चालू घडामोडी - ०८ मार्च २०१९

Updated On : Mar 08, 2019 | Category : Current Affairsमहाराष्ट्र श्री - सुनीत जाधवचा जेतेपदाचा षटकार; अमला ब्रम्हचारी ‘मिस महाराष्ट्र’ :
 • महागणपतीच्या साक्षीने टिटवाळ्यात झालेल्या महाराष्ट्र श्री राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत सुनीत जाधवने सलग सहाव्यांदा विजेतेपद पटकावले. सागर माळी आणि अनिल बिलावाचे कडवे आव्हान परतावत त्याने महाराष्ट्र श्री जिंकण्याचा पराक्रम केला. एवढेच नव्हे तर अन्य तिन्ही कॅटेगरीत मुंबईने विजय संपादन कपत चौकार ठोकला आणि सांघिक विजेतेपदावरही आपलेच शिक्कामोर्तब केले. क्रीडाप्रेमी नगरसेवक संतोष तरे यांच्या सहकार्याने महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटना आणि ठाणे जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेच्या माध्यमातून हा कार्यक्रम पार पडला.

 • यात ‘मिस मुंबई’ मंजिरी भावसारने आपल्या पीळदार शरीरसौष्ठवाचा नजारा सादर करीत फिजीक स्पोर्टस् प्रकारात ‘मिस महाराष्ट्र’चे जेतेपद पटकावले. तर मुंबईच्या अमला ब्रम्हचारीने महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करत ‘मिस महाराष्ट्र’चा मान मिळविला. पुरूषांच्या फिजीक स्पोर्टस् प्रकारात मुंबईचाच रोहन कदम सरस ठरला.

 • सुनीतने पराभवाचा घेतला बदला - गेल्याच आठवड्यात नवी मुंबईतील एनएमएसए श्री स्पर्धेत ठाण्याच्या सागर माळीने सुनीत जाधवचा पराभव करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्याचा वचपा सुनीतने या स्पर्धेत काढला. ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’च्या लढतीत सुनीत, सागर, अनिल बिलावा आणि महेंद्र पगडे यांच्यात कंपेरिझन घेण्यात आली आणि सुनीतच्या षटकारावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

 • मुंबईकर अमला, मंजिरी मिस महाराष्ट्र - पूर्ण स्पर्धेवर मुंबईच्या खेळाडूंनी आपला दबदबा दाखवून दिला. महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत राज्यभरातून आठ स्पर्धकांचा सहभाग उत्साह उंचावणारा होता. मुंबईच्या अमला ब्रम्हचारीने आपल्या पहिल्याच प्रयत्नात मिस महाराष्ट्र होण्याचा मान मिळविला. गेल्या महिन्यात तिने आपली पहिलीच स्पर्धा खेळताना चंदिगड येथे झालेल्या फेडरेशन कपमध्ये सुवर्ण जिंकून पराक्रम गाजवला होता. महिलांच्या फिजीक स्पोर्टस् प्रकारात डॉ. मंजिरी भावसारने मुंबईच्या दिपाली ओगळेची कडवी झुंज मोडीत काढत विजयाची मालिका कायम ठेवली.

जगातील सर्वात वयोवृद्ध महिला भारतात, ११८ वर्षांच्या करतार कौर यांचा विक्रम :
 • लुधियाना : जगातील सर्वात वयस्कर महिला ठरण्याचा मान भारतीय महिलेने पटकावला आहे. पंजाबच्या करतार कौर या हयात असलेल्या जगातल्या सर्वात वयोवृद्ध महिला ठरल्या आहेत. त्या 118 वर्षांच्या आहेत.

 • करतार कौर यांच्या नावाची नोंद 'गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये होणार आहे. आतापर्यंत जपानच्या काने तानाका सर्वात वयोवृद्ध महिला मानल्या जात होत्या. काने यांचं वय 116 वर्ष 63 दिवस इतकं आहे. मात्र करतार कौर त्यांच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठ्या आहेत.

 • भावाच्या वयावरुन करतार यांचं वय काढण्यात आलं. करतार यांचा जन्म 1901 साली झाला होता. आपली पणजी जगातील सर्वात वयोवृद्ध महिला असल्याची आपल्याला कल्पना होती, मात्र तिला दृष्ट लागू नये, यासाठी आपण ही गोष्ट लपवून ठेवल्याचं त्यांच्या पणतूने सांगितलं.

 • काही दिवसांपूर्वी करतार यांच्या ह्रदयात ब्लॉक असल्याने दवाखान्यात दाखल करण्यात आलं. त्यानंतर फिरोजपूरमधील वरिष्ठ कार्डिओलॉजिस्ट डॉ. रवींद्र सिंह कूका यांनी करतार यांच्यावर हार्ट सर्जरी केली. सध्या करतार यांची प्रकृती स्थिर आहे.

 • सर्वात वयोवृद्ध व्यक्तीवर पेसमेकर इम्प्लान्ट करण्याचा विक्रमही डॉक्टरांच्या टीमने केला आहे. करतार यांनी आपल्या नातवंडांची नातवंडं म्हणजेच पाच पिढ्या पाहिल्या आहेत. त्यांची मुलगी 88 वर्षांची आहे. करतार या पूर्णपणे शाकाहारी आहेत.

‘जागतिक महिला दिन’ ८ मार्चला का साजरा केला जातो :
 • आज जगभऱात जागतिक महिला दिन साजरा केला जात आहे. सोशल मीडियातून महिलांवर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. पण अनेकांना हे माहितीच नसतं की, ८ मार्चला जागतिक महिला दिन का साजरा केला जातो किंवा जागतिक महिला दिन साजरा करण्याची सुरूवात कधीपासून व कशी झाली. त्यानिमित्ताने काही माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 

 • संपूर्ण अमेरिका आणि युरोपसहित जवळजवळ जगभरच्या स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता. पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्री-पुरुष विषमतेचे हे एक ढळढळीत उदाहरण. या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपापल्या परीने संघर्ष करीत होत्या. १८९० मध्ये अमेरिकेत मतदानाच्या हक्कासंदर्भात `द नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशन’ स्थापन झाली. परंतु ही असोसिएशनसुद्धा वर्णद्वेषी आणि स्थलांतरितांविषयी पूर्वग्रह असणारी होती.

 • दक्षिणेकडील देशांना काळ्या मतदात्यांपासून आणि उत्तर व पूर्वेकडील देशांना तेथील बहुसंख्य देशांतरित मतदात्यांपासून वाचवण्याकरता स्त्रियांना मतदानाच्या हक्क मिळायलाच हवा, अशा प्रकारचे आवाहन ती करत होती. अर्थात या मर्यादित हक्कांना बहुसंख्य काळ्या वर्णाच्या आणि देशांतरित कामगार स्त्रियांनी जोरदार विरोध केला आणि क्रांतिकारी मार्क्सवाद्यांनी केलेल्या सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या हक्कांच्या मागणीला पाठिंबा दिला. १९०७ साली स्टुटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली.

 • त्यामध्ये क्लारा झेटकिन या अतिशय लढाऊ बाण्याच्या, झुंजार कम्युनिस्ट कार्यकर्तीने `सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे.’ अशी घोषणा केली. ८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या मागण्या केल्या. या दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही जोरकसपणे केली.

पुरुषांच्या तुलनेत महिलांना १९ टक्के कमी वेतनमान :
 • नवी दिल्ली : भारतात कर्मचाऱ्यांमध्ये लिंगभेद हा वेतनमानाबाबतही कायम असल्याचे जागतिक महिला दिनापूर्वी जाहीर झालेल्या एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. देशात पुरुषांच्या तुलनेत काम करणाऱ्या महिलांना १९ टक्के कमी वेतन  मिळते.

 • ‘मॉन्स्टर’च्या वेतन निर्देशांकानुसार, पुरुष आणि महिलांमध्ये वेतनाबाबतची दरी विस्तारली आहे. स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांना सरासरी ४६.१९ रुपये अधिक मिळतात.

 • वर्ष २०१८ मध्ये पुरुषांना ढोबळ ताशी पगार २४२.४९ रुपये मिळत होता. तर स्त्रियांच्या ताशी मेहनतान्याची रक्कम १९६.३० रुपये होती. अधिकतर क्षेत्रात स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत कमी वेतन आहे, असेही याबाबतचे निरीक्षण सांगते.

 • ‘मॉन्स्टर’च्या म्हणण्यानुसार, माहिती तंत्रज्ञान तसेच संबंधित क्षेत्रात स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांना २९ टक्के तर निर्मिती क्षेत्रात २४ टक्के अधिक वेतन आहे. आरोग्यसेवासारख्या क्षेत्रात महिलांची संख्या अधिक असतानाही पुरुष २१ टक्के वेतन अधिक मिळवितात. तुलनेत वित्तीय सेवा, बँक, विमा क्षेत्रात वेतनभेद अवघा २ टक्के आहे.

 • कामकरी स्त्री-पुरुषांमधील वेतन-दरी ही दशकभरापासून लक्षणीय राहिल्याचेही हे सर्वेक्षण सांगते. २०१७ मध्ये याबाबतची दरी ही काहीशी अधिक म्हणजे २० टक्के होती. ‘मॉन्स्टर’ने जाणून घेतलेल्या मतानुसार, ७१ टक्के पुरुषांनी तर ६६ टक्के महिलांनी वेतन तसेच कामाबाबत लिंगभेद कमी व्हायला पाहिजे, असे वाटते.

काँग्रेसचे माजी नेते डॉ. अजित सावंत यांचं निधन, आज मुंबईत अंत्यसंस्कार :
 • मुंबई : काँग्रेसचे माजी नेते आणि राजकीय निरीक्षक डॉ. अजित सावंत यांचं कर्करोगामुळे निधन झालं. मुंबईतील राहत्या घरी गुरुवारी (7 मार्च) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अजित सावंत 60 वर्षांचे होते. आज (7 मार्च) सकाळी दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

 • डॉ. अजित सावंत यांनी मुंबई काँग्रेसमध्ये अनेक वर्ष काम केलं. या दरम्यान त्यांनी अनेक महत्त्वाची पदं भूषवली. 2001 ते 2012 दरम्यान सावंत मुंबई प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते होते. हीम विधानसभा मतदारसंघातून त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर आमदारकीची निवडणूकही लढवली होती. पक्षांतर्गत संघर्षामुळे काँग्रेस सोडल्यानंतर त्यांनी काही काळासाठी आम आदमी पार्टीतही प्रवेश केला होता.

 • नॅशनल कॉन्फरेशन ऑफ युनिट्सचे वरिष्ठ अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम सांभाळलं होतं. तसंच भारतीय असंघटित कामगार विकास संघटनेचेही ते अध्यक्ष होते.

 • चाळीत राहणाऱ्या गिरणी कामगारांना त्यांचे हक्क मिळावेत, यासाठी त्यांनी लढा दिला. कामगारांचे हक्क आणि कामगार कायद्यांबाबत त्यांचा अभ्यास होता.

 • आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी सर्वात प्रथम संघटनाही अजित सावंत यांनी उभारली. 'बीपीओ-आयटी एम्प्लॉईज कॉन्फेडरेशन' या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी आयटी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या होणाऱ्या पिळवणुकीविरोधात आवाज उठवला होता. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कार्मिक व्यवस्थापनात काम केलं.

दिनविशेष :
 • जागतिक महिला दिन

महत्वाच्या घटना 

 • १८१७: न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज (NYSE) ची स्थापना.

 • १९४२: दुसरे महायुद्ध: जपानने म्यानमारची राजधानी रंगून जिंकली.

 • १९४८: भारतीय विमानसेवा एअर इंडिया इंटरनॅशनल ने परदेशात आपली सेवा सुरु केली.

 • १९५७: घाना देशाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

 • १९७९: फिलिप्स कंपनी ने प्रथमच सार्वजनिकरित्या कॉम्पॅक्ट डिस्क चे प्रकाशन केले.

 • १९९३: दमानिया एअरवेज या खाजगी विमानवाहतुक कंपनीने आपल्या पहिल्या विमानाला स्पिरीट ऑफ जे. आर. डी. असे नाव देण्याचे ठरविले.

 • २०१६: पूर्ण घडलेले सूर्यग्रहण इंडोनेशिया आणि उत्तर पॅसिफिक मधून दिसले.

जन्म 

 • १८६४: कादंबरीकार हरी नारायण आपटे यांचा जन्म. (मृत्यू: ३ मार्च १९१९)

 • १८७९: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन शात्रज्ञ ऑटो हान यांचा जन्म. (मृत्यू: २८ जुलै १९६८)

 • १८८६: जीवरसायन शास्रज्ञ एडवर्ड कालव्हिन केन्डॉल यांचा जन्म.

 • १९२८: कथालेखक वसंत अनंत कुंभोजकर यांचा जन्म.

 • १९३०: कवी, कादंबरीकार आणि नाटककार चिंतामण त्र्यंबक खालोलकर उर्फ आरतीप्रभू यांचा जन्म. (मृत्यू: २६ एप्रिल १९७६)

 • १९३१: प्रसिद्ध सॅक्सोफोन वादक मनोहारी सिंग यांचा जन्म. (मृत्यू: १३ जुलै २०१०)

मृत्यू 

 • १७०२: इंग्लंडचा राजा विल्यम (तिसरा) यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १६५०)

 • १९४२: क्यूबाचा बुद्धीबळपटू जोस रॉल कॅपाब्लांका यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १८८८)

 • १९५७: स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळ गंगाधर तथा बाळासाहेब खेर यांचे निधन. (जन्म: २४ ऑगस्ट१८८८)

 • १९८८: भारतीय गायक-गीतकार अमर सिंग चमकिला यांचे निधन. (जन्म: २१ जुलै १९६०)

टिप्पणी करा (Comment Below)