चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०८ जून २०१९

Date : 8 June, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
राज्यपालांच्या जागांसाठी भाजपमध्ये महाशर्यत; सहा महिन्यात १० राज्यपाल होणार निवृत्त :
  • नवी दिल्ली : दहा राज्यांचे राज्यपाल येत्या सहा महिन्यांत (जुलै ते डिसेंबर) निवृत्त होत असल्यामुळे भाजपमध्ये त्या जागांसाठी महाशर्यत सुरू झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत ज्यांना संधी मिळाली नाही आणि आरोग्य व इतर कारणांनी या निवडणुकीपासून दूर राहावे लागले अशा पक्षातील ज्येष्ठ मंडळींची मोठी रांग राज्यपालपदासाठी इच्छुक आहे. यावर्षी राज्यपालपदे मोठ्या संख्येने रिक्त होणार असल्यामुळे पक्षातील अनेकांना राजकीय आखाड्यात राहता येईल असा आशेचा किरण या पार्श्वभूमीवर दिसला आहे.

  • एकट्या जुलै महिन्यातच चार राज्यपाल निवृत्त होत आहेत. त्याची सुरुवात गुजरातचे राज्यपाल ओम प्रकाश कोहली यांच्यापासून होईल. त्यांची मुदत १५ जुलै रोजी संपत आहे. चुकीच्या बातम्यांसाठी नेहमीच चर्चेत राहिलेले नागालँडचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांची मुदत १९ जुलै रोजी, उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांची मुदत २१ जुलै रोजी तर पश्चिम बंगालचे राज्यपाल केसरी नाथ त्रिपाठी यांची पाच वर्षांची मुदत २३ जुलै रोजी संपत आहे.

  • राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (रालोआ) नेमलेल्या आणखी चार राज्यपालांचा कालवधी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पूर्ण होत आहे. या राज्यपालांत महाराष्ट्राचे सी. विद्यासागर राव (३० आॅगस्ट), गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा (३१ ऑगस्ट), कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला (एक सप्टेंबर) आणि राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंह (चार सप्टेंबर) यांचा समावेश आहे.

  • माजी सरन्यायाधीश पी. सथासिवम यांचा केरळच्या राज्यपालपदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ पाच सप्टेंबर रोजी संपत आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या कार्यकाळात २००९ मध्ये ई. एस. एल. नरसिंमहन यांची आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली होती. ते भारतात सध्या सर्वात जास्त काळ या पदावर राहिलेले आहेत. त्यांचा कार्यकाळ डिसेंबरमध्ये संपेल. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांच्याशी त्यांची जवळीक असल्यामुळे ते त्या पदावर आले. नायडू यांनी नरसिंहमन यांनाच त्या पदावर राहू द्या असा आग्रह धरल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यास तयार झाले. त्यांचा दहा वर्षांचा कार्यकाळ संपत आल्यामुळे ते बहुधा पदावरून दूर होतील.

SSC Result 2019 - असा पाहा दहावीचा निकाल :
  • Maharashtra SSC Result 2019 : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर दहावीच्या निकालाबाबत अफवा पसरल्या होत्या. आज अखेर बोर्डानं दहावीच्या निकालाची तारीख जाहीर करत निकांलासंबधीचा संभ्रम दूर केला आहे. गेल्यावर्षाही दहावीचा निकाल ८ जून रोजी लागला होता.  मुंबई, पुणे, कोकण, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, लातूर, नाशिक, कोल्हापूर या नऊ विभागीय मंडळांतर्फे एक मार्च ते २२ मार्चदरम्यान घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेला यंदा राज्यभरातून १७ लाखांपेक्षा आधिक विद्यार्थी बसले होते.

  • निकालासाठी अवघे काही तास उरल्याने विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे. मात्र हा ऑनलाइन निकाल पाहण्याबाबत अनेक विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. परीक्षा मंडळाने निकाल पाहण्यासाठी काही सूचना केल्या असून त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकाल पाहणे सोपे जाणार आहे.

येथे पाहू शकाल निकाल –

असा पाहा निकाल : वरीलपैकी एका संकेत स्थळावर जा, संकेत स्थळावर स्थाळावर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा, आसनक्रमांक टाका, निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल, निकालाची प्रिंट आऊटही काढता येईल

वरील संकेस्थळांवर विद्यार्थ्यांना १ वाजल्यापासून निकाल पाहता येणार आहे. तसंच मेसेजच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना निकाल मिळेल. त्यासाठी आसनक्रमांक नोंदवून ५७७६६ या क्रमांकावर मेसेज पाठवावा.

जगनमोहन मंत्रिमंडळात पाच उपमुख्यमंत्री :
  • आंध्र प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत तेलुगु देशम पक्षाचा दारुण पराभव करून सत्तेवर आलेल्या वायएसआर जनगमोहन रेड्डी सरकारने मंत्रिमंडळातही नवा पॅटर्न आणला आहे. जगनमोहन रेड्डी यांनी आपल्या २५ सदस्यांच्या मंत्रिमंडळामध्ये पाच उपमुख्यमंत्रीपदे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. एखाद्या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये पाच उपमुख्यमंत्री असण्याची देशातील ही पहिलीच वेळ आहे.

  • शनिवारी येथे होणाऱ्या एका जाहीर कार्यक्रमात नव्या मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात येणार आहे. शुक्रवारी सकाळी रेड्डी यांनी वायएसआर काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक आपल्या निवासस्थानी आयोजित केली होती, त्यावेळी पाच उपमुख्यमंत्री नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.

  • अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्ग, अल्पसंख्य आणि कापू समाजातील प्रत्येकी एका सदस्याची उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. मंत्रिमंडळामध्ये दुर्बल घटकांना प्राधान्य दिले जाणार आहे त्यामुळे रेड्डी समाजाला मोठा वाटा मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

  • सरकारच्या कामगिरीचा अडीच वर्षांनंतर आढावा घेण्यात येणार असून त्यानंतर मंत्रिमंडळाची फेररचना केली जाणार आहे. यापूर्वीच्या चंद्राबाबू नायडू सरकारमध्ये कापू आणि मागासवर्ग समाजातील प्रत्येकी एका सदस्याला उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले होते.

NEET चा टॉपर नलिन म्हणतो दोन वर्षात एकदाही वापरला नाही स्मार्ट फोन :
  • NEET च्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या नलिनने त्याच्या यशाचे गमक अखेर सांगितले आहे. नलिन म्हणतो, मी गेल्या दोन वर्षात एकादाही स्मार्ट फोन वापरला नाही. मी दिवसातले ७ ते ८ तास अभ्यास करत असे. मागच्या दोन वर्षात एकदाही स्मार्ट फोन वापरला नाही एवढंच काय विकतही घेतला नाही असं नलिनने सांगितलं आहे. तसेच मला अभ्यास करताना जे काही अडत असे ते शिक्षकांना विचारण्यात मला संकोच वाटत नसे. अभ्यास करण्याची चिकाटी आणि चांगले गुण मिळवण्याचे ध्येय यामुळे मी एवढं यश मिळवू शकलो असं नलिनने म्हटले आहे. मी अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रीत करू शकलो ते मला मिळालेल्या मार्गदर्शनामुळेच असंही नलिनने स्पष्ट केलं आहे

  • बुधवारी NEET परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आले. या परीक्षेत नलिन खंडेलवालने देशात पहिला येण्याचा मान पटकावला. नलिनने ७२० पैकी ७०१ गुण मिळवत पहिला क्रमांक मिळवला. तर दिल्लीचा भविक बंसल हा देशात दुसरा आहे आहे. उत्तर प्रदेशातील अक्षत कौशिकने तिसरा क्रमांक पटकावला. महाराष्ट्राच्या सार्थक भटने ७२० पैकी ६९५ गुण मिळवत देशात सहावा क्रमांक पटकावला. NEET -2019 या परिक्षेसाठी १५,१९,३७५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी ७,९७,०४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. ५ मे रोजी नीट परीक्षा घेण्यात आली होती. परंतु फॅनी वादळाच्या तडाख्यामुळे कर्नाटकातील विद्यार्थ्यांसाठी २० मे रोजी पुन्हा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.

  • या परीक्षेत नलिन खंडेलवाल या विद्यार्थ्याने देशात पहिला क्रमांक मिळवला आहे.  मागील दोन वर्षात स्मार्ट फोनला आपण हात तर लावलाच नाही शिवाय विकतही घेतला नाही असे सांगत अभ्यासावर लक्ष कसे केंद्रीत केले हे आता नलिनने स्पष्ट केले आहे. सध्या स्मार्ट फोन शिवाय तरूण पिढीचं पान हलत नाही. अशात NEET परीक्षेत टॉप केलेल्या मुलाने स्मार्ट फोनला हातही लावला नसल्याचं म्हटलं आहे. विद्यार्थ्यांसाठी हे उदाहरण एक आदर्श आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

आता झाडांवरही प्रथमोपचार! ‘भारताच्या ग्रीन मॅन’ने सुरु केली - ‘Tree Ambulance’ :
  • चेन्नईमधील पर्यावरणवादी डॉ. अब्दुल घनी यांनी एक वृक्षसंवर्धनासाठी एक आगळावेगळा प्रयोग सुरु केला आहे. ‘ग्रीन मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घनी यांनी चक्क झाडांना प्रथमोपचार देण्यासाठी रुग्णवाहिका सेवा सुरु केली आहे. खोड किंवा फांद्या तुटलेल्या तसेच कोणीही उपटून टाकलेल्या झाडांना पुन्हा उभं करण्याच्या दृष्टीने घनी यांनी ही मोहिम सुरु केली आहे.

  • जगभरातील हरित पट्टा कमी होत आहे. अनेक ठिकाणी बेसूमार वृक्षतोड होत असून त्याचा पर्यावरणावर परिणाम होत आहे. अनेक ठिकाणी कारखाने, वसाहतींसाठी जंगलांची कत्तल केली जात आहे. या सर्वांमध्ये अनेक झाडे मारली जात असून अशा झाडांना जगण्याची दुसरी संधी देत ‘जखमी’ झालेल्या झाडांची काळजी घेत त्यांना प्रथमोचार पोहचवून त्यांचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने ही मोहिम सुरु करण्यात आली आहे. २०२० पर्यंत संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यात ही मोहिम पोहचवण्याचे आमचे उद्दीष्ट असल्याचे घनी यांनी एनएनआयशी बोलताना सांगितले.

  • घनी यांनी एनएनआयला दिलेल्या माहितीनुसार, ‘या रुग्णवाहिकेने ५ जूनपासून आपला प्रवास सुरु केला आहे. तामिळनाडूमधून निघालेली ही रुग्णवाहिका वृक्षसंवर्धनासंदर्भात जागृती करत करत पुढील दोन महिन्यांमध्ये दिल्लीमध्ये पोहचणार आहे. या प्रवासादरम्यान अनेक ठिकाणच्या शाळा तसेच कॉलेजसमध्ये वृक्षसंवर्धन आणि जंगलांचे महत्व मुलांना सांगणार आहे.’

भारताचा सलग दुसरा विजय, पोलंडवर ३-१ ने मात :
  • भुवनेश्वर शहरात सुरु असलेल्या FIH Series Finals स्पर्धेत भारतीय संघाने सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. सलामीच्या सामन्यात रशियाचा १०-० ने धुव्वा उडवणाऱ्या भारताने दुसऱ्या सामन्यात पोलंडवर ३-१ ने मात केली. आगामी २०२० टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय हॉकीसंघासाठी ही स्पर्धा अत्यंत महत्वाची मानली जात आहे.

  • सलामीच्या सामन्याप्रमाणेच पोलंडविरुद्धही भारताने आक्रमक सुरुवात केली. मनप्रीत सिंहने २१ व्या मिनीटाला गोल करत भारताचं खातं उघडलं. मात्र पोलंडने या धक्क्यातून सावरत लगेच आक्रमक पवित्रा घेतला. मॅटेउज हुलबोजने २५ व्या मिनीटाला भारताचा बचाव भेदत पोलंडला १-१ अशी बरोबरी मिळवून दिली.

  • मात्र पोलंडाच्या या आक्रमणासमोर दबून न जाता भारताने जोरदार हल्ला चढवला. २६ व्या मिनीटाला मनप्रीत पुन्हा एकदा गोल करत भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिला. यानंतर दोन्ही संघांनी सावध पवित्रा घेऊन खेळ केला. अखेरीस ३६ व्या मिनीटाला हरमनप्रीत सिंहने गोल करत भारताची आघाडी ३-१ ने वाढवली. यानंतर सामन्यात पुनरागमन करणं पोलंडला जमलं नाही. अखेरीस भारताने आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

दिनविशेष :
  • जागतिक मेंदूचा ट्यूमर दिन / जागतिक महासागर दिन

महत्वाच्या घटना 

  • १६७०: पुरंदरच्या तहात गमावलेला रोहिडा किल्ला शिवाजी महाराजांनी परत जिंकून घेतला.

  • १७०७: औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुअज्जम आणि आझमशाह या त्याच्या दोन मुलांमधे दिल्लीच्या तख्तासाठी युद्ध झाले. यात मुअज्जमने आझमशाहला ठार करुन दिल्लीची गादी बळकावली.

  • १७१३: मुघलांनी १६८९ मधे जिंकलेला रायगड किल्ला पंतप्रतिनिधी यांनी सिद्दीकडुन राजकारणाने जिंकुन घेतला.

  • १७८३: आईसलँड मधील लाकी ज्वालामुखीचा उद्रेक, हजार ठार.

  • १९१२: कार्ल लेम्ले यांनी यूनिव्हर्सल पिक्चर्स या कंपनीची स्थापना केली.

  • १९१५: लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना लिहुन पूर्ण केलेल्या गीतारहस्य या ग्रंथाचे गायकवाडवाड्यात प्रकाशन झाले.

  • १९४१: दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी सीरीया व लेबानॉन पादाक्रांत केले.

  • १९४८: एअर इंडिया ची मुंबई – लंडन विमानसेवा सुरू झाली.

  • १९४८: जॉर्ज ऑर्वेलची १९८४ या नावाची कांदबरी प्रसिद्ध झाली.

  • १९५३: कृष्णवर्णीयांना हॉटेलमधे सेवा नाकारण्यास अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली.

  • १९६९: लष्करप्रमुख म्हणून सॅम माणेकशा यांची नियुक्ती.

  • १९९२: पहिल्यांदा जागतिक महासागर दिन साजरा केला गेला.

  • २००४: आधुनिक काळातील शुक्राचे (सूर्यावरुन) पहिले अधिक्रमण झाले. याआधीचे अधिक्रमण १८८२ या वर्षी झाले होते.

जन्म 

  • १९०६: भारतीय क्रिकेट खेळाडू सैयद नझीर अली यांचा जन्म.

  • १९१०: लेखक, तत्त्वचिंतक व समीक्षक दिनकर केशव तथा दि. के. बेडेकर यांचा जन्म. (मृत्यू: २ मे १९७३)

  • १९१५: भारतीय पत्रकार, लेखक, आणि कवी काययार सिंहनाथ राय यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑगस्ट २०१५)

  • १९१७: भावगीत गायक गजाननराव वाटवे यांचा जन्म. (मृत्यू: २ एप्रिल २००९)

  • १९२१: इंडोनेशियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष सुहार्तो यांचा जन्म. (मृत्यू: २७ जानेवारी २००८)

  • १९२५: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांची पत्नी बार्बरा बुश यांचा जन्म.

  • १९३६: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन भैतिकशास्त्रज्ञ केनिथ गेडीज विल्सन यांचा जन्म.

  • १९५५: वर्ल्ड वाईड वेब चे जनक टिम बर्नर्स-ली यांचा जन्म.

मृत्यू 

  • १७९५: फ्रान्सचा राजा लुई १७ वा यांचे निधन. (जन्म: २७ मार्च १७८५)

  • १८०९: अमेरिकन विचारवंत राजकारणी थॉमस पेन यांचे निधन. (जन्म: २९ जानेवारी १७३७)

  • १८४५: अमेरिकेचे ७वे राष्ट्राध्यक्ष अॅन्ड्रयू जॅक्सन यांचे निधन. (जन्म: १५ मार्च १७६७)

  • १९९५: रंगभूमी कलावंत एकपात्री प्रयोगकार राम नगरकर यांचे निधन.

  • १९९८: नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष सानी अबाचा यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.