चालू घडामोडी - ०८ मार्च २०१८

Date : 8 March, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
सिंधुताईंसह उर्मिला आपटेंचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव होणार :
  • नवी दिल्ली अनाथ मुलांसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ आणि भारतीय स्त्री शक्ती या संस्थेच्या अध्यक्षा उर्मिला आपटे यांना नारीशक्ती राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने उद्या राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.

  • दरवर्षी केंद्रीय महिला बाल विकास मंत्रालयाच्या वतीनं देशभरात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान केला जातो. यंदाच्या यादीत महाराष्ट्रातल्या या दोन महिलांचा समावेश आहे.

  • सिंधुताई सपकाळ यांनी अतिशय खडतर परिस्थितीत आयुष्य व्यतीत करुन शेकडो अनाथ मुलांना आईच्या मायेचं छत्र दिलं. त्यांना याआधीही अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. सिंधुताईंचा जन्म वर्धा जिल्ह्यातल्या नवरगाव इथला आहे.

  • उर्मिला बळवंत आपटे या मुंबईतील भारतीय स्त्री शक्ती या स्वयंसेवी संस्थेच्या अध्यक्षा आहेत. भारतीय स्त्री शक्ती ही संस्था महिलांचे शिक्षण आणि कौशल्य विकास, मानसिक आणि शारिरीक आरोग्य, स्वाभिमान, आर्थिक स्वातंत्र्य तसेच लिंग समानता या या पंचसुत्रीवर काम करते. गेल्या 30 वर्षांपासून भारतीय स्त्री शक्ती जे काम करतंय, त्याचाच सन्मान या पुरस्काराच्या रुपानं झाल्याची भावना यावेळी उर्मिला आपटे यांनी व्यक्त केली.

  • केंद्रीय कॅबिनेटनं ज्या सरोगसीसंदर्भातल्या विधेयकाला मंजुरी दिली, त्यात भारतीय स्त्री शक्तीनं केलेल्या महत्वाच्या सूचनांचा समावेश असल्याचं समाधान आहे, भविष्यातही महिलांच्या प्रश्नांवर आपण काम करत राहू असं आपटे यांनी म्हटलं आहे.

मुंबई विमानतळ जगातील एक नंबर :
  • मुंबई - छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ जगातील अव्वल क्रमांकाचे विमानतळ ठरले आहे. एअरपोर्ट काउन्सिल इंटरनॅशनलने विमानतळाच्या सोई-सुविधेनुसार सर्वेक्षण केले. यात चेकइन, विमानतळावरील प्रवेश, सुरक्षा, प्रवाशांचे विश्रामगृह, प्रवाशांची खानपान व्यवस्था, प्रवासी सामान कक्ष या बाबींचा समावेश होता.

  • या सर्व बाबींत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने अव्वल ठरत सर्वेक्षणामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. मुंबई आणि दिल्ली विमानतळाला विभागून हा क्रमांक देण्यात आला आहे. मुंबई विमानतळ सर्वांत व्यस्त विमानतळ ठरले होते.

  • मुंबई, दिल्ली विमानतळाने सिंगापूरला मागे टाकत प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.

'NEET'साठी आधार कार्ड बंधनकारक नाही :
  • नवी दिल्ली राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी (NEET) आधार कार्ड बंधनकारक नाही, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. किंबहुना, कोणत्याही परीक्षेसाठी आधार कार्ड बंधनकारक करु नये, असेही सुप्रीम कोर्टाने आदेश दिले आहेत.

  • केंद्र सरकारनेही यावेळी सुप्रीम कोर्टाला सांगितले की, UIDAI ने सीबीएसईला आधार कार्ड अनिवार्य करण्यास सांगितलेले नाही.

  • परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना ओळखपत्रासाठी ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान ओळखपत्र, रेशनिंग कार्ड, पासपोर्ट हे ओळखपत्रही मान्य असतील, असेही सुप्रीम कोर्टाने  आदेश दिले.

  • गुजरातमधील एक व्यक्तीने यासंदर्भात याचिका दाखल केली होती. याच महिन्यात सीबीएसईने नीट परीक्षार्थींना आधार कार्ड अनिवार्य केलं होतं. त्याविरोधात याचिकाकर्त्याने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यावर आज सुप्रीम कोर्टाने सुनावणी केली.

  • दरम्यान, यावेळी सुप्रीम कोर्टाने बँक अकाऊंट आणि मोबाईल नंबरला आधार कार्ड जोडण्यासाठीची मुदत वाढवून देण्याचेही आदेश केंद्राला दिले आहेत. जेणेकरुन नागरिकांना त्रास होणार नाही. सध्या आधार कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च आहे.

चंद्राबाबूंचा टीडीपी एनडीएतून बाहेर :
  • नवी दिल्ली : एनडीएला मोठा धक्का मिळाला आहे. तेलुगू देसम पक्षाने (टीडीपी) एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी याबाबत घोषणा केली.

  • अशोक गजपती राजू आणि वाय. एस. चौधरी या दोन्ही केंद्रीय मंत्र्यांना उद्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचे आदेश चंद्राबाबूंनी दिले आहेत.

  • “राजकारणातील एक जुना-जाणता नेता म्हणून आणि एक जबाबदार राजकारणी म्हणून पंतप्रधानांपर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न केला, जेणेकरुन त्यांना आमचा हा निर्णय सांगता आला असता. मात्र आमच्यासाठी त्यांच्याकडे वेळ नव्हता”, असेही यावेळी चंद्राबाबूंनी सांगितले.

  • अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आजच स्पष्ट केले होते की, आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देणं शक्य ही. विशेष राज्याचा दर्जा मिळाल्यानंतर विशेष आर्थिक पॅकेज मिळतं, जे प्रत्येक राज्याला देणे शक्य नसते.

  • अर्थमंत्री म्हणाले होते, “तेलंगणा आणि आंध्रच्या विभाजनावेळी आंध्रला विशेष दर्जा देण्याचं वचन दिले होते. त्यावेळी विशेष राज्याचा दर्जा देण्याची तरतूद होती. मात्र 14 व्या वित्तीय आयोगाच्या अहवालानुसार अशाप्रकारे दर्जा देऊ शकत नाही.”

  • आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा दिला जाऊ शकत नाही, या अर्थमंत्री अरुण जेटलींच्या वक्तव्यानंतर चंद्राबाबूंच्या राजकीय हालचाली वाढल्या होत्या आणि अखेर त्यांनी एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घोषित केला.

भारत आणि चीनमधील व्यापार ऐतिहासिक उंचीवर :
  • भारत आणि चीनमध्ये डोकलामसह इतर मुद्दय़ांवर दोन्ही बाजूंकडून तणावाचे वातावरण असतानाही दोन्ही देशांच्या द्विपक्षीय व्यापारामध्ये गेल्या वर्षी ८४.४४ अब्ज अमेरिकन डॉलर्सचा ऐतिहासिक व्यापार झाल्याचे समोर आले आहे. चीनच्या सीमा शुल्क सामान्य प्रशासन विभागाने ही आकडेवारी जाहीर केली आहे.

  • २०१७ मध्ये भारताकडून चीनला होणाऱ्या निर्यातीत वाढ झाली असून, ही निर्यात तब्बल ४० टक्क्यांनी वाढून १६.३४ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. वर्ष २०१७ मध्ये द्विपक्षीय व्यापार १८.३६ टक्क्यांनी वाढून ८४.४४ अब्ज डॉलर झाला आहे. ही ऐतिहासिक आकडेवारी असून, प्रथमच दोन्ही देशांमधील व्यापार ८० अब्ज डॉलरच्या पुढे गेला आहे. गेल्या वर्षी हा व्यापार ७१.१८ अब्ज डॉलर नोंदवण्यात आला होता.

  • दोन्ही देशांच्या नेत्यांनी २०१५ पर्यंत हा व्यापार १०० अब्ज डॉलपर्यंत पोहचवण्याचे लक्ष्य ठेवले होते. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये द्विपक्षीय व्यापार ७० अब्ज डॉलरवर येऊन थांबला होता. वर्ष २०१७ची आकडेवारीही लक्ष्याच्या तुलनेत २० अब्ज डॉलरने कमी आहे.

'फोर्ब्ज'च्या अब्जाधीशांच्या यादीत ट्रम्प २२२ क्रमांकांनी गडगडले :
  • न्यूयॉर्क : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे 'फोर्ब्ज'च्या अब्जाधीशांच्या यादीत ट्रम्प यांचं स्थानं 222 क्रमांकाने घसरलं आहे.

  • फोर्ब्जच्या ग्लोबल बिलियनेअर्स म्हणजेच जागतिक अब्जाधीशांच्या यादीत गेल्या वर्षी डोनाल्ड ट्रम्प 544 व्या क्रमांकावर होते. मात्र हा आकडा घसरुन 766 वर पोहचला आहे. ट्रम्प यांची मालमत्ता 400 मिलियन डॉलरनी (अंदाजे 2 हजार 598 कोटी रुपये) कमी होऊन 3.1 अब्ज डॉलर (20 हजार 136 कोटी) वर पोहचली आहे.

  • ई-कॉमर्स क्षेत्राने जोर धरल्यामुळे ट्रम्प टॉवर सारख्या मालमत्तांच्या किमती कमालीच्या कमी झाल्या आहेत. ट्रम्प यांच्या सुप्रसिद्ध बिल्डिंगच्या किमतीत 2.66 अब्ज रुपयांनी घट झाली आहे, असं फोर्ब्जने म्हटलं आहे.

  • ट्रम्प यांनी 2015 मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळी 10 अब्ज डॉलरचं नेट वर्थ असल्याचा दावा केला होता. ते अमेरिकेचे पहिले अब्जाधीश अध्यक्ष आहेत. अर्थात व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश करतानाच त्यांनी वैयक्तिक व्यवसायापासून फारकत घेतली होती.

दिनविशेष :

जागतिक दिवस 

  • जागतिक महिला दिन

महत्वाच्या घटना

  • १८१७: न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज (NYSE) ची स्थापना.

  • १९११: पहिल्यांदा जागतिक महिला दिन साजरा केला गेला.

  • १९४२: दुसरे महायुद्ध: जपानने म्यानमारची राजधानी रंगून जिंकली.

  • १९४८: भारतीय विमानसेवा एअर इंडिया इंटरनॅशनल ने परदेशात आपली सेवा सुरु केली.

  • १९४८: फलटण संस्थान भारतीय गणराज्यात विलीन झाले.

  • १९५७: घाना देशाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

  • १९७४: चार्ल्स डी गॉल विमानतळ पॅरिस, फ्रान्स मध्ये सुरु झाले.

  • १९७९: फिलिप्स कंपनी ने प्रथमच सार्वजनिकरित्या कॉम्पॅक्ट डिस्क चे प्रकाशन केले.

  • १९९३: दमानिया एअरवेज या खाजगी विमानवाहतुक कंपनीने आपल्या पहिल्या विमानाला स्पिरीट ऑफ जे. आर. डी. असे नाव देण्याचे ठरविले.

  • २०१६: पूर्ण घडलेले सूर्यग्रहण इंडोनेशिया आणि उत्तर पॅसिफिक मधून दिसले.

जन्म

  • १८६४: कादंबरीकार हरी नारायण आपटे यांचा जन्म. (मृत्यू: ३ मार्च १९१९)

  • १८७९: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन शात्रज्ञ ऑटो हान यांचा जन्म. (मृत्यू: २८ जुलै १९६८)

  • १८८६: जीवरसायन शास्रज्ञ एडवर्ड कालव्हिन केन्डॉल यांचा जन्म.

  • १९२१: गीतकार साहीर लुधियानवी यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑक्टोबर १९८०)

  • १९२८: कथालेखक वसंत अनंत कुंभोजकर यांचा जन्म.

  • १९३०: कवी, कादंबरीकार आणि नाटककार चिंतामण त्र्यंबक खालोलकर उर्फ आरतीप्रभू यांचा जन्म. (मृत्यू: २६ एप्रिल १९७६)

  • १९३१: प्रसिद्ध सॅक्सोफोन वादक मनोहारी सिंग यांचा जन्म. (मृत्यू: १३ जुलै २०१०)

  • १९६३: भारतीय क्रिकेटपटू गुरुशरणसिंग यांचा जन्म.

  • १९७४: अभिनेता फरदीन खान यांचा जन्म.

मृत्यू

  • १७०२: इंग्लंडचा राजा विल्यम (तिसरा) यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १६५०)

  • १९४२: क्यूबाचा बुद्धीबळपटू जोस रॉल कॅपाब्लांका यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १८८८)

  • १९५७: स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळ गंगाधर तथा बाळासाहेब खेर यांचे निधन. (जन्म: २४ ऑगस्ट १८८८)

  • १९८८: भारतीय गायक-गीतकार अमर सिंग चमकिला यांचे निधन. (जन्म: २१ जुलै १९६०)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.