चालू घडामोडी - ०८ नोव्हेंबर २०१८

Date : 8 November, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
केदारनाथाच्या चरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी नतमस्तक :
  • उत्तराखंडच्या हर्षिल या ठिकाणी असलेल्या सीमेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी जवानांसोबत दिवाळी साजरी केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथला पोहचले. तिथे केदारनाथाच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी दर्शन घेतले.

  • पंतप्रधान झाल्यापासून ते तिसऱ्यांदा केदारनाथ मंदिरात आले आहेत. केदारनाथावर जलाभिषेक केल्यानंतर त्यांनी पूजा-अर्चाही केली तसेच मंदिराला प्रदक्षिणाही मारली. केदारनाथमध्ये पुनर्निमाणाचे काम कसे सुरु आहे याचा ते स्वतः आढावा घेत आहेत. काही अधिकाऱ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली.

  • केदारनाथ मंदिराचे दृश्य सध्या अत्यंत विहंगम असे दिसून येते आहे. मंदिरामागे असलेल्या डोंगरांवर बर्फाची दुलईच पसरली आहे. केदारनाथ मंदिर फुलांनी सजवण्यात आले असून ही सजावट अत्यंत उठून दिसते आहे.

  • केदारनाथाच्या चरणी नतमस्तक झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंड प्रलयावर काढण्यात आलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शनही पाहिले. काही वेळाने केदारनाथ भागाच्या पुनर्निर्माणाचे प्रेझेंटेशनही पाहणार आहेत. केदारनाथमध्ये पंतप्रधान आल्याचे समजताच अनेकांनी त्यांना पाहण्यासाठी गर्दी केली. त्यानंतर पंतप्रधानांनी त्यांना हात हलवून अभिवादन केले.

अयोध्येत मंदिर होतं, मंदिर आहे आणि राहणार - योगी आदित्यनाथ :
  • अयोध्या : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज अयोध्येतील रामलला आणि हनुमानगढी मंदिरांचं दर्शन घेतलं. पूजेनंतर योगी आदित्यनाथ यांनी अयोध्या मंदिराबाबत मोठं वक्तव्य केलं. अयोध्येत राम मंदिर होतं, मंदिर आहे आणि मंदिर राहणार यात शंका नाही, असं आदित्यनाथ म्हणाले.

  • "अयोध्या मंदिराबाबत संविधानाच्या चौकटीत राहून सरकार काम करणार आहे. अयोध्येत मंदिर होतं आणि मंदिरच राहणार", हे सांगायलाही योगी यावेळी विसरले नाहीत.

  • अयोध्येतील सरयु तटावर 151 फूट रामाच्या मूर्तीच्या निर्मितीबाबत आदित्यनाथ म्हणाले की, " भगवान रामाच्या दर्शनीय मूर्तीसाठी दोन जागांची पाहणी करण्यात आली आहे. रामाची अशी मूर्ती तयार करायची आहे, जी अयोध्येची ओळख बनेल."

  • कालच योगी आदित्यनाथ यांनी फैजाबाद जिल्ह्याचे नाव बदलून अयोध्या केलं. अयोध्येतील दीपोत्सव कार्यक्रमादरम्यान फैजाबादच्या नामांतरासोबत आणखी काही महत्वाच्या घोषणा योगींनी केल्या.

  • अयोध्येतील मेडिकल कॉलेजचे नाव राजर्षी दशरथ ठेवलं, तर भगवान श्रीराम यांचं नाव विमानतळाला देण्याची घोषणाही योगी आदित्यनाथ यांनी केली. यापूर्वीच योगी आदित्यनाथांनी अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज केले आहे.

सलग पाचव्यांदा मोदींची जवानांसोबत सीमेवर दिवाळी :
  • देहरादून : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग पाचव्या वर्षी भारतीय जवानांसोबत दिवाळी साजरी केली. आज केदारनाथला जाण्यापूर्वी मोदी उत्तराखंडमधील हर्षील येथील भारत-चीन सीमेवर दाखल झाले. तिथल्या आयटीबीपी (ITBP) जवानांसोबत त्यांनी दिवाळी साजरी केली. पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर मोदी दरवर्षी जवानांसोबत दिवळी साजरी करतात.

  • नरेंद्र मोदी यांनी 2014 साली पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी पहिल्यांदा 2014 साली सियाचिन येथे भारत-चीन सीमेवर तैनात असलेल्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली. त्यानंतर 2015 साली त्यांनी पंजाब सीमेवरील जवानांसोबत दिवाळी साजरी केली. 2016 साली मोदी हिमाचल प्रदेश येथील सीमा भागात गेले.

  • तिथल्या तिबेट सीमेवर त्यांनी पोलिसांसोबत दिवाळी साजरी केली. मागील वर्षी त्यांनी जम्मू-काश्मिरमधील गुरेज येथे जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती.

  • याबाबत मोदी म्हणाले की, मी दरवर्षी देशाच्या सीमा भागात जातो. तिथे तैनात असलेल्या जवानांसोबत मी दिवाळी साजरी करतो. तिथल्या जवानांना हैरान करतो. मला त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करायला, वेळ घालवायला जास्त आवडते.

'ते' दोघे भारताच्या विजयाचे शिल्पकार, रोहितकडून कौतुक :
  • लखनौ : भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजच्या संघाला टी20 मालिकेत हरवून देशावासियांना दिवाळीचे गिफ्ट दिले आहे. लखनौमध्ये काल झालेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला 71 धावांनी धूळ चारली. त्यामुळे भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या आनंदी आहे. कालच्या सामन्यात त्याने शतक झळकावून सामना भारताच्या पारड्यात पाडला. परंतु या मालिका विजयाचे श्रेय त्याने दोन भारतीय खेळाडूंना दिले आहे. सामना संपल्यानंतर त्याने या दोन्ही खेळाडूंचे तोंड भरुन कौतुक केले. रोहितने सलामीवीर शिखर धवन आणि युवा गोलंदाज खलील अहमद या दोघांचे कौतुक केले.

  • रोहित म्हणाला की, "ही खेळपट्टी आमच्यासाठी नवीन होती. त्यामुळे सुरुवातीला आम्हाला थोडे सांभाळून खेळावे लागले. खेळपट्टीचा अंदाज आल्यानंतर आम्ही समोरच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला."

  • धवनबाबत बोलताना रोहित म्हणाला की, "शिखर सध्या त्याचा नैसर्गिक खेळ खेळतोय. त्याने सुरुवातीलाच प्रतिस्पर्धी संघावर दबाव निर्माण केला. त्याचा फायदा आम्हाला सामना संपेपर्यंत झाला."

  • कालच्या सामन्यात रोहित आणि शिखरने भारताला चांगली सुरुवात करुन दिली होती. दोघांनी 14 षटकात 123 धावांची भागीदारी केली. धवनने 41 चेंडूत 43 धावांची खेळी केली.

  • खलीलबाबत बोलताना रोहित म्हणाला की, "बुमराह आमचा स्पेशल गोलंदाज आहे. त्याचा आम्ही टी20 आणि एकदिवसीय सामन्यात वेगवेगळ्या पद्धतीने वापर करतो. तर दुसऱ्या बाजूला खलीलनेदेखील स्वतःचे वेगळेपण दाखवले आहे. येत्या काळात खलीलची संघाला खूप मदत होणार आहे."

श्रीनगरचे तापमान गोठणबिंदूखाली :
  • श्रीनगर - यंदाच्या हिवाळ्यात श्रीनगरमध्ये बुधवारची रात्र अत्यंत गारठलेली ठरली. येथे पहिल्यांदाच पारा गोठणबिंदूखाली घसरला. चालू आठवडाअखेर पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली. बुधवारी शहरातील किमान तापमान उणे २.२ सेल्सियश अंश नोंदले गेले. रात्री मात्र

  • पहिल्यांदा पारा सर्वसामान्य तापमानापेक्षा ५ सेल्शिअस अंशावर घसरला होता. काश्मीर खोरे आणि लडाख क्षेत्रातही तापमानाचा पारा गोठणबिंदूखाली होता. गुलमर्ग येथील तापमानही उणे ६.६ अंशावर होते. 

बुडत्या पाकला चीनचा आधार, आर्थिक मदतीची केली घोषणा :
  • इस्लामाबाद- आर्थिक संकटाच्या गर्तेत अडकलेल्या पाकिस्तानला पुन्हा एकदा चीननं मदतीचा हात दिला आहे. पाकिस्तानच्या अर्थमंत्र्यांनी याची माहिती दिली आहे. परंतु या मदतीसंदर्भात चीननं सार्वजनिकरीत्या वाच्यता केलेली नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आर्थिक पॅकेज मागण्याच्या निमित्तानं चीनचा दौराही केला होता. पाकिस्तानचे अर्थमंत्री असद उमर यांनी सांगितलं की, चीननं पाकिस्तानला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी मोठी मदत करणार असल्याचं जाहीर केलं आहे.

  •  उमर म्हणाले, पाकिस्तानला 12 अब्ज डॉलरच्या मदतीची गरज आहे. त्यातील 6 अब्ज डॉलर आम्हाला सौदी अरेबिया देणार आहे. तर उर्वरित रक्कम चीननं कर्जाच्या स्वरूपात देण्यास सहमती दर्शवली आहे. चीनच्या या मदतीमुळे पाकिस्तानमधलं आर्थिक संकट काही प्रमाणात कमी होईल.

  • इम्रान खान यांच्याबरोबर परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनीही चीनचा दौरा केला होता. पाकिस्तानमधलं आर्थिक संकट आता संपण्याच्या मार्गावर आहे, असं पाकिस्तानकडून सांगण्यात येत असलं तरी चीननं यावर सार्वजनिकरीत्या कोणतंही भाष्य केलेलं नाही. पाकिस्तान हा चीनचा नेहमीच मित्र राहिला आहे. दोन्ही देशांमध्ये चांगले द्विपक्षीय संबंध आहेत. आम्ही आमच्यापरीनं पाकिस्तानला मदत करण्याचा प्रयत्न करू, येत्या काळातही पाकिस्तानच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असंही चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. 

रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरपेक्षा अर्थमंत्री मोठे :
  • ‘रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर हा देशाच्या अर्थमंत्र्यांपेक्षा मोठा नसतो. अर्थमंत्र्यांनी एखाद्या निर्णयाबाबत आग्रह धरल्यास गव्हर्नर त्याला नकार देऊ शकत नाही. अर्थमंत्र्यांचे म्हणणे पटेत नसेल, तर त्याला पद सोडायची तयारी ठेवावी लागते’, असे स्पष्ट मत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी यापूर्वीच व्यक्त केले आहे. सध्या रिझव्‍‌र्ह बँकेशी सुरू असलेल्या वादात हे विधान सरकारच्या मदतीला येण्याची शक्यता आहे.

  • मनमोहन सिंग यांच्या मुलीने लिहिलेल्या ‘स्ट्रिक्टली पर्सनल : मनमोहन अँड गुरुशरण’ पुस्तकात मनमोहन सिंग यांचे हे मत नोंदवण्यात आले आहे. हे पुस्तक २०१४ साली प्रकाशित झाले होते.

  • मनमोहन सिंग यांनी या पुस्तकात अनुभव सांगितले आहेत. ‘अर्थमंत्री व रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरमध्ये विचारांची देवाणघेवाण होत असते. गव्हर्नर म्हणून निर्णय घेताना मलाही सरकारला विश्वासात घेऊनच काम करावे लागायचे’, असे त्यांनी या पुस्तकात म्हटले आहे.

दिनविशेष :
  • जागतिक शहरीकरण दिन / आंतरराष्ट्रीय रेडिओलॉजी दिन

महत्वाच्या घटना 

  • १८८९: मोंटाना हे अमेरिकेचे ४१ वे राज्य बनले.

  • १८९५: दुसराच एक प्रयोग करत असताना विल्हेम राँटजेन यांना क्ष किरणांचा शोध लागला.

  • १९३२: अखिल भारतीय अस्पृश्यता निवारक संघाच्या महाराष्ट्र शाखेची स्थापना.

  • १९८७: पुणे मॅरेथॉनचे पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते शानदार उद्घाटन. पुणे मॅरेथॉन ही स्पर्धा खासदार सुरेश कलमाडी यांनी सुरु केली.

  • १९९६: कवी व लेखक प्रा. माणिक गोडघाटे ऊर्फ ग्रेस यांची विदर्भ साहित्य संघाच्या जीवनव्रती पुरस्काराचे पहिले मानकरी म्हणून निवड.

  • २००२: जी. बी. पटनायक यांनी भारताचे ३२ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

  • २०१६: तत्कालीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० च्या नोटा व्यवहारातून रद्द केल्या.

  • २०१६: डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे ४५वे अध्यक्ष म्हणून निवडून आले.

जन्म 

  • १६५६: खगोलशास्त्रज्ञ एडमंड हॅले यांचा जन्म. धूमकेतूची कक्षा मोजणारे पहिले शास्रज्ञ. (मृत्यू: १४ जानेवारी१७४२)

  • १८३१: भारताचे ३०वे गव्हर्नर-जनरल रॉबर्ट बुलवेर-लिटन यांचा जन्म. (मृत्यू: २४ नोव्हेंबर १८९१)

  • १८६६: ऑस्टिन मोटर कंपनीचे संस्थापक हर्बर्ट ऑस्टिन यांचा जन्म. (मृत्यू: २३ मे १९४१)

  • १८९३: थायलँडचा राजा प्रजाधिपोक ऊर्फ राम (सातवा) यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे १९४१)

  • १९०९: स्वातंत्रसैनिक व पत्रकार नरुभाई लिमये यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑगस्ट १९९८)

  • १९१७: कर्करोग संशोधन क्षेत्रातील अग्रणी शास्त्रज्ञ डॉ. कमल रणदिवे यांचा जन्म. (मृत्यू: ११ एप्रिल २०००)

  • १९१९: प्रसिद्ध लेखक, नाटककार, संगीतकार, दिग्दर्शक, पटकथालेखक आणि अभिनेते पुरूषोत्तम लक्ष्मण उर्फ पु. ल. देशपांडे यांचा जन्म. (मृत्यू: १२ जून २००० – पुणे)

  • १९२०: भारतीय अभिनेत्री, नृत्यांगना सितारादेवी यांचा जन्म. (मृत्यू: २५ नोव्हेंबर २०१४)

  • १९२७: भारताचे उपपंतप्रधान, केन्द्रीय माहिती व नभोवाणी मंत्री, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म.

  • १९५३: भारतीय राजकारणी नंद कुमार पटेल यांचा जन्म. (मृत्यू: २५ मे २०१३)

मृत्यू 

  • १२२६: फ्रान्सचा राजा लुई (आठवा) यांचे निधन. (जन्म: ५ सप्टेंबर ११८७)

  • १६७४: कवी, विद्वान व मुत्सद्दी जॉन मिल्टन यांचे निधन. (जन्म: ९ डिसेंबर १६०८)

  • १९६०: भारतीय हवाई दलप्रमुख सुब्रतो मुखर्जी यांचे निधन.

  • २०१३: भारतीय पत्रकार आणि अभिनेते अमांची वेक्कत सुब्रमण्यम यांचे निधन. (जन्म: २ जानेवारी १९५७)

  • २०१५: भारतीय एअर मर्शल ओमप्रकाश मेहरा यांचे निधन. (जन्म: १९ जानेवारी १९१९)

  • २०१५: उद्योगपती लॉर्ड स्वराज पॉल यांचे सुपुत्र तसेच कँपँरो ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंगद पॉल यांचे अपघाती निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.