चालू घडामोडी - ०८ जानेवारी २०१९

Updated On : Jan 08, 2019 | Category : Current Affairsबांगलादेशच्या पंतप्रधानपदी शेख हसिना यांचा शपथविधी :
 • ढाका : बांगलादेशच्या पंतप्रधान म्हणून शेख हसिना यांनी सोमवारी चौथ्यांदा शपथ घेतली. भीषण हिंसाचार आणि मतघोटाळ्याच्या आरोपांचे ग्रहण लागलेल्या अलीकडेच झालेल्या निवडणुकीत त्यांच्या अवामी लीग या पक्षाने प्रचंड बहुमत मिळवले होते.

 • बंगभवन येथे झालेल्या समारंभात अध्यक्ष मोहम्मद अब्दुल हमीद यांनी ७१ वर्षांच्या हसिना यांना पदाची शपथ दिली. हसिना या चौथ्यांदा पंतप्रधान झाल्या असून, सलग तीन वेळा या पदावर राहण्याचा विक्रम त्यांनी केला आहे. सर्वप्रथम १९९६ साली आणि त्यानंतर २००८, २००९ व २०१४ साली त्यांनी पंतप्रधानपद भूषवले.

 • अध्यक्षांनी यावेळी नव्या मंत्र्यांनाही शपथ दिली. हसिना यांच्या मंत्रिमंडळात २४ कॅबिनेट मंत्री, १९ राज्यमंत्री आणि तीन उपमंत्री यांचा समावेश आहे. त्यांच्या मंत्रिमंडळात प्रामुख्याने नवे चेहरे आहेत. नव्या कॅबिनेटपैकी ३१ मंत्री पहिल्यांदाच मंत्री झाले आहेत. काही ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले आहे. संरक्षणासारखी महत्त्वाची खाती हसिना यांनी स्वत:कडेच ठेवली आहेत.

 • नव्या मंत्र्यांमध्ये असदुझ्झमान खान कमाल (गृह), मोहम्मद हसन महमूद (माहिती), एएचएम मुस्तफा कमाल (अर्थ), दिपू मोनी (शिक्षण) आणि ए.के. अब्दुल मोमीन (परराष्ट्र व्यवहार) यांचा समावेश आहे.

‘ग्रीन बुक’ला सर्वाधिक ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कार :
 • लॉसएंजल्स : प्रतिष्ठेच्या गोल्डन ग्लोब पुरस्कारात अनेक धक्कादायक निकाल लागले असून, ‘ग्रीन बुक’ या कालनाटय़ाधारित चित्रपटाला तीन पुरस्कार मिळाले आहेत. त्यात उत्तम चित्रपट, संगीत व विनोद या तीन प्रवर्गात या चित्रपटाने बाजी मारली आहे.

 • राणी अ‍ॅनीच्या जीवनचरित्रावरील ‘बोहेमियन ऱ्हापसोडी’ चित्रपटाने उत्तम नाटय़प्रकारात ‘अ स्टार इज बॉर्न’ला मात दिली आहे. चित्रपट व दूरचित्रवाणी मालिका यांच्यासाठी हे पुरस्कार दिले जातात. अँडी सॅमबर्ग व सँड्रा ओह यांनी या हॉलिवूड पुरस्कार कार्यक्रमाचे संचालन केले.

 • ग्रीन बुकला उत्तम नाटय़, उत्तम सहायक अभिनेता (महेरशाला अली), उत्तम पटकथा (लेखक पीटर, फॅरेली, ब्रायन क्युरी व निकल व्हॅलेलोंगा) हे तीन पुरस्कार मिळाले. बोहेमियन ऱ्हापसोडीने उत्तम नाटय़ गटात (संगीत चरित्रपट), अ स्टार इज बॉर्न, ब्लॅक पँथर , इफ बिएल स्ट्रीट कुड टॉक, ब्लॅक्सान्समन यांना मागे टाकले. निर्माते ग्रॅहॅम किंग यांनी सांगितले, की पुरस्काराची अपेक्षा नव्हती, पण अभिनेता रामी मलेक याचा पुरस्कार अपेक्षित होता.

 • मुंबईत जन्मलेल्या ब्रिटिश रॉकर फ्रेडी मक्र्युरीची भूमिका त्याने केली होती. मलेक व किंग यांनी आभाराच्या  भाषणात दिग्दर्शक ब्रायन सिंगर यांचे नाव घेतले नाही. ‘दी वाइफ’ या चित्रपटातील भूमिकेसाठी मिळालेल्या गोल्डन गोल्ब पुरस्कारावर भाषण करताना अभिनेत्री ग्लेन क्लोज यांनी रंगत आणली. ७१ वर्षांच्या ग्लेन यांना अश्रू आवरले नाहीत.

 • यावर माझा विश्वासच बसत नाही असे त्या म्हणाल्या. स्त्री म्हणून आम्ही मुलाबाळांचे संगोपन करणे अपेक्षित असते, पण आम्ही आमची स्वप्नेही पूर्ण करू शकतो. मी हे करू शकते व मला ते करू दिले गेले पाहिजे असा हट्ट महिलांनी धरला पाहिजे असे त्या म्हणाल्या. याच वेळी विनोदी व संगीत पटांच्या वर्गात उत्कृष्ट अभिनेत्री ठरलेल्या ऑलिव्हिया कोलमन हिने राशेल वेझ, एम्मा स्टोन या सहअभिनेत्रींचे ऋण व्यक्त केले. राणी अ‍ॅनीची भूमिका करताना खाण्याचे स्वातंत्र्य अनुभवले.

प्रिया दत्त लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत :
 • २०१९ची लोकसभा निवडणूक आपण लढवणार नसल्याचे काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांनी जाहीर केले आहे. एका पत्रकाद्वारे त्यांनी ही माहिती सार्वत्रिक केली आहे. उत्तर-मध्य मुंबईमधून त्या दोन वेळेस खासदार म्हणून निवडणून आल्या होत्या.

 •  

 • राजकीय आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळताना आपली ओढाताण होत असल्याने आपण निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी या पत्रकात स्पष्ट केले आहे. यापूर्वी काँग्रेसने आपल्यावर सोपवलेल्या सर्व जबाबदाऱ्या आपण चांगल्या प्रकारे हाताळल्या. मात्र, राजकारणापलिकडेही आयुष्यात बरंच काही असल्याने मला आता त्याकडे लक्ष केंद्रीत करायचे आहे, असे दत्त यांनी म्हटले आहे.

 • उत्तर-मध्य मुंबई या मतदारसंघातून प्रिया दत्त या दोनदा खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर २०१४च्या निवडणुकीत त्यांना भाजपाच्या पूनम महाजन यांनी मात दिली होती. मात्र, आता निवडणुकीत माघार घेतल्यानंतर काँग्रेस या जागेवरून कोणाला उमेदवारी देतंय याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर पत्रकातून दत्त यांनी राहूल गांधी यांच्यासह, मतदारसंघातील नागरिक आणि माध्यमांचेही आभार मानले आहेत.

भारतीय संघाला जग जिंकण्यासाठी आता फक्त 'या' संघाला नमवावं लागेल :
 • मुंबई : 72 वर्ष, 31 कसोटी मालिका, 29 कर्णधारांनंतर आशियाई संघाच्या कर्णधाराला ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरी नमवण्याचा पराक्रम करता आला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2-1 अशा फरकाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करून ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. सिडनी कसोटीचा खेळ पावसामुळे वाया गेला अन्यथा भारताने ही मालिका 3-1 अशी खिशात घातली असती. पण, 2-1 हा विजयही भारताला सुखावणारा आहे. भारतीय संघाने 2018ची सुरुवात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ( 2-1) मालिकेत पराभवाने केली होती, परंतु 2019 मध्ये भारताने विजयाने प्रारंभ केला.

 • 1947 साली भारतीय संघ प्रथमच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आला होता. तेव्हापासून 11 कसोटी मालिकेत भारताला विजय मिळवता आलेला नव्हता. मात्र, भारतीय संघाने 12 वी कसोटी मालिका जिंकली आणि इतिहास घडविला. या कामगिरीसह परदेशात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम कोहलीने करुन दाखवला आणि भारताच्या माजी कर्णधारांच्या पंगतीत त्याने स्थान पटकावले. पण, दक्षिण आफ्रिकेत भारताला अजूनही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. भविष्यात आफ्रिकेत मालिका विजयाचा झेंडा फडकावल्यास भारतीय संघ जग जिंकल्याचा दावा करू शकतो.

 • भारताने कोणाच्या नेतृत्वाखाली जिंकल्या कसोटी मालिका... 

 • ऑस्ट्रेलिया ( 2-1) - 2018-19, विराट कोहली ( कर्णधार ) 

 • बांगलादेश ( 1-0) - 2000, सौरव गांगुली ( कर्णधार )

 • इंग्लंड ( 1-0) - 1971, अजित वाडेकर ( कर्णधार )

 • न्यूझीलंड ( 3-1) - 1968-69, मन्सूर अली खान पतौडी ( कर्णधार )

 • पाकिस्तान ( 2-1) - 2004, सौरव गांगुली ( कर्णधार )

 • श्रीलंका (1-0) - 1993, मोहम्मद अझरूद्दीन ( कर्णधार )

 • वेस्ट इंडिज ( 1-0) - 1971, अजित वाडेकर ( कर्णधार )

 • झिम्बाब्वे ( 2-0) - 2005, सौरव गांगुली ( कर्णधार )

 • भारतीय संघाने परदेशात एकूण 81 कसोटी मालिका खेळल्या आहेत आणि त्यापैकी 14 मालिका त्यांना जिंकता आल्या आहेत आणि 14 मालिका बरोबरीत सोडवल्या. बांगलादेशमध्ये भारताने सलग पाच कसोटी मालिका जिंकल्या आहेत.  

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

 • १८२८: युनायटेड स्टेट्स ऑफ डेमोक्रॅटिक पार्टी सुरु झाली.

 • १८३५: अमेरिकेवरील राष्ट्रीय कर्ज पहिल्यांदाच आणि एकदाच शून्य झाले.

 • १८८०: सत्यशोधक समाजाच्या संस्काराने लावलेली लग्ने कायदेशीर असल्याचा मुंबई उच्‍च न्यायालयाचा निर्णय. ब्राम्हणेतर लोकही लग्नाचे पौरोहित्य करु शकतात हे न्यायालयाने मान्य केले.

 • १९४७: राजस्थान विद्यापीठाची स्थापना झाली.

 • २०००: लता मंगेशकर यांची १९९९ साठीच्या एन. टी. रामाराव राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

 • २००१: भारत व व्हिएतनाम दरम्यान सांस्कृतिक, पर्यटन आणि अणूऊर्जेचा शांततेसाठी वापर करण्याच्या तीन करारांवर सह्या झाल्या.

जन्म 

 • १८६७: नोबेल पुरस्कार विजेत्या अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ एमिली ग्रीन बाल्च यांचा जन्म. (निधन: ९ जानेवारी १९६१)

 • १८७०: स्पेनचे माजी पंतप्रधान मिगुएल प्रीमो दे रिव्हरा यांचा जन्म. (निधन: १६ मार्च १९३०)

 • १८७१: उत्तर आयर्लंडचे १ले पंतप्रधान जेम्स क्रेग यांचा जन्म. (निधन: २४ नोव्हेंबर १९४०)

 • १८७३: रोमानियाचे ३२वे पंतप्रधान इयूली मनु यांचा जन्म. (निधन: ५ फेब्रुवारी १९५३)

 • १८७६: लटवियाचे माजी पंतप्रधान आर्टर्स अल्बरिंग्स यांचा जन्म. (निधन: २६ एप्रिल १९३४)

 • १८८५: ऑस्ट्रेलियाचे १४वे पंतप्रधान जॉन कर्टिन यांचा जन्म. (निधन: ५ जुलै १९२५)

 • १८९१: नोबेल पुरस्कार विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ वॉल्थर बोथे यांचा जन्म. (निधन: ८ फेब्रुवारी १९५७)

 • १८९९: श्रीलंका देशाचे ४थे पंतप्रधान एस. डब्ल्यू. आर. डी. बंदरनायके यांचा जन्म. (निधन: २६ सप्टेंबर १९५९)

 • १९२६: प्रसिद्ध ओडिसी नर्तक केलुचरण महापात्रा यांचा जन्म. (निधन: ७ एप्रिल २००४)

 • १९३५: अमेरिकन गायक, गिटारवादक, अभिनेता आणि किंग ऑफ द रॉक अँड रोल एल्व्हिस प्रिस्टले यांचा जन्म. (निधन: १६ ऑगस्ट १९७७)

 • १९४२: इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ आणि लेखक स्टिफन हॉकिंग यांचा जन्म. (निधन: १४ मार्च २०१८)

 • १९४२: जपानचे ५६वे पंतप्रधान जुनीचीरो कोझुमी यांचा जन्म.

मृत्यू 

 • १६४२: इटालियन खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ गॅलेलिओ गॅलिली यांचे निधन. (जन्म: १५ फेब्रुवारी १५६४)

 • १८२५: कापसाच्या जिनिंग मशीनचा संशोधक एली व्हिटनी यांचे निधन. (जन्म: ८ डिसेंबर १७६५)

 • १८८४: ब्राम्हो समाजातील एक थोर पुरूष, समाजसुधारक आणि लोकसेवक केशव चंद्र सेन यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १८३८)

 • १९४१: बालवीर (स्काऊट) चळवळीचे प्रणेते लॉर्ड बेडन पॉवेल यांचे निधन. (जन्म: २२ फेब्रुवारी १८५७)

 • १९६७: प्राच्यविद्या पंडित श्रीपाद कृष्ण बेलवलकर यांचे निधन. (जन्म: १० डिसेंबर १८८० – नरसोबाची वाडी, शिरोळ, कोल्हापूर)

 • १९८४: पहिल्या भारतीय महिला वैमानिक सुषमा मुखोपाध्याय यांचे निधन.

 • १९९४: ६८वे शंकराचार्य परमाचार्य श्री. चंद्रशेखर सरस्वती यांचे निधन.

 • १९९६: फ्रान्सचे २१वे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवाँ मित्राँ यांचे निधन. (जन्म: २६ ऑक्टोबर १९१६)

 • १९९७: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन केमिस्ट मेल्विन कॅल्व्हिन यांचे निधन. (जन्म: ८ एप्रिल १९११)

 • २००२: नोबेल पुरस्कार विजेते ऑस्ट्रेलियन-रशियन भौतिकशास्त्रज्ञ अलेक्झांडर प्रॉखोरोव यांचे निधन. (जन्म: ११ जुलै १९१६)२०१७: भारतीय-ब्रिटिश गायक, गीतकार आणि गिटारवादक पीटर-सरस्टेड यांचे निधन. (जन्म: १० डिसेंबर १९४१)

टिप्पणी करा (Comment Below)