चालू घडामोडी - ०८ जानेवारी २०१८

Date : 8 January, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
किम जोंग उन यांच्याशी बोलेन, पण...! डोनाल्ड ट्रम्प यांची सशर्त चर्चेची तयारी :
  • कँप डेव्हीड : उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्याशी फोनवर बोलण्याची सशर्त तयारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी दाखविली व उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यातील बोलण्यातून सकारात्मक निष्कर्ष निघतील, अशी आशाही व्यक्त केली.

  • दक्षिण कोरियाशी अधिकृत पातळीवर पुढील आठवड्यात चर्चेची तयारी उत्तर कोरियाने गेल्या शुक्रवारी दाखविली. ही चर्चा झाली, तर दोन वर्षांनंतरची ती पहिली असेल. उत्तर कोरियाने अण्वस्त्रे आणि क्षेपणास्त्रांच्या केलेल्या चाचण्यांनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत अमेरिका आणि दक्षिण कोरियाने लष्करी उपाययोजना लांबणीवर टाकल्यावर उत्तर कोरियाने आपल्या शेजारी दक्षिण कोरियाशी चर्चेची तयारी दाखवली.

  • येथे वार्ताहरांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ट्रम्प म्हणाले की, किम जोंग उन यांच्याशी मी बोलणी करण्यास तयार आहे, परंतु सशर्त. निश्चितच मी त्यांच्याशी चर्चा करेन. मला त्यात काहीही अडचण नाही.

  • ट्रम्प अध्यक्ष बनताच उन यांच्याशी त्यांचा शाब्दिक संघर्ष सुरू झाला होता. ट्रम्प यांनी उन यांनी अण्वस्त्रांच्या व क्षेपणास्त्रांच्या चाचण्या केल्यापासून ‘रॉकेट मॅन’ असाच त्यांचा उल्लेख केला आहे. किम जोंग यांनी या आठवड्यात माझ्या टेबलवर अण्वस्त्राची कळ (बटण) आहे, असे म्हटले होते, त्यावर ट्रम्प यांनी माझ्याकडे त्याच्यापेक्षाही मोठी कळ असल्याचे म्हटले होते.(source :lokmat)

भारतात ९७.५४ कोटी दूरध्वनीधारक, सर्वाधिक ८३ लाखांची वाढ नोव्हेंबर महिन्यात; महाराष्ट्र दुस-या स्थानी:
  • मुंबई : भारतातील दूरध्वनीधारकांची संख्या ९७.५४ कोटींवर पोहोचली आहे. मागील वर्षी सर्वाधिक ८३ लाखांची वाढ नोव्हेंबर महिन्यात झाली. सेल्युलर आॅपरेटर्स असोसिएशन आॅफ इंडियाने (सीओएआय) या संबंधीचा अहवाल सादर केला आहे.

  • भारतात शौचालयांपेक्षा मोबाइल अधिक असल्याचा विषय अनेकदा चर्चीला गेला. यावर सीओएआयच्या अहवालामुळे पुन्हा शिक्कामोर्तब झाले.

  • सीओएआयने या अहवालात मोबाइल आणि लँडलाइन अशा दोन्ही प्रकारच्या धारकांचा अभ्यास केला. हे दोन्ही मिळून देशातील दूरध्वनीधारकांची संख्या ९७ कोटींच्या वर गेली आहे. यामध्ये एअरटेलचा हिस्सा सर्वाधिक २९.६८ टक्के आहे.

  • रिलायन्स जिओने अल्पावधितच १४.९६ टक्के बाजारी हिस्स्याची मजल मारली आहे, तर सरकारी बीएसएनएल आणि एमटीएनएलचा बाजारी हिस्सा एक टक्क्यांच्या खाली आहे.

  • फक्त मोबाइलधारकांचा विचार केल्यास, पूर्व उत्तर प्रदेश मंडळ यात अव्वल राहिले आहे.

  • देशातील एकूण मोबाइलधारकांपैकी ८.४९ कोटी धारक हे या मंडळातील आहेत. महाराष्ट्राचा क्रमांक त्यानंतर दुसरा असून, महाराष्ट्र (मुंबई वगळून) मंडळात ८.१५ कोटी मोबाइलधारक आहेत.(source: lokmat)

सर्व रेल्वे स्टेशनांवर मोफत ‘वाय-फाय’ सेवा मिळणार :
  • नवी दिल्ली : देशाच्या ग्रामीण, दुर्गम व शहरी भागातील सर्व म्हणजे सुमारे ८,५०० रेल्वे स्थानकांमध्ये ‘वाय-फाय’ सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून या योजनेसाठी ७०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

  • ‘डिजिटल इंडिया’ या सरकारच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत रेल्वे खात्याने अलीकडेच २१६ महत्त्वाच्या स्थानकांवर ‘वाय-फाय’ सेवा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे या रेल्वे स्थानकांतील मोफत इंटरनेट सेवेचा सुमारे सत्तर लाख प्रवाशांना लाभ मिळत आहे. रेल्वे खात्याच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, दैनंदिन जीवनात इंटरनेट ही महत्त्वाची गरज झाली असून देशातील सर्व रेल्वे स्थानकांवर वाय-फायद्वारे मोफत इंटरनेट सेवा पुरविण्यात येणार आहे.

  • देशातील १,२०० रेल्वे स्थानकांमध्ये ‘वाय-फाय’ची सुविधा ही मुख्यत्वे रेल्वे प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिली जाईल. त्यशिवाय ग्रामीण व दुर्गम भागातील ७,३०० रेल्वे स्थानकांत फक्त प्रवासीच नव्हे तर स्थानिक रहिवासीही ‘वाय-फाय’ सुविधेद्वारे मोफत इंटरनेट सेवेचा लाभ घेऊ शकतील.

  • ग्रामीण भागामध्ये डिजिटल बँकिंग, आधार कार्ड तयार करणे, सरकारी प्रमाणपत्रे, जन्म-मृत्यू प्रमाणपत्र आॅनलाइनद्वारे मिळविणे, करभरणा, बिले भरणे या सर्व गोष्टींसाठी इंटरनेटचा जास्तीत जास्त वापर जनतेकडून व्हावा असे केंद्र सरकारचे प्रयत्न आहेत.(source :lokmat)

दुबईतील भारतीय झाला एका रात्रीत कोट्यधीश! लॉटरीचे २६ कोटींचे बक्षीस :
  • दुबई: ‘दुबई रॅफेल ड्रॉ’ या लॉटरीचे पहिल्या क्रमांकाचे जॅकपॉट बक्षीस जिंकल्याने तेथे नोकरी करणारा हरिकृष्णन

  • व्ही. नायर हा भारतीय एका रात्रीत कोट्यधीश झाला. नायर यांना बक्षिसापोटी १३ दशलक्ष संयुक्त अरब अमिरातीचे दिरहम (सुमारे २०.६७ कोटी रुपये) एवढी रक्कम मिळाली.

  • आबुधाबी आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी या लॉटरीची सोडत काढण्यात आली. ‘दि बिग टिकेट ड्रीम १२’ या मालिकेतील या लॉटरीच्या तिकिटांची विक्री डिसेंबरमध्ये केली गेली होती.

  • या लॉटरीची तिकिटे आॅनलाइन किंवा विमानतळांवर खरेदी करण्याची सोय होती. ५०० दिरहमचे एक तिकीट घेतल्यास, त्यावर आणखी एक तिकीट मोफत दिले जात होते. नायर यांचे नशीब एवढे बलवत्तर की, त्यांना अशा मोफत मिळालेल्या तिकिटावर हे जॅकपॉटचे बक्षीस लागले.

  • एवढे मोठे बक्षीस लागल्याचे समजल्यावर त्यांची पहिली प्रतिक्रिया अविश्वासाची व नंतर आनंदाची होती! एकटे नायरच नव्हेत, तर इतर चार भारतीयांनाही या लॉटरीने साथ दिली. त्यात एका लहान मुलाचाही समावेश आहे.(source : lokmat)

पश्चिम महाराष्ट्रात सहा हजार कोटींचे रस्ते; सार्वजनिक बांधकाम विभागाचे पाच जिल्ह्यांसाठी नियोजन :
  • पुणे : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या पाच जिल्ह्यांमधील ३० रस्त्यांची कामे करण्यात येणार असून ‘हायब्रीड अ‍ॅन्यूईटी’ कार्यक्रमांतर्गत तब्बल पाच हजार ९५२ कोटी रुपये खर्चून हे रस्ते बांधण्यात येणार आहेत.

  • या रस्त्यांची लांबी जवळपास १ हजार ८२८ किलोमीटरची असणार आहे. त्यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असली, तरी केंद्र शासनाच्या नियमानुसार आर्थिक निकषांमध्ये बसणा-या ठेकेदारांनाच हे काम देण्यात येणार आहे. मात्र, अशा ठेकेदारांची संख्या कमी असल्याने अडचणी उद्भवण्याचीही शक्यता आहे.

  • सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुणे विभागामध्ये ‘हायब्रीड अ‍ॅन्यूईटी’ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत विभागातील ३० रस्त्यांची निर्मिती केली जाणार आहे. अस्तित्वात असलेल्या रस्त्यांची सुधारणा करणे आणि काही रस्त्यांची नव्याने बांधणी करणे अशा प्रकारची कामे करण्यात येणार आहेत.

  • प्रत्येक रस्त्याचे काम हे अंदाजे सव्वाशे ते दीडशे कोटी रुपयांचे असणार आहे. या कामासाठी केंद्र शासनाच्या आर्थिक निकषांमध्ये बसणारे ठेकेदाराच निवडले जाणार आहेत. मात्र, अशा ठेकेदारांची संख्या कमी असल्याने कदाचित काही ठेकेदार एकत्र येऊन निविदा भरण्याची शक्यता आहे.(source : lokmat)

एअर इंडियाला आणखी पाच वर्षे द्यावीत :
  • एअर इंडियाचे खासगीकरण करण्यासाठी ही वेळ योग्य नसून,  या कंपनीला सावरण्यासाठी आणखी पाच वर्षे देण्यात यावीत. तसेच सरकारने त्यांचे कर्जही माफ करावे, असे मत संसदीय समितीने व्यक्त केले आहे.

  • एअर इंडियाला टीएपी योजनेत तात्पुरत्या स्वरूपात जास्त व्याजदराने कर्जे घ्यावी लागली. त्यामुळे आर्थिक स्थिती वाईट होत गेली. संसदेच्या वाहतूक, पयर्टन व संस्कृतीविषयक स्थायी समितीने असे म्हटले आहे, की एअर इंडियात निर्गुतवणूक करणे किंवा तिचे खासगीकरण करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्यात यावा. निर्गुतवणुकीला पर्याय शोधले जावेत.  

  • एअर इंडियाचे मूल्यमापन केवळ व्यावसायिक मुद्दय़ांवर करणे चुकीचे असताना तसे मूल्यमापन निती आयोगाने केले आहे. असे मूल्यमापन करणे एअर इंडियासाठी अन्यायकारक आहे.

  • टीएपी व आर्थिक पुनर्रचना योजनेत २०१२ ते २०२२ या दहा वर्षांच्या काळापैकी सुरुवातीच्या काळात एअर इंडियात सुधारणा झाली होती व धोक्यातून ती बाहेर येत असल्याची चिन्हे होती. टीएपी काळाच्या अखेरीस सरकार एअर इंडियाच्या आर्थिक कामगिरीचे मूल्यमापन करून निर्णय घेऊ शकते पण आताच खासगीकरणाची घाई करण्याचे कारण नाही, असे संसदीय समितीने म्हटले आहे. (source : loksatta)

दिनविशेष

महत्वाच्या घटना

  • १८३५: अमेरिकेवरील राष्ट्रीय कर्ज पहिल्यांदाच आणि एकदाच शून्य झाले.

  • १८८०: सत्यशोधक समाजाच्या संस्काराने लावलेली लग्ने कायदेशीर असल्याचा मुंबई उच्‍च न्यायालयाचा निर्णय. ब्राम्हणेतर लोकही लग्नाचे पौरोहित्य करु शकतात हे न्यायालयाने मान्य केले.

  • १८८९: संख्यात्मक सामग्रीचे विश्लेषण करण्यासाठी डॉ. हर्मन होलरिथ यांना अमेरिकेत गणकयंत्राचे पेटंट मिळाले.

  • १९४०: दुसरे महायुद्ध – ब्रिटनने अन्नधान्यावर नियंत्रण (रेशनिंग) आणले.

  • १९४७: राजस्थान विद्यापीठाची स्थापना झाली.

  • १९५७: गोव्याच्या लष्करी न्यायालयात मोहन रानडे यांच्यासह तेवीस जणांना २४ वर्षांची शिक्षा झाली.

  • १९६३: लिओनार्डो डा व्हिन्सि यांच्या मोनालिसा चे अमेरिकेत प्रथमच नॅशनल गॅलरी ऑफ आर्ट, वॉशिंग्टन येथे प्रदर्शन करण्यात आले.

  • २०००: लता मंगेशकर यांची १९९९ साठीच्या एन. टी. रामाराव राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

  • २००१: भारत व व्हिएतनाम दरम्यान सांस्कृतिक, पर्यटन आणि अणूऊर्जेचा शांततेसाठी वापर करण्याच्या तीन करारांवर सह्या झाल्या.

जन्म

  • १९०९: ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त पहिल्या लेखिका आशापूर्णा देवी यांचा जन्म.

  • १९२४: स्वातंत्र्य सेनानी, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, लोकसभा सदस्य गीता मुखर्जी यांचा जन्म. (मृत्यू: ४ मार्च २०००)

  • १९२६: प्रसिद्ध ओडिसी नर्तक केलुचरण महापात्रा यांचा जन्म. (मृत्यू: ७ एप्रिल २००४)

  • १९३५: अमेरिकन गायक, गिटारवादक, अभिनेता आणि किंग ऑफ द रॉक अँड रोल एल्व्हिस प्रिस्टले यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑगस्ट १९७७)

  • १९३९: अभिनेत्री नंदा यांचा जन्म.

  • १९४२: इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ आणि लेखक स्टिफन हॉकिंग यांचा जन्म.

  • १९४५: मराठी लेखिका प्रभा गणोरकर यांचा जन्म.

मृत्य

  • १८२५: कापसाच्या जिनिंग मशीनचा संशोधक एली व्हिटनी यांचे निधन. (जन्म: ८ डिसेंबर १७६५)

  • १८८४: ब्राम्हो समाजातील एक थोर पुरूष, समाजसुधारक आणि लोकसेवक केशव चंद्र सेन यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १८३८)

  • १९६६: प्रथितयश दिग्दर्शक बिमल रॉय यांचे निधन. (जन्म: १२ जुलै १९०९)

  • १९६७: प्राच्यविद्या पंडित श्रीपाद कृष्ण बेलवलकर यांचे निधन. (जन्म: १० डिसेंबर १८८० – नरसोबाची वाडी, शिरोळ, कोल्हापूर)

  • १९७३: सकाळ वृत्तपत्राचे संस्थापक संपादक ना. भि. परुळेकर उर्फ नानासाहेब परुळेकर यांचे निधन.

  • १९७६: चीनचे राष्ट्राध्यक्ष चाऊ एन लाय यांचे निधन. (जन्म: ५ मार्च १८९८)

  • १९८४: पहिल्या भारतीय महिला वैमानिक सुषमा मुखोपाध्याय यांचे निधन.

  • १९९२: आनंद मासिकाचे माजी संपादक दं. प्र. सहस्रबुद्धे यांचे निधन.

  • १९९४: ६८वे शंकराचार्य परमाचार्य श्री. चंद्रशेखर सरस्वती यांचे निधन.

  • १९९५: समाजवादी विचारवंत मधु लिमये यांचे निधन. (जन्म: १ मे १९२२)

  • १९९६: फ्रान्सचे २१वे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवाँ मित्राँ यांचे निधन. (जन्म: २६ ऑक्टोबर १९१६)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.