चालू घडामोडी - ०७ मार्च २०१९

Updated On : Mar 07, 2019 | Category : Current Affairsमुकेश अंबानी जगातील १३ व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती, गेल्या वर्षभरात संपत्तीत २५ टक्क्यांनी वाढ :
 • मुंबई : भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी जगातील 13 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. फोर्ब्सने नुकतंच जाहीर केलेल्या जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानी 13 व्या क्रमांकावर आहेत.

 • फोर्ब्सच्या जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ऑनलाईन ई-शॉपिंग कंपनी अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस पहिल्या क्रमांकावर आहेत.  बेजोस यांच्यानंतर मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स आणि वॉरेन बफे यांचा अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक आहे.

 • मुकेश अंबानी यांची संपत्ती 2018 मध्ये 40.1 अब्ज डॉलर एवढी होती. आता, अंबानी यांची संपत्ती 50 अब्ज डॉलर एवढी झाली आहे. गतवर्षी जगभरातील श्रीमंतांच्या या यादीत मुकेश अंबानी हे 19 व्या स्थानी होते. मात्र, यंदाच्या उत्पन्नानुसार अंबानी यांनी 6 क्रमांकाने आघाडी घेत फोर्ब्सच्या यादीत 13 वे स्थान पटकावलं आहे.

कर्नाटकमध्ये जनता दलाची १० जागांची मागणी :
 • नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये धर्मनिरपेक्ष जनता दलाने लोकसभा निवडणुकीत किमान दहा जागांची मागणी केली आहे. यापूर्वी जनता दल १२ जागांसाठी आग्रही होते. राज्यात लोकसभेच्या २८ जागा आहेत. धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते व माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांची काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भेट घेतली.

 • कर्नाटमध्ये या दोन पक्षांचे सरकार आहे. जागावाटप १० मार्चला जाहीर केले जाणार आहे. राहुल गांधी व देवेगौडा यांनी दोन तास चर्चा केली. या भेटीत त्यांनी कर्नाटकमधील जागावाटप, देशातील राजकीय स्थिती त्यात विरोधकांच्या ऐक्याची गरज यावर चर्चा केली.

 • चर्चेवेळी काँग्रसचे सरचिटणीस के.सी.वेणुगोपाल व धर्मनिरपेक्ष जनता दलाचे सरचिटणीस दानिश अली उपस्थित होते. आमची चर्चा झाली. बैठकीत मी दहा जागा मागितल्या असे देवेगौडा यांनी स्पष्ट केले. आता राहुल गांधीच अंतिम निर्णय घेतील असे देवेगौडा यांनी सांगितले. निवडणूक जिंकणे हेच आमचे उद्दिष्ट आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

 • काही मुद्दे वेणुगोपाल व मी ठरवू असे असे दानिश अली यांनी सांगितले. दोन तृतीयांश जागा काँग्रेस लढवेल, उर्वरित जागा जनता दलाकडे येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. जागानिहाय चर्चा आम्ही करू १० मार्चला त्याची घोषणा करू, असेही सांगितले.

केंद्रीय स्वच्छता पाहणीत लागोपाठ तिसऱ्या वर्षी इंदूर शहर प्रथम :
 • नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या स्वच्छता पाहणीत लागोपाठ तिसऱ्या वर्षी इंदूरला पहिला क्रमांक मिळाला आहे. दुसरा क्रमांक छत्तीसगडमधील अंबिकापूरला, तर तिसरा कर्नाटकमधील म्हैसूरला मिळाला आहे.

 • स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार २०१९ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी एका कार्यक्रमात प्रदान केले. नवी दिल्ली महापालिका भागास स्वच्छ लहान  शहराचा पुरस्कार मिळाला असून उत्तराखंडमधील गौचरला उत्तम गंगा शहराचा मान मिळाला आहे. सर्वात मोठे स्वच्छ शहर म्हणून अहमदाबादला मान मिळाला असून रायपूर हे वेगाने वाढणारे मुख्य शहर ठरले आहे.

 • स्वच्छ मध्यम शहराचा मान उज्जनला मिळाला असून वेगाने वाढणाऱ्या मध्यम शहरात मथुरा-वृंदावन यांना गौरवण्यात आले आहे. उच्च मानांकित शहरांना महात्मा गांधींचा पुतळा व सन्मानचिन्ह देण्यात आले आहे.  स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये देशाच्या सर्व शहरी भागातील महापालिका व पालिकांनी भाग घेतला होता. त्यामुळे हे सर्वात मोठे स्वच्छता सर्वेक्षण आहे.

 • महात्मा गांधी यांनी स्वच्छतेचे महत्त्व पटवण्यासाठी मोठे काम केले होते. आता संपलेला कुंभमेळा व तेथील स्वच्छता यातून लोक प्रेरणा घेतील अशी अपेक्षा आहे असे राष्ट्रपती कोविंद  यांनी सांगितले. स्वच्छतेबाबत लोकांची मनोवृत्ती बदलली पाहिजे, व्यक्तिगत व सार्वजनिक अशा दोन्ही पातळीवरील स्वच्छतेवर काम केले पाहिजे. स्वच्छतेची संस्कृती हा आपल्या नागरी जीवनाचा एकात्म भाग झाला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.

 • केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कामकाज मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले की, देशातील शहरांमध्ये स्थित्यंतरे होत आहेत. शहरीकरण होत असले तरी ते नियोजनबद्ध असले पाहिजे. आतापर्यंत शहरी मैला व कचरा व्यवस्थापनाचे मुद्दे कधी मध्यवर्ती नव्हते पण आता ते आव्हान म्हणून स्वीकारण्यात आले आहेत.

केप्लर दुर्बिणीने शोधलेल्या पहिल्या बाह्य़ग्रहावर शिक्कामोर्तब :
 • वॉशिंग्टन : दहा वर्षांपूर्वी सोडण्यात आलेल्या नासाच्या केप्लर दुर्बीणीने शोधलेला पहिला संभाव्य बाह्य़ग्रह हा आता खरोखर बाह्य़ग्रह ठरला आहे असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. या बाह्य़ग्रहाचे नाव केप्लर १६५८ बी असून तो तप्त गुरू ग्रहासारखा आहे. तो त्याच्या मातृताऱ्याभोवती ३.८५ दिवसात एक प्रदक्षिणा पूर्ण करतो, असे अमेरिकेतील हवाई विद्यापीठाच्या संशोधकांनी  सांगितले.

 • मातृताऱ्याचा व्यास पृथ्वीवरून सूर्य पाहताना असतो त्याच्या साठ पट जास्त आहे. केप्लर दुर्बीणीने अनेक संभाव्य बाह्य़ग्रहांचा शोध लावला होता. ही दुर्बीण २००९ मध्ये सोडण्यात आली होती. त्यात संक्रमण पद्धतीने ग्रहांचा शोध घेण्यात आला. ग्रह ताऱ्यासमोरून जाताना त्याचा प्रकाश किंचित कमी होतो त्यातून अप्रत्यक्ष पद्धतीने यात ग्रहाचे अस्तित्व शोधले जाते.

 • यात इतर कारणामुळे संक्रमणात जसा ताऱ्याच्या प्रकाशात फरक पडतो तसा पडू शकतो त्यामुळे या संभाव्य बाह्य़ग्रहांचे अस्तित्व इतर पद्धतींनी निश्चित केले जाते असे अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल जर्नल या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या संशोधनात म्हटले आहे. केप्लर दुर्बीणीने २०११ मध्ये केप्लर १६५८ बी हा संभाव्य बाह्य़ग्रह शोधून काढला होता तो खडकाळ आहे. त्याच्या मातृताऱ्याचा त्यावेळी केलेला अंदाज चुकीचा ठरला असून तारा व केप्लर १६५८ बी ग्रह हे आकाराने मोठे आहेत.

 • हवाई विद्यापीठाचे अ‍ॅशले चॉनटॉस यांनी सांगितले की, नवीन विश्लेषणानुसार ताऱ्यांच्या ध्वनिलहरी वापरू न या ग्रहाच्या व मातृताऱ्याच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. केप्लर १६५९ बी हा गुरूसारखा तप्त ग्रह असून तो तीन पटींनी मोठा आहे.

राज्यात २०११ पूर्वीची सर्व शासकीय जमिनीवरची अतिक्रमणे नियमित, ३८२ शहरांना लाभ :
 • उस्मानाबाद : सर्वांसाठी घरे या प्रधानमंत्र्यांच्या योजनेसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील 382 शहरे आणि त्यालगतच्या शासकीय जमिनीवर असलेली अतिक्रमणे नियमित होणार आहेत. वन विभागाची जमीन वगळता सर्व शासकीय जमिनीवरची अतिक्रमणे नियमित होणार आहेत. यामध्ये एक जानेवारी 2011 पूर्वीची अतिक्रमणे नियमित होणार आहेत.

 • यापूर्वीच राज्य सरकारने ग्रामीण भागातली अतिक्रमणे नियमित करण्याचे धोरण जाहीर केलं आहे. या अंतर्गत 1 हजार 500 चौरस फुटाचे भूखंड नियमित केले जाणार आहेत. अतिक्रमण नियमित करताना आरक्षित प्रवर्गाला (आर्थिक दृष्ट्या दुर्बलसह) पैसे द्यावे लागणार नाहीत. इतर प्रवर्गाला मात्र पहिल्या पाचशे चौरस फूट वगळून उर्वरित जागेसाठी सरकारी नियमाप्रमाणे कर भरावा लागणार आहे. शहरातील विकासासाठी सार्वजनिक कामासाठी राखीव ठेवलेल्या जागेवरची ही अतिक्रमणे नियमित होणार आहेत. यासाठी

 • जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती निर्णय घेणार आहे. पंतप्रधान योजनेतील घरासाठी पात्र ठरण्याकरिता लाभार्थ्यांकडे स्वतची जागा असावी, अशी अट आहे. परंतु बऱ्याच शहरांमध्ये या योजनेसाठी पात्र व्यक्ती ठरतात, मात्र त्यांच्याकडे स्वतची जागा नाही, बहुतेक ठिकाणी  निवासी प्रयोजनाकरिता शासकीय जमिनींवर अतिक्रमण केल्याचे आढळून आले आहे.

 • त्यामुळे 1 जानेवारी 2011 रोजी किंवा त्यापूर्वी निवासी कारणासाठी केलेलेली अतिक्रमणे नियमित करण्याचा 13 नोव्हेंबर 2018 रोजी मंत्रिमंडळाने धोरणात्मक निर्णय घेतला होता.  त्यानंतर नगरविकास विभागाने त्यासंबंधीचा स्वतंत्र आदेश काढून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना सर्व महापालिका व नगरपालिकांना दिल्या आहेत.

‘मुंबई इंडियन्स’नंतर आता धोनीवरही वेब सीरिज :
 • टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे. यानंतर IPL स्पर्धा सुरु होणार असून त्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई इंडियन्स संघाच्या प्रवासावर नेटफ्लिक्स एक माहितीपट प्रदर्शित करत आहे. या पाठोपाठ धोनीचा आत्तापर्यंतचा प्रवासही त्याच्या चाहत्यांना वेब सीरिजच्या माध्यमातून पाहता येणार आहे. ‘हॉटस्टार’वर ‘रोअर ऑफ द लायन’ या नावाने धोनीवर माहितीपट / वेब सीरिजमधून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

 • या सीरिजचा टिझर मंगळवारी प्रदर्शित झाला. या टिझरमध्ये ”एक कहानी हैं, जो आपने अब तक नही सुनी” म्हणजेच ”एक कहाणी जी तूम्ही अजून ऐकली नाही”, असे धोनी म्हणताना दिसत आहे.

 • तसेच या शोच्या सारांशामध्ये म्हटले आहे की, ‘लाखो चाहते मैदानात आणि मैदानाबाहेर धोनीला MSD, कॅप्टन कूल, थाला आणि अजून बरेच काही म्हणत असतात. त्याला प्रोत्साहन देत असतात. धोनीची गोष्ट सर्वांना माहित आहे किंवा तुम्ही असा विचार करता. पण त्याच्याकडे सांगण्यासारखे आणखी काही आहे. त्याच्या जवळच्या मित्रांनाही माहित नसलेली अशी ही दुसरी गोष्ट आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

 • १८७६: अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांना टेलिफोनचे पेटंट मिळाले.

 • १९३६: दुसरे महायुद्ध – व्हर्सायचा तह धुडकावून जर्मनीने र्‍हाईनलँडमधे सैन्य घुसवले.

 • २००६: लष्कर-ए-तैय्यबा या आतंकवादी संघटनेने वाराणसी येथे बॉम्बस्फोट घडवून आणले.

 • २००९: केपलर स्पेस ऑब्झर्व्हेटरी या संशोधन संस्थेची स्थापना.

जन्म 

 • १७६५: फोटोग्राफी चे शोधक निसेफोरे नाऐप्से यांचा जन्म. (मृत्यू: ५ जुलै १८३३)

 • १७९२: ब्रिटिश गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ, रॉयल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचा संस्थापक सर जॉन विल्यम हर्षेल यांचा जन्म. (मृत्यू: ११ मे १८७१)

 • १८४९: महान वनस्पतीतज्ञ ल्यूथर बरबँक यांचा जन्म. (मृत्यू: ११ एप्रिल १९२६)

 • १९११: ज्ञानपीठ पुरस्कार विजिते आधुनिक हिंदी साहित्यिक आणि वृत्तपत्रकार सच्चिदानंद हिराचंद वात्सायन यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १९८७ – नवी दिल्ली)

 • १९१८: मराठी साहित्यिक स्नेहलता दत्तात्रय दसनूरकर यांचा जन्म.

 • १९३४: भारताचा यष्टिरक्षक नरी कॉन्ट्रॅक्टर यांचा जन्म.

 • १९५२: वेस्ट इंडियन क्रिकेटपटू व्हिव्हियन रिचर्डस यांचा जन्म.

मृत्यू 

 • १६४७: छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू दादोजी कोंडदेव यांचे निधन.

 • १९२२: रंगभूमी नट गणपतराव जोशी यांचे निधन. (जन्म: १५ ऑगस्ट १८६७)

 • १९५२: तत्वज्ञ परमहंस योगानंद यांचे निधन.

 • १९६१: भारतरत्न पंडित गोविंदवल्लभ पंत यांचे निधन. (जन्म: १० सप्टेंबर १८८७)

 • १९७४: माजी अर्थमंत्री टी. टी. कृष्णमाचारी यांचे निधन.

 • १९९३: माहितीपट निर्मितीचे आद्य प्रवर्तक इर्झा मीर यांचे निधन. (जन्म: २६ ऑक्टोबर १९००)

 • २०००: कथालेखक प्रा. प्रभाकर तामणे यांचे निधन. (जन्म: २९ ऑक्टोबर १९३१)

 • २०१२: संगीतकार रवि शंकर शर्मा ऊर्फ रवि यांचे निधन. (जन्म: ३ मार्च १९२६)

टिप्पणी करा (Comment Below)