चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०८ एप्रिल २०१९

Date : 8 April, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
सोलापूर झेडपीच्या गुरुजींच्या कार्याचा झेंडा फडकला पॅरिसमध्ये :
  • सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी सुरु केलेल्या 'लेट्स क्रॉस द बॉर्डर' या शैक्षणिक उपक्रमाची दखल घेत मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या वतीने त्यांना पॅरिस येथे हा उपक्रम सादर करण्यासाठी आमंत्रण दिले होते. 1 एप्रिल ते 5 एप्रिलदरम्यान पॅरिस येथे आयोजित 'एज्युकेशन एक्सचेंज' या परिषदेत हा शैक्षणिक प्रकल्प सादर केला गेला. जगभरातील 300 शिक्षकांना याकरिता आमंत्रित करण्यात आले होते.

  • वर्गाध्यापनात तंत्रज्ञानाचा नाविन्यपूर्ण रीतीने वापर करणाऱ्या 78 देशांतील 300 उपक्रमशील शिक्षकांना याकरिता आमंत्रित करण्यात आले होते. यासाठी भारतातील 13 शिक्षकांची निवड झाली होती. त्यामध्ये दिलीप राजू ( तामिळनाडू) विनिता गर्ग (दिल्ली), प्रीती कोकचा, कोवलीन मिधा, जया सूद, चांदनी अग्रवाल, हरिहरन मुर्थी (कर्नाटक ), भावी आहुजा, प्रीती सिंघल, चारू छाब्रा, अर्चना अवस्थी यांचा समावेश आहे.

  • भारत, पाकिस्तान, इराक, इराण, इस्त्रायल, पॅलेस्टाईन, अमेरिका व उत्तर कोरिया या देशांतील विद्यार्थ्यांमध्ये परस्पर बंधुभाव वाढीस लागावा व शांतताप्रिय नागरिकांची जडणघडण होण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेला 'लेट्स क्रॉस द बॉर्डर' हा उपक्रम मागील 2 वर्षांपासून सुरु असून आतापर्यंत 5000 विद्यार्थ्यांची पीस आर्मी तयार झाली आहे.

  • 6 आठवड्याच्या या उपक्रमात फिनलँड, ऑस्ट्रिया, बेल्जियमसह जगातील 10 देशांतील शिक्षक शांतताप्रिय नागरिकांची जडणघडण होण्याकरिता मार्गदर्शन करीत असून, आजतागायत 148 शाळांनी यात सहभाग नोंदवला आहे.

फेसबुकवर १० कोटींच्या राजकीय जाहिराती :
  • लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात रंगत येत असताना सर्वच राजकीय पक्ष समाजमाध्यमांद्वारे मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. फेब्रुवारी ते मार्चदरम्यान राजकीय पक्ष आणि त्यांच्या समर्थकांनी फेसबुकवरील जाहिरातींवर १० कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यात भाजप आणि त्यांच्या समर्थकांनी सर्वाधिक खर्च केला आहे.

  • ‘फेसबुक अ‍ॅड लायब्ररी’ अहवालानुसार, फेब्रुवारी ते मार्च २०१९ या कालावधीत फेसबुवर एकूण ५१,८१० जाहिराती होत्या. त्यावर त्यासाठी १०.३२ कोटी रुपये आकारण्यात आले आहेत.

  • फेसबुकवर सत्ताधारी भाजप व त्यांच्या समर्थकांनी सर्वाधिक जाहिराती केल्या आहेत. ‘भारत के मन की बात’ या पानावर एकूण ३७०० जाहिराती असून त्यावर दोन प्रवर्गात २.२३ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. भाजपने ‘माय फर्स्ट व्होट फॉर मोदी’ व ‘नेशन विथ नमो’ या पानांसाठीही मोठा खर्च केला असून ११०० जाहिरातींसाठी ३६.२ लाख रुपये मोजले आहेत.  

  • काँग्रेस पक्षाच्या पानावर ४१० जाहिराती असून फेब्रुवारी ते ३० मार्चदरम्यान त्यांचा खर्च ५.९१ लाख रुपये आहे. बिजू जनता दलाने ८.५६ लाख खर्च केले असून तेलुगू देसम पक्षाने १.५८ लाख तर राष्ट्रवादी काँग्रेसने ५८,३५५ रुपये खर्च केले आहेत.

निवडणुकीपूर्वी ‘ईव्हीएम’वर हजार वेळा चाचणी :
  • निवडणुकीपूर्वी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्यासाठी उमेदवार व त्यांच्या प्रतिवादींना ते ठरवतील त्या मशीनवर एक हजार वेळा आणि मतदानाच्या दिवशी मतदान सुरू होण्याच्या दीड तासापूर्वी ५० वेळा ‘मतदान चाचणी मतदान करण्याची परवानगी देण्यात येईल’, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दिली. त्यानंतर न्यायालयाने याचिका निकाली काढली.

  • नागूपर लोकसभा निवडणुकीसाठी शहरातील सहा ठिकाणी स्ट्राँग रुम तयार करण्यात आल्या आहेत. त्यापैकी बचत भवन परिसरात दक्षिण आणि मध्य नागपूर मतदारसंघातील मतदान केंद्रांवरील ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन ठेवण्यात आल्या. पण पहिल्या स्तराची तपासणी करताना सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते व त्या ठिकाणच्या टीव्हीवर काहीच दृश्य दाखवण्यात येत नव्हते, असा आक्षेप घेत शहर काँग्रेस व काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. त्यावर सुट्टीच्या दिवशी शनिवारी व रविवारी उच्च न्यायालयात न्या. रवि देशपांडे आणि न्या. श्रीराम मोडक यांच्यासमक्ष सुनावणी झाली.

  • मतदानाच्या प्रत्यक्ष दिवशी दीड तासापूर्वी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन तपासण्यात येतात. त्या वेळी उमेदवारांच्या प्रतिनिधींना वेगवेगळ्या मशीनवर ५० वेळा चाचणी करण्याची अनुमती दिली जाते. त्या दिवशी ५० पेक्षा अधिक वेळा मतदान करण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. पण निवडणूक आयोगाकडून पुरवण्यात आलेले साहित्य आणि यंत्रणांनुसार ५० पेक्षा अधिकवेळा परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

  • न्यायालयाने ही विनंती मान्य केली. सतीश उके यांनी मध्यस्थी अर्ज दाखल करून स्ट्राँग रुम परिसरात मोबाइल जामर बसवण्यात यावे, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चलचित्र दाखवण्यासाठी किमान दोन एलसीडी स्क्रीन बसवण्यात यावे, अशी विनंती केली. त्या वेळी ईव्हीएमची इंटरनेटशी जोडणी नसल्याने त्या हॅक होण्याची भीती नाही. त्यामुळे मोबाइल जामर बसवण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले.

युद्ध उन्माद भडकवण्याचा पाकिस्तानचाच हेतू :
  • भारत १६ ते २० एप्रिलदरम्यान पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचा दावा करीत पाकिस्तानने रविवारी भारतीय उपउच्चायुक्त गौरव अहलुवालिया यांना समज दिली. तर पाकिस्तानच्या दाव्यामागे युद्ध उन्माद भडकवण्याचा हेतू आहे, अशी टीका भारताने केली.

  • पाकिस्तानचा दावा बेजबाबदार आणि निर्थक असल्याचे स्पष्ट करत भारताने तो सपशेल फेटाळला. भारताचे परराष्ट्र प्रवक्ते रवीशकुमार यांनी पाकिस्तानच्या दाव्यावर ‘पब्लिक गिमिक’ अशा शब्दांत टीका केली. अशा प्रकारची क्लृप्ती वापरून पाकिस्तान दहशतवाद्यांना भारतावर हल्ले करण्यास प्रोत्साहनच देत असल्याचा आरोप कुमार यांनी केला. सीमेपलीकडून होणारा दहशतवादी हल्ला मोडून काढण्याचा अधिकार भारत राखून ठेवत असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

  • पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी रविवारी मुलतानमधील पत्रकार परिषदेत पाकिस्तानवर भारत पुन्हा हल्ला करण्याचा दावा गुप्तचरांच्या हवाल्याने केला होता. पाकिस्तानी सरकारकडे विश्वासार्ह गुप्तचरामार्फत मिळालेल्या माहितीनुसार भारत आणखी एका हल्ल्याची योजना तयार करत आहे. अशा प्रकारचा हल्ला भारत करू शकतो. त्यामागे पाकिस्ताविरोधात वातावरणनिर्मिती करून राजनैतिक दबाव वाढवण्याचा भारताचा हेतू आहे, असा दावा कुरेशी यांनी केला होता.

मेस्सी, सुआरेजच्या गोलने बार्सिलोना विजयी :
  • बार्सिलोना : लुईस सुआरेज आणि लियोनेल मेस्सी यांनी दोन मिनिटांच्या अंतरातच केलेल्या दोन गोलच्या बळावर बार्सिलोनाने रविवारी ला लिगा फुटबॉल स्पर्धेत अ‍ॅटलेटिको माद्रीद संघावर २-० असा विजय मिळवला. या शानदार विजयासह बार्सिलोनाने विजेतेपदाकडे भक्कम आगेकूच केली आहे.

  • मेस्सीसाठी ला लीगामधील हा विक्रमी ३३५ वा विजय आहे, तसेच त्याने आणि सुआरेज यांनी बार्सिलोनासाठी सध्याच्या हंगामात आतापर्यंत ५३ गोल केले आहेत.

  • सामन्याच्या २८ व्या मिनिटाला अ‍ॅटलेटिको माद्रीदचा खेळाडू डिएगो कोस्टाला रेफरीशी वाद घातल्याने त्याला रेडकार्ड दाखविण्यात आले. तथापि, संघाने १० खेळाडूंसह खेळताना तगड्या बार्सिलोनाला कडवी झुंज दिली. सामना गोलशून्य बरोबरीत सुटणार, अशी चिन्हे दिसत असतानाच ८५ व्या मिनिटाला सुआरेज आणि ८६ व्या मिनिटाला मेस्सीने गोल करीत बार्सिलोनाचा विजय पक्का केला.

  • या विजयासह गुणतालिकेत अव्वल स्थानावर काबीज असणारा बार्सिलोनाने दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या अ‍ॅटलेटिको माद्रीदवर ११ गुणांची आघाडी घेतली आहे. तथापि, दोन्ही संघांनी अद्याप सात सामने खेळणे बाकी आहे आणि आता अ‍ॅटलेटिकोसाठी हे अंतर कमी करणे कठीण असेल.

कोलकाता नाईट रायडर्सकडून राजस्थान रॉयल्सचा आठ विकेट्सनी धुव्वा :
  • कोलकाता : कोलकाता नाईट रायडर्सनं यंदाच्या आयपीएलमध्ये विजयी धडाका कायम ठेवताना राजस्थान रॉयल्सचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवला. कोलकात्याचा यंदाच्या मोसमातला हा चौथा विजय ठरला. या सामन्यात राजस्थाननं कोलकात्यासमोर 140 धावांचं सोपं आव्हान ठेवलं होतं.

  • सुनील नारायण आणि ख्रिस लीनच्या दमदार फलंदाजीमुळे कोलकात्यानं हे आव्हान 14 व्या षटकातच पार केलं. कोलकात्याच्या सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 91 धावांची भक्कम भागीदारी करत संघाच्या विजयाचा मार्ग सुकर केला.  ख्रिस लीननं सहा चौकार आणि तीन षटकारांसह 50 धावांची खेळी केली. तर सुनील नारायणनं 25 चेंडूत 47 धावा फटकावल्या.

  • तत्पूर्वी, स्टिव्ह स्मिथच्या संयमी अर्धशतकाच्या बळावर राजस्थान रॉयल्सने 139 धावांपर्यंत मजल मारली.  नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा कोलकात्याचा निर्णय अगदी योग्य ठरला.

  • राजस्थान रॉयल्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेला तात्काळ माघारी धाडण्यात कोलकात्याचे गोलंदाज यशस्वी ठरले. यानंतर जोस बटलर आणि स्टिव्ह स्मिथ जोडीने खेळपट्टीवर ठाण मांडत संघाचा डाव सावरला.  स्मिथने 73 धावांची खेळी केली.   कोलकात्याकडून हॅरी गुर्नेयने 2 तर प्रसिध कृष्णाने 1 बळी घेतला.

भाजपाचा जाहीरनामा आज होणार प्रसिद्ध, अनेक मोठ्या घोषणा होण्याची शक्यता :
  • लोकसभा निवडणुकीआधी देशभरात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे, मात्र अद्याप भाजपाने त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ११ वाजता भाजपा आपला जाहीरनामा प्रसिद्ध कऱणार आहे. जाहीरनाम्यातून भाजपा मोठ्या घोषणा जाहीर करु शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.

  • पाच वर्षात मोदी सरकारने मिळवलेलं यश तसंच शेतकरी, व्यापारी, तरुण आणि रोजगारासंबंधी काही महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध करु शकतात.

  • जाहीरनाम्यातून भाजपा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल असा अंदाज वर्तवला जात आहे. यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा, शेतकरी कल्याण, तरुण तसंच महिला सशक्तीकरणावर जास्त भर दिला जाईल. शेतकऱ्यांसाठी नवीन योजना सुरु कऱण्यासाठी भाजपाला मोठ्या प्रमाणात सल्ले मिळाले आहेत.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १८३८: द ग्रेट वेस्टर्न हे वाफेचे इंजिन असलेले जहाज इंग्लंडमधील ब्रिस्टॉल येथून निघून पंधरा दिवसांनी न्यूयॉर्क येथे पोचले. अटलांटिक महासागर पार करणारी ही पहिली आगबोट.

  • १९११: डच भौतिकशास्त्रज्ञ हाइक ओन्नेस यांनी अतिसंवाहकतेचा शोध लावला.

  • १९२१: आचार्य विनोबा भावे यांनी पवनार आश्रमाची स्थापना वर्धा येथे केली.

  • १९२९: भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीतील सेंट्रल असेंब्लीत बॉम्बस्फोट केला.

  • १९५०: भारत आणि पाकिस्तान मध्ये लयाकत-नेहरु करार झाला.

  • १९९३: मॅसेडोनियाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रात सामील झाले

जन्म 

  • १९२४: शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ ऊर्फ कुमार गंधर्व यांचा जन्म. (मृत्यू: १२ जानेवारी १९९२)

  • १९२८: नामवंत मराठी साहित्यिक, स्वामीकार रणजित देसाई यांचा जन्म. (मृत्यू: ६ मार्च १९९२)

  • १९३८: संयुक्त राष्ट्रांचे ७ वे प्रधान सचिव कोफी अन्नान यांचा जन्म.

  • १९७९: भारतीय गायक-गीतकार अमित त्रिवेदी यांचा जन्म.

मृत्यू 

  • १८५७: १८५७ च्या बंडातील स्वातंत्र्यवीर मंगल पांडे यांना फाशीच्या शिक्षेने मृत्यू. (जन्म: १९ जुलै १८२७)

  • १८९४: वंदे मातरम् या राष्ट्रगीताचे कवी, निबंधकार, कादंबरीकार, तत्त्वज्ञ, भाषाशास्त्रज्ञ, धर्ममिमांसक आणि सुधारक बंकिमचंद्र यादावचंद्र चटर्जी यांचे निधन. (जन्म: २७ जून १८३८)

  • १९७३: स्पॅनिश चित्रकार आणि शिल्पकार पाब्लो पिकासो यांचे निधन. (जन्म: २५ ऑक्टोबर १८८१)

  • १९७४: मराठी रंगभूमीवरील कलाकार नानासाहेब फाटक यांचे निधन. (जन्म: २४ जून १८९९)

  • १९९९: कामगार नेते, नर्मदा बचाव आंदोलनाच्या मेधा पाटकर यांचे वडील वसंत खानोलकर यांचे निधन.

  • २०१३: ब्रिटनच्या एकमेव महिला पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांचे निधन. (जन्म: १३ ऑक्टोबर १९२५)

  • २०१५: भारतीय पत्रकार आणि लेखक जयकानधन यांचे निधन. (जन्म: २४ एप्रिल १९३४)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.