चालू घडामोडी - ०७ मार्च २०१८

Date : 7 March, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पंतप्रधान मोदींनंतर सोशल मीडियावर ‘या’ भारतीय नेत्याचे सर्वाधिक फॉलोअर्स :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियावर खूप सक्रीय असतात. मोदी हे सोशल मीडियावर अजूनही सर्वाधिक लोकप्रिय भारतीय नेते आहेत. विशेष म्हणजे मोदींच्या मागोमाग म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर भाजपाच्याच नेत्याची वर्णी लागली आहे.

  • भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना फेसबुक आणि ट्विटरवर सर्वाधिक फॉलो केले जाणारे दुसरे नेते आहेत. सोशल मीडियावर अमित शहा यांचे दोन कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत. मोदींचे फक्त ट्विटरवरच पाच कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत. शहा यांचे फॉलोअर तिन्ही साईट- ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर आहेत. मोदींच्या ट्विटर हँडलवर (@narendramodi) सुमारे पाच कोटी फॉलाअर्स दिसतात.

  • शहा यांनी २०१३ मध्ये ट्विटरवर अकाऊंट सुरू केले होते आणि दोनच दिवसांपूर्वी त्यांनी एक कोटी फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला. फेसबुकवर त्यांचे १.१ कोटी फॉलोअर्स आहेत. तर इन्स्टाग्रामवर ६.७७ लाख लोक त्यांना फॉलो करतात. भाजपातील एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार शहा या माध्यमाचा उपयोग पक्ष कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहणे आणि लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी करतात.

  • ते नेहमी सोशल मीडियावर काम करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांच्या संपर्कात असतात आणि इतर कार्यकर्त्यांना जनतेबरोबर संपर्क राहण्यासाठी या माध्यमाचा उपयोग करण्यासाठी प्रोत्साहित करतात.

'या' पाच कारणांमुळे श्रीलंकेत बौद्ध आणि मुस्लिम आले समोरासमोर :

नवी दिल्ली - कँडीमध्ये सुरु झालेली धार्मिक दंगल देशामध्ये पसरू नये यासाठी संपूर्ण श्रीलंकेमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे. बौद्ध आणि मुस्लिम या दोन समाजांमधील हा संघर्ष अचानक भडकलेला नाही. मागच्या वर्षभरापासून या दोन समाजांमध्ये असणाऱ्या तणावाने आता हिंसेचे रुप घेतले आहे. श्रीलंकेत बौद्ध आणि मुस्लिम समोरासमोर येण्यामागे ही पाच प्रमुख कारणे आहेत. 

धर्मांतर हे या हिंसाचाराचे मुख्य कारण आहे. श्रीलंकेत बौद्धांचे जबरदस्तीने धर्मांतर केले जात असल्याचा आरोप काही प्रखर बौद्ध संघटनांकडून करण्यात येत होता. 

  1. श्रीलंकेत प्राचीन बौद्ध स्थळांची तोडफोड करण्यात आली त्यामागेही मुस्लिम संघटना असल्याचा आरोप करण्यात आला.                                        
  2. म्यानमारमध्ये हिंसाचार सुरु असल्याने रोहिंगे मुस्लिम श्रीलंकेमध्ये आश्रयाला आले. त्यांना देशात थारा देऊ नये यासाठी काही राष्ट्रवादी बौद्ध संघटनांनी जोरदार आंदोलनही केले होते. 
  3. सध्या हिंसाचार फक्त कँडी शहरात झाला आहे. पण देशाच्या अन्य भागातही हा हिंसाचार वेगाने पसरु शकतो असे अलजजीरा वृत्तवाहिनीचे म्हणणे आहे. 
  4. श्रीलंकेत यापूर्वीही जातीय हिंसाचारात अनेकांचे प्राण गेले आहेत. श्रीलंकेत एकूण लोकसंख्येच्या 10 टक्के मुस्लिम आहेत. 75 टक्के बौद्ध आणि 13 टक्के हिंदू आहेत. 
  5. फेब्रुवारी महिन्यातही बौद्ध आणि मुस्लिमांमध्ये झालेल्या हिंसाचारात पाच जण जखमी झाले होते. अनेक दुकाने आणि मशिदींची नासधूस करण्यात आली होती. 
  6. 2015 मध्ये सत्ता मिळवल्यानंतर राष्ट्रपती सिरिसेना यांनी मुस्लिम विरोधी हिंसाचाराची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. पण त्यात पुढे फारशी प्रगती झाली नाही. 
एअरटेल, आयडियाची टीडीसॅटकडे धाव :
  • नवी दिल्ली - ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हव्या तितक्या योजना राबविण्याची परवानगी ट्रायने दूससंचार कंपन्यांना दिल्याच्या विरोधात एअरटेल व आयडिया यांनी टेलिकॉम डिस्प्युट्स सेटलमेंट अँड अ‍ॅपिलेट ट्रायब्युनलकडे (टीडीसॅट) दाद मागितली आहे.

  • या निर्णयामुळे दूरसंचार कंपन्या व ग्राहक या दोघांच्याही हिताला बाधा येऊ शकते. याचा फक्त जिओ या कंपनीलाच फायदा होणार आहे, असा या कंपन्यांचा दावा आहे. ट्रायचा निर्णय रद्द करण्यात यावा, अशी या कंपन्यांची मागणी अद्याप तरी टीडीसॅटने मान्य केलेली नाही. ट्रायने ४ आठवड्यांच्या आत उत्तर सादर करावे, असा आदेश टीडीसॅटने दिला आहे. ट्रायच्या उत्तरावर

  • ३ आठवड्यांच्या आत एअरटेल व आयडिया या २ कंपन्यांनी आपली बाजू मांडावयाची आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ एप्रिलला होणार आहे.

चीनची संरक्षणावर भारताच्या चौपट तरतूद :
  • नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण खर्चाबाबत नेहमीच टोमणे मारणाऱ्या चीनने यंदाच्या वर्षी आपल्या संरक्षण खर्चात प्रचंड प्रमाणात वाढ करण्याची तयारी सुरु केली आहे. 2018 साठी चीनने संरक्षण खर्चात तब्बल 175 अब्ज डॉलर्सची वाढ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे चीनचा एकूण संरक्षण खर्च जवळजवळ 11 हजार 380 अब्ज रुपये झाला आहे.

  • भारताच्या संरक्षण खर्चाच्या तुलनेत चीनचा खर्च जवळपास चौपट झाला आहे. दरवर्ष भारत 2 लाख 95 हजार कोटींचा खर्च संरक्षणावर करतो. चीनच्या खर्चात झालेली वाढ ती थोडीथोडकी नाही, तर 8.1 असल्याचं सांगितलं जातं आहे.

  • चीनचा वाढता संरक्षण खर्च भारताची चिंता तर वाढवणारा आहेच. पण अमेरिका आणि दोस्त राष्ट्रांनाही विचार करायला लावणारा आहे. जगभरातले आपले नौदलाचे तळ मजबूत करणं, नव्या ठिकाणी हवाई अड्डे तयार करणे, सैन्याचं आधुनिकीकरण आणि भविष्यातल्या  शस्त्रांचं तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी सर्वाधिक रक्कम खर्च केली जाणार आहे.

  • संरक्षण क्षेत्रावर खर्च करणाऱ्या जगातल्या टॉप-10 देशांमध्ये आता चीन दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. जगभरात होणाऱ्या संरक्षण खर्चाच्या 13 टक्के खर्च चीन करतो. सर्वाधिक खर्चात अर्थातच अमेरिका आहे. एकूण खर्चाच्या 36 टक्के रक्कम अमेरिका संरक्षण क्षेत्रावर करते.

  • रशियाचा खर्च 4.1 तर सौदी अरेबियाचा खर्च 3.9 टक्के आहे. भारताचा क्रमांक या यादीत फ्रान्सच्या बरोबरीने पाचवा लागतो. भारत आणि फ्रान्स 3.3 टक्के खर्च संरक्षणावर करतात. इंग्लंड, जपान आणि जर्मनीचा संरक्षण खर्च अनुक्रमे 2.9, 2.7 आणि 2.4 टक्के आहे. दक्षिण कोरीया आणि इटली या यादीत शेवटच्या क्रमांकावर आहे.

सातवा वेतन आयोग यंदाच लागू होणार, मुनगंटीवारांची घोषणा :
  • मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना येत्या अर्थसंकल्पात खुशखबर मिळणार आहे. कारण केंद्राप्रमाणे राज्यातही सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानपरिषदेत याबाबतची माहिती दिली. यावर्षीच हा वेतन आयोग लागू होणार असल्याचं आश्वासन मुनगंटीवार यांनी दिलं.

  • सातवा वेतन आयोग आणि निवृत्तीवेतनामुळे सरकारच्या तिजोरीवर तब्बल 21 हजार 530 कोटी रुपयांचा वाढीव बोजा पडणार असल्याचंही मुनगंटीवार म्हणाले.

  • आमदार कपिल पाटील, नरेंद्र पाटील, हेमंत टकले यांनी तारांकित प्रश्न उपस्थित करत, सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत विचारणा केली. त्यावर मुनगंटीवार यांनी उत्तर दिलं.

  • राज्यात सातवा वेतन आयोग लागू होण्यास उशीर झाल्याने कर्मचाऱ्यांचा तोटा होणार नाही. तो पूर्वलक्षी प्रभावानेच लागू होईल, असं मुनगंटीवार म्हणाले. जो 21 हजार 530 कोटींचा बोजा  सरकारच्या तिजोरीवर पडणार आहे, त्याची तरतूद अर्थसंकल्पात करु, असं त्यांनी नमूद केलं.

  • केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू झाला आहे. त्यानुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही तेव्हापासूनच लागू होईल.

श्रीलंकेची विजयी सलामी, भारतावर 5 विकेट्स राखून मात :
  • कोलंबो : कुशल परेराच्या वेगवान अर्धशतकी खेळीच्या जोरावर तिरंगी मालिकेतल्या पहिल्या टी-20 सामन्यात श्रीलंकेने भारताचा 5 विकेट्स राखून पराभव केला. टीम इंडियाने दिलेलं 175 धावांचं आव्हान श्रीलंकेने 18.3 षटकांत पाच विकेट्सच्या मोबदल्यात पार केलं.

  • कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात कुशल परेराने अवघ्या 37 चेंडूत 67 धावा फटकावत भारतीय गोलंदाजांवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं. त्यात त्याने सहा चौकार आणि चार उत्तुंग षटकार ठोकले. त्यानंतर श्रीलंकेच्या दसून शनाका आणि थिसारा परेराने श्रीलंकेच्या विजयाचे सोपस्कार पूर्ण केले.

  • भारताकडून वॉशिंग्टन सुंदर आणि यजुवेंद्र चहलने प्रत्येकी दोन, तर जयदेव उनाडकटने एक विकेट घेतली.

  • त्याआधी शिखर धवनच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने श्रीलंकेला 175 धावांचं आव्हान दिलं होतं. सलामीचा रोहित शर्मा आणि सुरेश रैना स्वस्तात माघारी परतल्यामुळे टीम इंडियाची सुरुवात खराब झाली होती. पण त्यानंतर शिखर धवनने मनीष पांडेच्या साथीने 95 धावांची भागीदारी रचत टीम इंडियाचा डावाला आकार दिला.

  • धवनने 49 चेंडूत सहा चौकार आणि सहा षटकारांसह 90 धावा केल्या. धवनचं ट्वेन्टी ट्वेन्टी कारकीर्दीतलं पहिलंवहिलं शतक दहा धावांनी हुकलं. तर मनीष पांडेने तीन चौकार आणि एका षटकारासह 37 धावांचं योगदान दिलं.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १८७६: अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांना टेलिफोनचे पेटंट मिळाले.

  • १९३६: दुसरे महायुद्ध – व्हर्सायचा तह धुडकावून जर्मनीने र्‍हाईनलँडमधे सैन्य घुसवले.

  • २००६: लष्कर-ए-तैय्यबा या आतंकवादी संघटनेने वाराणसी येथे बॉम्बस्फोट घडवून आणले.

  • २००९: केपलर स्पेस ऑब्झर्व्हेटरी या संशोधन संस्थेची स्थापना.

जन्म

  • १५०८: दुसरा मुघल सम्राट हुमायून यांचा जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी १५५६)

  • १७६५: फोटोग्राफी चे शोधक निसेफोरे नाऐप्से यांचा जन्म. (मृत्यू: ५ जुलै १८३३)

  • १७९२: ब्रिटिश गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ, रॉयल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचा संस्थापक सर जॉन विल्यम हर्षेल यांचा जन्म. (मृत्यू: ११ मे १८७१)

  • १९११: ज्ञानपीठ पुरस्कार विजिते आधुनिक हिंदी साहित्यिक आणि वृत्तपत्रकार सच्चिदानंद हिराचंद वात्सायन यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १९८७ – नवी दिल्ली)

  • १९१८: मराठी साहित्यिक स्नेहलता दत्तात्रय दसनूरकर यांचा जन्म.

  • १९३४: भारताचा यष्टिरक्षक नरी कॉन्ट्रॅक्टर यांचा जन्म.

  • १९४२: भारतीय क्रिकेटपटू उमेश कुलकर्णी यांचा जन्म.

  • १९५५: चित्रपट अभिनेता अनुपम खेर यांचा जन्म.

मृत्यू

  • १६४७: छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू दादोजी कोंडदेव यांचे निधन.

  • १९२२: रंगभूमी नट गणपतराव जोशी यांचे निधन. (जन्म: १५ ऑगस्ट १८६७)

  • १९५२: तत्वज्ञ परमहंस योगानंद यांचे निधन.

  • १९६१: भारतरत्न पंडित गोविंदवल्लभ पंत यांचे निधन. (जन्म: १० सप्टेंबर १८८७)

  • १९७४: माजी अर्थमंत्री टी. टी. कृष्णमाचारी यांचे निधन.

  • २०१२: संगीतकार रवि शंकर शर्मा ऊर्फ रवि यांचे निधन. (जन्म: ३ मार्च १९२६)

  • २०१५: भारतीय वकील आणि राजकारणी जी. कार्तिकेयन यांचे निधन. (जन्म: २० जानेवारी १९४९)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.