चालू घडामोडी - ०८ मे २०१८

Date : 8 May, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
MPSC उमेदवारांनो, प्रोफाईल तातडीने आधार कार्डशी लिंक करा :
  • मुंबई: राज्य लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीची परीक्षा देणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. ज्या उमेदवारांनी आपल्या प्रोफाईलमध्ये आधार क्रमांक नमूद केला नसेल, किंवा आपलं प्रोफाईल आधार क्रमांकाशी जोडलं नसेल, त्यांनी तातडीने जोडून घ्यावं. त्यासाठी 31 मेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. अन्यथा त्यांचं प्रोफाईल 1 जून 2018 पासून निष्क्रिय (Deactivate) करण्यात येणार आहे.

  • आधार क्रमांकाशी न जोडणाऱ्यांचं प्रोफाईल निष्क्रिय (Deactivate) करण्यात येणार आहे. MPSC परीक्षांना बसणाऱ्या उमेदवारांची ओळख पटवण्यासाठी, आयोगाने मार्च 2017 पासून आधार कार्ड तपशील लागू केला आहे. आता या निर्णयाला वर्ष होऊन गेलं आहे.

  • मात्र ज्यांचे जुने प्रोफाईल आहेत त्यांनी अजूनही आधार कार्डचे तपशील अपडेट केले नाहीत. त्यामुळे आता आयोगाने थेट असे प्रोफाईल डिअॅक्टिव्हेट करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • प्रोफाईल निष्क्रिय केल्यानंतर संबंधित उमेदवार लॉग इन करुन प्रोफाईल पाहू शकेल, पण त्याला त्या प्रोफाईलवरुन कोणतेही अर्ज करु शकणार नाही.

रशियाच्या अध्यक्षपदी पुतिन यांचा चौथ्यांदा शपथविधी :
  • रशियाच्या अध्यक्षपदी व्लादिमीर पुतिन (वय ६५) यांचा चौथ्यांदा शपथविधी झाला असून त्यांची दोन दशकांची सत्ता आणखी सहा वर्षे राहणार आहे. पाश्चिमात्य देशांशी संबंध तणावाचे बनलेले असताना ते पुन्हा अध्यक्ष झाले आहेत.

  • १९९९ पासून पुतिन सत्तेवर असून ते जोसेफ स्टालिन यांच्यानंतर सर्वाधिक काळ सत्तेवर असलेले नेते ठरले आहेत. मार्चमधील निवडणुकीत त्यांचा विजय झाला होता. पुतिन यांनी एकूण ७७ टक्के मते जिंकली होती, पण या निवडणुकीत त्यांनी विरोधकांवर बंदी घातली होती. देशाच्या अर्थव्यवस्थेचे पुनरूज्जीवन करण्याचे आश्वासन देऊन ते सत्तेवर आले असून त्यांच्यासमोवर अनेक जटिल आंतरराष्ट्रीय पेच आहेत.

  • ‘रशियाच्या वर्तमान व भविष्यासाठी सर्व काही करण्याकरिताच माझे आयुष्य आहे व ते मी माझे कर्तव्य समजतो’ असे पुतिन यांनी सांगितले. शपथविधीच्या वेळी अनेकांनी स्मार्टफोनवर चित्रण केले. ऑर्नेट आंद्रयेव हॉल या क्रेमलिन राजप्रासाद संकुलाच्या भागात शपथविधी झाला. काळ्या रंगाच्या रशियन बनावटीच्या लिमोझीन गाडीतून ते आले, गेल्या वेळी त्यांनी मर्सिडीज वापरली होती.

  • रशियन लोकांनी दिलेल्या पाठिंब्याबाबत आभार मानून त्यांनी सांगितले, की माझ्यावरच्या मोठय़ा जबाबदारीची मला जाणीव आहे. रशियाचे सामथ्र्य, भरभराट व कीर्ती अनेक पटींनी वाढवण्यासाठी मी प्रयत्न करीन.

यूपीतील ६ माजी मुख्यमंत्र्यांना सरकारी घरं सोडण्याचे आदेश :
  • नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील 6 माजी मुख्यमंत्र्यांना सरकारी बंगले रिकामे करावे लागणार आहेत. सुप्रीम कोर्टाने तसा आदेश दिला आहे. कोर्टाने उत्तर प्रदेश सरकारने आणलेला कायदा रद्द केला.

  • त्यामुळे कोर्टाच्या या निर्णयाचा थेट फटका माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव, मायावती, कल्याण सिंह, राजनाथ सिंह, अखिलेश यादव आणि एन डी तिवारी यांना बसला आहे.

  • यूपी सरकारने ‘उत्तर प्रदेश मिनिस्टर्स सॅलरी, अलाऊंस अँड अदर फॅसिलिटीज अॅक्ट 1981’ मध्ये बदल करत, माजी मुख्यमंत्र्यांना आयुष्यभर मोफत सरकारी घरं देण्याची तरतूद केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने ही तरतूद मनमानी असल्याचं सांगत रद्द केली.

  • यापूर्वी ऑगस्ट 2016 मध्येही सुप्रीम कोर्टाने ही तरतूद नियमबाह्य असल्याचं म्हटलं होतं. त्यावेळी कोर्टाने 2 महिन्यात सरकारी बंगले खाली करण्यास सांगितलं होतं.

  • मात्र त्यावेळी यूपी सरकारने नियमांत बदल करत, जुनीच री पुन्हा ओढली होती. पण लोक प्रहरी या स्वयंसेवी संस्थेने पुन्हा कोर्टाचा दरवाजा ठोठावला होता.

पंतप्रधान जाणार जनकपूरमधील जानकी मंदिरात - ११ मे पासून नेपाळ दौरा :
  • नवी दिल्ली- नेपाळचे पंतप्रधान केपी ओली भारतात येऊन गेल्यानंतर महिन्याभरातच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 आणि 12 मे रोजी नेपाळच्या दौऱ्यावर जात आहेत. दोन्ही देशांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा दौरा आहे.

  • काठमांडूला जाण्यापूर्वी नरेंद्र मोदी दक्षिण नेपाळमधील जनकपूर येथे जानकी मंदिराला भेट देतील तसेच वायव्य नेपाळमधील मुस्तांग जिल्ह्यातील मुक्तीनाथ मंदिरालाही ते भेट देतील. मुस्तांग आणि काठमांडूला जाण्यापूर्वी जनकपूर येथील प्रांतिक सरकार नरेंद्र मोदी यांचा नागरी सत्कार करणार आहे. या दौऱ्यामध्ये पंतप्रधान 900 मेगावॅट क्षमतेच्या वीजप्रकल्पाचे उद्घाटनही करणार आहेत.

  • त्यांच्या या दौऱ्यासाठी मुस्तांग, जनकपूरसह इतर जिल्ह्यांमध्ये संरक्षण व्यवस्था कडक करण्यात आली आहे, अशी माहिती मुस्तांग जिल्ह्याचे पोलीस प्रमुख शिशिर पौडेल यांनी वृत्तसंस्थेला दिली.  गेल्या महिन्यामध्ये नेपाळच्या बिरातनगर येथील भारतीय वाणिज्यदुतावासासमोर प्रेशर कुकर बॉम्बस्फोट झाल्यानंतर सुरक्षाव्यवस्था अधिकच कडक करण्यात आली आहे.

  • नेपाळदौऱ्यानंतर पंतप्रधान शांतीनिकेतन येथे बांगलादेश भवनच्या उद्घाटनासाठी जाणार आहेत. तेथे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना वाजेद यांचीही ते भेट घेतील. हे भवन बांगलादेश सरकारच्या मदतीने बांधण्यात आले आहे. या वर्षी बांगलादेशात सार्वत्रिक निवडणूका होणार आहेत. भारतही बांगलादेशबरोबर विविध प्रकल्प पूर्णत्वास नेण्याच्या प्रयत्नात आहे.

देशभरात अभियांत्रिकी शिक्षणाच्या सव्वा लाख जागा कमी होणार : 
  • दर्जेदार शिक्षणाअभावी तसेच नोकऱ्या उपलब्ध नसल्यामुळे अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याचा विद्यार्थ्यांचा कल दिवसेंदिवस कमी होत चालल्यामुळे देशभरातील सुमारे २०० हून अधिक अभियांत्रिकी संस्थांनी आपली महाविद्यालये बंद करण्यासाठी ‘अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदे’कडे (एआयसीटीई) अर्ज केले असून, यामुळे २०१८-१९ या शैक्षणिक वर्षांत देशभरात अभियांत्रिकी शिक्षणाच्या जवळपास सव्वा लाख जागा कमी होणार आहेत.

  • एआयसीटीईने अभियांत्रिकी शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी कठोर पावले उचलली असून, अभियांत्रिकी महाविद्यालयांना ‘नॅशनल अ‍ॅक्रिडेशन बोर्डा’ची(एनबीए) श्रेणी घेणे सक्तीचे केले आहे. एकीकडे अभियांत्रिकीच्या आयटी, ईएक्सटीसीसह अनेक अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यास विद्यार्थी तयार नाहीत, तर दुसरीकडे अभियांत्रिकी शिक्षणाचा दर्जा राखण्यासाठी एआयसीटीईने कठोर पावले उलचल्यामुळे अनेक संस्थांनी आपली महाविद्यालये बंद करणे पसंत केले आहे.

  • यंदा देशभरातील सुमारे २०० हून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालयांनी आपली महाविद्यालये बंद करण्यासाठी एआयसीटीईकडे परवानगी मागितल्याची माहिती एआयसीटीईच्या सूत्रांनी दिली.

  • महाराष्ट्रात अभियांत्रिकीची एकूण ३६० महाविद्यालये असून यंदा २७ महाविद्यालयांनी आपली महाविद्यालये बंद करण्यासाठी परवानगी मागितली असून, त्यातील १६ संस्थांना अभियांत्रिकी महाविद्यालय बंद करण्यासाठी मान्यता देण्याची शिफारस राज्याच्या तंत्रशिक्षण विभागाने केली आहे. याशिवाय सात तंत्रनिकेतन बंद करण्याचीही शिफारस केल्याचे राज्याचे तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांनी सांगितले.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १८९९: क्रांतिकारक वासुदेव चाफेकर यांना फाशी.

  • १९१२: पॅरामाउंट पिक्चर्स (Paramount Pictures) या कंपनीची स्थापना झाली.

  • १९३२: पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे शिष्य पं. विनायकराव पटवर्धन यांनी पुणे येथे गांधर्व महाविद्यालय सुरू केले.

  • १९३३: महात्मा गांधी यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध आपले २१ दिवसांचे उपोषण सुरू केले.

  • १९६२: पश्चिम बंगाल येथील कोलकाता येथे रवींद्र भारती विद्यापिठाची स्थापना.

  • १९७४: रेल्वे कामगारांचा देशव्यापी संप झाला. सरकारविरुद्धचा असंतोष वाढत जाऊन आणीबाणी पुकारली जाण्याला जी कारणे घडली, त्यात हा संप महत्त्वाचा मानला जातो.

जन्म

  • १८८४: अमेरिकेचे ३३ वे राष्ट्राध्यक्ष हॅरी एस. ट्रूमन यांचा जन्म. (मृत्यू: २६ डिसेंबर १९७२)

  • १९०६: भारताचे माजी भूसेनाप्रमुख प्राणनाथ थापर यांचा जन्म.

  • १९१६: स्वामी चिन्मयानंद यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑगस्ट १९९३)

  • १९१६: भारतीय सिनेमॅटोग्राफर रामानंद सेनगुप्ता यांचा जन्म.

मृत्यू

  • १९७२: भारत रत्न पुरस्कृत पांडुरंग वामन काणे यांचे निधन. (जन्म: ७ मे १८८०)

  • १९८१: संस्कृतज्ञ, मराठी कवी डॉ. केशव नारायण वाटवे  यांचे निधन.

  • १९८२: ४० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कवी अनिल यांचे निधन. (जन्म: ११ सप्टेंबर१९०१)

  • १९९५: पत्रकार, संपादक, राजकीय विश्लेषक आणि मुत्सद्दीप्रेम भाटिया यांचे निधन. (जन्म: ११ ऑगस्ट १९११)

  • १९९५: देवदेवतांची आणि संतांची चित्रे यामुळे प्रसिद्ध असलेले चित्रकार जि. भी. दीक्षित यांचे निधन.

  • १९९९: कलादिग्दर्शक श्रीकृष्ण समेळ यांचे निधन.

  • २००३: संस्कृत व प्राकृत विद्वान डॉ. अमृत माधव घाटगे यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १९१३)

  • २०१४: जीपीएस प्रणाली चे सहसंशोधक रॉजर एल ईस्टन यांचे निधन. (जन्म: ३० एप्रिल १९२१)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.