चालू घडामोडी - ०७ जानेवारी २०१९

Updated On : Jan 07, 2019 | Category : Current Affairsभारताने ७० वर्षांनी इतिहास रचला, ऑस्ट्रेलियन भूमीत कसोटी मालिका विजय :
 • सिडनी : टीम इंडियाने तब्बल 70 वर्षांनी ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकून नवा इतिहास रचला आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सिडनी कसोटी पावसामुळे अनिर्णित राहिली. त्यामुळे टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 2-1 अशी खिशात घातली.

 • टीम इंडियाने या कामगिरीसह ऑस्ट्रेलियन भूमीवर पहिला-वहिला मालिकाविजय साजरा केला. गेल्या सत्तर वर्षात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात एकही कसोटी मालिका जिंकता आली नव्हती. पण यावेळी विराट कोहलीच्या टीम इंडियाने यजमानांना धूळ चारत एक नवा इतिहास लिहिला.

 • भारताने या कसोटी मालिकेत अॅडलेड कसोटीत 31 धावांनी विजय मिळवला होता. ऑस्ट्रेलियाने पर्थ कसोटी जिंकून मालिकेत आपलं आव्हान कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. पण भारताने मेलबर्नची तिसरी कसोटी 146 धावांनी जिंकून मालिकेत आघाडी घेतली होती.

 • सिडनी कसोटीच्या चौथ्या दिवशी पावसामुळे अवघ्या 24.5 षटकांचाच खेळ होऊ शकला होता. पहिलं सत्र पावसामुळे पूर्णपणे वाया गेलं. त्यानंतर दुसऱ्या सत्रात चहापानानंतर पावसाने पुन्हा हजेरी लावली होती. पंचांनी चौथ्या दिवशी खेळ थांबवला त्यावेळी फॉलोऑननंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात बिनबाद सहा धावांची मजल मारली. टीम इंडियाकडे 316 धावांची भक्कम आघाडी जमा होती.

 • सिडनी कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी चेतेश्वर पुजारा आणि रिषभ पंतच्या दमदार शतकांमुळे टीम इंडियाने सिडनी कसोटीत आपला पहिला डाव सात बाद 622 धावांवर घोषित केला होता. भारताने ऑस्ट्रेलियात उभारलेली ही दुसरी सर्वात मोठी धावसंख्या ठरली आहे.

ड्रायव्हिंग लायसन्स आधारशी लिंक करावे लागणार :
 • केंद्र सरकार बनावट परवान्यांना लगाम घालण्यासाठी लवकरच वाहन चालवण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) आधारशी जोडणे (लिंक) अनिवार्य करणार आहे.

 • सरकार लवकरच वाहनचालक परवान्याला आधार कार्ड संलग्न करणे अनिवार्य करणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली. आम्ही लवकरच एक कायदा आणणार असून, त्यायोगे वाहनचालक परवान्याला (ड्रायव्हिंग लायसन्स) आधार संलग्न करणे अनिवार्य करण्यात येईल, असे विधि, इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान खात्याचे मंत्री असलेले प्रसाद यांनी येथे सुरू असलेल्या १०६व्या विज्ञान काँग्रेसमध्ये केलेल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले.

 • सध्या असे होते की, अपघात करून पळून जाणारी दोषी व्यक्ती दुय्यम (डुप्लिकेट) परवाना मिळवतो. यामुळे त्याला सहीसलामत सुटून जाणे शक्य होते. मात्र, परवान्याला आधार कार्ड संलग्न केल्यास, तुम्ही तुमचे नाव बदलू शकता, परंतु डोळ्यांची बुबुळे किंवा बोटांचे ठसे असे बायोमॅट्रिक्स बदलू शकत नाही. त्यामुळे तुम्ही डुप्लिेकट लायसन्स घेण्यासाठी गेलात, की या व्यक्तीजवळ आधीच चालक परवाना असून त्याला नवा परवाना दिला जाऊ नये असे यंत्रणा सांगेल, अशा शब्दांत प्रसाद यांनी आधार संलग्न करण्याची कारणमीमांसा स्पष्ट केली.

बुलढाण्याचा किशोर गव्हाणे विजेता :
 • मागील वर्षी उपविजेतेपद मिळवणाऱ्या बुलढाण्याच्या किशोर गव्हाणेचे ‘मविप्र नाशिक मॅरेथॉन’ जिंकण्याचे स्वप्न यंदा पूर्ण झाले. रविवारी झालेल्या शर्यतीत मागील वर्षीपेक्षा एक मिनिटे अधिक वेळ घेऊन दोन तास, २६ मिनिटे, ३१ सेकंद अशी वेळ नोंदवत सहाव्या ‘मविप्र नाशिक मॅरेथॉन २०१९’चे विजेतेपद त्याने मिळविले. मागील वर्षी गव्हाणेने दोन तास, २५ मिनिटे, २५ सेकंद अशी वेळ नोंदवली होती. सेनादलाच्या करण सिंगच्या नावे असलेला दोन तास, २२ मिनिटे आणि ३९ सेकंदाचा याआधीचा या मॅरेथॉनमधील विक्रम मात्र यंदाही अबाधित राहिला.

 • महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, बिहार, हरयाणातील धावपटूंनी सहभाग घेतला. मॅरेथॉनमध्ये द्वितीय क्रमांक राजस्थानच्या आशीष कुमारला (२:२८:३१) आणि तृतीय क्रमांक उत्तर प्रदेशच्या नवीन हुडाला मिळाला. एकूण १७ गटांमध्ये झालेल्या शर्यतींमध्ये तब्बल तीन हजारपेक्षा अधिक धावपटूंनी सहभाग नोंदवला होता.

 • रावसाहेब थोरात सभागृहात झालेल्या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय धावपटू  ललिता बाबर यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. आंतरराष्ट्रीय  कबड्डी प्रशिक्षिका शैलजा जैन यांच्या उपस्थितीत मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

भारतीयांच्या ई-वॉलेट वापरात वाढ :
 • जगातील दुसरा मोठा ऑनलाइन बाजार असणाऱ्या भारतात आता ई वॉलेटचा वापर ८ टक्क्यांनी वाढला आहे. एक व्यक्ती सरासरी तीन हजार रुपये डिजिटल पद्धतीद्वारे महिन्याला खर्च करत असल्याचे पाहणीतून आढळले आहे.

 • सध्या तंत्रज्ञानाने युग आहे. या डिजिटल युगात विविध कामांसाठी महाजालाचा वापर केला जातो. यामुळे वेबपोर्टल, अ‍ॅपचे प्रमाणही वाढले आहे. प्रत्येक वेळी रोखीचा वापर करण्यापेक्षा लोक ई वॉलेटचा किंवा डिजिटल पद्धतीचा वापर करू लागले असून महाजालाचा वापर करून पैसे भरण्याच्या वापरात ८.९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

 • नोटाबंदीनंतर ई पद्धतीचा वापर मोठय़ा प्रमाणावर वाढला आणि लोकांनी ई वॉलेटचा पर्याय मोठय़ा प्रमाणात स्वीकारला. सध्या दीडशेहून अधिक अ‍ॅप भ्रमणध्वनीच्या आयओएस आणि अँड्रॉईड प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. अनेक बँकांचेही अ‍ॅप बाजारात आलेले आहेत. खरेदी किंवा खाद्यपदार्थ मागविताना बऱ्याचदा ई पद्धतीचा वापर केल्यास देय रकमेवर सवलत दिली जाते. त्यामुळे या पर्यायाचा वापर सहज केला जातो, असे डिजिटल माध्यम व्यवस्थापक आदित्य पाटील यांनी सांगितले, तर ग्राहक कमीत कमी दोन हजार ते साडेचार हजार रुपये दर महिन्याला डिजिटल पद्धतीद्वारे खर्च करतात, असे डिजिटल वॉलेट यंत्रणेचे प्रमुख साहिल कुमार यांनी सांगितले.

 • शहरात बऱ्याचदा माहितीची चोरी होते किंवा फसवणूक होते अशा बातम्या पसरत असतात म्हणून बरेचसे ग्राहक ई वॉलेटचा वापर न करता डेबिट कार्ड आणि नेट बँकिंगचा वापर मोठय़ा प्रमाणात करतात. डेबिट कार्ड आणि नेट बँकिंगच्या वापराचे एकूण प्रमाण ६० टक्के आहे. देशातील मोठय़ा शहरांबरोबर लहान शहरे, जिल्हास्तरावरही याचा वापर वाढला आहे. डिजिटल ई वॉलेटचे प्रमाण खूप वाढत असले तरी यात सुरक्षितता येणे आवश्यक असल्याचेही मेहता म्हणाले.

‘आधार’मुळे निधीत बचत :
 • आधार योजना ही देशाचे चित्र पालटणारी ठरली असून, त्याच्या आधारे मदत योजना राबवल्याने पैशाची गळती कमी झाली असून, आता या वाचलेल्या पैशातून आयुष्मान भारतसारख्या तीन योजनांना निधी देता येऊ शकतो, असे प्रतिपादन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केले आहे.

 • आधार योजना यशस्वीरीत्या राबवण्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आहे. काँग्रेसमध्ये या योजनेबाबत विरोधाभास होता व निर्णायकता नव्हती. ‘बेनिफिट्स ऑफ आधार व्हेअर इट स्टँडस टुडे’ या  फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे, की आधारचा वापर अनुदानांचे वितरण करण्यासाठी करण्यात आल्याने गेल्या काही वर्षांत म्हणजे मार्च २०१८ अखेरीस नव्वद हजार कोटी रुपये वाचले आहेत. यात नकली लाभार्थी उघड झाले असून काही जणांची नावे दुबार होती तीही लक्षात आली आहेत, त्यामुळे हा पैसा वाचला आहे. जागतिक बँकेने डिजिटल डिव्हिडंड रिपोर्ट तयार केला असून, त्यात म्हटल्यानुसार भारत आधारमुळे दरवर्षी किमान ७७ हजार कोटी रुपये वाचवू शकतो.

 • आधारमुळे झालेली बचत आयुष्मान भारतसारख्या आरोग्य योजनांवर वापरता येईल. अशा तीन योजना तरी या बचतीच्या पैशातून राबवता येतील. आयुष्मान भारत व जनधन योजना यामुळे प्रत्येक कुटुंबाला वार्षिक पाच लाख रुपयांचा विमा मिळाला असून, १०.७४ कोटी गरीब कुटुंबांना त्याचा लाभ झाला आहे. आयुष्मान भारत योजनेत अनेकांना वैद्यकीय उपचार मिळाले आहेत. सप्टेंबरमध्ये आयुष्मान भारत योजना सुरू केल्यानंतर सात लाख गरीब रुग्णांना त्याचा फायदा झाला. कारण त्यांना रुग्णालयात मोफत उपचार मिळाले आहेत. यूपीएने आधार योजना विरोधाभासातून राबवली, त्यामुळे त्याचा काही उपयोग त्यांच्या काळात झाला नाही. काँग्रेसने या योजनेचे श्रेय न घेता उलट त्यांनी या योजनेस न्यायालयात आव्हान देऊन तंत्रज्ञान विरोध, आधार विरोध दाखवून दिला. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्णायकता दाखवून ही योजना यशस्वी केली आहे.

 • आधारमार्फत १६९८६८ कोटी रुपये निधी हस्तांतरित करण्यात आला आहे.  त्यात मध्यस्थांची डोकेदुखी कमी होऊन पैशाची गळती थांबली आहे. आधार विधेयक २०१६ मध्ये संमत झाल्यानंतर २८ महिन्यांत १२२ कोटी लोकांना आधार क्रमांक देण्यात आले. त्यातील ९९ टक्के लोक हे १८ वयाच्या पुढील आहेत. पहल व उज्ज्वला योजनेत आधार जोडणी असलेल्या खात्यात पैसे हस्तांतरित करण्यात आले. ५८.२४ रेशन कार्डेही आधारला जोडलेली असून, मनरेगाची १०.३३ कार्डे त्याला जोडली आहेत. १.९३ कोटी खऱ्या लाभार्थ्यांना यात पैसे मिळाले आहेत. प्राप्तिकर खात्याने आधीच २१ कोटी पॅन कार्डही आधारला जोडली आहेत.

रेल्वे प्रवाशांना आता २० मिनिटं आधी स्टेशनवर पोहोचावं लागणार :
 • मुंबई : लांब पल्ल्याच्या प्रवासाला जाणाऱ्या प्रवाशांना आता 20 मिनिटं आधीच स्टेशनवर पोहोचावं लागणार आहे. कारण विमानतळासारखीच सुरक्षाव्यवस्था अंमलात आणण्याचा विचार रेल्वे प्रशासनाकडून सुरु आहे.

 • रेल्वे प्रवाशांना आता किमान 15-20 मिनिटं आधी स्टेशनला पोहोचून सुरक्षेचे सर्व टप्पे पूर्ण करावे लागणार आहेत. जर प्रवासी रेल्वे निघण्याआधी हे टप्पे पूर्ण करु शकला नाही, तर त्याला प्रवासाला मुकावं लागणार आहे. येत्या काही दिवसात ही योजना देशातील तब्बल 202 रेल्वे स्थानकांवर राबवण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालक अरुण कुमार यांनी दिली आहे.

 • दरम्यान ज्या स्थानकांवर ही योजना राबवली जाईल ती रेल्वे स्थानकं सर्वबाजूंनी सुरक्षित करण्यात येणार आहेत. सुरक्षेची जबाबदारी इंटिग्रेटेड सिक्युरिटी सिस्टीम यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे. ज्याठिकाणी मार्ग बंद करण्याची सोय नसेल त्याठिकाणी रेल्वे सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात येणार आहेत.

 • सध्या देशभरातील 202 रेल्वे स्थानकांवर ही सुरक्षा योजना राबवण्यात येणार आहे. यात इंटिग्रेटेड सिक्यूरिटी सिस्टीम म्हणजेच ISS सुरक्षा यंत्रणा उभारण्यासाठी रेल्वेकडून मंजुरी मिळाली आहे. ISS सुरक्षा यंत्रणेमध्ये CCTV कॅमेरे, बॅग स्कॅनिंग, बॉम्ब डिटेक्टर आदींचा समावेश असेल. ही यंत्रणा रेल्वे स्टेशनच्या सर्व प्रवेशद्वारांवर असेल. या सर्व योजनेसाठी 385 कोटींचा खर्च प्रस्तावित आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

 • १६८०: मुंबई कौन्सिलने शिवाजी महारांजाबरोबर करायच्या कराराचा मसुदा तयार केला.

 • १७३८: भोपाळच्या लढाईत मराठा विजयानंतर पेशवा बाजीराव आणि जयसिंग दुसरा यांच्यात शांतता करार झाला.

 • १७८९: अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन निवडून आले.

 • १९०४: सीक्यूडी हा त्रासदायक अतिदक्षता सिग्नल सुरु करण्यात आला.

 • १९२२: पंजाब केसरी लाला लजपतराय आणि त्यांचे सहकारी पंडित संतानम यांना राजद्रोहाच्या आरोपावरुन १८ महिन्यांची शिक्षा झाली.

 • १९२७: न्यूयॉर्क ते लंडन अशी अटलांटिक महासागर पार करणारी दूरध्वनीसेवा सुरू झाली.

 • १९३५: कोलकाता येथे इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकेडमीचे (INSA) उद्‌घाटन झाले.

 • १९५९: क्यूबातील फिडेल कॅस्ट्रो यांच्या सरकारला अमेरिकेने मान्यता दिली.

 • १९७८: एम. व्ही. चंद्रगुप्त ही मालवाहू नौका ६९ कर्मचार्‍यांसह होनोलुलू जवळील महासागरात बेपत्ता झाली.

जन्म 

 • १८००: अमेरिकेचे १३वे राष्ट्रपती मिलॉर्ड फिलमोर यांचा जन्म. (निधन: ८ मार्च १९७४)

 • १८२७: युनिव्हर्सल स्टँडर्ड टाइमचे निर्माते सँडफोर्ड फ्लेमिंग यांचा जन्म. (निधन: २२ जुलै १९१५)

 • १८३१: युनिव्हर्सल पोस्टल युनियनचे संस्थापक हिनरिक वॉन स्टेफन यांचा जन्म. (निधन: ८ एप्रिल १८९७)

 • १८३४: रीस टेलिफोनचे निर्माते जोहान फिलिप रीस यांचा जन्म. (निधन: १४ जानेवारी १८७४)

 • १८३७: व्हाइट स्टार लाइन शिपिंग कंपनीचे संस्थापक थॉमस हेन्री इस्मे यांचा जन्म. (निधन: २३ नोव्हेंबर १८९९)

 • १८९३: स्वातंत्र्य वीरांगना जानकीदेवी बजाज यांचा जन्म. (निधन: २१ मे १९७९)

 • १९२०: लोकसाहित्याच्या अभ्यासक सरोजिनी बाबर यांचा जन्म. (निधन: १९ एप्रिल २००८)

 • १९२५: स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कन्या प्रभात यांचा जन्म.

 • १९२५: डूररेल्ड वन्यजीव उद्यानचे संस्थापक गेराल्ड डूर्रेले यांचा जन्म. (निधन: ३० जानेवारी १९९५)

 • १९२६: दक्षिण कोरियाचे ११वे पंतप्रधान किम जोंग-पिल यांचा जन्म. (निधन: २३ जुन २०१८)

 • १९३४: सायप्रसचे ५वे राष्ट्रपती तासॉस पापाडोपोलोस यांचा जन्म. (निधन: १२ डिसेंबर २००८)

 • १९४१: नोबेल पारितोषिक विजेते इंग्रजी केमिस्ट जॉन ई. वॉकर यांचा जन्म.

 • १९४५: केनियाचे २रे पंतप्रधान रेलिया ओडिंगा यांचा जन्म.

 • १९४६: रोलिंग स्टोनचे सह-संस्थापक जॉन वेंनर यांचा जन्म.

 • १९४७: टाइम आउटचे संस्थापक टायनी इलियट यांचा जन्म.

 • १९४८: विदुषी व लेखिका शोभा डे यांचा जन्म.

मृत्यू 

 • १९२०: ऑस्ट्रेलियाचे १ले पंतप्रधान एडमंड बार्टन यांचे निधन. (जन्म: १८ जानेवारी १८४९)

 • १९८४: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन-फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: ३ मे १९०२)

 • १९८९: दुसर्‍या महायुद्धाच्या आधी व नंतरच्या काळातील जपानी सम्राट मिचेनोमिया हिरोहितो यांचे निधन. (जन्म: २९ एप्रिल १९०१)

 • १९९८: नोबेल पारितोषिक विजेते क्रोएशियन-स्विस रसायनशास्त्रज्ञ व्लादिमीर प्रीलॉगयांचे निधन. (जन्म: २३ जुलै १९०६)

 • २०१७: पोर्तुगीजचे १६वे राष्ट्रपती मारियो सोरेस यांचे निधन. (जन्म: ७ डिसेंबर १९२४)

टिप्पणी करा (Comment Below)