चालू घडामोडी - ०८ फेब्रुवारी २०१९

Date : 8 February, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
अभिमानास्पद! स्वीडिश पंतप्रधानांच्या सल्लागारपदी निला विखे-पाटील यांची निवड :
  • अहमदनगर: स्वीडनच्या पंतप्रधानांच्या सल्लागार म्हणून निला विखे-पाटील यांची निवड झाली आहे. निला या प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ अशोक विखे-पाटील यांच्या कन्या, तर केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्या नात आहेत. स्वीडनच्या पंतप्रधान पदाची धुरा गेल्याच महिन्यात स्टिफन लोफवन यांनी हाती घेतली. त्यांच्या सल्लागार म्हणून निला काम करतील. 

  • स्वीडनमध्ये सोशल डेमोक्रॅट-ग्रीन पार्टीचं सरकार आहे. डेमोक्रॅटिक पार्टीचे स्टिफन लोफवन यांच्याकडे या सरकारचं नेतृत्व आहे. आता त्यांच्या सल्लागार म्हणून 32 वर्षांच्या निला विखे-पाटील काम पाहतील. त्या अर्थ विभागाशी संबंधित विभागांवर काम करतील. कर, अर्थसंकल्प, गृहनिर्माण या संबंधित विषय त्या हाताळतील, अशी माहिती निला यांच्या वडिलांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली. याशिवाय स्टॉकहॉम महानगपालिकेच्या परिषदेवरही त्यांची निवड झाली आहे. स्टॉकहॉम स्वीडनच्या राजधानीचं शहर आहे. 

  • निला यांनी याआधीच्या सरकारच्या सल्लागार म्हणूनही काम केलं आहे. त्या ग्रीन पार्टीच्या सक्रीय सदस्य आहेत. स्टॉकहॉम ग्रीन पार्टीच्या निवडणूक समितीच्या सदस्य मंडळातही त्यांचा समावेश आहे. निला यांचा जन्म स्वीडनमध्ये झाला. त्या सुरुवातीला काही काळ महाराष्ट्रात वास्तव्याला होत्या. त्या माजी केंद्रीय मंत्री दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांच्या नात आहेत. तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुतणी आहेत. 

हवाईदल-इस्रोची संयुक्त अंतराळ मोहीम, अंतराळात मानव पाठविण्यासाठी तयारी सुरू :
  • पुणे : अंतराळात मानव पाठविण्याच्या मोहिमेची तयारी सुरू झाली असून, यासाठी इस्रो आणि हवाईदल यांच्यात संयुक्त प्रयत्न सुरू झाले आहेत, अशी माहिती लष्करी वैद्यकीय सेवेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल बिपीन पुरी यांनी गुरुवारी दिली.

  • लष्करी वैद्यकीय महाविद्यालय (एएफएमसी) तर्फे ६७व्या वार्षिक लष्करी वैद्यकीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रात भारतीय लष्कराच्या तिन्ही दलातील वैद्यकीय अधिकारी सहभागी झाले आहेत. यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत पुरी बोलत होते.

  • पुरी म्हणाले की, या प्रकल्पांतर्गत अंतराळ मानवाच्या आरोग्यविषयक समस्यांबाबत निराकरण आणि येणारी आव्हाने या संदर्भात संशोधन करण्यासाठी बंगळुरू येथील इन्स्टिट्यूट आॅफ एरोस्पेस मेडिसिन यांच्या पुढाकाराने हे काम हाती घेण्यात आले आहे. या संदर्भात इस्रो आणि हवाई दलाच्या मेडिकल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या असून, प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात झाली.

  • अंतराळ क्षेत्रात एक पाऊल पुढे टाकण्यासाठी भारताकडून मोठे प्रयत्न केले जात आहेत. अंतराळात मानव पाठविण्याचा पंतप्रधान यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. २०२२ पर्यंत अंतराळात भारतीय मानवाला पाठविण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.

राष्ट्रीय वरिष्ठ तलवारबाजी स्पर्धेत औरंगाबादच्या दुर्गेश, तुषारला कास्य :
  • औरंगाबाद : गुवाहाटी येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय वरिष्ठ तलवारबाजी स्पर्धेत औरंगाबादचा आंतरराष्ट्रीय खेळाडू दुर्गेश जहागीरदार आणि तुषार आहेर यांनी सांघिक कास्यपदक जिंकले. या स्पर्धेत महाराष्ट्राने फॉईल प्रकारात कास्यपदक जिंकले.

  • कास्यपदक जिंकणाऱ्या महाराष्ट्राच्या संघात दुर्गेश जहागीरदार व तुषार आहेर या औरंगाबादच्या खेळाडूंसह नाशिकचा ऋत्विक शिंदे व सांगलीच्या अनिल महापती यांचा समावेश होता. या स्पर्धेत महाराष्ट्राने बिहारचा १५-९ व केरळचा ४५-२८, असा पराभव केला होता. उपांत्य फेरीत महाराष्ट्राला गोवा संघाने पराभूत केले.

  • संघासोबत मार्गदर्शक म्हणून स्वप्नील तांगडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. या निवडीबद्दल राज्य संघटनेचे सचिव उदय डोंगरे, क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड, जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी, क्रीडा अधिकारी गोकुळ तांदळे, जिल्हा तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष एस.पी. जवळकर, सचिव दिनेश वंजारे, मंजू खंडेलवाल, अजय त्रिभुवन, सागर मगरे, संजय भूमकर आदींनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

मुकेश अंबानी यांच्या मोठ्या मुलाच्या लग्नाची तारीख जाहीर :
  • मुंबई : देशातील सर्वात मोठे उद्योजक मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी याच्या लग्नाची तारीख जाहीर झाली आहे. हिरे व्यापारी रसेल मेहता यांची कन्या श्लोका मेहतासोबत 9 मार्च रोजी आकाश विवाहबंधनात अडकणार आहे. मागील वर्षी आकाश आणि श्लोकाचा साखरपुडा झाला होता.

  • पुढील महिन्यात आकाशचा ग्रँड विवाह पार पडणार आहे. मागील काही दिवसांपासून लग्नाची जोरात तयारी सुरु आहे. नुकतंच मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानीचा विवाह पार पडला होता. त्यावेळी देशाभरातील दिग्गजांनी ईशाच्या लग्नाला हजेरी लावली होती.

  • येत्या 9 मार्चला शनिवारी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये सांयकाळी 7.30 वाजता हा ग्रँड विवाहसोहळा पार पडणार आहे. तर 11 मार्चला याच ठिकाणी रिसेप्शन पार पडेल. लग्नाला देशातील विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

‘आठवड्याभरात ISIS चा १०० टक्के नायनाट’ :
  • ISIS या दहशतवादी संघटनेने इराक आणि सीरिया येथील भूभाग ताब्यात घेतले होते आणि तेथे आपले तळ ठोकले होते. मात्र आता त्याच्या ताब्यात असलेला भूभाग अत्यंत कमी असून ISIS चा आठवड्याभरात १०० टक्के नायनाट करण्यात येईल, अशी आशा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे.

  • इराक आणि सीरियातून ISIS ही दहशतवादी संघटना पुढील आठवड्यात १०० टक्के नष्ट केली जाईल. ISIS कडे आता सुमारे १ टक्के भूभाग शिल्लक राहिला असून लष्करी फौजांनी गेल्या वर्षभरात त्याच्यावर चांगलाच हल्लाबोल केला आहे. त्यामुळे पुढील आठवड्याभरात ISIS इतिहासजमा होईल, असे ट्रम्प म्हणाले. ISIS बाबत चर्चा करण्यासाठी ८० हून अधिक देशांचे राजदूत आणि मंत्री यांची वॉशिंग्टन येथे बुधवारी बैठक झाली. त्यात ट्रम्प यांनी ही माहिती दिली.

  • ISIS विरोधात आता नव्याने धोरण आखण्यात आले आहे. प्रत्यक्ष युद्धभूमीवर असलेल्या अमेरिकेच्या सैनिकांना आणि दलाच्या प्रमुखांना बळ देणे व इतर भागीदारांना सक्षम करणे तसेच दहशतवाद्यांच्या विचारसरणीवर थेट हल्ला चढवणे अशी ही रणनीती असणार आहे. आतापर्यंत केलेल्या संयुक्त मोहिमेत सीरिया आणि इराकमधील बहुतांश भूभाग ISIS च्या तबल्यातून सोडवण्यात आला आहे. आता अफगाणिस्तान, लिबिया, पश्चिम आफ्रिका अशा काही ठिकाणी या संघटनेचे थोडे अस्तित्व शिल्लक आहे. त्या ठिकाणांहून आठवड्याच्या आत ISIS चा समूळ नायनाट करण्यात येईल, असेही ट्रम्प म्हणाले.

मराठी पाऊल वनसेवेतही पुढे :
  • भारतीय वनसेवेतील मराठी टक्केवारी गेल्या तीन वर्षांपासून वाढत आहे. बुधवारी जाहीर झालेल्या निकालाने त्यावर शिक्कामोर्तब केले. देशभरातून ८९ उमेदवारांची निवड यात झाली असून त्यात महाराष्ट्रातील दहा उमेदवारांचा समावेश आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्यावतीने डिसेंबर २०१८ मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली होती.

  • भारतीय वनसेवेत आधी महाराष्ट्राची टक्केवारी अतिशय कमी होती. आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यातील उमेदवारांचेच वर्चस्व होते. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्रातून मोठय़ा संख्येने उमेदवार निवडले जात आहेत. मागील वर्षी भारतातून तिसरा आलेला निरंजन पुण्यातील ज्ञानप्रबोधिनीचा विद्यार्थी होता. मराठी टक्का वाढण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून वनखात्याकरिता खास मार्गदर्शनाचा एक वेगळा गट कार्यरत आहे.

  • यामध्ये भारतीय पोलीस सेवेतील महेश भागवत यांच्यासह राज्याच्या वनखात्याचे प्रधान सचिव विकास खारगे, भारतीय वनसेवेतील सुनीता भागवत, राजस्थान कॅडरचे प्रवीण कासवान तसेच गेल्यावर्षी भारतीय वनसेवा परीक्षा उत्तीर्ण झालेले कस्तुरी सुटे, निखिल धवल, काजोल पाटील, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त समीर उधारे यांनी उमेदवारांना मार्गदर्शन केले. या १५ उमेदवारांपैकी काही जण नागरी सेवा मुलाखतीलासुद्धा आहेत. विशेष म्हणजे, भारतीय वनसेवेत अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी विषयातील विद्यार्थी आहेत. बुधवारी अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आली.

  • भारतीय वनसेवेबद्दल महाराष्ट्रात जी जागृती झाली आहे, ती इतर कुठेही नाही. ८९ उमेदवारांमध्ये सुमारे १५ जण आमच्या ‘इंटरव्ह्यू गायडन्स ग्रुप’ मधील आहेत. विशेष म्हणजे, गेल्या तीन-चार वर्षांपासून यातील मराठी टक्का वाढत आहे. गेल्यावर्षी आम्ही फक्त मुलाखतीसाठी मुलांना मार्गदर्शन केले. यावर्षी मात्र आम्ही त्यांची मुख्य परीक्षेचीसुद्धा तयारी करून घेतली.  – महेश भागवत, भारतीय पोलीस सेवा

मीराबाई चानूचे ‘सुवर्ण’ पुनरागमन, थायलंड इजीएटी कपमध्ये मिळवले जेतेपद :
  • नवी दिल्ली - विश्व चॅम्पियन भारतीय भारोत्तोलक मीराबाई चानूने कमरेच्या दुखापतीनंतर जबरदस्त पुनरागमन करताना गुरूवारी थायलंडमध्ये इजीएटी कपमध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली. या दुखापतीमुळे चानू २०१८ मध्ये सहा महिन्यांपासून अधिक वेळ विविध स्पर्धांपासून दूर राहिली होती.

  • मिळालेल्या माहितीनुसार चानू हीने ४८ किलो गटात १९२ किलो वजन उचलून सिल्व्हर लेव्हल आॅलिम्पिक पात्रता स्पर्धेत सुवर्ण मिळवले आहे. टोकियो २०२० आॅलिम्पिकच्या अंतिम रँकिंगच्या कटसाठी या स्पर्धेतील गुण महत्त्वपूर्ण ठरतील. चानूने स्नॅचमध्ये ८२ किलो व क्लिन अ‍ॅण्ड जर्कमध्ये ११० किलो वजन उलचून अव्वल स्थान मिळवले.

  • दुखापतीतून सावरण्यासाठी तिला विस्तृत फिजीओथेरपी करावी लागली. चानू ही दुखापतीमुळे गेल्या वर्षी विश्व चॅम्पियनशीपमध्ये सहभागी होऊ शकली नव्हती. ही स्पर्धा गोल्ड लेव्हल आॅलिम्पिक पात्रता आहे. तिला दुखापतीमुळे जकार्तामध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेतही सहभागी होता आले नव्हते.

  • आता मी पूर्ण तंदुरुस्त असल्याचे अनुभव घेत आहे. मात्र, पुनरागमन करत असल्याने मी माझी सर्वोत्तम कामगिरी करु शकले नाही. तरी मी वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीच्या तुलनेत केवळ चार किलो वजन कमी उचलले. त्यामुळे मी समाधानी आहे. आता मी चीनमध्ये होणाऱ्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी तयारी करणार असून यानंतर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी सज्ज व्हायचे आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १७१४: छत्रपती शाहू महाराज (सातारा गादी) आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांच्यात वळवंड (लोणावळा) येथे तह झाला.

  • १८९९: रँडचा खून करण्यार्‍या चाफेकर बंधूंची नावे इंग्रज सरकारला सांगणार्‍या गणेश शंकर द्रविड व रामचंद्र शंकर द्रविड या बंधूंचा वासुदेव चाफेकर आणि महादेव रानडे यांनी गोळ्या झाडून वध केला.

  • १९३६: १६ सप्टेंबर १९३५ रोजी नोंदणी झालेल्या बँक ऑफ महाराष्ट्र चे कामकाज सुरू झाले.

  • १९६०: पंजाबच्या खडकसिंह या मल्लाविरुद्ध गुणांवर विजय मिळवून गणपत आंदळकर हिंदकेसरी बनले.

  • १९७१: NASDAQ हा अमेरिकन शेअर बाजाराचा निर्देशांक सुरू झाला.

  • २०००: छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारीस करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय.

जन्म 

  • १७००: डच गणितज्ञ डॅनियल बर्नोली यांचा जन्म. (मृत्यू: १७ मार्च १७८२)

  • १८४४: भाषांतरकार गोविंद शंकरशास्त्री बापट यांचा जन्म.

  • १८९७: भारताचे ३ रे राष्ट्रपती, शिक्षणतज्ञ. पद्मविभूषण व भारतरत्‍न डॉ. झाकिर हुसेन यांचा जन्म. (मृत्यू: ३ मे १९६९)

  • १९०९: तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य प्रा. केशव विष्णू तथा बाबा बेलसरे यांचा जन्म. (मृत्यू: ३ जानेवारी १९९८)

  • १९२५: शास्त्रीय गायिका शोभा गुर्टू यांचा जन्म. (मृत्यू: २७ सप्टेंबर २००४)

  • १९४१: गझलगायक जगजीतसिंग यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑक्टोबर २०११)

मृत्यू 

  • १९२७: ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे निधन. (जन्म: ७ सप्टेंबर १८४९)

  • १९७१: मुंबईचे पहिले गृहमंत्री, हैदराबाद संस्थानात भारत सरकारचे एंजट जनरल, नामवंत साहित्यिक आणि भारतीय विद्याभवन चे संस्थापक डॉ. कन्हैय्यालाल मुन्शी यांचे निधन. (जन्म: ३० डिसेंबर १८८७)

  • १९७५: नोबेल पारितोषिक विजेते वनस्पतिज रंग व अल्कलॉईड्सवर संशोधन करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ सर रॉबर्ट रॉबिनसन यांचे निधन. (जन्म: १३ सप्टेंबर १८८६)

  • १९९४: कवी, कोशकार, इतिहास संशोधक, इतिहास लेखक, शाहिरी वाङ्मयाचे संग्राहक, संपादक व प्रकाशक यशवंत नरसिंह केळकर यांचे निधन. (जन्म: १९ जुलै १९०२)

  • १९९५: भारताचे माजी नौदलप्रमुख, व्हाईस अॅडमिरल भास्करराव सोमण यांचे निधन.

  • १९९९: आनंदग्रामच्या संस्थापिका व थोर समाजसेविका डॉ. इंदुताई पटवर्धन यांचे निधन. (जन्म: १४ मे १९२६)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.