चालू घडामोडी - ०७ जानेवारी २०१८

Date : 7 January, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भीमाशंकर देवस्थानचा आराखडा तयार, वनसंवर्धन अधिनियम १९८० अंतर्गत मान्यता घेण्याची गरज :
  • पुणे : भीमाशंकर देवस्थानचा १४० कोटी रुपयांचा पर्यावरणपूरक विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यातील काही विकासकामांसाठीच वनसंवर्धन अधिनियम १९८० अंतर्गत मान्यता घेण्याची गरज आहे. त्यामुळे उर्वरित कामांच्या मान्यतेसाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याची गरज नाही. परिणामी इतर कामे वेगाने होणार आहेत.

  • भीमाशंकर येथे दरवर्षी सुमारे २५ लाख भाविक दर्शनासाठी येतात. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे श्रीक्षेत्र भीमाशंकर या जोतिर्लिंग ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जाचे आहे. त्यामुळे भीमाशंकर देवस्थानाचा पर्यावरणपूरक विकास करण्याचे शासनाने निश्चित केले आहे. राज्यातील सर्व ज्योतिर्लिंगे राष्ट्रीय महामार्गांना जोडण्यात येणार आहेत.

  • या कामांना गती देण्यासाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे राज्य शासनाकडून पाठपुरावा केला जाणार आहे. भीमाशंकर परिसरातील निसर्गरम्य असून वन्यजीव अभयारण्य म्हणून राखीव वनामध्ये मोडते. त्यामुळे आराखड्यातील ज्या विकासकामांना भारतीय वनसंवर्धन अधिनियमन १९८० अंतर्गत मान्यता घेण्याची गरज आहे, अशाच कामांचे प्रसताव तयार करून केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार आहेत.

  • तसेच भीमाशंकर परिसरात बॅटरीवर चालणारी वाहने चालविण्याचा राज्य शासनाचा विचार आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगितले जात आहे. आराखड्यातील कामांसाठी खासगी जमीन संपादित केली जाणार आहे.

२४ तासांतच योगी सरकारने हज हाऊसचा भगवा रंग उतरवला :
  • लखनऊ : उत्तर प्रदेश राज्य हज समितीच्या अर्थात हज हाऊसच्या इमारतीच्या संरक्षक भिंतीला देण्यात आलेला भगवा रंग २४ तासांतच उतरवण्याची वेळ योगी सरकारवर आली. या प्रकरणी मुस्लिम संघटना आणि त्यांच्या प्रतिनिधींनी टीकेचा भडिमार केल्यानंतर सरकारने पुन्हा या भिंती पांढऱ्या रंगात रंगवल्या आहेत. मात्र, सरकारने ही बाब आपल्या अंगावर न घेता यासाठी रंगकामाचे कंत्राट दिलेल्या कंत्राटदारालाच जबाबदार धरले आहे.

  • योगी सरकारने सर्व सरकारी कार्यालये भगव्या रंगात रंगवायची मोहिम सुरु केली आहे. यामागे त्यांचा हिंदुत्वाचा अजेंडा आहे. मात्र, हा अजेंडा राबताना सरकारने मुस्लिमांचे प्रतिक असणाऱ्या हज हाऊसच्या बाहेरील संरक्षक भिंतही भगव्या रंगाने रंगवली.

  • भगवा रंग हा हिंदू धर्माचे प्रतिक असून हज हाऊस मुस्लिम धर्माचे प्रतिक आहे. त्यामुळे हज हाऊसला भगवा रंग लावून सरकार रंगांवरुन राजकारण करीत असल्याची टीका ऑल इं‌डिया सुन्नी बोर्डाचे अध्यक्ष मौलाना मोहम्मद मुश्ताक नदवी केली आहे.

  • तसेच या गोष्टींवरुन वाद घालण्याची गरज नाही. भगवा रंग हा ऊर्जेचे प्रतिक असून चमकदार असल्याने त्याचा रंग चांगला दिसतो, असे मुस्लिम वक्फ आणि हज राज्यमंत्री मोहसिन रजा यांनी म्हटले आहे.

लालूप्रसाद यादव यांच्या जामिनासाठी हायकोर्टात जाणारच- तेजस्वी यादव :
  • रांची- राजदचे सर्वेसर्वा व बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळाप्रकरणी रांचीतील सीबीआयच्या विशेष कोर्टाचे साडे तीन वर्षाचा कारावास व पाच लाख रूपये दंडाची शिक्षा सुनावली. रांचीतील सीबीआयच्या विशेष कोर्टात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिक्षा सुनावण्यात आली.

  •  21 वर्षांनंतर चारा घोटाळ्याचा निकाल लागला. लालू प्रसाद यांना जामीन मिळणार नाही, असंही कोर्टाने सांगितलं. लालू प्रसाद यादव यांच्या जामीनासाठी हायकोर्टात जाणार असल्याचं लालूप्रसाद यादव यांचा मुलगा व बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी म्हंटलं आहे.

  • मी हार मानणार नाही. लालू प्रसाद यादव यांच्या हायकोर्टाचा दरवाजा ठोठावणार आणि जामीन मिळवणारच, असं तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे.

  • लालू प्रसाद यादव यांना कोर्टाने दोषी ठरविल्यानंतर राजदच्या भविष्यावरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राजदचं भविष्यात काय होणार? यावरूनही अनेक चर्चा होत आहेत. तर दुसरीकडे लालू प्रसाद यादव यांच्यानंतर पक्षात मोठ्या प्रमाणात फूट पडेल, अशीही शक्यता वर्तविली जाते आहे. पण, तेजस्वी यादव यांनी हे सर्व अंदाज चुकीचे ठरतील, असं म्हटलं आहे

एटीपी महाराष्ट्र ओपन टेनिस - जाईल्स सिमॉनला जेतेपद, केवीन अँडरसनला केले पराभूत :
  • पुणे : फ्रान्सच्या जाईल्स सिमॉनने दक्षिण आफ्रिकेच्या केवीन अ‍ॅँडरसनचे एकेरीत आव्हान मोडीत काढत सरळ दोन सेटमध्ये पराभव करून एटीपी महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेत विजेतेपद जिंकले. शुक्रवारी उपांत्य फेरीत सिमॉनने अग्रमानांकित सिलीचला पराभवाचा धक्का दिला होता.

  • महाराष्ट्र टेनिस संघटनेच्या वतीने म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवर झालेल्या या स्पर्धेत कोणतेही मानांकन नसलेल्या सिमॉनने जागतिक क्रमवारीत १२४ व्या क्रमांकावर असलेल्या आणि २०१७ मध्ये यूएस ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या अ‍ॅँडरसनला ७-६ (४), ६-२ गुणांनी नमविले. सिमॉनने या स्पर्धेत माजी विजेता रॉबर्टा अगुतलासुद्धा घरचा रस्ता दाखविला आहे.

  • २९ वर्षीय सिमॉनने पहिल्या सेटमध्ये अधिक भक्कम सुरुवात केली. दोन्ही खेळाडूंनी सुरुवातीला आपल्या सर्व्हिस राखल्या. ७ व्या गेममध्ये सिमॉनने जोरदार खेळ करत केविन अँडरसनची सर्व्हिस भेदत ५-३ अशी आघाडी घेतली. त्यानंतर १०गेममध्ये पुनरागमन करत अँडरसनने सिमॉनची सर्व्हिस ब्रेक केली.

  • त्यामुळे सामन्यात ५-५ अशी बरोबरी निर्माण झाली. अखेर दोन्ही खेळाडूंनी पुन्हा एकदा आपल्या सर्व्हिस राखल्या व त्यामुळे सेट टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्ये सिमॉन याने नेटजवळून आक्रमक खेळ करत हा सेट ७-६ (७-४) जिंकून विजेतेपदाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले.

आली चॉकलेटी रंगाची नवी नोट :
  • मुंबई - कोणत्याही देशाची नोट असो वा नाणे, त्यावर असते त्या देशातील महत्त्वाची वास्तू, महापुरुष किंवा अजून एखाद्या आगळ्यावेगळ्या वैशिष्ट्याचे छायाचित्र. या नोटा, नाण्यांमधून त्या देशाची आर्थिक व सांस्कृतिक ओळखही होत असते.

  • १० रुपयांच्या नव्या नोटा रिझर्व्ह बँक चलनात आणत असून, त्याही अशाच वैशिष्ट्यपूर्ण आहेत. महात्मा गांधींचे छायाचित्र असलेल्या १० रुपयांच्या नोटांच्या मालिकेतील या नव्या नोट्या आहेत चॉकलेटी रंगाच्या.

  • या नोटेच्या एका बाजूस ओडिशातील कोणार्क येथील प्रसिद्ध सूर्यमंदिराचे चित्र असेल. दुसºया बाजूस महात्मा गांधी यांचे चित्र मध्यभागी असेल. तसेच उजव्या बाजूस अशोक स्तंभ, वॉटरमार्क, नंबर पॅनेल अशी वैशिष्ट्ये असतीलच.

  • १० रुपयांच्या या नव्या नोटेवर स्वाक्षरी असेल रिझर्व्ह बँकेचे विद्यमान गव्हर्नर उर्जित पटेल यांची. या नोटेचे डायमेन्शन असेल ६३ एमएम बाय १२३ एमएम. नव्या नोटा आल्या तरी १० रुपयांच्या जुन्या नोटाही चलनात कायम राहणार आहेत.

लोकमत सरपंच अ‍ॅवॉर्ड’ विजेत्या ग्रामपंचायतींना देणार बाजार ओटे, सहकारमंत्र्यांची घोषणा :
  • अहमदनगर : पाच हजार किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्येच्या ‘लोकमत सरपंच अ‍ॅवॉर्ड’ विजेत्या ग्रामपंचायतींना बाजार ओटे बांधण्यासाठी पणन विभाग अनुदान देईल, अशी घोषणा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शनिवारी येथे केली.

  • अहमदनगर येथे ‘लोकमत सरपंच अ‍ॅवॉर्ड’ सोहळा मंत्री देशमुख व जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या उपस्थितीत झाला. १३ सरपंचांना जिल्हास्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले. ‘लोकमत’ने रोजगारनिर्मिती करणाºया ग्रामपंचायतींच्या सरपंचांनाही पुरस्कार सुरू केले आहेत. त्यांना १० लाखांचे बिनव्याजी कर्ज देऊ, अशीही घोषणा त्यांनी केली.

  • सरपंचांना शासनानेही प्रोत्साहन देण्याची मागणी आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी केली. ‘लोकमत’च्या ‘सरपंच अ‍ॅवॉर्ड्’चे देशमुख यांनी कौतुक केले. सरपंचांना गौरविणारी योजना नव्हती.

  • ‘लोकमत’ने ही उणीव शोधून अशी पुरस्कार योजना सुरू केली आहे. हा अभिनव प्रेरणादायी उपक्रम असल्याचे मंत्री राम शिंदे म्हणाले. ‘बीकेटी टायर्स’ हे या सोहळ्याचे मुख्य प्रायोजक तर पतंजली प्रायोजक व महिंद्रा ट्रॅक्टर्स सहप्रायोजक आहेत.

दिनविशेष

महत्वाच्या घटना 

  • १६१०: गॅलेलिओ यांनी दुर्दार्शीच्या सहाय्याने इयो, युरोपा, गॅनिमिडी आणि कॅलिस्टो या गुरूच्या चार उपग्रहांचा शोध लावला.

  • १६८०: मुंबई कौन्सिलने शिवाजी महारांजाबरोबर करायच्या कराराचा मसुदा तयार केला.

  • १७८९: अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन निवडून आले.

  • १९२२: पंजाब केसरी लाला लजपतराय आणि त्यांचे सहकारी पंडित संतानम यांना राजद्रोहाच्या आरोपावरुन १८ महिन्यांची शिक्षा झाली.

  • १९२७: न्यूयॉर्क ते लंडन अशी अटलांटिक महासागर पार करणारी दूरध्वनीसेवा सुरू झाली.

  • १९३५: कोलकाता येथे इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकेडमीचे (INSA) उद्‌घाटन झाले.

  • १९५९: क्यूबातील फिडेल कॅस्ट्रो यांच्या सरकारला अमेरिकेने मान्यता दिली.

  • १९६८: अमेरिकेचे सर्व्हेयर यान चंद्राच्या टायको या विवराच्या किनारी उतरले.

  • १९७२: कन्याकुमारी येथील विवेकानंद केन्द्राचे काम पूर्ण झाले.

  • १९७८: एम. व्ही. चंद्रगुप्त ही मालवाहू नौका ६९ कर्मचार्‍यांसह होनोलुलू जवळील महासागरात बेपत्ता झाली.

जन्म

  • १८९३: स्वातंत्र्य वीरांगना जानकीदेवी बजाज यांचा जन्म. (मृत्यू: २१ मे १९७९)

  • १९२०: लोकसाहित्याच्या अभ्यासक सरोजिनी बाबर यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल २००८)

  • १९२१: अभिनेते चंद्रकांत गोखले यांचा जन्म. (मृत्यू: २० जून २००८)

  • १९२५: स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कन्या प्रभात यांचा जन्म.

  • १९४८: विदुषी व लेखिका शोभा डे यांचा जन्म.

  • १९६१: अभिनेत्री सुप्रिया पाठक यांचा जन्म.

  • १९७९: हिंदी चित्रपट अभिनेत्री बिपाशा बासू यांचा जन्म.

मृत्यू

  • १९८९: दुसर्‍या महायुद्धाच्या आधी व नंतरच्या काळातील जपानी सम्राट मिचेनोमिया हिरोहितो यांचे निधन. (जन्म: २९ एप्रिल १९०१)

  • २०००: विद्यार्थी सहायक समितीचे संस्थापक व स्वातंत्र्यसैनिक डॉ. अच्युतराव आपटे यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.