चालू घडामोडी - ०८ एप्रिल २०१८

Date : 8 April, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
नेपाळच्या प्रगतीसाठी भारत पाठीशी-नरेंद्र मोदी :
  • नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात व्यापक चर्चा झाली असून संरक्षण, सुरक्षा, दळणवळण,व्यापार व कृषी या क्षेत्रात दोन्ही देशांच्या बाजूने सहकार्य वाढवण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी चर्चेनंतर सांगितले, की नेपाळच्या सर्वागीण वाढीत भारत त्याच्या पाठीशी राहील. दोन्ही शेजारी देशात लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी सहकार्य केले जाईल.

  • ओली हे चीनशी मैत्री करण्यास महत्त्व देणारे नेते आहेत अशी त्यांची प्रतिमा असून त्यांनी सांगितले, की भारत व नेपाळ यांच्यात विश्वासावर आधारित संबंध प्रस्थापित करण्यात येतील. दोन्ही देशांतील संबंध एका उंचीवर नेण्यासाठी भारतभेटीवर आलो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

  • चीनसमर्थक असलेले ओली यांनी फेब्रुवारीत दुसऱ्यांदा नेपाळची धुरा घेतली असून ते यापूर्वी २०१५ ते २०१६ दरम्यान पंतप्रधान होते. त्या वेळी भारत व नेपाळ यांचे संबंध बिघडलेले होते. मोदी यांनी सांगितले, की नेपाळचे पंतप्रधान ओली यांचे संपन्न नेपाळ व विकसित नेपाळबाबतचे धोरण हे सब का साथ सब का विकाससारखेच आहे.

  • काठमांडूला भारताशी जोडण्यासाठी रेल्वेमार्ग सुरू करण्याचे दोन्ही देशांनी मान्य केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी सांगितले, की नेपाळ व भारत यांच्यात संरक्षण व सुरक्षासंबंधात सहकार्य करण्यात येईल. सुरक्षेच्या बाबतीत दोन्ही देशांत चांगले संबंध असून खुल्या सीमेचा गैरवापर होऊ नये यासाठी दोन्ही देश प्रयत्न करतील. ओली यांनी मोदी यांना नेपाळभेटीचे निमंत्रण दिले.

औरंगाबादसह पाच विमानतळांचा होणार विकास; जळगाव, पुणे, कोल्हापूर, अकोल्याचा समावेश :
  • नवी दिल्ली : भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) औरंगाबादसह पाच शहरातील विमानतळांचा विकास करण्याचे ठरवले आहे. यात धावपट्टीचा विस्तार व विमानतळांवर अतिरिक्त सुविधा यांचा समावेश आहे. अकोला व औरंगाबाद विमानतळांच्या विस्तारासाठी अनुक्रमे ८४.२६ एकर आणि १८२ एकर जमिनीची आवश्यकता आहे.

  • प्राधिकरणाने कोल्हापूर विमानतळासाठी स्टेटमेंट आॅफ वर्क (एसओडब्ल्यू) जारी केले असून, या विमानतळावर विकास कामे करण्यात येणार आहेत. पुणे विमानतळावर इंटिग्रेटेड टर्मिनल बिल्डिंगसाठी व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती केली आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने महाराष्ट्रातील अनेक विमानतळांचा विकास करण्याचे ठरवले आहे. त्यात रनवेचा विस्तार अन्य विकास कामांचा समावेश आहे.

  • औरंगाबाद विमानतळाच्या रनवेचा २८३५ मीटरवरून ३६६० मीटरपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे, तर अकोला विमानतळाच्या रनवेचा १२१९ मीटरवरून १४०० मीटरपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. नव्या तंत्रज्ञानाचे ब्लॉक कम कंट्रोल टॉवर, ई अँड एम वर्कशॉप, अग्निशमन दल व संबंधित इमारती यांचा या यांता समावेश आहे.

  • अन्य सोयी या असतील जळगाव विमातळाच्या रनवेचा सध्या १७०० मीटरचा असून, तो ३२६९ मीटर करण्यात येईल. कोल्हापूर विमानळाच्या रनवेचा १३७० मीटरवरुन २३०० मीटरपर्यंत विस्तार केला जाईल. याशिवाय नवी टर्मिनल इमारत, एटीसी कम टेक्निकल ब्लॉक कम फायर स्टेशन, डीव्हीओआर, रात्रीच्या लँडिंगची सुविधा आणि रनवेच्या दोन्ही टोकास साधी सुलभ प्रकाश योजना यांचा समावेश आहे. पुणे विमानतळावर नवीन इंटिग्रेटेड टर्मिनल बिल्डिंग, एअरबस ३२०/३२१ विमानांसाठी पािर्कंग आदी सुविधांचा समावेश आहे.

हॉकीत भारतीय महिलांचा इंग्लंडला दणका :
  • मुंबई -  भारतील महिला हॉकी संघाने बलाढ्य इंग्लंडवर 2-1 ने मात करत राष्ट्रकुल स्पर्धेत रविवारी सकाळी एका सनसनाटी विजयाची नोंद केली. अटीतटीच्या झालेल्या या लढतीत नवनीत कौर आणि गुरजित कौर यांनी केलेल्या प्रत्येकी एका गोलच्या जोरावर भारतीय महिलांनी इंग्लंडचे आव्हान परतवून लावले. राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय महिला संघांने तब्बल 16 वर्षांनंतर इंग्लंडवर मात करण्यात यश मिळवले आहे. 

  • पहिल्या लढतीत वेल्सकडून अनपेक्षितरित्या पराभूत झालेल्या भारतीय महिला हॉकी संघाने दुसऱ्या लढतीत मलेशियावर मात केली होती. दरम्यान, आज झालेल्या महत्त्वपूर्ण लढतीत भारतीय संघ पहिल्याच मिनिटाला पिछाडीवर पडला होता.  अलेक्झँड्रा डेन्सन हिने पहिल्याच मिनिटाला गोल करून इंग्लंडला आघाडीवर नेले मात्र 41व्या मिनिटाला  नवनीत कौर आणि 47 व्या मिनिटाला गुरजित कौर यांनी केलेल्या गोलांच्या जोरावर भारताने सहज विजय मिळवला. 

  • त्याआधी अखेरच्या पाच मिनिटात दोन गोल नोंदविणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाने अ गटात शुक्रवारी मलेशियाचा ४-१ ने पराभव करीत राष्ट्रकुल स्पर्धेत विजयी पथावर पुनरागमन केले होते.

  • गुरजित कौरने ६ व्या तसेच ३९ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदविले. कर्णधार राणी रामपालने ५६ व्या तसेच लालरेमसियामीने ५९ व्या मिनिटाला एकेक गोल केला. याआधी काल वेल्सकडून भारतीय संघ ३-२ ने पराभूत झाला होता. मलेशियाकडून एकमेव गोल नुरेनी राशीद हिने पेनल्टी कॉर्नरवर नोंदविला.

चेन्नई सुपरकिंग्सचा मुंबई इंडियन्सवर एका विकेटने विजय :
  • मुंबई : महेंद्रसिंग धोनीच्या 'चेन्नई सुपर किंग्स'ने 'मुंबई इंडियन्स'चा एका विकेटने सनसनाटी पराभव करुन आयपीएलच्या रणांगणात आपलं पुनरागमन साजरं केलं.

  • वानखेडे स्टेडियमवरच्या या सामन्यात मुंबईने चेन्नईला विजयासाठी 20 षटकांत 166 धावांचं आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईची आठ बाद 118 अशी घसरगुंडी उडाली होती. त्या परिस्थितीत ड्वेन ब्राव्होनं 30 चेंडूंमध्ये 68 धावांची खेळी उभारुन चेन्नईला विजयपथावर नेलं.

  • ब्राव्होने तीन चौकार आणि सात षटकार लगावत ही खेळी साकारली. ब्राव्हो बाद झाला, त्यावेळी चेन्नईला विजयासाठी सहा चेंडूंमध्ये सात धावांची आवश्यकता होती. केदार जाधवने एक चेंडू राखून चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

  • त्याआधी, ईशान किशन, सूर्यकुमार यादव आणि कृणाल पंड्याच्या आतषबाजीनं मुंबईला वीस षटकांत चार बाद 165 धावांची मजल मारुन दिली होती.

  • मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर 'रन'संग्रामाची ठिणगी पडली आणि आयपीएलच्या नव्या मोसमाचा शुभारंभ झाला.

  • विराट कोहलीची रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि दोन वेळा आयपीएल जिंकणारी कोलकाता नाईट रायडर्स दुसऱ्या दिवशी एकमेकांसमोर उभ्या ठाकणार आहेत.

  • या दोन्ही फौजा आयपीएलच्या नव्या मोसमातल्या आपल्या सलामीच्या लढाईसाठी सज्ज झाल्या आहेत. दोन संघांमधला हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवण्यात येईल.

१६ वर्षांच्या मनूला नेमबाजीत सुवर्ण, हीनाला रौप्य :
  • सिडनी : भारताच्या नेमबाज मनू भाकेर आणि हीना सिद्धू यांनी एकाच वेळी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य पदकाची कमाई केली आहे. महिलांच्या 10 मीटर्स एअर पिस्टल प्रकारात दोघींनी अभिमानास्पद कामगिरी बजावली.

  • महिलांच्या 10 मीटर्स एअर पिस्टल प्रकाराच्या अंतिम फेरीत मनूने 240.9 गुण कमवत सुवर्णपदकाला गवसणी घातली, तर हीना सिद्धूने 234 गुणांची नोंद करत रौप्य पदक पटकावलं. त्यामुळे भारताला एकाच वेळी सुवर्ण आणि रौप्य पदकाची कमाई करता आली.

  • कौतुकास्पद म्हणजे हरियाणाची मनू भाकेर अवघी 16 वर्षांची आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतील पदार्पणातच तिने चमकदार कामगिरी केली.

  • मनूने आयएसएसएफ ज्युनिअर विश्वचषकातही 10 मीटर्स एअर पिस्टलमध्ये शेवटच्या शॉटवर सुवर्णपदक मिळवलं होतं.

  • ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये 21 वी राष्ट्रकुल स्पर्धा सुरु आहे. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने नऊ पदकांची कमाई केली आहे. त्यापैकी सात पदकं वेटलिफ्टर्सनी पटकावली आहेत. भारताने आतापर्यंत सहा सुवर्णदोन रौप्य आणि एका कांस्य पदकाची कमाई केली आहे.

  • पहिल्या दिवशी वेटलिफ्टर गुरुराजाने रौप्यपदकाची कमाई करत भारताचं पदकांचं खातं उघडलं, तर वेटलिफ्टर मीराबाई चानूने सुवर्ण कमावून पहिलं गोल्ड मेडल मिळवण्याचा मान पटकावला.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १८३८: द ग्रेट वेस्टर्न हे वाफेचे इंजिन असलेले जहाज इंग्लंडमधील ब्रिस्टॉल येथून निघून पंधरा दिवसांनी न्यूयॉर्क येथे पोचले. अटलांटिक महासागर पार करणारी ही पहिली आगबोट.

  • १९११: डच भौतिकशास्त्रज्ञ हाइक ओन्नेस यांनी अतिसंवाहकतेचा शोध लावला.

  • १९२१: आचार्य विनोबा भावे यांनी ‘पवनार’ आश्रमाची स्थापना वर्धा येथे केली.

  • १९२९: भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीतील सेंट्रल असेंब्लीत बॉम्बस्फोट केला.

  • १९५०: भारत आणि पाकिस्तान मध्ये लयाकत-नेहरु करार झाला.

  • १९९३: मॅसेडोनियाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रात सामील झाले

  • २००५: पोप जॉन पॉल (दुसरे) यांच्या अंत्ययात्रेत अंदाजे ४० लाख लोक सहभागी झाले.

जन्म

  • १९२४: शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ ऊर्फ कुमार गंधर्व यांचा जन्म. (मृत्यू: १२ जानेवारी १९९२)

  • १९२८: नामवंत मराठी साहित्यिक, स्वामीकार रणजित देसाई यांचा जन्म. (मृत्यू: ६ मार्च १९९२)

  • १९३८: संयुक्त राष्ट्रांचे ७ वे प्रधान सचिव कोफी अन्नान यांचा जन्म.

  • १९७९: भारतीय गायक-गीतकार अमित त्रिवेदी यांचा जन्म.

मृत्यू

  • १८५७: १८५७ च्या बंडातील स्वातंत्र्यवीर मंगल पांडे यांना फाशीच्या शिक्षेने मृत्यू. (जन्म: १९ जुलै१८२७)

  • १८९४: वंदे मातरम् या राष्ट्रगीताचे कवी, निबंधकार, कादंबरीकार, तत्त्वज्ञ, भाषाशास्त्रज्ञ, धर्ममिमांसक आणि सुधारक बंकिमचंद्र यादावचंद्र चटर्जी यांचे निधन. (जन्म: २७ जून १८३८)

  • १९०६: अल्झायमरच्या आजाराने निदान झालेल्या पहिल्या व्यक्ती एग्स्टे डिटर यांचे निधन. (जन्म: १६ मे १८५०)

  • १९५३: उद्योगपती वालचंद हिराचंद दोशी यांचे निधन. (जन्म: २३ नोव्हेंबर १८८२)

  • १९७३: स्पॅनिश चित्रकार आणि शिल्पकार पाब्लो पिकासो यांचे निधन. (जन्म: २५ ऑक्टोबर १८८१)

  • १९७४: मराठी रंगभूमीवरील कलाकार नानासाहेब फाटक यांचे निधन. (जन्म: २४ जून १८९९)

  • १९९९: कामगार नेते, नर्मदा बचाव आंदोलनाच्या मेधा पाटकर यांचे वडील वसंत खानोलकर यांचे निधन.

  • २०१३: ब्रिटनच्या एकमेव महिला पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांचे निधन. (जन्म: १३ ऑक्टोबर १९२५)

  • २०१५: भारतीय पत्रकार आणि लेखक जयकानधन यांचे निधन. (जन्म: २४ एप्रिल १९३४)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.