चालू घडामोडी - ०७ फेब्रुवारी २०१९

Updated On : Feb 07, 2019 | Category : Current Affairsराज्य सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा, कलाकारांचा सन्मान होणार :
 • मुंबई : सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्तींना राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदाच्या राज्य सांस्कृतिक पुरस्कारांच्या घोषणेचा शासन निर्णय आज प्रसिध्द करण्यात आला.

 • नाटक, कंठसंगीत, उपशास्त्रीय संगीत, मराठी चित्रपट, किर्तन, शाहिरी, नृत्य, आदिवासी गिरीजन, कलादान, वाद्यसंगत, तमाशा, लोककला या क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या कलाकारांना प्रतिवर्षी राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

 • नाटक विभागासाठी रवी पटवर्धन, कंठसंगीतासाठी, श्रीमती माधुरी विश्वनाथ ओक, उपशास्त्रीय संगीतासाठी श्याम देशपांडे, मराठी चित्रपटासाठी उषा नाईक, कीर्तनासाठी ह.भ.प.विनोदबुवा खोंड, शाहिरीसाठी शाहीर विजय जगताप, नृत्यासाठी श्रीमती माणिकबाई रेंडके, आदिवासी गिरीजनसाठी श्रीमती वेणू बुकले, वाद्यसंगीतासाठी पं.प्रभाकर धाकडे, तमाशासाठी श्रीमती चंद्राबाई अण्णा आवळे, लोककलेसाठी मोहन कदम आणि कलादानसाठी श्रीकांत धोंगडे  यांना हा पुरस्कार जाहिर झालेला आहे.

 • सन 1976 पासून सदरील पुरस्कारांचे वितरण करण्यात येत आहे. या पुरस्कारासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री,  विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील गठित समितीने २०१८ च्या पुरस्कारांसाठी या मान्यवरांची शिफारस केली होती. पुरस्काराचे रु. 1 लाख रोख, मानचिन्ह व प्रमाणपत्र असे स्वरुप आहे.

स्वीडिश पंतप्रधानांच्या सल्लागारपदी नीला विखे पाटील :
 • भारतीय वंशाच्या नीला विखे पाटील यांची स्वीडनच्या पंतप्रधान कार्यालयात सल्लागार म्हणून नियुक्ती झाली आहे. जानेवारीत स्वीडनच्या पंतप्रधान पदाचा कार्यभार हाती घेतलेले स्टीफन लोफवन यांच्यासोबत त्या काम करतील. ३२ वर्षीय नीला या ख्यातनाम शिक्षण तज्ज्ञ अशोक विखे पाटील यांच्या कन्या आहेत.

 • नीला पंतप्रधान कार्यालयातील आर्थिक, कर, अर्थसंकल्प, वित्तीय बाजार आणि घर बांधणीचे काम पाहतील, अशी माहिती अशोक विखे पाटील यांनी ‘पीटीआय’ला दिली. स्वीडन येथे जन्म झालेल्या नीला या स्टॉकहोम महापालिकेच्या निवडणूक समिती सदस्यही आहेत. नीला या माजी केंद्रीय मंत्री दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांच्या नात तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या त्या पुतणी आहेत.

 • नीला यांनी पदवीनंतर गॉथेनबर्ग स्कूल ऑफ बिझनेसमधून अर्थशास्त्र आणि कायदा या विषयांसह एमबीए केले असून माद्रीदमधील कॉम्प्ल्यूटन्स विद्यापीठातूनही एमबीए केले आहे.

दिल्लीत स्वामिनाथन आयोग लागू होणार, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची घोषणा :
 • नवी दिल्ली : दिल्लीतील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीतील केजरीवाल सरकारने स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याची घोषणा केली आहे. खुद्द दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याबद्दल ट्विट करत माहिती दिली.

 • या घोषणेने देशात स्वामीनाथन आयोग लागू करणारे दिल्ली पहिले राज्य ठरणार आहे. आता स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार दिल्लीतील शेतकऱ्यांना हमीभाव मिळणार आहे.

 • शेतीवर अवलंबून असणाऱ्या राज्यातील बळीराजाच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे. मोठे शेतकऱ्यांवरही नापिकीमुळे कर्जाचा बोजा वाढतच चालला आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना यातून बाहेर काढण्यासाठी केजरीवाल सरकारने दिल्लीत स्वामिनाथन आयोग लागू करण्यात येतं आहे

सरकारची आयडिया, दीर्घकालीन रस्त्यांसाठी जिओ टेक्स्टाईल मटेरियलचा प्रयोग :
 • परभणी : राज्यातील ग्रामीण भागात काळी माती आणि पाण्यामुळे वारंवार खचणाऱ्या रस्त्यांची अवस्था फार वाईट आहे मात्र शासनाला यावर उपाय सुचला आहे. ग्रामीण भागातील रस्ते दीर्घकालीन टिकावेत म्हणून आता जिओ टेक्स्टाईल मटेरियल टाकून रस्ता तयार केला जात आहे. राज्यातील पहिला प्रयोग परभणीत करण्यात येत आहे, अशा पद्धतीने रस्ता तयार करण्याची राज्यातील पहिलीच वेळ आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे खराब असलेल्या रस्त्यांचे आता भाग्य उजळणार आहे.

 • राज्यात गावखेड्यातून शहराला अथवा तालुक्याला जोडणाऱ्या ग्रामीण रस्त्यांची अवस्था स्वातंत्र्याची सत्तरी ओलांडल्या नंतरही कायम आहे. आजही अनेक तांड्या, वस्त्यांना जाण्यासाठी रास्ता नाही. हे रस्ते प्रामुख्याने डांबरीकरणाने केली जातात. मात्र डांबरी रस्ता तयार केल्यानंतर खालच्या काळ्या माती आणि पाण्यामुळे काही काळातच हा रस्ता खड्डेमय होतो, अनेक ठिकाणी खचला जातो.

 • वारंवार रस्ता करुनही काही दिवसातच ते रस्ते पुन्हा जशास तसेच होतात. मात्र यावर आता शासनाने पर्याय शोधलाय जे डांबरी रस्ते काळी माती आणि पाण्यामुळे तग धरत नव्हते ते यापुढे जिओ टेक्स्टाईल मटेरिअल या नवीन तंत्राद्वारे दीर्घकाळ टिकतील, असा दावा करण्यात आला आहे. परभणीत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत साडेगाव ते मांगणगाव या सहा किलोमीटर च्या रस्त्याचे काम 4 कोटी 98 लाख रुपये खर्चून केला जात आहे, ज्यात जिओ टेक्स्टाईल मटेरिअलच्या चादरचा वापर होत आहे.

 • परभणी तालुक्यातील साडेगाव ते मांगणगाव हा रस्ता मागच्या अनेक वर्ष खराब होता, ज्यामुळे गावकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करत परभणी गाठावे लागायचे. मागच्या दोन महिन्यांपासून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत लातूरच्या आशीर्वाद कन्ट्रक्शनला हे काम देण्यात आलं आहे. ते नवीन तंत्राचा वापर करुन हे काम करत आहेत.

जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी ट्रम्प यांच्याकडून डेव्हिड मालपास यांचे नामांकन :
 • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डेव्हिड मालपास यांना नामांकित केले आहे. माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार वॉल स्ट्रीटचे माजी अर्थशास्त्रज्ञ राहिलेले मालपस हे सध्या अमेरिकन सरकारच्या वित्त विभागात आंतरराष्ट्रीय प्रकरणांचे अंडर सेक्रेटरी म्हणून काम पाहत आहेत. डेव्हिड मालपस हे जागतिक बँकेचे मोठे टीकाकार राहिले आहेत.

 • बुधवारी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, जे देश खूप गरीब आहेत, त्यांना आर्थिक मदतीची मोठी गरज आहे. अशा देशांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी मालपास प्रयत्न करतील.  मालपास हे अपेक्षा पूर्ण करतील असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे.

 • अशा धोरणांचा अवलंब केला जाईल, ज्यामुळे जागतिक बँक जगभर गरिबीविरोधात लढा देऊ शकेन आणि आर्थिक संधी वाढतील, असे मालपस यांनी सांगितले. मालपास यांची बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यास ते दक्षिण कोरियाचे जिम याँग किम यांचे स्थान घेतील. जिम यांनी नुकताच राजीनामा दिला होता. २०१६ मध्ये मालपस यांनी अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत आर्थिक सल्लागाराचे काम केले होते.

 • दरम्यान, भारतीय वंशाच्या पेप्सिकोच्या माजी अध्यक्ष इंद्रा नुयी याही जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत होत्या. १९४९ पासून जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाची निवड अमेरिका करते. किम यांनी आपला कार्यकाळ संपण्याच्या तीन वर्षे आधीच जागतिक बँकेचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा कार्यकाळ वर्ष २०२२ मध्ये संपणार होता. अनेक प्रकरणांमध्ये ट्रम्प प्रशासनाबरोबरील मतभेदामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते.

आता तुमचे WhatsApp दुसरे कोणीही पाहू शकणार नाही, नवीन फीचर लाँच :

व्हॉट्स अ‍ॅपने नुकतेच iOS युजर्ससाठी बायोमेट्रिक ऑथेन्टिकेशन फीचर लाँच केले आहे. गेल्या काही दिवसांपासून या स्क्रीन लॉक फीचरचे टेस्टिंग सुरू होते. जाणून घेऊया हे नवंकोरं फीचर कसं अ‍ॅक्टिव्हेट करायचं आणि कसं वापरायचं?

दरम्यान, नोटिफिकेशन्स मिळाल्यानंतरही व्हॉट्स अ‍ॅप मेसेज लॉक असतानाही तुम्ही वाचू शकता आणि अनलॉक न करता तुम्हाला मेसेजचा रिप्लाय देणेही शक्य आहे.  

 • अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरमध्ये जाऊन WhatsApp सर्च करा

 • जर तुमच्या फोनमध्ये व्हॉट्स अ‍ॅपचे जुने वर्जन असेल तर, तुम्हाला अपडेटचा पर्याय दिसेल

 • अपडेटवर क्लिक केल्यानंतर काही युजर्संना iTunes च्या पासवर्डची मागणी केली जाऊ शकते. येथे आवश्यक असलेली माहिती भरावी.  

 • WhatsAppअपडेट करुन घ्या.  

 • WhatsApp ओपन करावे आणि सेटिंग्स ऑप्शनमध्ये जावे.

 • अकाऊंट सेटिंग्समध्ये तुम्हाला Privacy ऑप्शन मिळेल.

 • Privacy ऑप्शन सिलेक्ट करा, त्यामध्ये सर्वात शेवटी Screen Lockचा ऑप्शन दिसेल.

 • स्क्रीन लॉक ओपन केल्यानंतर आणखी काही ऑप्शन दिसतील. 

 • Immediately, After 1 minute आणि 1 Hour, असे ऑप्शन तुम्हाला मिळतील. 

 • येथे आपण फेस आयडी किंवा टच आयडी सिलेक्ट करू शकता. 

 • फेस आयडीमध्ये फेस स्कॅन होईल, तर टच आयडीमध्ये फिंगरप्रिंट स्कॅन करुन घ्यायचा. 

रणजीत विदर्भाला जेतेपदाची संधी :
 • नागपूर : अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा दुसऱ्यांदा अपयशी ठरताचा सौराष्ट्र संघाची रणजी करंडकाच्या अंतिम समान्यात चौथ्या दिवशीच घसरगुंडी झाली. २०६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाºया पाहुण्या संघाने ५८ धावात अर्धा संघ गमावताच गत चॅम्पियन विदर्भ दुसºया जेतेपदापासून केवळ पाच पावले दूर आहे. आज गुरुवारी अखेरच्या दिवशी सौराष्ट्रला अद्याप १४८ धावांची गरज असून त्यांचे पाच फलंदाज शिल्लक आहेत.

 • जामठा स्टेडियमवर चौथ्या दिवशी आदित्य सरवटेने पुन्हा एकदा पुजाराला भोपळाही न फोडू देता पायचित केले. डावखुºया सरवटेने नव्या चेंडूने मारा करीत दहा षटकात १३ धावात तीन गडी बाद केले. याआधी दोनदा उपविजेता राहिलेल्या सौराष्ट्र संघाला विजयासाठी जोरकस प्रयत्न करावे लागतील. चौथ्या दिवशी खेळ थांबला तेव्हा विश्वराज जडेजा (२३) आणि कमलेश मकवाना (२) हे नाबाद होते.

 • डावखुरा फिरकीपटू धर्मेंद्रसिंग जडेजा याने ९६ धावात सहा गडी बाद करीत सौराष्टÑची स्थिती भक्कम केली होती. ८ बाद १४८ असा संघर्ष करीत असताना आठव्या स्थानावर आलेल्या आदित्य सरवटेने १३३ चेंडूत चिवट ४९ धावा करीत संघाला २०० चा आकडा गाठून दिला. कालच्या २ बाद ५५ वरुन पुढे खेळणाºया विदर्भाकडून मोहित काळे याने ९४ चेंडूत ३८ धावांचे योगदान दिले. त्यानंतर सौराष्टÑच्या दुसºया डावाला सरवटे यानेच खिंडार पाडले. पहिल्या डावातील शतकवीर स्नेल पटेल (१२), हार्विक देसाई (८) आणि पुजारा (००) यांना पहिल्या पाच षटकात त्याने तंबूत परत पाठविले. त्याआधी, टिच्चून मारा करणाºया जडेजाने पहिल्या सत्रात अनुभवी वसीम जाफर (११) व गणेश सतीश (३५) यांच्यासह चौघांना बाद केले.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

 • १८५६: ब्रिटिशांनी अवध साम्राज्य ताब्यात घेतले. सम्राट वाजिद अली शहा याला तुरुंगात टाकण्यात आले.

 • १९१५: गंगाधर नरहर ऊर्फ बापुसाहेब पाठक यांनी पुण्यातील आर्यन हे पहिले चित्रपटगृह सुरु केले. तेथे प्रदर्शित झालेला पहिला मूकपट होता हिर्‍याची अंगठी.

 • १९२०: बाबूराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनी ने तयार केलेला सैरंध्री हा चित्रपट पुण्याच्या आर्यन सिनेमात प्रथम प्रकाशित झाला.

 • १९४८: कसोटी क्रिकेटमधे शतक झळकवणारा नील हार्वे हा सर्वात लहान ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला.

 • १९७१: स्वित्झर्लंडमधे महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला.

 • १९७७: सोवियेत संघाने सोयुझ २४ हे अंतराळयान प्रक्षेपित केले.

 • १९९९: युवराज अब्दुल्ला जॉर्डनच्या राजेपदी विराजमान.

 • २००३: क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला.

जन्म 

 • १८१२: इंग्लिश कादंबरीकार व लेखक चार्ल्स डिकन्स यांचा जन्म. (मृत्यू: ९ जून १८७०)

 • १८७३: आरएमएस टायटॅनिक जहाजाचे रचनाकार थॉमस अँन्ड्रयूज यांचा जन्म. (मृत्यू: १५ एप्रिल१९१२)

 • १९०६: रशियन विमानशास्त्रज्ञ अँतोनोव्ह एअरक्राफ्ट कंपनीचे संस्थापक ओलेग अँतोनोव्ह यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १९८४)

मृत्यू 

 • १३३३:  निचिरेन शोषु बौद्ध धर्माचे संस्थापक निक्को यांचे निधन.

 • १९३८: अमेरिकन उद्योजक हार्वे फायरस्टोन यांचे निधन. (जन्म: २० डिसेंबर १८६८)

 • १९९९: जॉर्डनचे राजे हुसेन यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १९३५)

टिप्पणी करा (Comment Below)