चालू घडामोडी - ०८ ऑक्टोबर २०१८

Date : 8 October, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
कोल्हापूरचा मावळा युथ ऑलिम्पिकमध्ये चमकला, शाहु मानेला नेमबाजीत रौप्यपदक :
  • कोल्हापूरकर १६ वर्षीय शाहू माने याने भारताला युवा ऑलिम्पिक स्पर्धेतील पहिले पदक मिळवून दिले आहे. त्याच्या या पदकामुळे अर्जेंटीनाच्या ब्यूनस आयर्स येथे रविवारपासून सुरू झालेल्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने आपलं पदकांचं खातं खोललं आहे. नेमबाजीच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात शाहुने रौप्य पदकाची कमाई केली.

  • अंतिम सामन्यात अवघ्या 1.7 गुणांनी शाहुचं सुवर्ण पदक हुकलं. अंतिम सामन्यात त्याने एकूण 247.5 गुण मिळवले. तर रशियाच्या ग्रिगोरी शामाकोव याने 249.2 गुण मिळवून सुवर्ष पदक पटकावलं, आणि सर्बियाच्या अलेस्का मिट्रोविक याने 227.9 गुण मिळवून कांस्य पदक मिळवलं.

  • शाहु माने हा एकमेव भारतीय नेमबाज या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पात्र ठरला होता. पात्रता सामन्यांमध्ये त्याने शानदार प्रदर्शन करताना एकूण 623.7 गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावला होता.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शपथविधी झालेल्या १५४ पीएसआयच्या नियुक्त्यांवर गदा :
  • मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शपथविधी झालेल्या 154 पीएसआयच्या नियुक्त्यांवर गदा आली आहे. राज्य सरकार कायदा करेपर्यंत पद्दोनतीतील आरक्षण बेकायदा असल्याचं महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) स्पष्ट केलं. सरकारने 154 पोलिसांना फौजदारपदी दिलेली पदोन्नती मॅटने बेकायदा ठरवत रद्द केली आहे आणि संबंधित फौजदारांच्या नियुक्त्याही रोखल्या आहेत.

  • 154 पोलिसांना त्यांच्या मूळ जागी नियुक्त करावे किंवा नियुक्तीच्या प्रतीक्षेत ठेवावे, असे आदेशही मॅटने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी दिलेल्या निर्णयाचा सोयीचा अर्थ लावून सरकारी नोकऱ्यांमध्ये पदोन्नतीत आरक्षण लागू करण्याच्या राज्य सरकारच्या मनसुब्याला मॅटच्या या निर्णयामुळे धक्का बसला आहे. सरकारच्या भूमिकेवर राज्यात पदोन्नतीमधील आरक्षणाचं भवितव्य ठरणार आहे.

  • सरकारी सेवेत पदोन्नतीमध्येही आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय मॅटने काही वर्षांपूर्वी रद्द केला होता. राज्य सरकारने त्याविरोधात हायकोर्टात आव्हान दिलं होतं. मात्र हायकोर्टाने ऑगस्ट 2017 मध्ये मॅटचा निर्णय योग्य ठरवत पदोन्नतीमधील आरक्षणाच्या सरकारच्या भूमिकेला हादरा दिला होता.

  • उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सरकारने सर्वोच्च न्यायालयात  विशेष अनुमती याचिकेच्या माध्यमातून आव्हान दिलं असून हे प्रकरण सध्या प्रलंबित आहे.

मुख्यमंत्री असताना मला गुजरातचा दक्षिण कोरिया करायचा होता- मोदी :
  • 2001 मध्ये पहिल्यांदा गुजरातचा मुख्यमंत्री झाल्यानंतर मला गुजरातचा दक्षिण कोरिया करायचा होता, असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. रविवारी उत्तराखंड गुंतवणूकदार शिखर संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

  • मोदी म्हणाले, जगातल्या अनेक देशांमध्येही जेवढी ताकद नाही तेवढी ताकद आपल्या देशाच्या अनेक राज्यांमध्ये आहे. अनेक छोट्या देशांसोबत तुलना केल्यास आपल्या लहान राज्यांमध्येही त्या देशांपेक्षा जास्त क्षमता असल्याचं लक्षात येईल. मला अजूनही आठवतं जेव्हा मी 7 ऑक्टोबर 2001 मध्ये पहिल्यांदा गुजरातचा मुख्यमंत्री झालो होतो, प्रशासन काय असतं याबाबत मला काहीच अनुभव नव्हता. मी पुर्णतः नवखा होतो.

  • त्यावेळी एका पत्रकाराने मला ‘गुजरातच्या विकासासाठी तुमचा आदर्श कोण’ असा प्रश्न विचारला होता. सामान्यतः असा प्रश्न विचारल्यावर बहुतेक लोक सांगतात की, त्यांना त्यांचा प्रदेश अमेरिका किंवा इग्लंड सारखा बनवायचा आहे. पण मी त्याला जरा वेगळं उत्तर दिलं.

  • मला गुजरात दक्षिण कोरिया सारखा बनवायचा आहे असं मी त्याला सांगितलं. त्या पत्रकाराला काही कळालं नाही. तेव्हा मी त्याला गुजरात आणि दक्षिण कोरियाची लोकसंख्या सारखीच आहे, मी याचा सखोल अभ्यास केला असून आपण त्या दिशेने वाटचाल केल्यास आपल्याला कोणीही रोखू शकणार नाही, हे सांगितलं.

श्रीलंकेचा धुव्वा, भारताच्या अंडर-19 संघाचं सहाव्यांदा आशिया चषकावर नाव :
  • ढाका : भारताच्या अंडर-19 संघाने सहाव्यांदा आशिया चषकावर नाव कोरलं आहे. अंतिम सामन्यात श्रीलंकेवर 144 धावांनी मात करत भारताच्या युवा खेळाडूंनी हा चषक जिंकला. बांगलादेशची राजधानी ढाक्यात खेळवण्यात आलेल्या या सामन्यात श्रीलंकेच्या अंडर-19 संघाचा डाव 160 धावात गुंडाळला.

  • अंडर नाईन्टिन आशिया चषकाच्या फायनलमध्ये भारताने श्रीलंकेला विजयासाठी 305 धावांचं मोठं आव्हान दिलं होतं. मुंबईच्या यशस्वी जैसवालसह चार फलंदाजांनी झळकावलेल्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने 50 षटकांत तीन बाद 304 धावांचा डोंगर उभारला.

  • यशस्वी जैसवालने 113 चेंडूत आठ चौकार आणि एका षटकारासह 85 धावांची खेळी उभारली. त्याने अनुज रावतसह सलामीला 121 धावांची भागीदारी रचली. अनुज रावतने 57 धावांची खेळी केली. कर्णधार प्रभसिमरन मानने नाबाद 65, तर आयुष बदोनीने नाबाद 52 धावा फटकावल्या.

  • 305 धावांचा पाठलाग करता आलेल्या श्रीलंकेच्या संघाला मोठी मजल मारता आली नाही. हर्ष त्यागीने एकट्याने सहा फलंदाजांना माघारी धाडलं. दोन विकेट घेऊन त्याला सिद्धार्थ देसाईनेही छान साथ दिली. तर मोहित जंगराने एका फलंदाजाला माघारी धाडलं.

'संडे' ठरला 'सनी डे', गेल्या १० वर्षांतला दुसरा सर्वात उष्ण दिवस :
  • मुंबई : ऑक्टोबर हीटने मुंबईकरांना अक्षरशः बेजार केलं आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच तापमान वाढल्यामुळे मुंबईकरांचं चांगलंच घामटं निघत आहे. रविवारी सांताक्रुझमध्ये 37.8 अंश सेल्सिअस, तर कुलाब्यात 37 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

  • शनिवारीच मुंबईतील तापमानाने गेल्या दहा वर्षातला दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक कमाल तापमानाचा आकडा गाठला होता, मात्र दुसऱ्याच दिवशी ते तापमानही ओलांडलं गेलं. त्यामुळे रविवार 7 ऑक्टोबर हा गेल्या दहा वर्षातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात उष्ण दिवस ठरला.

  • शनिवार 6 ऑक्टोबर रोजी पारा 37.2 अंश सेल्सिअसवर पोहचला होता. 2016 पासून ऑक्टोबर महिन्यात नोंदवलं गेलेलं हे सर्वोच्च तापमान ठरलं होतं. मात्र आता रविवार 7 ऑक्टोबरचं तापमान (37.8) हे गेल्या तीन वर्षांतलं सर्वोच्च ठरलं आहे.

  • उत्तरेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे ऑक्टोबर महिन्यात मुंबईचं तापमान वाढतं. त्यातच आकाश निरभ्र असल्यामुळे सूर्यकिरणांचा थेट प्रभाव जाणवू लागतो. दोन दिवस तापमानवाढीची शक्यता असून त्यानंतर पारा उतरेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

दिनविशेष :
  • भारतीय वायुसेना दिन

महत्वाच्या घटना

  • १९३२: इंडियन एअर फोर्स अ‍ॅक्ट द्वारे भारतीय वायूदलाची स्थापना झाली.

  • १९३९: दुसरे महायुद्ध – जर्मनीने पोलंडचा पश्चिम भाग ताब्यात घेतला.

  • १९५९: स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुणे विद्यापीठाने सन्माननीय डी-लिट पदवी घरी येऊन दिली.

  • १९६२: अल्जीरीयाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.

  • १९६२: नाट्य निकेतन निर्मित, आचार्य अत्रे लिखित व प्रभाकर पणशीकर दिग्दर्शित तो मी नव्हेच या नाटकाचा पहिला प्रयोग दिल्ली येथील आयफॅक्स थिएटर येथे झाला.

  • १९७८: ऑस्ट्रेलियाच्या केन वॉर्बीने पाण्यावर ३१७.६० तशी मैल वेगाचा विक्रम केला.

  • १९८२: पोलंडने सॉलिडॅरिटी व इतर सर्व कामगार संघटनांवर बंदी घातली.

  • २००१: सप्टेंबर ११ च्या अतिरेकी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाची (Department of Homeland Security) स्थापना केली.

 जन्म

  • १८५०: फ्रेन्च रसायनशास्त्रज्ञ हेन्‍री लुईस ली चॅटॅलिअर यांचा जन्म. (मृत्यू: १७ सप्टेंबर १९३६)

  • १८८९: डेल्टा एअर लाईन्स चे सहसंस्थापक कॉलेट ई. वूल्मन यांचा जन्म. (मृत्यू: ११ सप्टेंबर १९६६)

  • १८९१: उद्योजक, साहित्यिक व चित्रकार शंकरराव वासुदेव किर्लोस्कर यांचा जन्म. (मृत्यू: १ जानेवारी १९७५)

  • १९२२:संशोधक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जैवभौतिक शास्त्रज्ञ गोपालसमुद्रम नारायण अय्यर रामचंद्रन तथा डॉ. जी. एन. रामचंद्रन यांचा जन्म. (मृत्यू: ७ एप्रिल २००१ – चेन्नई, तामिळनाडू)

  • १९२४: भारतीय कवि आणि स्कॉलर थिरूनलूर करुणाकरन यांचा जन्म. (मृत्यू: ५ जुलै २००६)

  • १९२६: जबरदस्त आवाजाने संवादफेक करून प्रेक्षकांना खूष करणारा हिन्दी चित्रपट अभिनेता कुलभूषण पंडित तथा राजकुमार ऊर्फ जानी यांचा जन्म. (मृत्यू: ३ जुलै १९९६)

  • १९२८: ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू नील हार्वे यांचा जन्म.

  • १९३०: भारतीय इंग्रजी दिग्दर्शक आणि निर्माता अलेसदैर मिल्ने यांचा जन्म. (मृत्यू: ८ जानेवारी २०१३)

  • १९६०: नेटफ्लिक्स चे सहसंस्थापक रीड हेस्टिंग्स यांचा जन्म.

१९९७: अमेरिकन अभिनेत्री बेला थोर्न यांचा जन्म.

मृत्यू

  • १३१७: जपानचे सम्राट फुशिमी यांचे निधन. (जन्म: १० मे १२६५)

  • १८८८: कवी व संस्कृतचे प्राध्यापक महादेव मोरेश्वर कुंटे यांचे निधन. (जन्म: १ ऑगस्ट १८३५ – माहुली, सांगली, महाराष्ट्र)

  • १९३६: हिन्दी साहित्यिक धनपतराय श्रीवास्तव ऊर्फ मुन्शी प्रेमचंद यांचे निधन. (जन्म: ३१ जुलै १८८०)

  • १९६७: इंग्लंडचे पंतप्रधान क्लेमंट अ‍ॅटली यांचे निधन. (जन्म: ३ जानेवारी १८८३)

  • १९७९: स्वातंत्र्यसैनिक व सर्वोदयी नेतेलोकनायक जयप्रकाश नारायण यांचे निधन. (जन्म: ११ ऑक्टोबर १९०२)

  • १९९६: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका गोदावरी परुळेकर यांचे निधन. (जन्म: १४ ऑगस्ट १९०७)

  • १९९८: देवरुख येथील मातृमंदिर संस्थेच्या संस्थापिका, कोकणच्या मदर तेरेसा इंदिराबाई हळबे ऊर्फ मावशी यांचे निधन.

  • २०१२: केन्द्रीय मंत्री व गुजरातचे राज्यपाल नवल किशोर शर्मा यांचे निधन. (जन्म: ५ जुलै १९२५)

  • २०१२: पत्रकार व पार्श्वगायिका वर्षा भोसले यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.