चालू घडामोडी ०७ जून २०१८

Date : 7 June, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पर्यावरण संवर्धनाबद्दल लोकमतचा गौरव, ‘इंडिया आय’चा लोकजागर : 
  • नवी दिल्ली : पर्यावरण संरक्षणासाठी केवळ झाडे लावून भागणार नाही, झाडे जगविण्याची व संरक्षणाची जबाबदारीदेखील आपल्यालाच पार पाडावी लागेल, अशी भावना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी चौबे यांनी व्यक्त केली.

  • 'इंडिया आय इंटरनॅशनल ह्युमन राईट्स आॅब्झर्व्हर’ने पर्यावरण दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर इंडिया आयचे व्यवस्थापकीय संचालक राकेश शर्मा, अध्यक्ष राकेश गर्ग व डिव्हाईन शक्ती फाऊंडेशनच्या प्रमुख साध्वी भगवती सरस्वती उपस्थित होत्या.

  • विकासाच्या गतीमुळे पर्यावरण संरक्षणाची हाक लोकांपर्यंत पोहोचत नाही, अशी खंत व्यक्त करून राकेश शर्मा म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून मानवी स्वभाव असाच बनत चालला आहे. त्यामुळे आज आपल्याला स्वच्छ हवेसाठी झगडावे लागते आहे. दिल्लीसारख्या शहरांमध्ये तर स्वच्छ हवा असण्याच्या दिवसाची वाट पाहण्याची वेळ आली आहे. प्लास्टिकचा वापर रोखण्यासाठी दिल्लीतल्या घराघरात जाऊन कापडी, कागदी पिशव्या वाटणार असल्याची घोषणा शर्मा यांनी केली.

  • साध्वी भागवती सरस्वती म्हणाल्या, कागदांवर, बैठकांमध्ये पर्यावरण रक्षणाची केवळ चर्चा होते. आता प्रत्यक्ष जमिनीवर काम करण्याची वेळ आली आहे. प्रामाणिक प्रयत्न त्यासाठी करावे लागतील.

निकेश अरोरा 'पालो अल्टो'च्या सीईओपदी :
  • मुंबई : निकेश अरोरा यांच्या खांद्यावर पालो अल्टो नेटवर्क या सायबर सिक्युरिटी फर्मच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची (सीईओ) धुरा देण्यात आली आहे. अरोरा यांना पालो अल्टो नेटवर्ककडून 12.8 कोटी डॉलरचं (सुमारे 858 कोटी रुपये) पॅकेज देण्यात आले आहे. जगात सर्वाधिक पगार घेणाऱ्या सीईओंच्या यादीत अरोरा यांचं नाव दाखल झालं आहे.

  • 50 वर्षीय निकेश अरोरा यांची मार्क मिकलॉकलीन यांच्या जागी नियुक्ती झाली आहे. मिकलॉकलीन हे गेल्या सात वर्षांपासून पालो अल्टो नेटवर्कच्या सीईओपदावर होते. सीईओपदासह निकेश अरोरा हे पालो अल्टो नेटवर्कचे प्रेसिडंटही असतील. त्यामुळे मिकलॉकलीन यापुढे पालो अल्टो नेटवर्कचे व्हाईस चेअरमन म्हणून कंपनीशी जोडलेले असतील.

  • टीम कूक आणि बॉब लेजर यांच्या रांगेत निकेश अरोरा - 12.8 कोटी डॉलर पॅकेज असणारे निकेश अरोरा यांचे पॅकेज हे 'अॅपल'चे सीईओ टीम कूक यांच्या पॅकेजएवढे झाले आहे. त्यामुळे निकेश अरोरा हे आता टीम कूक (अॅपल) आणि बॉब लेजर (वॉल्ट डिज्नी) यांच्या रांगेत जाऊन बसले आहेत.

उत्खननात प्रथमच सापडले ब्रॉन्झ युगातील रथ व शस्त्रे :
  • मेरठ : उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यातील सुनौली गावात भारतीय पुरातत्व विभागाने (एएसआय) केलेल्या उत्खननात ब्रॉन्झ युगातील (इ.स.पूर्व २००० ते १८००) रथांचे अवशेष प्रथमच सापडले आहेत.

  • ‘एएसआय’ने गेल्या मार्चपासून यागावात आठ ठिकाणी उत्खनन सुरु केले होते. त्यात रथाच्या अवशेषाखेरीज आठ कबरस्ताने, तीन शवपेटिका, तलवारी, सुरे, कंगवे आणि आभूषणेही सापडली. तीन रथ एकाच ठिकाणी सापडल्याने ही कबरस्ताने शाही घराण्याची असावीत व त्या काळात येथे एखाद्या लढवय्या जमातीचे वास्तव्य असावे, असे संकेत मिळतात. या उत्खननाचे सहसंचालक एस.के. मुंजाल म्हणाले की, ब्रॉन्झ युगात मेसापोटेमिया व ग्रीस

  • संस्कृतीत रथांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असे. आता येथे त्याच काळातील रथ सापडल्याने येथील संस्कृतीही तेवढीच पुरातन असल्याचे दिसून येते.

  • मुंजाल यांच्या म्हणण्यानुसार येथे सापडलेले पुरातत्वीय अवशेष संशोधनास नवी दिशा देणारे आहेत. याचे कारण असे की, येथे सापडलेल्या शवपेटिकांवर तांब्याच्या पत्र्याचे मुकुटाच्या, फुलांच्या व शिंगांच्या आकाराची नक्षी बसविलेली आहे. यापूर्वी हडप्पा, मोहेन्जो दारो व धोलवारिया (गुजरात) येथील उत्खननातही शवपेटिका सापडल्या होत्या.

  • परंतु त्यांवर तांब्याचे नक्षीकाम नव्हते. येथे अशा नक्षीकामाच्या शवपेटिका सापडणे हे शाही दफनविधीचे द्योतक आहे. अशा प्रकारचे भारतीय उपखंडात सापडलेले हे पहिलेच कबरस्तान आहे. तलवारी, जांबिया, ढाली व शिरस्त्राणे अशी युद्धात वापरली जाणारी आयुधे सापडली यावरून या भागातील लढवय्या जमातीचे वास्तव्य दिसून येते, असे मुंजाल म्हणाले. 

NRI लग्नाची ४८ तासात नोंदणी झाली पाहिजे, अन्यथा पासपोर्ट, व्हिसा मिळणार नाही - मनेका गांधी :
  • भारतात एखाद्या तरुणीचं एनआरआय पुरुषासोबत लग्न झाल्यास ४८ तासात नोंदणी झाली पाहिजे असा आदेश मनेका गांधी यांच्या केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाकडून देण्यात आला आहे. सध्या भारतात लग्नाची नोंदणी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचं वेळेचं बंधन नाहीये. कायदा आयोगाच्या अहवालात लग्नाची नोंदणी करण्यासाठी ३० दिवसांचं बंधन असलं पाहिजे, त्यानंतर प्रत्येक दिवसामागे पाच रुपयांचा दंड ठोठावण्यात यावा अशी शिफारस करण्यात आली आहे.

  • ‘एनआरआय लग्नाची नोंदणी ४८ तासात झाली पाहिजे, अन्यथा पासपोर्ट किंवा व्हिसा मिळणार नाही’, असं मनेका गांधींनी सांगितलं आहे. पुढे त्यांनी सांगितलं की, महिला आणि बालविकास मंत्रालयाने रजिस्ट्रारना अशा लग्नांची माहिती पुरवण्याचे आदेश दिले आहेत, जेणेकरुन सेंट्रल डेटाबेसदेखील अपडेट राहिल.

  • यासाठी एक विशेष पोर्टल तयार करण्यात आलं आहे. या पोर्टलवर एनआरआय नवरदेवांशी करण्यात आलेल्या लग्नाची नोंदणी करावी लागेल. आतापर्यंत अशा पाच प्रकरणात एनआआय नवरदेवांचा पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे अशी माहिती मनेका गांधी यांनी दिली आहे.

  • ‘भारतातील तरुणींशी लग्न करुन एनआरआय नवरदेव परदेशात पळून जाण्याच्या समस्येवर अंकुश ठेवण्यासाठी महिला आणि बालविकास मंत्रालयाशिवाय परराष्ट्र आणि गृह मंत्रालय एकत्र काम करत आहे’, अशी माहिती मनेका गांधी यांनी दिली आहे.

  • मनेका गांधी यांनी सांगितल्यानुसार, ‘परराष्ट्र, गृह आणि महिला व बालविकास मंत्रालयाच्या प्रतिनिधींची एक समिती गठीत करण्यात आली आहे. तक्रार आल्यानंतर कारवाई होईल याची जबाबदारी या समितीकडे असेल’.

‘काला’ चित्रपटाच्या प्रदर्शन स्थगितीस न्यायालयाचा नकार :
  • प्रसिद्ध अभिनेता रजनीकांत याची भूमिका असलेल्या ‘काला’ या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली असून, आता हा चित्रपट गुरुवारी प्रदर्शित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

  • न्या. आदर्शकुमार गोयल व न्या. अशोक भूषण यांनी चित्रपट निर्माता के. एस. राजशेखरन यांची याचिका फेटाळली. या चित्रपटाची कथा, गाणी व दृश्ये हे सगळे काम माझेच होते असा दावा त्यांनी केला होता. ‘काला’ हा चित्रपट रजनीकांत यांचे जावई अभिनेते धनुष यांनी निर्मिती केलेला असून, वंडरबार फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेडच्या या चित्रपटाचे दिग्दर्शक पा. रणजिथ आहेत. हा चित्रपट आधी लांबणीवर टाकण्यात आला होता. आता तो गुरुवारपासून प्रदर्शित होत आहे.

  • राजशेखरन यांच्या वकिलाने असा आरोप केला, की या चित्रपटाचे स्वामित्व हक्क आमच्या अशिलाकडे आहेत व निर्मात्यांनी चित्रपट बनवताना आमची परवानगी घेतली नाही. ज्या चित्रपटाची सगळे जण वाट पाहात आहेत त्याच्या प्रदर्शनास स्थगिती द्यावी अशी तुमची अपेक्षा आहे काय, अशी विचारणा करून न्यायालयाने सांगितले, की या चित्रपटाचे प्रदर्शन दोनदा लांबणीवर टाकण्यात आले आहे.

  • वकिलांनी सांगितले, की १६ मे रोजी मद्रास उच्च न्यायालयाने या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबतची याचिका १६ जूनला सुनावणीसाठी ठेवल्याचे सांगितले. त्यावर न्यायालयाने सांगितले, की चित्रपट प्रदर्शित होऊ द्या. तो रोखता येणार नाही. ‘कारिकलन’ या चित्रपटाची कथा आपण १९९२ मध्ये लिहिली होती. त्या कथेचे जाहीर वाचनही झाले होते, त्या वेळी रजनीकांत यांचे बंधू त्या कार्यक्रमाला उपस्थित होते.

  • या कथेचे स्वामित्व हक्क घेण्यासाठी अर्ज करण्यात आला होता. यात रजनीकांत यांनी मुख्य भूमिका करावी असे ठरले होते. यातील कारिकलन हा चोला काळातील राजा आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १८९३: महात्मा गांधीं यांनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली.

  • १९३८: डी. सी. ४ प्रकारच्या विमानाचे प्रथम उड्डाण.

  • १९६५: अमेरिकेच्या सर्वोच्‍च न्यायालयाने परिणित दांपत्याने गर्भनिरोधक साधने वापरणे कायदेशीर ठरवले.

  • १९७५: क्रिकेटच्या पहिल्या विश्वकरंडक स्पर्धेस इंग्लंडमध्येे सुरुवात झाली.

  • १९८१: इस्रायलने इराकची ओसिराक परमाणू भट्टी नष्ट केली.

  • १९९४:आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या (IMF) उपव्यवस्थापकीय संचालकपदी अर्थतज्ज्ञ प्रभाकर नार्वेकर या प्रथमच एका भारतीयाची नियुक्ती झाली.

  • २००१: युनायटेड किंग्डम मधील निवडणुकांत टोनी ब्लेरच्या नेतृत्वाखाली लेबर पार्टीला मोठे बहुमत.

  • २००४: शिरोमणी अकाली दल (लॉँगोवाल) या राजकीय पक्षाची स्थापना.

  • २००६: अल कायदाचा इराकमधील म्होरक्या अबू मुसाब अल झरकावी हा अमेरिकन हवाईदलाने केलेल्या बॉम्बहल्ल्यात ठार झाला.

जन्म 

  • १९१३: लेखक टीकाकार मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल २०१०)

  • १९१४: दिग्दर्शक, पटकथाकार, लेखक व पत्रकार ख्वाजा अहमद तथा के. ए. अब्बास यांचा जन्म. (मृत्यू: १ जुन १९८७)

  • १९१७: अमेरिकन गायक, संगीतकार निर्माते डीन मार्टिन यांचा जन्म. (मृत्यू: २५ डिसेंबर १९९५)

  • १९४२: लिबियाचा हुकूमशहा मुअम्मर गडाफी यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑक्टोबर २०११)

मृत्यू 

  • १९५४: ब्रिटीश गणितज्ञ आणि संगणकशास्त्रज्ञ ऍलन ट्युरिंग यांचे निधन. (जन्म: २३ जुन १९१२)

  • १९७०: ब्रिटिश साहित्यिक इ. एम. फोर्स्टर यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १८७९)

  • १९७८: नोबेल पारितोषिक विजेते नॉरिश रसायनशास्त्रज्ञ रोनाल्ड जॉर्ज व्रेफोर्ड यांचे निधन.

  • १९९२: मराठी वाङ‌्मयाचे अभ्यासक आणि संशोधक डॉ. स. ग. मालशे यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर१९२१)

  • १९९२: नासकार चे सहसंस्थापक बिल फ्रान्स सीनियर यांचे निधन. (जन्म: २६ सप्टेंबर १९०९)

  • २०००: बालसाहित्यिक गोपीनाथ तळवलकर यांचे निधन. (जन्म: २९ नोव्हेंबर १९०७)

  • २००२: भारताचे उपराष्ट्रपती बसप्पा दानप्पा तथा बी. डी. जत्ती यांचे निधन. (जन्म: १० सप्टेंबर १९१२)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.