वर्षांनंतर नफा होतो, असे सांगितले जाते. मात्र, गेल्या चार वर्षांतील तोटा वाढत असल्याने रेल्वे बोर्डाला द्यावयाच्या वाहतूक शुल्कात सूट मिळावी, अशी मागणी होती. त्यात ५० टक्के सूट देण्यात आली आहे. त्यामुळे आता डेक्कन ओडिसीच्या परिचालनावर चांगले परिणाम दिसून येतील, असा दावा अधिकारी करत आहेत.

 • डेक्कन ओडिसीची सहल आखताना ४० टक्के तास ही रेल्वे महाराष्ट्रात चालवली जावी, अशी तरतूद आहे. गेल्या काही वर्षांत डेक्कन ओडिसीतून प्रवास करून पर्यटनाला येणाऱ्या आरक्षण टक्केवारीची सरासरी ५३.५ टक्के एवढी आहे. २०१४ मध्ये १६ सहली आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यात ४०५ पर्यटक होते. त्यात वाढ होत गेली. २०१५-१६ मध्ये ६३१, २०१६-१७ मध्ये ६४३ आणि २०१७-१८ मध्ये ८८२ प्रवाशांनी पर्यटन सहलीचा आनंद लुटला. या वर्षांत १० सहली झाल्या असून आतापर्यंत ५८७ प्रवासी डेक्कन ओडिसीतून पर्यटनाला आले होते.

अमिरातीतील श्रीमंत भारतीयांमध्ये डॉ. दातार यांना १८ वे मानांकन :
 • दुबई : अल अदील ट्रेडिंगचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय दातार यांना अरेबियन बिझनेसतर्फे संयुक्त अरब अमिरातीतील (यूएई) सर्वांत श्रीमंत भारतीयांच्या यादीत वर्ष २०१८ साठी १८ वे मानांकन देऊन नुकतेच गौरवण्यात आले.

 • या यादीत समावेश असलेले डॉ. दातार हे एकमेव महाराष्ट्रीय उद्योजक आहेत. गेल्या दोन वर्षांत त्यांनी ३९ व्या क्रमांकापासून १८ व्या क्रमांकापर्यंत येण्याची कामगिरी केली आहे.

 • यासंदर्भात डॉ. दातार म्हणाले, पुरस्कार व गौरव मी करीत असलेल्या कार्याची जबाबदारी वाढवणारे आहे. सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून आमच्या ग्राहकांना वर्धित मूल्य मिळवून देण्यासाठी आम्ही निरंतर प्रयत्नरत राहू. आमच्या प्रयत्नांना पाठिंबा, प्रोत्साहन देणाऱ्या संयुक्त अरब अमिरातीच्या शासकांचा मी आभारी आहे.

'या' देशात सार्वजनिक परिवाहन सेवा मोफत; भांगेची खरेदी-विक्रीही कायदेशीर :
 • लक्झेमबर्ग : प्रदुषणाशी लढण्य़ासाठी युरोपमधील लक्झेमबर्ग या देशामध्ये पुढील उन्हाळ्यापर्यंत सार्वजनिक परिवाहन सेवा मोफत करण्यात आली आहे. यामुळे नागरिक खासगी कार सोडून सरकारी बसमधून प्रवास करण्यास प्राधान्य देतील अशी आशा तेथील नव्या पंतप्रधानांना आहे. असे करणारा लक्झेमबर्ग हा जगातील पहिलाच देश बनला आहे. याचबरोबर भांगेची खरेदी-विक्री आणि साठवणूकही कायदेशीर करण्यात आली आहे. 

 • लक्जेमबर्गमध्ये प्रदूषण आणि वाहतूक कोंडीची समस्या जटील बनत चालली आहे. यामुळे नागरिकांना सरकारी बस, ट्रेन आणि ट्राममधून प्रवास करण्यासाठी एकही पैसा न आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशाला प्रदुषण आणि वाहतूक कोंडीपासून वाचविण्यासाठी सरकार नवनवीन उपाययोजना अवलंबत आहे. 

 • बुधवारी झेविअर बेटल यांनी लक्झेमबर्गच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. डेमोक्रेटिक पार्टीचे नेते बेटल यांनी सोशलिस्ट वर्कर्स पार्टी आणि ग्रीन पार्टी यांच्या सोबत मिळून सरकार स्थापन केले आहे. बेटल यांनी प्रचारावेळीच पब्लिक ट्रान्सपोर्ट मोफत देण्याचे आश्वासन दिले होते. बेटल यांनी भांगेची खरेदी-विक्री आणि साठवणूकही कायदेशीर करण्यात आली आहे. यामुळे यापुढे नागरिकांना भांगेच्या खरेदी-विक्री प्रकरणी अटक केली जाणार नाही. तसेच काही सुट्याही जाहीर केल्या आहेत. 

 • लक्झेमबर्ग या शहरामध्ये वाहतूक व्यवस्थेला जगातील सर्वात खराब वाहतूक म्हणून ओळखले जाते. एक लाख 10 हजार लोकसंख्येच्या या शहरामध्ये चार लाख लोक कामासाठी येतात. यापैकी शेजारील देशांतून दोन लाख लोक येतात.

यासिर शाह बनला कसोटीत जलद २०० विकेट्स घेणारा गोलंदाज :
 • अबुधाबी : पाकिस्तानचा लेग स्पिनर यासिर शाहनं कारकीर्दीतल्या 33 व्या कसोटीत दोनशे विकेट्सचा पल्ला गाठून आपल्या शिरपेचात मानाचा नवा तुरा खोवला आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद दोनशे विकेट्स घेण्याचा तब्बल 82 वर्षे जुना विक्रम आता त्याच्या नावावर जमा झाला आहे.

 • अबुधाबी कसोटीत न्यूझीलंडच्या विल सोमरविल हा यासिर शाहचा दोनशेवा विकेट ठरला. त्यानं ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर क्लॅरी ग्रिमेट यांचा 1936 सालचा विक्रम आपल्या नावावर केला. ग्रिमेट यांनी कारकीर्दीतल्या 36व्या कसोटीत दोनशे विकेट्स घेण्याची कामगिरी बजावली होती, तर यासिरने 33व्या कसोटीत हा विक्रम केला आहे.

 • यासिर शाहने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला 9 सामन्यात 50 विकेट्स घेतल्या होत्या तर 100 विकेट्सचा टप्पा त्याने 17 कसोटीत पूर्ण केला होता. यासिरने पाकिस्तानकडून 33 कसोटी सामन्यात 3.08 च्या सरासरीने 200 विकेट्स घेतल्या आहे. त्याशिवाय एकदिवसीय सामन्यात यासिरच्या नावे 19 विकेट्स आहेत. मात्र टी20 सामन्यात त्याला एकही विकेट्स मिळाला नाही.

दिनविशेष :
 • भारतीय लष्कर ध्वज दिन / आंतरराष्ट्रीय नागरी विमानसेवा दिन

महत्वाच्या घटना 

 • १८२५: बाष्पशक्तीवर चालणारे एंटरप्राइज हे भारतात आलेले पहिले जहाज.

 • १८५६: पहिला उच्चवर्णीय विधवा विवाह कोलकात्यात झाला.

 • १९१७: पहिले महायुद्ध – अमेरिकेने ऑस्ट्रिया/हंगेरी विरुद्ध युद्ध पुकारले.

 • १९३५: प्रभातचा धर्मात्मा हा अस्पृष्योद्धारावरचा चित्रपट मुंबईतील कृष्ण सिनेमात प्रदर्शित झाला.

 • १९४१: दुसरे महायुद्ध – जपानने पर्ल हार्बरवर तुफानी हल्ला केला.

 • १९७५: इंडोनेशियाने पूर्व तिमोरवर हल्ला केला.

 • १९८८: यासर अराफात यांनी इस्त्राएलच्या अस्तित्त्वास मान्यता दिली.

 • १९९४: कन्‍नड साहित्यिक यू. आर. अनंतमूर्ती यांना ज्ञानपीठ पारितोषिक जाहीर.

 • १९९५: फ्रेन्च गयानातील कोऊरू प्रक्षेपण केन्द्रावरुन इन्सॅट-२सी या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले.

 • १९९८: ७२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी वसंत बापट यांची निवड.

 • २०१६: पाकिस्तान इंटरनॅशनल एरलाईन्स चे पीके ६६१ विमान कोसळले. यात ४७ लोकांचा मृत्यू.

जन्म 

 • १९०२: भारतीय क्रिकेटपटू जनार्दन नवले यांचा जन्म. (मृत्यू: ७ सप्टेंबर १९७९)

 • १९२१: स्वामीनारायण पंथातील अध्यात्मिक गुरू प्रमुख स्वामी महाराज यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट २०१६)

 • १९५७: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू जिऑफ लॉसन यांचा जन्म.

मृत्यू 

 • १८९४: सुएझ कालव्याचे सहनिर्माते फर्डीनंट द लेशप्स यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १८०५)

 • १९४१: कविवर्य भास्कर रामचंद्र तथा भा. रा. तांबे यांचे निधन. (जन्म: २७ ऑक्टोबर १८७४)

 • १९७६: विचारवंत आणि शिक्षणतज्ज्ञ गोवर्धनदास पारेख यांचे निधन.

 • १९८२: संगीतशिक्षक बाबूराव विजापुरे यांचे निधन. (जन्म: १७ जून १९०३)

 • १९९३: इव्होरी कोस्ट आयलंडचे पहिले अध्यक्ष फेलिक्स हॉफॉएट-बोजि यांचे निधन. (जन्म: १८ ऑक्टोबर १९०५)

 • १९९७: ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी शांतानंद सरस्वती यांचे अलाहाबाद येथील अलोपी आश्रमात निधन. (जन्म: १६ जुलै १९१३ – अच्छाती, बस्ती, उत्तर प्रदेश)

 • २००४: अॅमवे चे सहसंस्थापक जय व्हॅन ऍन्डेल यांचे निधन. (जन्म: ३ जुन १९२४)

 • २०१३: ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक विनय आपटे यांचे निधन.

 • २०१६: पाकिस्तानी गायक आणि इस्लाम धर्मप्रचारक जुनैद जमशेद यांचे विमान अपघातात निधन.

टिप्पणी करा (Comment Below)