चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०७ मे २०१९

Date : 7 May, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
सीबीएसई दहावी परीक्षेचा निकाल जाहीर, १३ विद्यार्थ्यांना ५०० पैकी ४९९ गुण :
  • नवी दिल्ली : सीबीएसई(केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ) तर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. या परीक्षेत तब्बल 13 विद्यार्थ्यांना 500 पैकी 499 गुण मिळाळे आहेत. यंदा सीबीएसई दहावीचा निकाल 91.1 टक्के लागला आहे.

  • आज दुपारी सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईटवर दहावी परीक्षेचा हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. परीक्षेनंतर 38 दिवसांत हा निकाल लावण्यात आला आहे. देशभरातील 17 लाख 61 हजार 78 विद्यार्थ्यांनी यंदा सीबीएसईची दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी 16 लाख 4 हजार 428 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. cbse.nic.in, cbseresutls.nic.in या वेबसाईटवर हा निकाल उपलब्ध आहे.

  • सीबीएसईच्या या परीक्षेत 13 विद्यार्थ्यांना 500 पैकी 499 गुण मिळाले आहेत. तर 25 विद्यार्थ्यांना 500 पैकी 498 गुण मिळाले आहेत. यंदा सीबीएसईच्या निकालात त्रिवेंद्रम विभागानं बाजी मारली आहे. त्रिवेंद्रम विभागाचा निकाल 99.85 टक्के इतका लागला आहे. महाराष्ट्राचा समावेश असलेला चेन्नई विभाग 99 टक्क्यांसह दुसऱ्या, 95.89 टक्क्यांसह अजमेर तिसऱ्या क्रमांकावर आहे.

सचिनची बॅट वापरुन शाहीद आफ्रिदीने 'ते' विश्वविक्रमी शतक ठोकलं होतं :
  • इस्लामाबाद : पाकिस्तानचा धडाकेबाज फलंदाज शाहीद आफ्रिदी सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याचे कारण ठरलं आहे आफ्रिदीचं गेम चेंजर हे आत्मचरित्र. आफ्रिदीने या आत्मचरित्रात एक खुलासा केला आहे. आफ्रिदीने 37 चेंडूत ठोकलेल्या वेगवान शतकाचे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरशी कनेक्शन असल्याचे त्याच्या आत्मचरित्रात म्हटले आहे.

  • आफ्रिदीने त्याच्या आत्मचरित्रात म्हटले आहे की, सचिन तेंडुलकरने दिलेली बॅट वापरून त्याने 37 चेंडूत जगातलं सर्वात वेगवान शतक ठोकलं होतं. 1996 मध्ये कारकीर्दीतल्या केवळ दुसऱ्याच वन डे सामन्यात आफ्रिदीने हा पराक्रम गाजवला होता. त्या खेळीत आफ्रिदीने 40 चेंडूत 102 धावांची खेळी केली होती. या खेळीत सहा चौकार आणि तब्बल 11 षटकारांचा समावेश होता.

  • आफ्रिदीने त्याच्या आत्मचरित्रात म्हटले आहे की, "सचिनने त्याची बॅट पाकिस्तनचा अष्टपैलू खेळाडू वकार युनिसला दिली होती. पाकिस्तानातल्या सियालकोटमध्ये चांगल्या बॅट तयार करून मिळतात. त्यामुळे सचिनला त्याच्या बॅटसारखीच बॅट तयार करुन हवी होती. त्यामुळे सचिनने ती बॅट वकारला दिली होती. पण ती बॅट सियालकोटला नेण्याआधी त्याने मला दिली. त्या बॅटने मी अवघ्या 37 चेंडूत शतक ठोकलं."

पाणी वाटपासंबंधी महाराष्ट्र-कर्नाटक करार होणार :
  • बेळगाव : महाराष्ट्र सरकार बरोबर परस्पर पाणीवाटप करार करण्यासाठी कर्नाटक सरकार तयार असल्याची माहिती कर्नाटकचे जलसंपदा मंत्री डी. के.शिवकुमार यांनी दिली. दरवर्षी कृष्णा नदीच्या काठावरील गावांना उन्हाळ्यात भेडसावत असणारी पाणी समस्या कायमस्वरुपी सोडवण्यासाठी कर्नाटकने ही तयारी दर्शवली आहे.

  • महाराष्ट्रातून कृष्णा नदीचं पाणी सोडण्यासंबंधी चर्चा करण्यासाठी कर्नाटक जल निगमच्या कार्यालयात बेळगाव, बागलकोट आणि विजापूर येथील आमदार, खासदार यांची बैठक बोलवण्यात आली होती. दरवर्षी महाराष्ट्रातून उन्हाळ्यात कर्नाटकातून वाहणाऱ्या कृष्णा नदीचं चार टीएमसी पाणी सोडण्यात येतं.

  • 2004 पासून 2017 पर्यंत कर्नाटकने महाराष्ट्राकडून पाणी विकत घेतले आहे. यापुढे परस्पर पाणी वाटप करार करुन दोन राज्यातील पाणी समस्या निवारण्यासाठी कर्नाटक सरकार तयार असून त्या संबंधीचे पत्र राज्याच्या मुख्य सचिवांकडून महाराष्ट्र सरकारला पाठवण्यात येईल.

  • पाणी वाटप करार कसा असावा या संबंधी निर्णय घेण्यासाठी तांत्रिक समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती तांत्रिक आणि अन्य बाबींचा विचार करुन अहवाल देणार आहे. त्यामुळे कर्नाटक महाराष्ट्राला आणि महाराष्ट्र कर्नाटकला पाणी देण्याबाबत पाणी वाटप करार लवकरच करण्यात येईल, असंही जलसंपदा मंत्री डी. के. शिवकुमार यांनी सांगितलं.

पंतप्रधान मोदींना आणखी दोन प्रकरणात निवडणूक आयोगाकडून क्लीनचीट :
  • नवी दिल्ली - निवडणूक आयोगाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणखी दोन प्रकरणात क्लीनचीट दिली आहे. 23 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद येथे काढलेल्या रोड शोविरोधात काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. मात्र निवडणूक आयोगाच्या सूत्रांनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचं निदर्शनास येत नसल्याचं सांगण्यात आलं आहे. 

  • सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकच्या चित्रदुर्ग येथे 9 एप्रिल रोजी दिलेल्या भाषणात नवीन मतदारांना बालकोट एअर स्ट्राईकचा उल्लेख करत शहीद झालेल्या जवानांप्रती तुमचं मत समर्पित करा असं आवाहन केलं होतं. त्यामध्येही पंतप्रधानांना क्लीनचीट दिल्याची माहिती आहे. त्याच दिवशी महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यात औसा येथेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशाप्रकारे नवीन मतदारांना आवाहन केलं होतं. अद्याप आयोगाकडून या दोन्ही प्रकरणांमध्ये घेण्यात आलेले निर्णय सार्वजनिक केले नाहीत. मात्र आत्तापर्यंत ही दोन्ही प्रकरणं मिळून एकूण 8 प्रकरणांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक आयोगाकडून क्लीनचीट देण्यात आली आहे. 

  • गुजरात निवडणूक आयोगाकडून प्रथमदर्शनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचारसंहितेचं उल्लंघन केलं नसल्याचं दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदान केल्यानंतर रोड शो करत विरोधकांवर राजकीय टीका केली होती. हे आचारसंहितेचं उल्लंघन असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता. याआधीही निवडणूक आयोगाकडून मोदी यांचे सहा भाषण, शाह यांचे दोन भाषण आणि काँग्रेस अध्यक्षांच्या एका भाषणावर घेण्यात आलेले आक्षेप फेटाळून लावले होते. 

काय आहे '996', ज्यामुळे चीनच्या तरुणांची उडालीय झोप :
  • चीनमधील तरुणांना सध्या एका गंभीर समस्येचा सामना करावा लागत आहे. 996 असे या समस्येचं नाव आहे. बऱ्याचदा अनेक तरुणांनी यासंबधी चर्चा केली आहे. काही ठिकाणी तक्रारी सुद्धा करण्यात आल्या आहेत. मात्र, या समस्येवर उपाय झालेला दिसून येत नाही.

  • सध्या चीनमध्ये डिजिटल कामकाज मोठ्याप्रमाणात वाढत आहे. त्यामुळे इंजिनीअर, कोडर, सॉफ्टवेअर डेव्हलपर, गेम डिझाईनर आणि आयटी सेक्टरमधील अनेक लोक 996 मुळे त्रस्त आहेत. त्यांची रात्रीची झोप 996 मुळे उडाली आहे.

  • खरंतर, 996 म्हणजे, आठवड्यातील सहा दिवस सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत काम करण्याची वेळ. ही वेळ कर्मचाऱ्यांच्या मर्जीने ठेवली नसून दबामुळे ठेवल्याचे समजते. यासाठी काही पगारवाढ किंवा सुविधाही दिल्या नसल्याचे समजते.

  • 996 मुळे चीनमधील जास्तकरुन टेक्नॉलॉजी क्षेत्रातील तरुणांचा वर्क-लाईफ बॅलन्स बिघडला आहे. त्यामुळे याठिकाणी 996 ची तक्रार करत आहेत.

  • गेल्या काही दिवसांपूर्वी एका चीनी तरुणांने वृत्तसंस्था एएफपीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, हा विषय संपूर्ण जगात वादाचा मुद्दा बनला आहे. एका वर्षानंतर एखाद्या मुलीसोबत बोलत असल्याचे यावेळी एएफपीच्या रिपोर्टरशी बोलताना या तरुणाला वाटले.

  • उल्लेखनीय म्हणजे, 996 असे काम करणाऱ्या कंपन्यामध्ये हुआवाई, अलीबाबा यासारख्या कंपन्यांची नावे आहे. सध्या काही देशांमध्ये अशा चीनच्या कंपन्यांची लिस्ट व्हायरल होत आहे, त्यामध्ये 996 फॉर्म्युला लागला आहे.

अमेरिकेसोबतची चर्चा रद्द करणार चीन :
  • वॉशिंग्टन : अमेरिकेसोबतच्या उच्चस्तरीय वाटाघाटी रद्द करण्याचा विचार चीनने चालविला आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी उत्पादनांविरुद्ध आणखी २०० अब्ज डॉलरचे दंडात्मक शुल्क लावण्याची घोषणा केल्यानंतर चीनकडून हा निर्णय घेण्याची तयारी करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

  • ट्रम्प यांनी रविवारी नव्या शुल्काबाबतचे वक्तव्य केले. विशेष म्हणजे चीनचे उपपंतप्रधान लिवू हे यांच्या नेतृत्वाखालील एक उच्चस्तरीय चिनी शिष्टमंडळ याच आठवड्यात वॉशिंग्टनला जाणार आहे. त्याआधीच ट्रम्प यांनी नवे शुल्क लावण्याची घोषणा केल्याने वाटाघाटी निरर्थक असल्याचे चीनला वाटत आहे.

  • त्यामुळे या वाटाघाटी रद्द करण्याचा विचार चीनने चालविला आहे. चीनचे शिष्टमंडळ वॉशिंग्टनमध्ये पोहोचल्यानंतर बुधवारी व्यापारी चर्चेस सुरुवात होणे अपेक्षित आहे. हे पथक वॉशिंग्टनला जाईल. मात्र चर्चेबाबत साशंकता आहे.

पाचव्या टप्प्यात ६२ टक्के मतदान :
  • लोकसभा निवडणुकीतील पाचव्या टप्प्यात सात राज्यांतील ५१ जागांसाठी सोमवारी सुमारे ६२ टक्के मतदान झाले. जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्य़ातील एका मतदान केंद्रावर झालेले दोन स्फोट आणि पश्चिम बंगालमध्ये बराकपूर येथे निर्माण झालेला तणाव वगळता, मतदान शांततेत झाले.  बऱ्याच ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये बिघाडाच्या तक्रारीही आल्या.

  • केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, पक्षाध्यक्ष राहुल गांधी, केंद्रीय मंत्री राज्यवर्धन  सिंह राठोड, राजीव प्रताप रुडी आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या दिग्गजांचे भवितव्य या मतदानात पेटीबंद झाले.  उत्तर प्रदेशातील १४, राजस्थानमधील १२, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशातील प्रत्येकी ७, बिहारमधील ५ आणि झारखंडमधील ४ मतदारसंघांमध्ये पाचव्या टप्प्यात मतदान झाले.

  • सर्वाधिक म्हणजे ७४.४२ टक्के मतदान पश्चिम बंगालमध्ये झाले. लडाखमध्ये ६४ टक्के मतदान झाले, तर अनंतनागच्या दहशतवादग्रस्त पुलवामा आणि शोपियाँ येथे अवघे तीन टक्के मतदान झाले. जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यादेखील अनंतनागमधून लोकसभेसाठी रिंगणात आहेत.

  • पश्चिम बंगालमधील बराकपूर येथे भाजपचे उमेदवार अर्जुन सिंह आणि केंद्रीय सुरक्षा जवानांमध्ये झटापट झाल्याचे समजते. तेथे मतदारांना मतदानापासून रोखले जात असल्याचा आरोप करीत तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्याने मतदान केंद्रावर प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असता हा प्रकार घडला. २०१४च्या निवडणुकीत भाजपने १४ पैकी १२ जागा जिंकल्या होत्या. रायबरेली आणि अमेठी या दोन जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. त्या अमेठीत ५३ टक्के, तर रायबरेलीत ५३.६८ टक्के मतदान झाले.

राफेल सुनावणी शुक्रवारी :
  • राफेल विमान खरेदी व्यवहाराबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या फेरविचारासाठी दाखल झालेल्या याचिकेची आता शुक्रवार १० मे रोजी सुनावणी होणार आहे.

  • राफेलसंबंधी गोपनीय कागदपत्रे उघड झाल्याने न्यायालयाने आधीच्या निकालाचा फेरविचार करावा, यासाठी ही याचिका दाखल झाली होती. न्यायालयाच्या निकालाचा आधार घेत ‘चौकीदार चोर है’चा निर्वाळा न्यायालयानेही दिल्याचे वक्तव्य राहुल यांनी केले होते. त्याप्रकरणी दाखल झालेल्या अवमान याचिकेची सुनावणीही राफेल फेरविचार याचिकांसोबत घेतली जाईल, असे न्यायालयाने आधी जाहीर केले होते. त्यानुसार सोमवारी या दोन्ही याचिकांची सुनावणी अपेक्षित होती. मात्र कामकाज सुरू झाले तेव्हा सुनावणी वेगवेगळ्या दिवशी ठेवल्याचे उघड झाले.

  • या प्रकरणी सरन्यायाधीश रंजन गोगोई म्हणाले की, ‘‘या दोन्ही याचिकांची एकत्रित सुनावणी होईल, असे आम्ही आधीच जाहीर केले होते. तरीही फेरविचार याचिकांची सुनावणी आज (सोमवारी) आणि अवमान याचिकेची सुनावणी १० मे रोजी ठेवली गेली आहे. या प्रकाराने आम्ही थोडे गोंधळलो आहोत. त्यामुळे आता या दोन्ही याचिकांचा एकत्रित विचार १० मे रोजीच दुपारी दोन वाजता केला जाईल.

जाणून घ्या काँग्रेस का म्हणतं आहे ‘मै हिंदुस्तान हूँ’ :
  • सोमवारी देशभरात लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा पाचवा टप्पा पार पडला. आता अखेरच्या दोन टप्प्यांचे मतदान बाकी आहे. अशातच काँग्रेस आणि भाजपासारख्या राष्ट्रीय पक्षांनी प्रचाराच्या पद्धतीही बदलून त्या अधिकाधिक तीव्र करण्यास सुरूवात केली आहे. जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी या पक्षांनी जाहिराती, जिंगल्सची मदत घेण्यास सुरूवात केली आहे. त्यातच आता काँग्रेसने ट्विटरवर ‘मै हिंदुस्तान हूँ’ हे अभियान सुरू केले आहे.

  • गेल्या सत्तर वर्षांमध्ये भारताने प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली असून प्रत्येक भारतीयाने देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्याचीच आठवण करून देत असल्याचे सांगत काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ शेअर केला. दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेसनेही ट्विट करत स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशातील प्रतिष्ठित संस्थांची पायाभरणी केली आणि देशाला महाशक्ती बनवण्याचा मार्ग दाखवला असल्याचे म्हटले आहे.

  • यापूर्वी काँग्रेसने ‘अब होगा न्याय’ या जाहिरातीद्वारे केंद्र सरकारवर हल्लाबोल केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा ट्विटरवरून मै हिंदुस्तान हूँ म्हणत देशवासीयांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. या मोहिमेत न्याय योजना, गरिबी, रोजगार, शेतकऱ्यांचे प्रश्न, महिलांचे प्रश्न, जीएसटी आणि शिक्षणाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. तसेच काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनीही काँग्रेसने गेल्या सात दशकांपासून केलेल्या विकासकामांची माहिती ट्विटरवरून शेअर केली आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १८४९: जॉन इलियट ड्रिंकवॉटर बेथुन यांनी कलकत्ता फिमेल स्कूल सुरू केले.

  • १९०७: मुंबईत विजेवर चालणारी ट्रॅम सुरू झाली.

  • १९४६: सोनी ह्या कंपनी ची स्थापना झाली.

  • १९५५: एअर इंडिया ची मुंबई – टोकियो विमानसेवा सुरू झाली.

  • १९७६: होंडा एकॉर्डा या गाडी प्रकाशित करण्यात आली.

  • १९९०: लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान.

  • १९९२: एन्डेव्हर हे अंतराळयान आपल्या पहिल्या मोहिमेवर निघाले.

  • १९९८: मर्सिडीज-बेंज कंपनी ने क्रिस्लर हि कंपनी ४० अब्ज अमेरिकन डॉलर्स मध्ये विकत घेतली ही इतिहासातील सर्वात मोठी औद्योगिक विलीनीकरण आहे.

  • २०००: व्लादिमीर पुतिन रशियाचे राष्ट्राध्यक्ष बनले.

  • २०००: कोची येथे झलेल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत तिरुअनंतपुरमचा नऊ वर्षाचा बुद्धिबळपटू अर्जुन विष्णुवर्धन याला भारतातील सर्वात लहान फिडे मास्टर होण्याचा मान मिळाला.

जन्म 

  • १८६१: पहिले भारतीय नोबेल पुरस्कार विजेते रबिंद्रनाथ ठाकूर तथा टागोर यांचा कलकत्ता येथे पिराली ब्राम्हण कुटुंबात जन्म. (मृत्यू: ७ ऑगस्ट १९४१)

  • १८८०: भारतरत्न पांडुरंग वामन काणे यांचा जन्म. (मृत्यू: १८ एप्रिल १९७२)

  • १८९२: क्रांतिकारक आणि युगोस्लाव्हियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष जोसेफ टिटो यांचा जन्म. (मृत्यू: ४ मे १९८०)

  • १९०९: पोलरॉइड कॉर्पोरेशनचे संस्थापक एडविन एच. भूमी यांचा जन्म. (मृत्यू: १ मार्च १९९१)

  • १९१२: ज्ञानपीठ पारितोषिक विजेते गुजराथी कथा-कादंबरीकार पन्नालाल पटेल यांचा जन्म. (मृत्यू: ६ एप्रिल१९८९ – अहमदाबाद, गुजरात)

  • १९२३: मराठी नाट्यअभिनेते व दिग्दर्शक आत्माराम गोविंद भेंडे यांचा आरोंदा (सिंधुदुर्ग) येथे जन्म.

  • १९४८: मैहर घराण्याचे बासरी वादक नित्यानंद हळदीपूर यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९२४: भारतीय कार्यकर्ते अलायरी सीताराम राजू यांचे निधन.

  • १९९१: लोककवी मनमोहन उर्फ गोपाल नरहर नातू यांचे पुणे येथे निधन. (जन्म: ११ नोव्हेंबर १९११)

  • १९९४: ध्रुपद गायक उस्ताद नसीर झहिरुद्दिन डागर यांचे निधन.

  • २००१: लेखिका मालती बेडेकर ऊर्फ विभावरी शिरुरकर यांचे निधन. (जन्म: १८ मार्च १९०५)

  • २००१: गीतकार, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित प्रेम धवन यांचे निधन. (जन्म: १३ जून १९२३ – अंबाला, पंजाब)

  • २००२: मराठी अस्मितेच्या व विचार स्वातंत्र्याच्या बुलंद पुरस्कर्त्या, जेष्ठ लेखिका, तत्त्ववेत्या आणि निसर्गाच्या अभ्यासक दुर्गाबाई भागवत यांचे मुंबई येथे निधन. (जन्म: १० फेब्रुवारी १९१०)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.