चालू घडामोडी- ०८ ऑगस्ट २०१८

Date : 8 August, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांचं निधन :
  • चेन्नई : तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमकेचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांचं वयाच्या 94 व्या वर्षी निधन झालं. करुणानिधी हे त्यांच्या कारकिर्दीत 12 वेळा आमदार म्हणून निवडून आले. तसेच, त्यांनी तामिळनाडू राज्याचं पाचवेळा मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे.

  • 28 जुलै रोजी करुणानिधी यांना चेन्नईतील कावेरी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यानच आज संध्याकाळी 6.10 वाजता कावेरी रुग्णालयात करुणानिधींनी अखेरचा श्वास घेतला.

  • कावेरी रुग्णालयाचे कार्यकारी संचालक डॉ. अरविंदन सेल्वराज यांनी पत्रक काढून, करुणानिधी यांच्या निधनाची माहिती दिली.

  • दरम्यान, करुणानिधी यांच्या निधनामुळे तामिळनाडू सरकारने एक आठवड्याचा दुखवटा जाहीर केला असून, उद्या (8 ऑगस्ट) शासकीय सुट्टी घोषित केली आहे.

राज्यसभेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीतून राष्ट्रवादीची माघार : 
  • नवी दिल्ली : राज्यसभेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीतून राष्ट्रवादी माघार घेण्याची चिन्हं आहेत. विरोधीपक्षांमध्ये एकजूट नसल्यामुळे यूपीएकडून संभाव्य उमेदवार वंदना चव्हाण उमेदवारी मागे घेण्याची शक्यता आहे.

  • बीजू जनता दल (बीजेडी)च्या भूमिकेमुळे वंदना चव्हाण यांच्या उमेदवारीवर संकट निर्माण झालं आहे. गुरुवारी म्हणजेच 9 ऑगस्टला उपसभापतीपदाची निवडणूक होणार आहे.

  • बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेड (जेडीयू)चे नेते नितीशकुमार यांनी ओदिशाचे मुख्यमंत्री आणि बीजेडीचे सर्वेसर्वा नवीन पटनाईक यांना फोन केला होता. त्यामुळे बीजेडी खासदार एनडीएकडून उपसभापतीपदाचे उमेदवार असलेल्या जेडीयू खासदार हरिवंश नारायण सिंह यांना मतदान करण्याची शक्यता आहे.

  • बीजेडीने साथ न दिल्यास राष्ट्रवादी आपला उमेदवार मागे घेण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उद्या नवीन पटनाईक यांच्याशी फोनवरुन चर्चा करतील. चर्चेत सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर राष्ट्रवादी आपला उमेदवार मागे घेण्याची शक्यता आहे.

केजरीवालांनी प्रत्येक आमदाराचा निधी 6 कोटींनी वाढवला : 
  • नवी दिल्ली दिल्लीतील आमदारांना आता वार्षिक 4 कोटींऐवजी 10 कोटी रुपये आमदार निधी मिळणार आहे. मतदारसंघातील विकासासाठी निधी वाढवण्यासंदर्भातील प्रस्तावाला आज दिल्ली सरकारने मंजुरी दिली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेतला.

  • आमदार निधीत वाढ करण्याची उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह अनेक आमदारांची मागणी होती. अखेर केजरीवाल सरकारने या मागणीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या वर्षापासूनच हा निर्णय लागू करण्यात येणार आहे.

  • सर्व आमदारांना विधानसभेत सिसोदिया यांनीच या नव्या निर्णयाबाबत माहिती दिली. ते म्हणाले, “वार्षिक आमदार निधी 4 कोटींहून 10 कोटी रुपये करण्यात आला आहे. सध्या आपल्या मतदारसंघातील विकासकामांसाठी आमदारांना वर्षाकाठी 4 कोटी रुपये मिळतात, हा निधी वाढवून 10 कोटी करण्यात आला आहे.”

  • तसेच, तेलुगू, काश्मिरी, मल्याळम, गुजराती यांसह देशातील इतर भाषांच्या अकादमींसह परदेशी भाषांसाठीही अकादमी स्थापन करण्याच्या प्रस्तावालाही मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.

ऐकावं ते नवल! शास्त्रज्ञांनी शोधला लठ्ठपणा वाढवणारा व्हायरस :
  • न्यूयॉर्क - विज्ञानाच्या जगात अनेक चित्रविचित्र शोध लागत असतात. आतातर शास्त्रज्ञांनी चक्क लठ्ठपणा वाढवणारा व्हायरस शोधून काढला आहे. त्यामुळे आता लठ्ठपणा कमी करण्यासाठीची लस तयार करणे शक्य होणार आहे. 

  • गेल्या काही काळात लठ्ठपणाची समस्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. बदललेली जीवनपद्धती आणि बदललेल्या खाण्यापिण्याच्या सवयी लठ्ठपणा वाढवण्यास कारणीभूत ठरतात, असे सर्वसाधारणपणे मानले जाते. मात्र शास्त्रज्ञांनी लठ्ठपणा वाढवणारा व्हायरस शोधून काढल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. शास्त्रज्ञांनी लठ्ठपणा आणि संसर्गजन्य आजार परसवणाऱ्या व्हायरसमधील परस्पर संबंध असल्याचे पुरावे शोधून काढले आहेत.  

  • शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासामध्ये ज्या रुग्णांचे वजन सामान्य असते त्यांच्या तुलनेत लठ्ठपणामुळे त्रस्त असलेल्या रुग्णांच्या शरीरात एडनोव्हायरस-36 चार पटीने अधिक असल्याचे समोर आले. तसेच प्राण्यांवर करण्यात आलेल्या परीक्षणात हा व्हायरस शरीरातील लठ्ठपणा 15 टक्क्यांपर्यंत वाढवण्यास कारणीभूत असल्याचे निष्पन्न झाले. 

  • हा व्हायरस शरीरावर दुहेरी परिणाम करतो. एकीकडे हा व्हायरस फॅट सेल्समध्ये उत्तेजना निर्माण करतो. त्यामुळे शरीरात जळजळ आणि सूज येते. तर दुसरीकडे हा व्हायरस मृत पेशींना शरीराबाहेर जाण्यापासूनही रोखतो. त्यामुळे लठ्ठपणा वाढतो. 

  • शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासामध्ये लठ्ठपणाने ग्रस्त असलेल्या एकूण 30 टक्के व्यक्तींना या व्हायरसची लागण झाल्याचे आले. तर 11 टक्के व्यक्तींमध्ये एडनोव्हायरस-36 असल्याचे समोर आले. दरम्यान, युनिव्हर्सिटी ऑफ मॅच्युसिट्सचे डॉ. विल्मोर वेब्ले सांगतात की, श्वसनासंबंधीचे आजार परसण्यासाठी जबाबदार असणाऱ्या एडनोव्हायरससाठी लस बनवून अमेरिकन लष्कर त्याचा वापर करत आहे.  त्यामुळे लठ्ठपणा वाढवणाऱ्या या व्हायरसला रोखण्यासाठी लस तयार करणे शक्य आहे, असा निष्कर्ष निघतो."

करुणानिधी यांच्याबद्दल 'या' दहा गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का :

मुंबई : तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि दक्षिण भारतातील राजकारणात आपला अमिट ठसा निर्माण करणारे एम. करुणानिधी यांचे आयुष्य अनेक चढ उतारांनी भरलेले होते. त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे दहा मुद्दे खालीलप्रमाणे...

  1. एम. करुणानिधी यांचा जन्म थिरुवरुर जिल्ह्यामध्ये एका खेड्यात 3 जून 1924 रोजी झाला.
  2. करुणानिधी यांनी तमिळ सिनेसृष्टीमध्ये कथालेखनाचे काम सुरु केले.
  3. द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाची स्थापना करणाऱ्या सदस्यांपैकी ते एक होते.
  4. 1957 साली त्यांनी पहिल्यांदा तमिळनाडू विधानसभेची निवडणूक लढवली.
  5. करुणानिधी यांनी 12 वेळा विधानसभेची निवडणूक लढविली आणि त्या सर्व निवडणूका ते जिंकले.
  6. एम. करुणानिधी तामिळनाडूचे पाचवेळा मुख्यमंत्री झाले.
  7. चित्रपटांप्रमाणे त्यांनी अनेक कथा, नाटकं, कविता लिहिल्या आहेत.
  8. करुणानिधी यांना कलैग्नार नावाने ओळखले जाते.
  9. करुणानिधी यांचा राजकीय वारसा त्यांचा मुलगा स्टॅलिन व मुलगी कनिमोळी यांच्याकडे आहे.
  10. करुणानिधी यांनी द्रमुक पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सलग 50 वर्षे सांभाळली.
भारतीय वंशाच्या लिटल चँपला सोडावं लागणार इंग्लंड, ब्रिटिश व्यक्त करतायत हळहळ : 
  • भारतीय वंशाच्या अवघ्या नऊ वर्षाच्या श्रेयस रोयाल या बुद्धिबळपटूनं इंग्लंडच्या गळ्यात मानसन्मान मिळवून दिले. परंतु इंग्लंडच्या व्हिसाच्या नियमांमुळे त्याला कदाचित भारतात परतावं लागणार असून अशा गुणी खेळाडूच्या मागे तमाम ब्रिटिश जनता उभी राहिली आहे. आपल्या वयोगटात श्रेयस जागतिक स्तरावर चौथ्या स्थानावर आहे. या पिढीमधला संपूर्ण इंग्लंडमधला सगळ्यात गुणी खेळाडू म्हणून श्रेयसकडे बगितलं जातं.

  • श्रेयसचे वडील टीसीएसमध्ये असून तो वयाच्या तिसऱ्या वर्षापासून इंग्लंडमध्ये आहे. अनेक स्पर्धांमध्ये इंग्लंडच्या वतीने खेळताना चमक दाखवलेला श्रेयस जागतिक करमवारीत चौथ्या स्थानावर आहे. परंतु ज्यांचे उत्पन्न वर्षाला 1,20,000 पौंडांपेक्षा जास्त नाही अशांच्या व्हिसाचे नूतनीकरण होत नाही. श्रेयसच्या वडिलांचे जिंतेद्र सिंह यांचे उत्पन्न यापेक्षा कमी आहे. परिणामी त्यांना भारतात परतावं लागणार आहे आणि इंग्लंडलाही श्रेयसला मुकावं लागणार आहे.

  • यावरून ब्रिटनमधल्या सोशल मीडियावर श्रेयसला पाठिंबा देणाऱ्या व व्हिसाच्या या कठोर नियमांचा निशेध करणाऱ्या पोस्ट व्हायरल होत आहेत. उत्पन्नाची ही मर्यादा खूपच जास्त असून इंग्लंडमध्ये वर्क परमिटवर काम करणाऱ्या बहुतेकांचं उत्पन्न यापेक्षा कमी असतं असं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे.

  • श्रेयस ही इंग्लंडची राष्ट्रीय संपत्ती असून इथं राहू द्यावं असी विनंती त्याच्या पालकांनी केली होती. मात्र, श्रेयस हा खरंच अत्यंत गुणी खेळाडू आहे परंतु हे काही त्याला या देशात राहू देण्यासाठी कारण होऊ शकत नाही असं उत्तर ब्रिटिश शासनानं दिलं आहे.

दिनविशेष :
  • आंतरराष्ट्रीय मांजर दिन

महत्वाच्या घटना

  • १६४८: स्वराज्याची पहिली लढाई – पुणे सातारा मार्गावरील खळत-बैलसरच्या लढाईत आदिलशहाचा सरदार फत्तेहखानाच्या फौजेचा शिवाजीराजांनी सपशेल पराभव केला.

  • १९०८: विलब राइट यांनी पहिले उड्डाण केले.

  • १९४२: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर (ऑगस्ट क्रांति मैदान) झालेल्या अधिवेशनात चले जाव चा ठराव मंजुर केला. याप्रसंगी महात्मा गांधींनी करेंगे या मरेंगे हा संदेश दिला.

  • १९६७: इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाइन्स, सिंगापूर व थायलँड यांनी ASEAN ची स्थापना केली.

  • १९८५: भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे येथे ध्रुव ही भारताची सहावी व आतापर्यंतची सर्वात मोठी फास्ट ब्रीडर संशोधनपर अणुभट्टी कार्यान्वित झाली.

  • १९९४: पुणे येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने फक्त महिलांसाठीच असलेले देशातील पहिले वास्तुशास्त्र महाविद्यालय (Dr. Bhanuben Nanavati College of Architecture for Women) सुरू केले.

  • १९९८: संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) सात प्रयोगशाळा औद्योगिक क्षेत्रासाठी खुल्या झाल्या.

  • २०००: महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा महाकवी कालिदास संस्कृत-साधना पुरस्कार पुण्याचे वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरुजी यांना जाहीर.

  • २००८: चीनमधील बिंजिंग येथे येथे २९ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

जन्म

  • १०७८: जपानी सम्राट होरिकावा यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑगस्ट ११०७)

  • १८७९: अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमस चे सहसंस्थापक डॉ. बॉब स्मिथ यांचा जन्म. (मृत्यू: १६ नोव्हेंबर १९५०)

  • १९०२: नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ पॉल डायरॅक यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑक्टोबर १९८४)

  • १९१२: जागतिक कीर्तीचे फलज्योतिषी बंगळुरू वेंकट तथा बी. व्ही. रमण यांचा जन्म. (मृत्यू: २० डिसेंबर १९९८)

  • १९१२: चित्र व शिल्पकलेतील दिग्गज तुकाराम केरबा ऊर्फ टी. के. अण्णा वडणगेकर यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मार्च २००४)

  • १९२५: शास्त्र व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु पद्मश्री डॉ. वि. ग. भिडे यांचा जन्म.

  • १९२६: साहित्यिक, चित्रपट कथालेखक, ग्रामीण कथालेखक, भारतीय चित्रपट महामंडळाचे संस्थापक सचिव आणि बालभारती चे संपादक शंकर पाटील यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै १९९४)

मृत्यू

  • १८२७: ब्रिटनचे पंतप्रधान जॉर्ज कॅनिंग यांचे निधन. (जन्म: ११ एप्रिल १७७०)

  • १८९७: जर्मन रसायनशास्त्रज्ञ व्हिक्टर मेयर यांचे निधन. (जन्म: ८ सप्टेंबर १८४८)

  • १९९८: लेखिका व कादंबरीकार डॉ. सुमती क्षेत्रमाडे यांचे निधन.

  • १९९९: चित्रपट निर्माते व दिग्दर्शक गजानन नरहर सरपोतदार यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.