चालू घडामोडी - ०७ नोव्हेंबर २०१८

Date : 7 November, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
विद्यापीठाची पीएच.डी प्रवेश परीक्षा आता २३ डिसेंबर :
  • मुंबई - मुंबई विद्यापीठातर्फे प्रथमच आॅनलाइन घेण्यात येणारी पीएच.डी प्रवेश परीक्षा (पेट) रविवार २३ डिसेंबर, २०१८ रोजी होणार आहे. आधी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा १६ डिसेंबरला आयोजित करण्यात आली होती. मात्र, या वेळापत्रकात बदल करण्यात आल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अर्जुन घाटुळे यांनी दिली आहे.

  • पीएच.डी परीक्षेसाठी प्रवेशपत्र (हॉल तिकीट) आता १५ डिसेंबर २०१८ पासून आॅनलाइन उपलब्ध करून देण्यात येईल. या आॅनलाइन प्रवेश परीक्षेचे अर्ज संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले असून, प्रवेश शुल्क भरण्याची सुविधादेखील आॅनलाइनच्या माध्यमातून उपलब्ध आहे.

  • विद्यापीठ अनुदान आयोगाच्या २०१६च्या नवीन निर्देशानुसार विद्यापीठाने नुकतीच पीएच.डी व एमफीलच्या प्रवेशाच्या संदर्भात कुलगुरूंचे निर्देश प्रसिद्ध केले होते. या आधारावर २०१८ ची पीएच.डी व एमफील प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. या पेट परीक्षेचे अर्ज फक्त आॅनलाइन असतील.

  • विद्यार्थ्यांना त्याची कोणतीही प्रत विद्यापीठात जमा करण्याची आवश्यकता नाही, परंतु सदर अर्जाची प्रिंटआउट पुढील संदर्भासाठी काढून ठेवण्यात यावी, असे निर्देश विद्यापीठाने दिले आहेत. या पेट परीक्षेचे अर्ज भरताना कोणतेही कागदपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही.

आता अहमदाबादचंही नाव बदलणार :
  • नवी दिल्ली - आता गुजरात सरकारनंही अहमदाबादचे नामांतर करण्याची तयारी केली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनीअहमदाबादचे नाव कर्णावती करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर,कायदेशीर प्रक्रियांसाठी जनतेचे समर्थन मिळाल्यास अहमदाबादचे नाव बदलणार असल्याचे  गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी सांगितले आहे.

  • प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधताना त्यांनी हे विधान केले आहे. ''कर्णावती नाव जनतेच्या पसंतीस आहे. अहमदाबादचे नाव कर्णावती करण्यात यावे ही लोकभावना आहे. जेव्हा योग्य वेळ येईल, त्यावेळेस आम्ही अहमदाबादचे नाव बदलू'',असेही पटेल यांनी स्पष्ट केले. 

  • काँग्रेस प्रवक्ते मनिष दोशी यांची टीका : मतांच्या राजकारण करायचे असल्याने भाजपाकडून शहरांची नावे बदलली जात आहेत. अहमदाबादचे नाव कर्णावती करण्यात काहीही अर्थ नाही, असेही दोशी म्हणालेत. हिंदूंची दिशाभूल करण्याचे काम भाजपाकडून होते आहे, असा हल्लाबोलही त्यांनी चढवला. यापूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फैजाबाद जिल्ह्याचे नामकरण अयोध्या असे केले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत-चीन सीमेवर जवानांसोबत साजरी करणार दिवाळी :
  • नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाही आपल्या खास अंदाजात दिवाळी साजरी करणार आहेत. 2014मध्ये पंतप्रधानपदाची धुरा हाती घेतल्यापासून मोदी देशाच्या जवानांसोबत दिवाळी साजरी करत आहेत. यंदा ते उत्तराखंडातील हर्षिल बॉर्डरवर जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत.

  • यावेळेस त्यांच्यासोबत लष्कर प्रमुख बिपिन रावत आणि सैन्याचे अन्य अधिकारीदेखील हजर असतील. हर्षिल बॉर्डर हे भारत-चीन सीमारेषेपासून 45 किलोमीटर अंतरावर आहे. याव्यतिरिक्त पंतप्रधान मोदी बाबा केदारनाथाचेही दर्शन घेणार आहेत. 

  • 2014मध्ये पंतप्रधान मोदींनी LoCवर जाऊन जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती. जम्मू काश्मीरमधील गुरेज सेक्टरमध्ये सीमारेषेजवळ जाऊन त्यांनी बीएसएफच्या जवानांसोबत दिवाळीचा आनंद लुटला. जवानांच्या शौर्यालाही त्यांनी सलाम केले होते.  

अमेरिकेत ट्रम्प यांना धक्का - डेमॉक्रेटीक पक्षाची बहुमताकडे घोडदौड :
  • वॉशिंग्टन : अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीचे निकाल जाहीर होत असून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाने अमेरिकी सिनेटमध्ये वर्चस्व अबाधित राखले आहे. तर अमेरिकी हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्हमध्ये डेमॉक्रेटीक पक्षाने पुन्हा मुसंडी मारल्याचे चित्र असून हा ट्रम्प यांच्यासाठी धक्का मानला जात आहे. 

  • अमेरिकी संसदेच्या वरिष्ठ सदनातील (सीनेट) 100 पैकी 35 जागा आणि कनिष्ठ सदनामध्ये (हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्ह) 435 जागांवर खासदार निवडले जाणार आहेत. या साठी मंगळवारी मतदान झाले. आज निकाल घोषित होणार आहे.

  • हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्हमध्ये 435 जागांपैकी 339 जागांवरील निकाल जाहीर झाले आहेत. ट्रम्प यांच्या पक्षाला 166 जागा तर डेमॉक्रेटीक पक्षाला 173 जागा मिळाल्या आहेत. अद्याप 96 जागांचा निकाल येणे बाकी असून डेमॉक्रेटीक पक्षाची घोडदौड पाहता ट्रम्प यांना हार मानावी लागणार असल्याचे स्पष्ट होणार आहे. दोन्ही सदनांमध्ये गेल्या 84 वर्षांत केवळ तीनवेळा एकाच पक्षाला वर्चस्व राखने शक्य झाले आहे.

भारतीय बनावटीच्या 'फाल्कन २०००' चार्डर्ट जेटचं २०१२ मध्ये उड्डाण :
  • नागपूर : भारताच्या शिरपेचात लवकरच आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. पूर्णपणे भारतीय बनावटीचं स्वयंनिर्मित पहिलं चार्टर्ड जेट "फाल्कन 2000'  हे 2021 मध्ये उड्डाण करणार आहे. या जेटची निर्मिती नागपूरच्या एसईझेडमधील अनिल धीरुभाई एरोस्पेस पार्कमध्ये करण्यात आली आहे. नुकतंच या विमानाच्या कॉकपीटचं काम पूर्ण झालं आहे.

  • डसॉल्ट आणि रिलायन्स यांची संयुक्त कंपनी डीआरएएलमध्ये या जेटची निर्मिती करण्यात आली आहे. फ्रान्स आणि भारतीय तंत्रज्ञ नागपूरच्या मिहान सेझमध्ये जानेवारी 2018 पासून काम करत होते. फाल्कन 2000 हे चार्टर्ड जेट 2012 मध्ये उड्डाण करेल, अशी माहिती मिहान एसईझेडच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी दीपक जोशी यांनी दिली आहे.

  • "पहिल्या टप्प्यात कंपनीने 10 ते 18 आसनी 'फाल्कन 2000' या चार्टर्ड जेट विमानाच्या कॉकपीटचं काम पूर्ण केलं. लवकरच पुढील काम सुरु केलं जाणार असून 2021 मध्ये डीआरएएल कंपनी पूर्णपणे नागपुरात निर्मिती झालेलं छोटं चार्टर्ड जेट उड्डाण करेल," असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं. तसं झाल्यास जागतिक पातळीवर एव्हिएशन क्षेत्रात नागपूरचे लौकिक निर्माण होईल.

पाक पंतप्रधानांच्या नावाशेजारी 'बेगिंग', PTV च्या संचालकांची उचलबांगडी :
  • मुंबई : अनेकदा वृत्तवाहिन्यांवरील बातम्यांमध्ये व्याकरणाच्या चुका होतात. अशाच एका चुकीमुळे पाकिस्तानातील सरकारी वृत्तवाहिनी 'पीटीव्ही'च्या व्यवस्थापकीय संचालकांना नोकरी गमवावी लागली. पाक पंतप्रधान इम्रान खान यांची दृश्यं दाखवताना 'बीजिंग'ऐवजी 'बेगिंग' लिहिण्याची चूक त्यांना महागात पडली.

  • पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सध्या चीन दौऱ्यावर असून राजधानी बीजिंगमध्ये आहेत. इम्रान खान यांचा सहभाग असलेल्या एका कार्यक्रमाचं प्रक्षेपण करताना 'पीटीव्ही'ने चीनची राजधानी बीजिंगचं स्पेलिंग चुकवलं आणि 'बेगिंग' असं केलं. बेगिंगचा अर्थ भीक मागणे होत असल्याने खरोखर अर्थाचा अनर्थ झाला.

  • पीटीव्हीच्या स्क्रीनच्या डाव्या कोपऱ्यात लोकेशनमध्ये बेगिंग असा शब्द दिसत असतानाच इम्रान खान भाषण देत होते. महत्त्वाचा शब्द लिहिताना कर्मचाऱ्यांनी केलेली हलगर्जी व्यवस्थापकीय संचालकांना भोवली. 'पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ' (पीटीआय) सरकारने चॅनलचे एमडी अर्शद खान यांची तात्काळ उचलबांगडी केली.

  • या भाषणाचा बेगिंग असा उल्लेख असणारा स्क्रीनशॉर्ट आणि काही सेकंदांचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

फैजाबादचं नाव आता अयोध्या, योगी आदित्यनाथांची घोषणा :
  • लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फैजाबाद जिल्ह्याचे नाव बदलून अयोध्या केले आहे. अयोध्येतील दीपोत्सव कार्यक्रमादरम्यान फैजाबादच्या नामांतरासोबत आणखी काही महत्वाच्या घोषणा योगींनी केल्या.

  • योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येतील मेडिकल कॉलेजचे नाव राजर्षी दशरथ असे ठेवले, तर भगवान श्रीराम यांचे नाव विमानतळाला देण्याची घोषणा त्यांनी केली. यापूर्वीच योगी आदित्यनाथांनी अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज केले आहे.

  • मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे भाषण सुरु असताना प्रेक्षकातून 'योगीजी फक्त एक काम करा, राम मंदिराचे निर्माण करा' अशा घोषणा दिल्या जात होत्या. 'अयोध्येच्या नावाने आजपासून हा जिल्हा ओळखला जाईल, अयोध्या आमच्या प्रतिष्ठेचा मुद्दा आहे. अयोध्येची ओळख मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामांमुळे आहे.' असं यावेळी योगी म्हणाले.

  • अयोध्येला काय पाहिजे, हे आज देशाला समजेल. जगातील कोणतीच शक्ती अयोध्येसोबत अन्याय करु शकत नाही, असे आश्वासन मी देतो. माझ्यापूर्वी कोणताही मुख्यमंत्री येथे आला नव्हता, पण गेल्या दीड वर्षात मी सहा वेळा आलो, कारण अयोध्येचा विकास करण्याची आमची इच्छा आहे, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.

१५४ पीएसआयच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा, स्थगिती देणारी याचिका फेटाळली :
  • मुंबई : राज्यातील अनुसूचित जाती आणि जमातीमधील 154 पीएसआयना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या नियुक्तीला स्थगिती देणारी याचिका मॅटने फेटाळली आहे. त्यामुळे या 154 जणांना नियुक्ती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

  • सर्वोच्च न्यायालयाच्या 26 सप्टेंबर 2018 रोजी जर्नेल सिंह केस आणि इंद्रा श्वानी प्रकरणात दिलेल्या आदेशाचा दाखला देत, सरकारी नोकरीतील एससी/एसटीच्या घटनात्मक आरक्षणाला बाधा पोहोचवता येणार नाही, असं सांगत मॅटने विरोधी याचिका फेटाळली आहे.

  • "सरकारच्या म्हणण्यानुसार संबंधित परीक्षेसाठी फक्त 828 जागा मंजूर आहेत. त्यातील राखीव 154 जागांऐवजी, खुल्या प्रवर्गातील आणि याचिकाकर्त्यांपेक्षा जास्त गुण असलेले 154 उमेदवार आधीच प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले आहेत. 154 राखीव प्रवर्गातील उमेदवारांना याचिकाकर्त्यांपेक्षा कमी गुण जरी असले तरी त्यांची नियुक्ती राखीव प्रवर्गातून झाली आहे.

  • म्हणूनच 154 राखीव जागेवरील उमेदवार कमी केल्यानंतरही त्यांच्या जागा भरण्यासाठी आवश्यक 154 उमेदवार आधीच उपलब्ध आहेत. त्यामुळे याचिकाकर्त्यांचा संबंधित जागेसाठी विचार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. याचिकाकर्त्यांनी त्यांना विचारात घेऊन पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्त करुन ट्रेनिंगला पाठवण्यासाठी केलेली मागणी ही मुळातच काल्पनिक आणि तथ्यहीन आहे," असं न्यायालयाने स्पष्ट केलं.

  • "सुप्रीम कोर्टाच्या 29 सप्टेंबर 2018 च्या आदेशाआधी या 154 जणांवर अनिश्चिततेचं सावट होतं, परंतु जर्नेल सिंह प्रकरणात दिलेल्या आदेशामुळे ही अस्थिरताही आता राहिलेली नाही. त्यामुळे राज्य सरकारने जर्नेल सिंह प्रकरणातील आदेशाला बांधील राहून पावलं उचलावीत," असे निर्देशही मॅटने दिले आहेत.

रोहितचा विक्रमांचा पाऊस, T20i मध्ये सर्वाधिक शतकं :
  • लखनौ : रोहित शर्माच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. लखनौमधील वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात रोहित शर्माने विक्रमांचा डोंगर रचला. आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटच्या इतिहासात चार शतकं ठोकणारा तो जगातला पहिलाच फलंदाज ठरला.

  • रोहितने झळकावलेलं शतक त्याच्या कारकीर्दीतलं चौथं शतक होतं. आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटच्या इतिहासात चार शतकं ठोकणारा तो जगातला पहिलाच फलंदाज आहे.

  • टी20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय - आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही रोहितच ठरला. रोहितने कर्णधार विराट कोहलीचा विक्रम मोडून आपल्या नावे केला. आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा जगातील तो तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे.

  • यापूर्वी 62 टी20 सामन्यांमध्ये 2102 धावा करुन कोहली अव्वल स्थानी होता. लखनौतील सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी कोहलीचा विक्रम मोडण्यासाठी रोहितला 11 धावांची गरज होती. हा पल्ला गाठण्यासाठी रोहितला 86 सामने लागले.

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाकडून दीपोत्सव उत्साहात साजरा :
  • वॉशिंग्टन : भारतीय व अमेरिकी राजनैतिक अधिकाऱ्यांनी सोमवारी दिवाळी उत्साहात एकत्रित साजरी केली. दोन्ही देशांतील मजबूत संबंध यातून स्पष्ट झाल्याचे सांगण्यात आले.

  • भारताचे अमेरिकेतील राजदूत नवतेज सरना व उप परराष्ट्रमंत्री जॉन सुलिवान हे फॉगी बॉटम या परराष्ट्र खात्याच्या मुख्यालयात झालेल्या दिवाळीच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे होते. सुलिवान यांनी सांगितले, की  एकत्रितपणे दिवाळी साजरी करण्यातून भारत व अमेरिका यांच्यात सहिष्णुता, विविधता, स्वातंत्र्य व न्याय या लोकशाही तत्त्वांचे सामर्थ्य आणखी वाढले आहे. एकूण २०० पाहुणे या वेळी उपस्थित होते. अमेरिकी परराष्ट्र खाते व भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांचा त्यात समावेश होता.

  • अमेरिकी परराष्ट्र खात्याने या वेळी प्रथमच भारतीय दूतावासाच्या सहकार्याने दिवाळी उत्सवाचे आयोजन केले होते. राजदूत सरना यांनी सांगितले, की परराष्ट्र खात्यात साजरी होत असलेली दिवाळी ही भारत व अमेरिका यांच्यातील चांगल्या संबंधाचे प्रतीक आहे. भारतीय वंशाच्या अमेरिकी लोकांनी केलेले योगदान महत्त्वाचे आहे. अमेरिकेने २०१६ मध्ये दीपावलीनिमित्त टपाल तिकीटही जारी केले होते. दोन्ही देशांत काही सांस्कृतिक साम्यस्थळेही आहेत.

  • अमेरिकेचे अधिकारी सुलिवान यांनी दिवाळीनिमित्त सर्वाना शुभेच्छा दिल्या. भारतीय दूतावास व दक्षिण आशियाई अमेरिकन कर्मचारी संघटना यांनी दिवाळी कार्यक्रमाचे शानदार आयोजन केल्याचे सांगून ते म्हणाले, की वाईटावर चांगल्याचा, अंधारावर प्रकाशाचा, अज्ञानावर ज्ञानाचा विजय हा दोन्ही देशांना एकत्र आणणारा समान धागा आहे. दिवाळीत एक आशेचा संदेश आहे. या वेळी हिंदुस्थानी अभिजात संगीतातील तबला व सतारवादनाचे कार्यक्रम झाले.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १६६५: सर्वात जुने जर्नल लंडन गॅझेट पहिल्यांदा प्रकाशित झाले.

  • १८७५: सुजलाम् सुफलाम्, मलयज शीतलाम्, साश्यशामलाम्, मातरम् वंदे…! वंदे मातरम् असे भारतमातेचे वर्णन करणारे गीत बंकिमचंद्र यादावचंद्र चटर्जी यांनी लिहिले.

  • १८७९: वासुदेव बळवंत फडके यांना जन्मठेप (काळ्यापाण्याची) शिक्षा ठोठवण्यात आली.

  • १९१७: पहिले महायुद्ध – गाझाच्या तिसर्‍या लढाईत ब्रिटिश फौजांनी गाझा ताब्यात घेतले.

  • १९३६: प्रभात चा संत तुकाराम हा चित्रपट पुण्यातील प्रभात चित्र्पटगृहात रिलीज झाला.

  • १९४४: फ्रँकलिन डी. रूझवेल्ट चौथ्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले.

  • १९५१: एम. पातंजली शास्त्री यांनी भारताचे २ रे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

  • १९९०: मेरी रॉबिन्सन या आयर्लंडच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनल्या.

  • २००१: बेल्जियमची राष्ट्रीय विमान वाहतुक कंपनी सबीना (SABENA) दिवाळखोरीत गेली.

जन्म 

  • १८५८: लाल-बाल-पाल या त्रयीतील स्वातंत्र्यसेनानी बिपिन चंद्र पाल यांचा जन्म. (मृत्यू: २० मे १९३२)

  • १८६७: नोबेल पारितोषिक विजेत्या पोलिश-फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ मेरी क्यूरी यांचा वाॅर्सा पोलंड येथे जन्म. (मृत्यू: ४ जुलै १९३४)

  • १८६८: व्याकरणकार व निबंधकार मोरो केशव दामले यांचा जन्म. (मृत्यू: ३० एप्रिल १९१३)

  • १८७९: रशियन क्रांतिकारक लिऑन ट्रॉट्स्की यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑगस्ट १९४०)

  • १८८४: क्रांतिकारक, विद्वान, कृषीतज्ञ, इतिहासकार आणि गदर पार्टी चे शिल्पकार डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचा जन्म. (मृत्यू: २२ जानेवारी १९६७)

  • १८८८: नोबेल पारितोषिक विजेते भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकट रमण यांचा जन्म. (मृत्यू: २१ नोव्हेंबर १९७०)

  • १९००: स्वातंत्र्यसैनिक, संसदपटू, शेतकरी चळवळीतील नेते आणि काँग्रेसचे पुढारी प्रा. गोगिनेनी रंगा नायकुलू ऊर्फ एन. जी. रंगा यांचा जन्म. (मृत्यू: ९ जून १९९५)

  • १९०३: शिक्षणशास्त्र, मानस व बालमानस या विषयांचे लेखक भास्कर धोंडो कर्वे यांचा जन्म.

  • १९१५: महाराष्ट्रातील विचारवंत व शिक्षणतज्ञ गोवर्धन धनराज पारिख यांचा जन्म.

  • १९५४: अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, पटकथालेखक कमल हासन यांचा जन्म.

  • १९६०: भारतीय चित्रपट निर्माते श्यामप्रसाद यांचा जन्म.

  • १९७१: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक त्रिविक्रम श्रीनिवास यांचा जन्म.

  • १९७५: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक वेंकट प्रभू यांचा जन्म.

  • १९८०: भारतीय गायक-गीतकार कार्तिक यांचा जन्म.

  • १९८१: भारतीय अभिनेत्री अनुष्का शेट्टी यांचा जन्म.

मृत्यू 

  • १५६२: मारवाडचे राव मालदेव राठोड यांचे निधन. (जन्म: ५ डिसेंबर १५११)

  • १८६२: दिल्लीचा शेवटचा बादशहा बहादूरशहा जफर यांचे निधन. (जन्म: २४ ऑक्टोबर १७७५)

  • १९०५: आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाणारे एक श्रेष्ठ कवी कृष्णाजी केशव दामले तथा केशवसुत यांचे हुबळी येथे निधन. (जन्म: ७ ऑक्टोबर १८६६)

  • १९२३: भारतीय शिक्षक अश्विनीकुमार दत्ता यांचे निधन. (जन्म: २५ जानेवारी १८५६)

  • १९४७: भारतीय-श्रीलंकेचे पत्रकार आणि राजकारणी के. नतेसा अय्यर यांचे निधन.

  • १९६३: मराठी लघुकथाकार व प्रसाद मासिकाचे संपादक यशवंत गोपाळ तथा य. गो. जोशी यांचे निधन. (जन्म: १७ डिसेंबर १९०१)

  • १९८०: हॉलिवूड अभिनेता स्टीव्ह मॅकक्‍वीन यांचे निधन. (जन्म: २४ मार्च १९३०)

  • १९८१: अमेरिकन इतिहासकार व तत्त्वज्ञ विल डुरांट यांचे निधन. (जन्म: ५ नोव्हेंबर १८८५)

  • १९९८: शास्त्रीय गायक, संगीतकार व शास्त्रीय संगीताचे अभ्यासक पं. जितेंद्र अभिषेकी यांचे निधन. (जन्म: २१ सप्टेंबर १९२९)

  • २०००: ज्येष्ठ गांधीवादी नेते, माजी केंद्रीयमंत्री, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आणि हरितक्रांतीचे अध्वर्यू सी.सुब्रह्मण्यम यांचे निधन. (जन्म: ३० जानेवारी १९१०)

  • २००६: भारतीय क्रिकेटर आणि मॅनेजर पॉली उम्रीगर यांचे निधन. (जन्म: २८ मार्च १९२६)

२००९: लेखिका व स्वातंत्र्यसैनिक सुनीता देशपांडे यांचे निधन. (जन्म: ३ जुलै १९२६)

२०१५: भारतीय दिग्दर्शक आणि कवी बाप्पादित्य बंदोपाध्याय यांचे निधन. (जन्म: २८ ऑगस्ट १९७०)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.