चालू घडामोडी - ०७ जुलै २०१८

Date : 7 July, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
अटीतटीच्या सामन्यात इंग्लंडचा विजय, मालिकेत १-१ नं बरोबरी :
  • कार्डिफ : दुसऱ्या टी-20 सामन्यात इंग्लंडने भारताचा पराभव करत मालिकेत 1-1ने बरोबरी साधली आहे. अॅलेक्स हेसल्सच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडने दुसरा सामना पाच गडी राखून जिंकला आहे. भारताने इंग्लंडसमोर 149 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं.

  • अॅलेक्स हेल्सने इंग्लंडकडून 41 चेंडूत सर्वाधिक 58 धावा केल्या. याशिवाय जॉनी बेअर्सटोनेही 28 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

  • नाणेफेक जिंकत इंग्लंडने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर रोहित शर्मा अवघ्या 5 धावांवर बाद झाला. रोहितनंतर शिखर धवनही अवघ्या 10 धावांवर धावचित झाला. सामन्याच्या सुरुवातीलाच दोन विकेट गेल्यानंतर सावध खेळण्याची आवश्यकता असताना फटकेबाजी करण्याच्या नादात लोकेश राहुलही आपली विकेट देऊन बसला.

  • रोहित, शिखर आणि राहुल तंबूत परतल्यानंतर खेळायला आलेल्या विराट कोहली आणि सुरेश रैनाने संघाला सावरलं. कोहलीने सर्वाधिक 47 धावा केल्या. सुरेश रैनाने 27 आणि महेंद्रसिंग धोनीने 32 धावा केल्या. इंग्लंडच्या जेस बॉल, प्लंकेट, वाईली आणि आदिल रशीद या गोलंदाजांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

  • भारतानं दिलेल्या 149 धावांचं लक्ष्य इंग्लंडने 19.4 षटकांमध्ये गाठलं. शेवटच्या क्षणी अटीतटीच्या झालेल्या सामन्यात इंग्लंडने बाजी मारली. भारताकडून उमेश यादवने 2 विकेट घेतल्या. तर भुवनेश्वर कुमार, यजुवेंद्र चहल आणि हार्दिक पांड्याने एक-एक विकेट घेतली. दुसरा सामना जिंकून इंग्लंडने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. त्यामुळे अखरेचा सामना निर्णायक ठरणार आहे.

पाकचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना १० वर्षांची शिक्षा
  • इस्लामाबाद : पाकिस्तानमधील आगामी निवडणुकीपूर्वीच नवाज शरीफ आणि त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. पनामागेट भ्रष्टाचारप्रकरणी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना 10 वर्षं तर त्यांची मुलगी मरीयम शरीफ यांना 7 सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याआधी नवाज शरीफ यांनी आजचा निर्णय टाळण्यासाठी याचिका दाखल केली होती. मात्र कोर्टाने याचिका अमान्य करत आजच निर्णय दिला आहे.

  • कोर्टाने मरियमचे पती रिटायर्ड कॅप्टन सफदर यांनाही एका वर्षाची शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने बंद खोलीत नवाज शरीफ यांच्यासह त्यांची मुलगी आणि जावयाला शिक्षा सुनावली आहे. 100 पानी निकालपत्रात नवाज शरीफ यांना 73 कोटी रुपये (8 दशलक्ष पौंड) तर मरीयम यांना 18 कोटी रुपये (2 दशलक्ष पौंड) दंड ठोठावला आहे.

  • पनामागेट प्रकरणात नवाज शरीफ यांच्याविरोधात तीन गुन्हे दाखल आहेत. यातील एक ब्रिटनमधील लंडनमध्ये असलेल्या एवेनफील्ड अपार्टमेंटशी निगडित आहे. याचप्रकरणी शरीफ यांना 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सोबतच हे अपार्टमेंटही जप्त करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

  • याआधीही पनामागेट प्रकरणात पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाने माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना दोषी ठरवलं होतं. ज्यानंतर शरीफ यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. कोर्टाने शिक्षा सुनावल्यामुळे आता त्यांना निवडणूक लढवता येणार नाही.

  • मरीयम यांनाही सात वर्षांची शिक्षा सुनावल्यामुळे त्यांच्या राजकीय कारकीर्दीलाही ग्रहण लागू शकतं. पाकिस्तानमध्ये याच महिन्यात 25 तारखेला सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येणार आहेत.

राणीच्या बागेतील पेंग्विनकडे गुड न्यूज  :
  • मुंबई : मुंबईतील राणीच्या बागेत असलेल्या पेंग्विन्सच्या कुटुंबात गोड बातमी आहे. भायखळामधील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात मादी पेंग्विनने अंडं दिलं. त्यामुळे लवकरच या कुटुंबात नवीन सदस्य जन्माला येणार आहे.

  • राणीच्या बागेत पेंग्विनच्या तीन जोडीतील एका मादीने गुरुवारी अंडं दिलं. सर्वात कमी वयाचा असलेला पेंग्विन मिस्टर मॉल्ट (तीन वर्षे) आणि त्याची जोडीदार फ्लिपर (साडेचार वर्षे) यांच्याकडे ही गुड न्यूज आहे.

  • फक्त मुंबईतच नाही, तर देशभरात जन्माला येणारा हा पहिलाच पेंग्विन असेल. पेंग्विनच्या जन्मासाठी आणखी 40 दिवस वाट पाहावी लागणार आहे.

  • राणीच्या बागेतले सात पेंग्विन गेल्या दोन वर्षांत मुंबईच्या वातावरणात चांगलेच रुळले. मार्च-एप्रिल आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर हा पेंग्विनच्या प्रजननाचा काळ असतो.

  • मादीने अंडं दिल्यानंतर 40 दिवसांमध्ये त्यातून पिल्लू बाहेर येते. या छोट्या पेंग्विनच्या जन्माला अद्याप सव्वा महिना असला तरी राणीच्या बागेत त्याच्या स्वागताची तयारी सुरु झाली आहे. जन्मानंतर या पिल्लाचं वजन, पोषण याबाबतही काळजी घेतली जाणार आहे.

सिडको भूखंडाच्या विक्रीस स्थगिती, मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा :
  • नागपूर : नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील सिडकोच्या कथित भूखंड घोटाळ्यावरून थेट आरोप होताच, या भूखंड विक्री व्यवहारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी स्थगिती दिली. तशी माहिती त्यांनी विधान परिषदेत दिली.

  • सिडकोतील १७६७ कोटी रुपयांची २४ एकर जमीन कोयना प्रकल्पग्रस्तांना देण्यात आली होती. मात्र, ती जमीन बांधकाम व्यावसायिक मनिष भतीजा यांना अवघ्या साडेतीन कोटी रुपयांना विकण्यात आली. या जमीन विक्रीत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यहार झाल्याचा आरोप करत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी या भूखंड व्यवहाराबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांना लक्ष्य केले होते.

  • विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुरुवारी सिडको भूखंडासह आघाडी सरकारच्या काळातील २०० भूखंडाची न्यायालयीन चौकशीची घोषणा विधानसभेत केली. मात्र, ज्या भूखंड व्यवहारावरून फडणवीस यांच्यावर आरोप झाले, त्याला स्थगिती देण्याची औपचारिक घोषणा केली नव्हती. ती शुक्रवारी त्यांनी केली.

  • शुक्रवारी विधानसभेचे कामकाज विजेअभावी बंद पडल्याने फडणवीस यांनी विधान परिषदेत स्थगितीबाबतचे निवेदन केले. फडणवीस म्हणाले की, रायगड जिल्ह्यातील जी जमीन आठ प्रकल्पग्रस्तांना दिली होती, ती त्यांनी खासगी बिल्डरला विकल्याच्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा आपण गुरुवारी केली. हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला गेला होता. त्या अनुषंगाने या व्यवहाराला स्थगिती देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे.

  • मुख्यमंत्र्यांनीच आता या व्यवहारास स्थगिती दिल्याने, आम्ही उपस्थित केलेला मुद्दा वैध होता, यास पुष्टी मिळाली, असे काँग्रेस नेत्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील ६३ टक्के सरकारी कर्मचाऱ्यांची वेळेवर हजेरी, १५.५ टक्के येतात अकरानंतर :
  • नवी दिल्ली : महाराष्ट्रातील एकूण ३.१४ लाख कर्मचा-यांपैकी ६३ टक्के कर्मचारी दररोज कार्यालयात वेळेवर येतात, असे समोर आले आहे. पण या बाबतीत हरयाणा, पंजाब ही राज्ये महाराष्ट्राच्या तुलनेत आघाडीवर आहेत, तर पश्चिम बंगाल आणि बिहारमधील स्थिती राज्यापेक्षा वाईट आहे.

  • देशभरात सर्व सरकारी कार्यालयात गुरुवार, ६ जून रोजी कर्मचा-यांच्या बायोमेट्रिक हजेरीची माहिती संकलित करण्यात आली होती. त्यानुसार हरयाणामध्ये एकूण ९७ टक्के कर्मचारी वेळेआधीच कार्यालयात येतात तर पंजाबमध्ये हाच आकडा ९२ टक्के इतका आहे.

  • त्यानंतर अन्य राज्यांमध्ये हे प्रमाण राजस्थान ८८.७, दिल्ली ८६, उत्तरप्रदेश ८०, गुजरात ७० टक्के, मध्य प्रदेश ५२ आणि कर्नाटकमध्ये ६८ टक्के इतके आहे.

  • निम्मे कर्मचारी एक तास आधीच येतात - बायोमेट्रिक हजेरीच्या माहितीनुसार महाराष्ट्रातील ६३% कर्मचारी सकाळी ९ ते १० च्या दरम्यान कार्यालयात हजर असतात. यातील ५०% तर ९ च्याही आधीच कार्यालयात पोहचतात.

  • महाराष्ट्रात एकूण १९० सरकारी आस्थापनांमध्ये ३.१४ लाख कर्मचाºयांची बायोमेट्रिक हजेरी घेतली जाते. यात ५.२ टक्के कर्मचारी ठरलेल्या वेळेआधी एक तास पोहचतात तर ८.२ टक्के अर्धा तास आधी येतात.

हज यात्रेचे मुंबईतील पहिले विमान २९ जुलैला उडणार :
  • मुंबई : हज यात्रेसाठी मुंबईतून पहिले विमान २९ जुलै रोजी उड्डाण करणार आहे. २९ जुलै ते १२ आॅगस्ट या कालावधीत मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून हज यात्रेकरूंना घेऊन विमाने सौदी अरेबियामध्ये जातील. मुंबईतून यंदा १४ हजार ६०० यात्रेकरू हज यात्रेला जाणार आहेत.

  • मुंबईतील हज यात्रेसाठीचा विमानाचा हा दुसरा टप्पा आहे. उड्डाणे सुरू झाल्यानंतर प्रत्येक दिवशी सरासरी पाच ते सहा विमानांची उड्डाणे होतील. राज्यातून मुंबईव्यतिरिक्त औरंगाबाद, नागपूर येथून हज यात्रेसाठी विमाने जाणार आहेत. औरंगाबाद येथून २९ ते ३१ जुलै या कालावधीत तर नागपूर येथून २९ जुलै ते ४ आॅगस्ट या कालावधीत विमानाद्वारे हज यात्रेकरू हजला जातील.

  • केंद्रीय हज समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मक्सुद अहमद खान यांनी ही माहिती दिली. यात्रेकरूंना थेट जेद्दाह येथे पाठविण्यात येईल. त्यांचा परतीचा प्रवास मदिना येथून सुरू होईल. परतीच्या प्रवासात मुंबईसाठी मदिना येथून १२ ते २६ सप्टेंबर या कालावधीत विमानांची उड्डाणे होतील. तर नागपूरसाठी ११ ते १८ सप्टेंबर या कालावधीत उड्डाणे होतील. औरंगाबादसाठी १३ व १४ सप्टेंबर रोजी विमानांची उड्डाणे होतील. दुसऱ्या टप्प्यात औरंगाबाद, चेन्नई, मुंबई, नागपूर, रांची, अहमदाबाद, बंगळुरू, कोचीन, हैदराबाद, जयपूर व भोपाळ या ११ एम्बार्केशन पॉइंटवरून उड्डाणे होणार आहेत.

झाकीर नाईकला भारतात पाठवणे शक्य नाही, मलेशिया सरकारची आडमुठी भूमिका :
  • वादग्रस्त मुस्लिम प्रचारक झाकीर नाईकला भारतात पाठवणे शक्य नाही अशी आडमुठी भूमिका आता मलेशिया सरकारने घेतल्याचे समोर आले आहे. मलेशियाचे पंतप्रधान महाथीर मोहम्मद यांनी शुक्रवारी हा निर्णय जाहीर केला आहे. चिथावणीखोर भाषणांद्वारे मुस्लिम तरूणांना दहशतवादाकडे वळवल्याचा, बनावट कंपन्यांच्या माध्यमातून निधी गोळा करून दहशतवादी कारवायांसाठी उपलब्ध करून देण्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे.

  • गुरुवारपर्यंत समोर आलेल्या महितीनुसार भारताने केलेल्या प्रत्यार्पणाच्या मागणीवर मलेशिया सरकार विचाराधीन आहे अशी माहिती समोर आली होती. मात्र आज मलेशियाचे पंतप्रधान महाथीर मोहम्मद यांनी झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणाला नकार दिला आहे असे समजते आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

  • झाकीर नाईकमुळे कोणतीही समस्या निर्माण झालेली नाही. त्यामुळे त्याच्या प्रत्यार्पणाचा प्रश्नच निर्माण होत नाही असे मलेशियाच्या पंतप्रधानांनी म्हटले आहे. कुआलालंपूरबाहेर असलेल्या पुतराज्या या ठिकाणी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांना झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी झाकीर नाईकला भारतात पाठवणे शक्य नसल्याचे म्हटले आहे.

दिनविशेष :
  • जागतिक चॉकलेट दिन

महत्वाच्या घटना 

  • १४५६: मृत्यूच्या २५ वर्षांनंतर जोन ऑफ आर्क यांना निर्दोष ठरवले.

  • १८५४: कावसजीदावर यांनी दि बॉम्बे स्पिनिंग ॲन्ड विव्हिंग मिल पहिली कापड गिरणी मुंबईमध्ये सुरू केली.

  • १८९६: मुंबईच्या फोर्ट भागातील एस्प्लनेड मॅन्शन या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील वॉटसन हॉटेलमध्ये ऑगस्ते लुई या ल्युनिअर बंधूंनी भारतात पहिल्यांदाच चित्रपट दाखवला.

  • १८९८: हवाई बेटांनी अमेरिकेचे सार्वभौमत्व मान्य केले.

  • १९१०: पुणे येथे भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना.

  • १९८५: विम्बल्डन पुरूष एकेरीचे विजेतेपद १७ व्या वर्षी मिळवणारे बोरिस बेकर सर्वात तरुण खेळाडू बनले.

  • १९९८: इन्डिपेन्डन्स चषक तिरंगी क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेविरुद्ध खेळताना सचिन तेंडुलकरने वेस्ट इंडिजच्या डेसमंड हेन्सच्या एकदिवसीय सामन्यातील १७ शतकांची बरोबरी केली. तसेच एकदिवसीय सामन्यातील ७००० धावांचा टप्पा पार केला.

जन्म 

  • १६५६: शीख धर्माचे आठवे गुरु गुरू हर क्रिशन यांचा जन्म. (मृत्यू: ३० मार्च १६६४)

  • १८४८: ब्राझीलचे ५वे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सिस्को दि पॉला रॉद्रिगेस आल्वेस यांचा जन्म.

  • १९१४: संगीतकार अनिल बिस्वास यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मे २००३)

  • १९२३: कथाकार, कादंबरीकार आणि समीक्षक प्रा. लक्ष्मण गणेश जोग यांचा जन्म.

  • १९४७: नेपाळचे राजा ज्ञानेंद्र बीर विक्रम शहा देव यांचा जन्म.

  • १९४८: चित्रपट रंगभूमीवरील अभिनेत्री पद्मा चव्हाण यांचा जन्म. (मृत्यू: १२ सप्टेंबर १९९६)

  • १९६२: गायिका पद्मजा फेणाणी यांचा जन्म.

  • १९७३: भारतीय गायक-गीतकार आणि दिग्दर्शक कैलाश खेर यांचा जन्म.

  • १९८१: भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी यांचा जन्म.

मृत्यू 

  • १३०७: इंग्लंडचा राजा एडवर्ड पहिला यांचे निधन. (जन्म: १७ जून १२३९)

  • १५७२: पोलंडचा राजा सिगिस्मंड दुसरा ऑस्टस यांचे निधन.

  • १९३०: स्कॉटिश डॉक्टर शेरलॉक होम्स या गुप्तहेर कथांचे लेखक सर आर्थर कॉनन डॉइल यांचे निधन. (जन्म: २२ मे १८५९)

  • १९६५: इस्रायलचे २ पंतप्रधान मोशे शॅरेट यांचे निधन.

  • १९८२: भारतीय गुरू आणि धार्मिक लेखक बॉन महाराजा यांचे निधन. (जन्म: २३ मार्च १९०१)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.