चालू घडामोडी - ०७ सप्टेंबर २०१८

Date : 7 September, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
समांतर आरक्षणातील खुली पदे खुल्या प्रवर्गातूनच भरण्याची सरकारची भूमिका :
  • मुंबई : समांतर आरक्षणांतर्गतची खुली पदे ही खुल्या प्रवर्गातूनच भरण्याची भूमिका राज्य सरकारने कायम ठेवली आहे. समांतर आरक्षणांतर्गतची पदे भरण्याची कार्यवाही काटेकोरपणे करावी, असे आदेश सामान्य प्रशासन विभागाने गुरुवारी काढले.

  • खुल्या प्रवर्गातील पदे भरताना त्यात मागास प्रवर्गांनाही संधी मिळेल, असे सुधारित परिपत्रक जारी करण्याचे आदेश सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी गेल्या आठवड्यात दिले होते. मात्र, सामान्य प्रशासन विभागाने गुरुवारी काढलेल्या परिपत्रकात असा कोणताही उल्लेख केलेला नाही. समांतर आरक्षणांतर्गत खुली पदे ही खुल्या प्रवर्गातूनच भरण्याचा १३ आॅगस्ट २०१४ चा निर्णय कायम असल्याचे सामान्य प्रशासन विभागाच्या सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.

  • बडोले यांच्या भूमिकेमुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. राज्य शासनाने घेतलेला एखादा धोरणात्मक निर्णय रद्द करण्याचा अधिकार एकट्या मंत्र्यांना आहे का, असा प्रश्नही उपस्थित झाला होता.

  • प्रकल्पग्रस्तांना ५ टक्के, माजी सैनिकांना १५ टक्के, महिलांना ३० टक्के, अपंंगांना ३ टक्के, खेळाडूंना ५, अंशकालिन पदवीधर/पदविकाधारकांना १० टक्के तर अनाथांना १ टक्का इतके समांतर आरक्षण राज्यात दिले जाते. ही पदे भरण्याची कार्यवाही काटेकोरपणे करावी, असे निर्देश गुरुवारच्या परिपत्रकात सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत.

  • २०१४ चा आदेश कायम समांतर आरक्षणात खुल्या पदांसाठी मागासवर्गीयांना संधी न देणे हा सामाजिक आरक्षणालाच छेद ठरतो, या भूमिकेतून बडोले यांनी २०१४ मध्ये आदेश रद्द करण्याचे आदेश दिले.. मात्र आता २0१४ चा आदेश कायम राहील.

विश्वचषक नेमबाज : ज्युनिअर गटात विश्वविक्रमासह सौरभ चौधरीचा सुवर्णवेध :
  • चांगवोन : सौरभ चौधरीने आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत विश्वविक्रमासह ज्युनिअर १० मीटर एअर पिस्तुल गटात सुवर्णपदकाला गवसणी घातली. त्याचवेळी अभिषेक वर्माला गुरुवारी सिनिअर गटात आठव्या स्थानावर समाधान मानावे लागल्यामुळे आॅलिम्पिक कोटा मिळविता आला नाही.

  • सौरभने ५८१ गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहताना अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली. त्याने फायनलमध्ये २४५.५ अंकांची नोंद करीत आपलाच विश्वविक्रम मोडला. अर्जुनसिंग चीमाने आठ खेळाडूंच्या फायनलमध्ये २१८ अंकांसह कांस्यपदक पटकावले.

  • सौरभने सर्वप्रथम जून महिन्यात आयएसएसएफ विश्वकपदरम्यान १० मीटर एअर पिस्तुलमध्ये विश्वविक्रम नोंदवला होता. पात्रता फेरीत अव्वल स्थानावर असलेला कोरियाचा होजिन लिम २४३.१ अंकांसह रौप्यपदकाचा मानकरी ठरला.

  • सौरभच्या स्पर्धेत अर्जुनसिंग चीमाने कांस्यपदक पटकावले, तर भारतीय संघ आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या १६ वर्षीय सौरभच्या चमकदार वैयक्तिक कामगिरीच्या जोरावर रौप्यपदक पटकावण्यात यशस्वी ठरला. सौरभ, चीमा व अनमोल यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने एकूण १७३० गुणांची कमाई करत रौप्यपदकाचा मान मिळवला. १७३२ गुणांची नोंद करणारा कोरियन संघ विश्वविक्रमासह सुवर्णपदक पटकावण्यात यशस्वी ठरला. रशियाने १७११ गुणांसह कांस्यपदक पटकावले.

६१५ खातेधारकांना तब्बल ५९ हजार कोटींचं कृषी कर्ज :
  • मुंबई : देशातील सरकारी बँकांनी तब्बल 58 हजार 561 कोटी रुपयांचं कृषी कर्ज 651 बँक खातेधारकांना दिल्याचं समोर आलं आहे. 'द वायर' या न्यूज वेबसाईटने दाखल केलेल्या 'आरटीआय'मध्ये ही माहिती उघड झाली.

  • 2016 मध्ये सरकारी बँकांनी 58 हजार 561 कोटी रुपयांच्या कृषी कर्जाचं वाटप केलं. याचाच अर्थ प्रत्येकाला सरासरी 95 कोटी रुपयांचं कृषी कर्ज वितरित करण्यात आलं. 'द वायर'ने दाखल केलेल्या 'आरटीआय'वर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ही माहिती दिली.

  • विशेष म्हणजे मुंबई शहरातल्या एकाच शाखेकडून 29.95 कोटी रुपयांचं कर्ज दिल्याचं उघड झालं आहे. मुंबईच्या उच्चभ्रू भागातील तिघा खातेधारकांना हे कृषी कर्ज देण्यात आलं आहे.

  • इतर कर्जांच्या तुलनेत कृषी कर्जावर कमी व्याज दर आकारला जातो. सध्याच्या घडीला कृषी कर्जावर 4 टक्के व्याज दर आहे. लघु आणि दुर्लक्षित शेतकऱ्यांसाठी कर्जाच्या काही अटी-शर्थीही शिथील करण्यात आल्या आहेत.

  • शेतकी व्यवसायात असलेल्या अनेक मोठमोठ्या कंपन्या कृषी कर्ज या विभागात कर्ज घेतात. रिलायन्स फ्रेश ही अॅग्रो-बिझनेस  कंपनी आहे. शेती उत्पादनाची खरेदी-विक्री करुन गोदामासाठी ते कृषी कर्ज घेतात, असं 'रायथू स्वराज्य वेदिका' या शेतकी संस्थेचे संस्थापक किरण कुमार विसा यांनी सांगितलं.

एसटी महामंडळ ५०० नवीन बस खरेदी करणार :
  • मुंबई : एसटी बस ही ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी असून सर्वसामान्य नागरिक या बसमधून प्रवास करत असतात. त्यांचा हा प्रवास आरामदायी आणि सुरक्षित व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला 500 नवीन बसेस खरेदी करण्यासाठी राज्य शासनाकडून निधी देण्यात येईल, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

  • सह्याद्री अतिथीगृहात यासंदर्भात बैठक झाली. यावेळी एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजिसिंह देओल यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

  • बस खरेदीसाठी लागणाऱ्या निधीपैकी 12.5 कोटी रुपयांचा निधी नजीकच्या काळात तर उर्वरित निधी हा विधिमंडळाच्या येत्या अधिवेशनात उपलब्ध करून दिला जाईल, असेही अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले.

  • सर्वसामान्य माणसांची ही गरज लक्षात घेऊन त्यांना चांगल्या एसटी बसमधून प्रवास करता यावा, हा त्यामागचा उद्देश आहे. महामंडळाने ही पुढाकार घेऊन एस.टी बस स्थानके सुंदर आणि स्वच्छ ठेवावीत, असे आवाहनही अर्थमंत्र्यांनी यावेळी केले.

भारत-अमेरिकेत संरक्षणविषयक करार :
  • नवी दिल्ली : भारत आणि अमेरिका यांच्यात गुरुवारी दोन अधिक दोन (टू प्लस टू) उच्चस्तरीय बैठक झाली. त्यावेळी दोन्ही देशांनी संरक्षणाशी संबंधित सीओएमसीएएसए करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे भारताचा अमेरिकेकडून अत्याधुनिक शस्त्रे विकत घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सदर बैठक यापूर्वी दोन वेळा रद्द झाली होती.

  • भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जिम मॅटिस आणि संरक्षणमंत्री माइक पॉम्पिओ या बैठकीमध्ये सहभागी झाले होते. दोन्ही देशांमधील लष्करी संबंध दृढ करणे आणि आशियातील चीनच्या वाढत्या प्रभावाला आळा घालणे हा या करारांचा उद्देश आहे. दक्षिण आशियामध्ये स्थिरता आणि शांतता कशी नांदेल या बाबतही बैठकीत चर्चा झाली.

  • सीमेपलीकडून होणारा दहशतवाद, अण्वस्त्र पुरवठादार गटात भारताचा समावेश आणि एच १ बी व्हिसा आदी महत्त्वाच्या प्रश्नांवर या वेळी चर्चा झाली. दोन्ही देशांमध्ये हॉटलाइन यंत्रणा सुरू करण्याचा निर्णयही घेण्यात आला.

  • कम्युनिकेशन्स, कॉम्पॅटिबिलिटी, सिक्युरिटी अग्रीमेण्ट (सीओएमसीएएसए) करार दोन देशांच्या संबंधांमधील मैलाचा दगड आहे असे पॉम्पिओ म्हणाले. तर या करारामुळे भारताची संरक्षणक्षमता आणि संरक्षणसिद्धता वाढेल, असे सीतारामन म्हणाल्या. गेल्या दशकभरामध्ये दोन्ही देशांमध्ये संरक्षणविषयक अनेक करार झाले आहेत, उपग्रहाकडून मिळणाऱ्या माहितीची देवाणघेवाण आणि ड्रोनची विक्री या बाबत महत्त्वाच्या करारावर शिक्कमोर्तब होऊ शकते. अमेरिकेने त्यांचे ड्रोन तंत्रज्ञान आतापर्यंत निवडक देशांनाच दिले आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १६७९: सिद्दी जौहर आणि इंग्रजांचा मारा रोखत मराठ्यांनी खांदेरी किल्ल्याभोवती एक मीटर उंचीचा तट उभारून पूर्ण केला.

  • १८१४: दुसर्‍या बाजीरावाने पांडुरंग कोल्हटकराच्या साहाय्याने उंदेरी-खांदेरी किल्ल्यांचा ताबा परत मिळवला.

  • १८२२: ब्राझिलला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य मिळाले.

  • १९०६: बँक ऑफ इंडिया ची स्थापना झाली. ही भारतात स्थापन झालेली पहिली स्वदेशी व्यापारी बँक आहे.

  • १९२३: इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन (इंटरपोल) ची स्थापना झाली.

  • १९५३: निकिता ख्रुश्चेव सोविएत संघाच्या सर्वेसर्वापदी.

  • १९७८: मधुमेह नियंत्रित करण्यासाठी उपयोगी पडणारे इन्सुलिन प्रथमच जनुक अभियांत्रिकी पद्धतीने तयार करण्यात यश.

  • १९७९: दिवाळखोरी टाळण्यासाठी ख्रायसलर कॉर्पोरेशन ने अमेरिकन सरकारकडे १.५ बिलियन डॉलर्सची मागणी केली.

जन्म

  • १८०७: न्यूझीलंड देशाचे पहिले पंतप्रधान हेन्री सिवेल यांचा जन्म. (मृत्यू: १४ मे १८७९)

  • १८२२: प्राच्यविद्या पंडित, समाजसेवक आणि धन्वतंरी रामकृष्ण विठ्ठल तथा भाऊ दाजी लाड यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मे १८७४)

  • १९१५: प्रख्यात आसामी साहित्यिक आणि इतिहासकार, पद्मश्री डॉ. महेश्वर नियोग यांचा जन्म. (मृत्यू: १३ सप्टेंबर१९९५)

  • १९३३: मॅगसेसे पारितोषिक विजेत्या समाजसेविका तसेच सेवा [Self Employed Women’s Association] या संस्थेच्या संस्थापिका इला भट्ट यांचा जन्म.

  • १९३४: बंगाली कवी व कादंबरीकार सुनील गंगोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: २३ ऑक्टोबर २०१२)

  • १९३४: चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथालेखक बी. आर. इशारा यांचा जन्म. (मृत्यू: २५ जुलै २०१२)

  • १९४०: लेखक व संपादक चंद्रकांत खोत यांचा जन्म.

  • १९६७: भारतीय-इंग्लिश अकाउंटंट आणि राजकारणी आलोक शर्मा यांचा जन्म.

मृत्यू

  • १६०१: विल्यम शेक्सपियर यांचे वडील जॉन शेक्सपियर यांचे निधन.

  • १९५३: मराठी कवी आणि लेखक भगवान रघुनाथ कुळकर्णी यांचे निधन. (जन्म: १५ ऑगस्ट १९१३)

  • १९७९: कसोटी क्रिकेट संघाचे पहिले यष्टिरक्षक जे. जी. नवले यांचे निधन. (जन्म: ७ डिसेंबर १९०२)

  • १९९१: कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे सहसंस्थापक रवि नारायण रेड्डी यांचे निधन. (जन्म: ५ जून १९०८)

  • १९९४: इंग्लिश दिग्दर्शक आणि पटकथाकार टेरेन्स यंग यांचे निधन. (जन्म: २० जून १९१५)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.