चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०८ मे २०१९

Date : 8 May, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
ICSE Result : आयसीएसई, आयएससी परीक्षेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना घवघवीत यश :
  • नवी दिल्ली : सीबीएसई  दहावी आणि बारावी निकालानंतर आज आयसीएसई आणि आयएससी दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये ISC परीक्षेचा निकाल 96.52 % लागला. मागील वर्षीच्या तुलनेत 0.31% ने या निकालात वाढ पाहायला मिळाली तर आयसीएसईचा निकाल यावर्षी 98.54 लागला.

  • या निकालात मुंबईच्या जमनाबाई नर्सी शाळेची जुही कजारियाने 99.60% मार्क्स मिळवून देशात पहिली येण्याचा मान मिळवला. तर मुंबईचे फोरम संजनवाला,अनुश्री चौधरी, अनुष्का अग्निहोत्री आणि ठाण्याचा यश भन्साळीने 99.40%मिळवून देशात दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवलं. अनुष्का अग्निहोत्री अनुष्का ही कांदिवली ठाकूर कॉम्प्लेक्समधील चिल्ड्रन्स अकॅडमी शाळेतील विद्यार्थिनी आहे. तिसऱ्या क्रमांकावर राज्यातील एकूण 11 जणांनी 99.20 टक्के गुण मिळवले आहे. तर देशात मुक्तसारच्या मन्नार बन्सल याने सुद्धा 99.60 टक्के गुण मिळवून देशात पहिला क्रमांक मिळवला आहे.

  • तर आयएससी परीक्षेत मुंबईच्या मिहिका सावंतने देशात 99.75 टक्के गुण मिळवून देशात दुसरा येण्याचा मान पटकवला. तर देशात आयएससी परीक्षेत कोलकत्ताच्या देवांग अग्रवाल आणि बंगलोरची विभा स्वामिनाथन यांनी 100 टक्के गुण मिळवून देशात पहिला क्रमांक मिळवला

  • यंदा ICSE दहावीची परीक्षा 22 फेब्रुवारी ते 25 मार्च दरम्यान घेण्यात आली होती. तर ICSE बारावीची परीक्षा 4 फेब्रुवारी ते 25 मार्च दरम्यान झाली होती. आयसीएसईच्या दहावी परीक्षेचा निकाल  98.54 टक्के इतका लागला आहे.  तर बारावी परीक्षेचा निकाल 96.52 टक्के इतका लागला आहे. आयसीएसई परीक्षेत यंदाच्या निकालांमध्ये मुलींनी बाजी मारली आहे.

राज्यातील दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडून अतिरिक्त २१६० कोटी :
  • मुंबई : महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी एनडीआरएफ, केंद्र सरकारकडून आणखी 2160 कोटी रुपयांची मदत प्राप्त झाली आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटरवरुन आभार मानले.

  • राज्यातील दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडून राज्याला सातत्याने मदत होते आहे. आतापर्यंत 4248.59 कोटी रुपये केंद्र सरकारकडून प्राप्त झाले आहेत.

  • महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी एनडीआरएफ, केंद्र सरकारकडून आणखी 2160 कोटी रूपये मदतीपोटी प्राप्त झाले. मी यासाठी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांचा अतिशय आभारी आहे. आतापर्यंत 4248.59 कोटी रूपये केंद्र सरकारकडून प्राप्त झाले आहेत. 

  •  

  • दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारही मोठ्या प्रमाणात पुढाकार घेत असून टँकर, चारा छावण्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा दिला जात आहे.

  • केंद्राच्या मदतीची वाट न पाहता 4000 कोटी रुपयांपेक्षा अधिक मदत यापूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. दुष्काळ निवारणासाठी आचारसंहिता शिथिल करण्याची मुख्यमंत्र्यांची मागणी निवडणूक आयोगाने मान्य केली आहे.

  • राज्यातील अनेक भागात दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून प्रशासनाकडून यासंदर्भात विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असल्यामुळे दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीत अडचणी येत होत्या.

तुम्ही सर्व मर्यादा ओलांडल्या; सुषमा स्वराज यांचा ममतांवर निशाणा :
  • लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरू आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोचरी टीका केली होती. त्यानंतर आता  पंतप्रधानांवर आक्षेपार्ह वक्तव्य करून ममता बॅनर्जी यांनी सर्व मर्यादा ओलांडल्याचे सांगत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी त्यांना धारेवर धरले.

  • तुम्ही एका राज्याच्या मुख्यमंत्री आहात आणि नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. ममताजी तुम्ही सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. यापुढेही तुम्हाला त्यांच्याशीच चर्चा करायची आहे, असे ट्विट करत स्वराज यांनी ममतांवर निशाणा साधला.

  • पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या खालच्या दर्जाचे राजकारण करीत असून आपण फॅनी वादळाने राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत विचारपूस करण्यासाठी दूरध्वनी केला तेव्हा त्यांनी बोलण्याचे टाळले, त्यांनी वादळावरही राजकारण केले अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका सभेदरम्यान केली होती. दीदींना राजकारणात जास्त रस आहे. मी राज्याच्या अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला पण तो संपर्कही राज्य सरकारने होऊ दिला नसल्याचा आरोप त्यांनी केला होता.

  • त्यानंतर त्याला उत्तर देत मोदी यांनी वादळग्रस्त ओदिशाचा दौरा केल्यानंतर आपल्याला कलाइकुंडा येथे भेटीसाठी बोलावले होते. मात्र ते बोलावतील तेथे जाण्यासाठी आम्ही त्यांचे नोकर आहोत का? निवडणुकीच्या काळात मी मुदत संपलेल्या पंतप्रधानांसोबत व्यासपीठावर का जावे, असा प्रश्न ममतांनी विचारला होता. तसेच मोदी आणि अमित शाह हे दुर्योधन आणि दुःशासनासारखे आहेत, अशी टीकाही ममता बॅनर्जी यांनी केली होती. ममता बॅनर्जींच्या याच टीकेवर स्वराज यांनी ट्विटरवरून निशाणा साधला.

फिर एक बार मोदी सरकार, भेंडवळची भविष्यवाणी :
  • लोकसभा निवडणुकीतील पाच टप्प्यांमधील मतदान पार पडले असून देशात कोणाची सत्ता येणार याचे उत्तर २३ मे रोजी मिळणार आहे. देशात कोणाची सत्ता येणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच बुधवारी सकाळी तीनशेहून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळची घटमांडणी पार पडली आहे. यातील राजकीय भविष्यवाणीत देशातील राजा कायम राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. देशात स्थिर सरकार येईल असे संकेतही यातून मिळाले आहेत.

  • पाऊस, पीक, राजा, संरक्षण आणि आर्थिक अशा पाच गोष्टींचा भेंडवळच्या भविष्यवाणीत समावेश असतो. यात देशाचा राजा अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत काय भविष्यवाणी वर्तवली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. भेंडवळच्या घटमांडणीत पानविडाच्या आाधारे राजाचे भविष्य सांगितले जाते. बुधवारी सकाळी भेंडवळची घटमांडणी पार पडली असून यात पानविडा कायम आहे.

  • पान आणि त्यावरील नाणंही स्थिर आहे. मात्र, सुपारी किंचित हललेली होती. यातून देशात राजाची गादी कायम असेल आणि देशात स्थिर सरकार येईल, असे संकेत मिळाले आहेत. घटमांडणीतील करंजी हललेली असून त्यामुळे देशाला आर्थिक संकटांना सामोरे जावं लागू शकते, असा अंदाजही यातून वर्तवण्यात आला आहे.याशिवाय परकीय घुसखोरी होत राहणार, पण संरक्षण खाते त्यास चोख प्रत्युत्तर देईल, असे यातून समोर आले आहे.

  • पिकांबाबत काय अंदाज कापूस आणि गहू या पिकांचे उत्पादन मोघम स्वरुपात राहणार आणि ज्वारीचे पीक सर्वसाधारण येईल. पण भावात तेजी मात्र राहणार नाही, असा अंदाजही यात वर्तवण्यात आला आहे. यंदा कमी पावसाची शक्यता असून चारा-पाण्याची टंचाई येईल, असे देखील संकेत मिळाले आहेत.

पाकिस्तानकडून भारताच्या ४३ मच्छीमारांना अटक :
  • पाकिस्तानने सोमवारी भारताच्या 43 मच्छीमारांना अटक केली. पाकिस्तानच्या सागरी हद्दीत प्रवेश केल्याचे सांगत या मच्छीमारांना अटक करण्यात आली. पाकिस्तानी नौदलाकडून ही कारवाई करण्यात आली. याव्यतिरिक्त 6 बोटीदेखील जप्त केल्याची माहिती पाकिस्तानी नौदलाकडून देण्यात आली.

  • सध्या या मच्छीमारांना स्थानिक पोलिसांकडे सोपवण्यात आल्याचे पाकिस्तानी नौदला अंतर्गत कार्यरत असलेल्या सागरी सुरक्षा यंत्रणेच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आले. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या मच्छीमारांना न्यायिक दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले जाणार असून त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यापूर्वी जानेवारी महिन्यात पाकिस्तानी नौदलाने काही भारतीय मच्छीमारांना अटक केली होती.

  • पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एप्रिल महिन्यात 4 टप्प्यांमध्ये 360 भारतीय मच्छीमारांना भारताच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पाकिस्तानने कराचीतील लांधी आणि मालिर येथील तुरूंगातून 250 भारतीय मच्छीमारांची तीन टप्प्यांमध्ये सुटका केली होती. यापूर्वीही अनेकदा भारतीय मच्छीमारांना सागरी हद्द ओलांडल्यावरून पाकिस्तानी नौदलाने अटक केली होती.

सत्ता स्थापनेसाठी विरोधकांची ‘वेगळी’ रणनिती, निकालानंतर भेटणार राष्ट्रपतींना :
  • देशात अजून दोन टप्प्यांचे मतदान बाकी असताना विरोधी पक्षांनी आतापासूनच सरकार बनवण्याच्या पर्यायी रणनितीवर काम सुरु केले आहे. कुठल्याही पक्षाला पूर्ण बहुमत न मिळाल्यास सर्वात मोठया पक्षाला सरकार स्थापनेचे पहिले निमंत्रण देऊ नये यासाठी विरोधी पक्षांची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटण्याची योजना आहे. एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

  • केंद्रात भाजपाचा विरोध करणाऱ्या २१ पक्षांची एका पत्रावर स्वाक्षरी करण्याची योजना आहे. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर राष्ट्रपतींना भेटून पर्यायी सरकार स्थापनेसाठी ते पाठिंब्याचे पत्र सादर करण्याची त्यांनी रणनिती आखली आहे. लोकसभा निवडणूक निकालानंतर सर्वात मोठया पक्षाला प्रादेशिक पक्षांच्या आघाडीमध्ये फूट पाडण्याची संधी मिळू नये यासाठी २१ विरोधी पक्षांनी अशा प्रकारचा निर्णय घेतला आहे.

  • ५४३ सदस्यांच्या लोकसभेत २७२ हा बहुमताचा आकडा आहे. २०१४ लोकसभा निवडणुकीत भाजपाने एकटयाने २८२ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले होते. एनडीएचे एकत्रित मिळून ३३६ सदस्य आहेत. १९९८ साली राष्ट्रपती के.आर.नारायणन यांनी दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना सरकार स्थापनेआधी पाठिंब्याचे पत्र सादर करायला सांगितले होते. त्यावेळी देशभरातून भाजपाचे १७८ खासदार निवडून आले होते.

राष्ट्रीय ‘उत्सवा’साठी परदेशी पर्यटकांचे भारत भ्रमण :
  • जगातील मोठी लोकशाही असलेल्या देशातील निवडणुकांचे परदेशातील राजकीय अभ्यासकांना कायमच आकर्षण राहिले आहे. यंदाच्या निवडणुकीत जवळपास २५०० विदेशी पर्यटक खास निवडणुकीसाठी आल्याचे पर्यटन क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.

  • लोकसभेच्या २०१४च्या निवडणुकीत ‘मोदी लाट’ होती. देशातील सत्ताबदलाचा प्रयोग बघण्यासाठी त्यावेळी एकटय़ा गुजरातमध्ये १८०० हून अधिक पर्यटक परदेशातून आले होते. निवडणूक पर्यटन अशी थेट संकल्पना आपल्याकडे रुजलेली नसली तरी भारतीय बाजारपेठ आणि कोणता  पक्ष सत्तास्थानी येईल याचा अभ्यास करण्यासाठी राजकीय अभ्यासक तसेच राज्यशास्त्राचे विद्यार्थी येतात.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथील सभेसाठी यंदा जपान, कोरिया व तैवानी पर्यटक उपस्थित असल्याचे ‘केसरी टूर्स’चे व्यवस्थापकीय संचालक शैलेश पाटील यांनी सांगितले. पंतप्रधानांनी भाषणात कोणत्या विषयांना प्राधान्य दिले तसेच लोकभावना काय आहे याची ही मंडळी चौकशी करत होते, असे पाटील यांनी सांगितले.  यंदाच्या निवडणुकीदरम्यान जपान, तैवान, कोरिया तसेच जर्मनी व अमेरिकेतून किमान अडीच हजार लोक आले असून वेगवेगळ्या राज्यांमधील  प्रचारसभा याला त्यांचे प्राधान्य होते.

  • भारतातील निवडणुका या अनेक देशांसाठी महत्त्वाच्या असून याचा विचार करून आगामी काळात ‘निवडणूक पर्यटन’ असा विचार पर्यटन क्षेत्रातील कंपन्या करू शकतील, असे ‘वीणा वर्ल्ड’च्या प्रमुख वीणा पाटील यांनी सांगितले. ‘मॅब एव्हिएशन’ ही हेलिकॉप्टर व विमाने भाडय़ाने देणाऱ्या कंपनीचे प्रमुख मंदार भारदे यांच्या म्हणण्यानुसार, आगामी काळात लोकसभेच्या निवडणुकांकडे पर्यटन म्हणून निश्चित पाहता येईल.

ओबामांनी सांगितलं म्हणून मोदींनी पॅरिस जलवायू कराराला दिली मान्यता :
  • नवी दिल्ली - पॅरिस येथे झालेला जलवायू कराराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांच्यातील चर्चेचा मोठा खुलासा झाला आहे. ओबामा यांचे जवळचे सहकारी बेंजामिन रोड्स यांनी सांगितले की, जलवायू कराराच्या मान्यतेसाठी तत्कालीन राष्ट्रपती बराक ओबामा आणि अमेरिका यांच्या मार्गावरील भारत हा मोठा अडसर होता. रोड्स यांनी एका मुलाखतीत म्हटलं की, ओबामा यांच्या सांगण्यावरुनच पंतप्रधान नरेंद्र मोदी जलवायू परिवर्तन करार करण्यासाठी तयार झाले. 

  • अमेरिकेचे विदेश मंत्री कुर्त कैंपबेल आणि भारतातील अमेरिकेचे माजी राजदूत रिचर्ड वर्मा यांच्यासोबत द टीलेव्स पॉडकास्ट ऑफ एशिया ग्रुपच्या कार्यक्रमामध्ये एका मुलाखतीत रोड्स यांनी तत्त्कालीन बराक ओबामा सरकार 2014 च्या अखेरीस चीनसोबत साम्यजंस्य करण्यासाठी यशस्वी राहिलं. ज्यामध्ये दोन्ही देशांमधील वाढतं तापमान कमी करण्याबाबत द्विपक्षीय उद्देशांची घोषणा करण्यात आली. 

  • रिचर्ड वर्मा यांच्या प्रश्नावर उत्तर देताना रोड्स यांनी सांगितले की, चीनसोबत आल्याने इतर देशांनीही पुढाकार घेतला. मात्र भारत जलवायू परिवर्तन करारासाठी तयार नव्हता. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 जानेवारी 2015 च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त बराक ओबामा यांना मुख्य अतिथी म्हणून निमंत्रित केले. ओबामा यांच्या सल्लागारांनीही अमेरिकेने भारतासोबत चांगले संबंध प्रस्थापित करुन मोदींबरोबर वैयक्तिक संबंध मजबूत करण्याचा सल्ला दिला. बराक ओबामा यांनी सल्लागारांनी सांगितल्याप्रमाणे केले. 

दिनविशेष :
  • आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस आणि रेड क्रेसेंट दिन

महत्वाच्या घटना 

  • १८८६: जॉन पेंबरटन यांनी कोका कोला हे पेय पहिल्यांदाच तयार करुन विकले.

  • १८९९: क्रांतिकारक वासुदेव चाफेकर यांना फाशी.

  • १९१२: पॅरामाउंट पिक्चर्स (Paramount Pictures) या कंपनीची स्थापना झाली.

  • १९३२: पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे शिष्य पं. विनायकराव पटवर्धन यांनी पुणे येथे गांधर्व महाविद्यालय सुरू केले.

  • १९४५: दुसरे महायुद्ध – युरोप विजय दिन – जर्मनीची दोस्त राष्ट्रांसमोर बिनशर्त शरणागती, युरोपमधील युद्ध समाप्त.

  • १९६२: पश्चिम बंगाल येथील कोलकाता येथे रवींद्र भारती विद्यापिठाची स्थापना.

  • १९७४: रेल्वे कामगारांचा देशव्यापी संप झाला. सरकारविरुद्धचा असंतोष वाढत जाऊन आणीबाणी पुकारली जाण्याला जी कारणे घडली, त्यात हा संप महत्त्वाचा मानला जातो.

जन्म 

  • १८२८: रेड क्रॉस या संस्थेचे सहसंस्थापक हेनरी डूनेंट यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑक्टोबर १९१०)

  • १८८४: अमेरिकेचे ३३ वे राष्ट्राध्यक्ष हॅरी एस. ट्रूमन यांचा जन्म. (मृत्यू: २६ डिसेंबर १९७२)

  • १९०६: भारताचे माजी भूसेनाप्रमुख प्राणनाथ थापर यांचा जन्म.

  • १९१६: स्वामी चिन्मयानंद यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑगस्ट १९९३)

  • १९१६: भारतीय सिनेमॅटोग्राफर रामानंद सेनगुप्ता यांचा जन्म.

  • १९७०: ऑस्ट्रेलियन क्रिकेटखेळाडू मायकेल बेव्हन यांचा जन्म.

मृत्यू 

  • १७९४: फ्रेन्च रसायनशास्त्रज्ञ अ‍ॅन्टॉइन लॅव्हाझिये यांचे निधन. (जन्म: २६ ऑगस्ट १७४३)

  • १९२०: पाली भाषा व बौद्ध साहित्य या विषयावरचे अभ्यासक चिंतामण वैजनाथ राजवाडे यांचे निधन.

  • १९५२: फॉक्स थियेटर चे संस्थापक विल्यम फॉक्स यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १८७९)

  • १९७२: भारत रत्न पुरस्कृत पांडुरंग वामन काणे यांचे निधन. (जन्म: ७ मे १८८०)

  • १९८२: ४० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कवी अनिल यांचे निधन. (जन्म: ११ सप्टेंबर१९०१)

  • १९८४: रीडर डायजेस्ट चे सहसंस्थापक लीला बेल वालेस यांचे   निधन. (जन्म: २५ डिसेंबर  १८८९)

  • १९९५: पत्रकार, संपादक, राजकीय विश्लेषक आणि मुत्सद्दीप्रेम भाटिया यांचे निधन. (जन्म: ११ ऑगस्ट १९११)

  • १९९५: देवदेवतांची आणि संतांची चित्रे यामुळे प्रसिद्ध असलेले चित्रकार जि. भी. दीक्षित यांचे निधन.

  • २००३: संस्कृत व प्राकृत विद्वान डॉ. अमृत माधव घाटगे यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १९१३)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.