चालू घडामोडी - ०७ ऑक्टोबर २०१८

Date : 7 October, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
मसाल्यांचे बादशाह ‘एमडीएच’चे मालक चुन्नी लाल गुलाटी यांचे निधन :
  • नवी दिल्ली : मसाल्यांचे बादशाह म्हणून ख्याती असलेले ‘एमडीएच’ कंपनीचे मालक चुन्नी लाल गुलाटी यांचे शनिवारी निधन झाले. ते 99 वर्षांचे होते. चुन्नी लाल गुलाटी यांचे खरे नाव महाशय धरमपाल गुलाटी होते. 

  • गेल्या अनेक वर्षांपासून ‘महाशियां दी हट्टी’ ही मसाल्याच्या पदार्थांचे उत्पादन करणारी कंपनी ‘एमडीएच’ या नावाने प्रसिद्ध आहे. चुन्नी लाल गुलाटी यांच्या अथक प्रयत्नांमुळे ‘एमडीएच’ कंपनीने मसाल्याच्या पदार्थांमध्ये बाजारात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

  • फाळणीनंतर चुन्नी लाल गुलाटी दिल्लीतील करोल बाग भागात स्थायिक झाले. त्यानंतर त्यांनी भारतात मसाल्यांचे अनेक कारखाने सुरू केले. त्याशिवाय, दुबई आणि लंडनमध्येही ‘एमडीएच’ कंपनीचे कार्यालय आहे. सध्याच्या घडीला जवळपास 100 देशांमध्ये ‘एमडीएच’ कंपनीचा कारभार चालतो. 

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर :
  • नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, मिझोराम आणि तेलंगणा या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. या पाचही राज्यांमध्ये आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.

  • छत्तीसगडमध्ये 12 आणि 20 नोव्हेंबरला दोन टप्प्यात निवडणूक होणार आहे. मध्य प्रदेश आमि मिझोराममध्ये एकाच टप्प्यात 28 नोव्हेंबरला, तर तेलंगणा आणि राजस्थानमध्ये एकाच टप्प्यात 7 डिसेंबरला मतदान होईल. त्यानंतर चारच दिवसात म्हणजे 11 डिसेंबरला पाच राज्यांचा निकाल लागणार आहे.

  • तेलंगणा विधानसभा काही दिवसांपूर्वीच भंग करण्यात आली आहे. टीआरएसचे प्रमुख चंद्रशेखर राव यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामाही दिला होता. तर दुसरीकडे मिझोराम या राज्यामध्ये काँग्रेसची सत्ता आहे.

  • मध्यप्रदेश, राज्यस्थान, छत्तीसगड, तेलंगणा, मिझोराम.

एसटी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना :
  • मुंबई : एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या महाविद्यालयीन मुला-मुलींना उच्चशिक्षण घेता यावं, यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मुला-मुलींसाठी सावित्रीबाई ज्योतिबा फुले शिष्यवृत्ती योजना सुरु करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.

  • महामंडळाच्या सुमारे 1 लाख 4 हजार कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. या योजनेअंतर्गत एसटी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना मान्यताप्राप्त विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या शिक्षण संस्थेत उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतल्यानंतर दरमहा 750 रुपये इतकी रक्कम शैक्षणिक शिष्यवृत्ती म्हणून मिळणार आहे.

  • सदर रक्कम संबंधित विद्यार्थ्याच्या राष्ट्रीयकृत/शेड्युल्ड बँकेच्या खात्यावर महामंडळातर्फे थेट जमा करण्यात येईल.

  • दरवर्षी कामगार अधिकारी शिष्यवृत्ती पात्र पाल्यांची नावे मागवतील. त्यांची छाननी करुन लाभार्थी पाल्यांच्या बँक खात्यावर दरमहा सदर रक्कम जमा करण्यात येईल. प्रत्येक एसटी कर्मचाऱ्यांच्या दोन पाल्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

विद्यार्थ्यांना दिलासा - अकरावी प्रवेशासाठी आता शेवटची संधी :
  • मुंबई : अकरावी प्रवेशासाठी तिसरी प्राधान्य फेरी ही शेवटची फेरी असेल असे जाहीर करण्यात आले होते. मात्र, तिसऱ्या प्राधान्य फेरीनंतरही शेकडो विद्यार्थी प्रवेशाविना राहिल्याने प्रवेश प्रक्रिया समितीकडून आता चौथी आणि शेवटची प्राधान्य फेरी जाहीर करण्यात आली आहे. ही फेरी ८ ते २० आॅक्टोबरदरम्यान चालणार आहे. ही शेवटची फेरी असून यानंतर ही प्रक्रिया बंद झाल्याचे जाहीर करण्यात येईल, असे शिक्षण उपसंचालक कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

  • चौथ्या फेरीत आत्तापर्यंत प्रवेश न मिळालेले विद्यार्थी, महाविद्यालयांनी काही कारणांमुळे प्रवेश नाकारलेले विद्यार्थी, एटीकेटी, प्रवेश रद्द केलेले तसेच नव्याने नोंदणी करणारे विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. या फेरीत विद्यार्थी आधीचे प्रवेश रद्द करूनही प्रवेश फेरीत सहभागी होऊ शकतात. विद्यार्थी सामान्य शाखेत असेल आणि त्याला बायफोकलमध्ये प्रवेश घ्यायचा असल्यास ती संधीही त्याला महाविद्यालयीन स्तरावर उपलब्ध होणार आहे. मात्र या फेरीसाठी महाविद्यालयांमधील रिक्त जागांची स्थिती ही अगदी अल्प असेल. यामुळे आधीचा प्रवेश रद्द करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी विचार करावा, असे आवाहनही उपसंचालक कार्यालयाने केले आहे.

  • असे असेल अंतिम प्रवेश फेरीचे वेळापत्रक ८ आॅक्टोबर, सकाळी ११ वाजता - रिक्त जागांचा तपशील जाहीर होणार. ८ ते ९ आॅक्टोबर, सकाळी ११ ते ५-यापूर्वीचे प्रवेश रद्द करणे, महाविद्यालयांनी शिल्लक अल्पसंख्याक, इनहाउस, व्यवस्थापन जागा समर्पित करणे.

  • ९ आॅक्टोबर, रात्री ८ वाजता - रिक्त जागांचा तपशील संकेतस्थळावर प्रसिद्ध. १० ते १९ आॅक्टोबर, सकाळी ११ ते ५ - नवीन अर्ज सादर करणे, अपूर्ण अर्ज मंजूर करून घेणे. १० ते १९ आॅक्टोबर, सकाळी ११ ते ५ - प्राधान्य फेरी ४ मध्ये सहभागी होऊन आॅनलाइन प्रक्रियेनुसार महाविद्यालयांत जाऊन प्रवेश अद्ययावत करणे.

  • १७ ते २० आॅक्टोबर, सामान्य शाखेत प्रवेश घेतलेले पण बायफोकलमध्ये प्रवेशेच्छुक असलेल्यांनी प्रवेश ट्रान्सफर करून घेणे.

दिनविशेष :
  • आंतरराष्ट्रीय त्रिज्यात्मक मज्जातंतुवेदना जागरूकता दिन

महत्वाच्या घटना 

  • १९१२: हेलसिंकी स्टॉक एक्सचेंज सुरू झाले.

  • १९१९: महात्मा गांधींनी नवजीवन हे वृत्तपत्र सुरू केले.

  • १९१९: के. एल. एम. (KLM) या विमान कंपनीची स्थापना झाली.

  • १९३३: पाच छोट्या कंपन्यांचे एकत्रीकरण करुन एअर फ्रान्स ही कंपनी स्थापण्यात आली.

  • १९४९: जर्मन डेमॉक्रेटिक रिपब्लिक (पूर्व जर्मनी) ची स्थापना.

  • १९७१: ओमानचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

  • २००१: सप्टेंबर ११ च्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला चढवला.

  • २००२: सलमान खान यांची वांद्रे पोलिसांत अटक.

जन्म 

  • १८६६: मराठी काव्याचे प्रवर्तक कृष्णाजी केशव दामले तथा केशवसुत यांचा जन्म. (मृत्यू: ७ नोव्हेंबर १९०५)

  • १८८५: अणूचे अंतरंग स्पष्ट करणार्‍या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे डॅनिश पदार्थवैज्ञानिक नील्स बोहर यांचा जन्म. (मृत्यू: १८ नोव्हेंबर १९६२)

  • १९००: जर्मन नाझी अधिकारी हाइनरिक हिमलर यांचा जन्म. (मृत्यू: २९ एप्रिल १९४५)

  • १९०७: गुजराथी नाटककार व लेखक, नेहरू पुरस्कार व साहित्य अकादमी पुरस्कार विजेते प्रागजी डोस्सा यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑगस्ट १९९७)

  • १९१४: गझल, दादरा आणि ठुमरी गायिका बेगम अख्तर यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑक्टोबर १९७४)

  • १९१७: कवी आणि बालकुमार-साहित्यिक विनायक महादेव तथा वि. म. कुलकर्णी यांचा जन्म. (मृत्यू: १३ मे२०१० – पुणे)

  • १९२९: आयमॅक्स कॉर्पोरेशन चे सहसंस्थापक ग्रॅमी फर्ग्युसन यांचा जन्म.

  • १९५२: रशियाचे ४ थे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा जन्म.

  • १९६०: शास्त्रीय गायिका आश्विनी भिडे-देशपांडे यांचा जन्म.

मृत्यू  

  • १७०८: शिखांचे १० वे गुरू गुरू गोबिंद सिंग यांचे निधन. (जन्म: २२ डिसेंबर १६६६)

  • १८४९: अमेरिकन गूढ व भयकथांचा लेखक व कवी एडगर अ‍ॅलन पो यांचे निधन. (जन्म: १९ जानेवारी १८०९)

  • १९५१: फिलिप्स कंपनी चे सहसंस्थापक एंटोन फिलिप्स यांचे निधन. (जन्म: १४ मार्च १८७४)

  • १९९८: महाराष्ट्राचे महसूलमंत्री, काँग्रेसचे नेते, पद्मश्री भाऊसाहेब वर्तक यांचे निधन.

  • १९९९: साहित्यिक, वाचकप्रिय वीणा या दर्जेदार मासिकाचे संपादक, बालसाहित्यकार उमाकांत निमराज ठोमरे यांचे निधन. (जन्म: १५ ऑगस्ट १९२९ – अहमदनगर)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.