चालू घडामोडी - ०९ एप्रिल २०१८

Date : 9 April, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
योगी आदित्यनाथांना मिळणार दलित मित्र पुरस्कार :
  • लखनऊ: उत्तर प्रदेशातील आंबेडकर महासभा या संघटनेकडून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दलित मित्र पुरस्कार देण्यात येणार आहे. आंबेडकर महासभेकडून पहिल्यांदाच एखाद्या व्यक्तीला या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

  • संघटनेचे अध्यक्ष लालजी निर्मल यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, या पुरस्कारासाठी योगी आदित्यनाथ यांची निवड करण्यामागे अनेक कारणे आहेत. हे पहिले सरकार आहे की ज्यांनी उत्तर प्रदेशातील प्रत्येक सरकारी कार्यालयात आणि पोलीस ठाण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र लावण्याचा आदेश दिला. तसेच योगी सरकारने विधानसभेत मागासलेल्या घटकांना आरक्षण देण्याचीही घोषणा केली. या सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊन त्यांना दलित मित्र पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे लालजी निर्मल यांनी सांगितले. 

  • मात्र, योगी आदित्यनाथांना हा पुरस्कार देण्याच्या निर्णयावरून विरोधकांकडून टीकाही केली जात आहे. या टीकेला प्रत्युत्तर देताना लालजी निर्मल यांनी सांगितले की, आमच्या संघटनेला कोणतीही राजकीय संघटना निधी पुरवत नाही. त्यामुळे हे सर्व आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे लालजी यांनी सांगितले. 

  • भाजपा सरकारकडून यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात मोठ्याप्रमाणावर कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांकडून प्रत्येक जिल्ह्यात पदयात्राही काढल्या जाणार आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये दलित अत्याचार तसेच अॅट्रॉसिटी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल आणि त्यानंतर देशभरात उसळलेला हिंसाचार यामुळे भारतीय जनता पक्षातील खासदार स्वत:च्याच पक्षावर नाराज आहेत.

देशात केवळ ६ विमानतळांवरच बॉम्ब निष्क्रीय करणं शक्य :
  • भारतात सातत्याने दहशतवादी हल्ल्याचा धोका कायम आहे, त्यामुळे सार्वजनिक ठिकाणांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची ठरते. मात्र, देशातील 59 मुख्य विमानतळांपैकी केवळ 6 विमानतळांवरच सीआयएसएफची टीम बॉम्ब निष्क्रीय करू शकते. म्हणजे केवळ दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, कोचिन आणि हैदराबाद या सहा ठिकाणीच बॉम्ब निष्क्रीय करण्याची सुविधा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

  • हिंदुस्थान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान केलेल्या पाहणीमध्ये याबाबतची माहिती समोर आली आहे. सहा विमानतळांपैकी फक्त कोलकाता आणि चेन्नई विमानतळ हे एअरपोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडियाद्वारे(AAI) चालवले जातात, इतर विमानतळ खासगी आहेत. ब्यूरो फॉर सिविल एविएशन सिक्युरिटी (BCAS) च्या नियमांनुसार, विमानतळावर जवळपास 28 वस्तूंचा वापर बॉम्ब निष्क्रीय करण्यासाठी केला जातो.

  • पण या सर्व आवश्यक वस्तू केवळ 6 विमानतळावरच उपलब्ध असल्याची माहिती आहे. सीआयएसएफच्या अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, 28 वस्तूंपैकी एकही वस्तू नसेल तर बॉम्ब निष्क्रीय करता येत नाही. याबाबत AAI, BCAS आणि सिव्हील एविएशन मंत्रालयाला पत्र पाठवून माहिती देण्यात आली आहे असं या अधिका-याने सांगितलं.

जीतू रायचा 'सुवर्ण'वेध; ओम मिथरवालला कांस्यपदक :
  • वेटलिफ्टर्सच्या पाठोपाठ नेमबाजांनीही राष्ट्रकुल स्पर्धेतील धडाकेबाज कामगिरी सुरु ठेवली आहे. काल मनू भाकरने सुवर्णपदकाची कमाई केल्यावर आज जीतू रायने सोनेरी कामगिरी केली. १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात जीतू रायने सुवर्णपदक पटकावले आहे. तर ओम मिथरवालने कांस्यपदक जिंकले आहे. पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात भारताला दोन पदकांची आशा होती. भारतीय नेमबाजांनी अपेक्षित कामगिरी करत दोन पदकांची कमाई करुन भारताची स्पर्धेतील एकूण पदकांची संख्या १५ वर नेली आहे. 

  • वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक पटकावणाऱ्या जीतू रायने २३५.१ गुणांची कमाई करत सुवर्णपदकाची कमाई केली. पात्रता फेरीत ५८४ गुण पटकावून लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या ओम प्रकाश मिथरवालला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याने २१४.३ गुण मिळवले. दुसरा क्रमांक पटकावणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या केरी बेलने जीतू रायला कडवी झुंज दिली. त्याने एकूण २३३.५ गुणांची कमाई केली. मात्र जीतूने त्याचा सर्व अनुभव पणाला लावत केरी बेलला मागे टाकले आणि भारताला स्पर्धेतील आठवे सुवर्णपदक मिळवून दिले.

  • २०१४ मध्ये ग्लास्गोत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत ५० मीटर एअर पिस्तुल प्रकारात जीतू रायने सुवर्णपदकाची कमाई केली होती. मात्र त्याला १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात स्थान मिळाले नव्हते. यंदा प्रथमच जीतू राय राष्ट्रकुल स्पर्धेच्या १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करत होता. याशिवाय जीतू रायने रिओ ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरी गाठली होती. मात्र तिथे त्याला आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. 

'केंब्रिज अॅनॅलिटिकासारखे डेटा चोरीचे आणखी प्रकार समोर येऊ शकतात' :
  • केंब्रिज अॅनॅलिटिका डेटा लिक प्रकरणामुळे जगभरात टीका सहन करावी लागली होती. मात्र आता फेसबुकच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. केंब्रिज अॅनॅलिटिका डेटा लिकसारखी आणखी प्रकरणे समोर येऊ शकतात, असे फेसबुकच्या चीफ ऑपरेशन ऑफिसर शेरिल सँडबर्ग यांनी म्हटले आहे.

  • फेसुबकच्या वरिष्ठ अधिकारी वर्गात सँडबर्ग यांचे स्थान दुसऱ्या क्रमांकाचे आहे. संस्थापक मार्क झुकेरबर्गनंतर सँडबर्ग यांचा क्रमांक लागतो. त्यामुळे त्यांचे विधान अतिशय महत्त्वाचे मानले जाते. 

  • 'केंब्रिज अॅनॅलिटिका डेटा लिक प्रकरणाचा तपास सुरु आहे. मात्र असे आणखीही प्रकार उजेडात येऊ शकतात,' असे सँडबर्ग यांनी एनबीसीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना म्हटले. वापरकर्त्यांना त्यांची माहिती वापरली जाऊ नये, असे वाटत असेल तर त्यांनी त्या माहितीसाठी पैसे मोजावेत, असे म्हणत  सँडबर्ग यांनी 'पेड सेवे'चे संकेत दिले.

  • सँडबर्ग यांच्या मुलाखतीचे टीव्हीवर प्रक्षेपण झाल्यानंतर, पेड सेवा देण्याबद्दल फेसबुकला प्रश्न विचारण्यात आले. मात्र असा कोणताही विचार नसल्याचे फेसबुकने स्पष्ट केले. सँडबर्ग या जर-तरच्या स्थितीत पेड सेवेबद्दल बोलत होत्या, असे स्पष्टीकरण फेसबुकने दिले. 

पोस्ट ऑफिस खाती डिजिटल होणार; अर्थ मंत्रालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय :
  • देशातील जवळपास 34 कोटी पोस्ट ऑफिस बचत खातेधारकांना मे महिन्यापासून सर्व प्रकारच्या ऑनलाईन सेवा मिळणार आहेत. केंद्र सरकारने पोस्ट ऑफिसमधील बचत खाती इंडियन पोस्ट पेमेंट्स बँकेला (आयपीपीबी) लिंक करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे मे महिन्यापासून पोस्ट ऑफिसमध्ये खाते असलेल्या सर्वांना डिजिटल बँकिंग सुविधेचा लाभ घेता येईल.

  • अर्थ मंत्रालयाने पोस्ट ऑफिसमधील खात्यांना आयपीपीबीला लिंक करण्याची परवानगी दिल्याची माहिती अर्थ मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे आता पोस्ट ऑफिसचे खातेधारक आपल्या खात्यातून दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात ऑनलाईन पैसे पाठवू शकतात. 34 कोटी बचत खात्यांपैकी 17 कोटी पोस्ट ऑफिस बचत खाती आहेत. तर उर्वरित खाती मासिक उत्पन्न योजना आणि आरडी या प्रकारात मोडतात. 

  • सरकारने उचललेल्या या पावलामुळे देशात सर्वात मोठे बँकिंग नेटवर्क तयार होईल. भारतीय पोस्ट खात्यांतर्गत येणाऱ्या 1.55 लाख कार्यालयांना आयपीपीबीला लिंक करण्याची योजना असल्याने देशात सर्वात मोठे बँकिंग नेटवर्क उभे राहिल. 'आयपीपीबी रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारित येते. तर पोस्ट ऑफिसच्या बँकिंग सुविधा अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत येतात.

  • सध्या इतर बँकेचे ग्राहक या सेवांचा लाभ घेत आहेत. पोस्ट ऑफिस बचत खाती आयपीपीबीला लिंक झाल्यावर सर्व खातेधारक इतर बँकांच्या ग्राहकांप्रमाणे रोख हस्तांतरण सेवेचा वापर करु शकतात,' अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मे महिन्यापासून पोस्ट ऑफिसमध्ये खाती असलेल्या सर्वांना या सेवेचा लाभ घेता येईल. ही सेवा पूर्णपणे ऐच्छिक असणार आहे. त्यामुळे ती स्वीकारायची की नाही, याची निवड ग्राहकांना करता येईल.

जुलैमध्ये सूर्यावर पहिली स्वारी :
  • वॉशिंग्टन : माणसाने सूर्यावर स्वारी करण्याची कल्पना आता प्रत्यक्षात साकारणार आहे. पार्कर सोलार प्रोब हे नासाचे अंतराळयान ३१ जुलै रोजी सूर्याच्या दिशेने झेपावणार आहे. हे अंतराळयान हवाई दलाच्या विमानातून फ्लोरिडा येथे नेण्यात आले असून तिथे त्याच्या काही चाचण्या घेण्यात येत आहेत. डेल्टा आयव्ही अग्निबाणाच्या सहाय्याने पार्कर सोलार प्रोब अवकाशात प्रक्षेपित करण्यात येईल. ते सूर्याच्या अगदी जवळ जाणार आहे.

  • आजवर तिथपर्यंत मानवनिर्मित एकही गोष्ट पोहोचू शकलेली नाही. सूर्यातून होणारा किरणोत्सार, तसेच प्रचंड तप्त वातावरण याचा सामना करत पार्कर सोलार प्रोबला आपले शोधकार्य पार पाडावे लागणार आहे. सौरवायू, तसेच ग्रहमालेतील व पृथ्वीजवळील हवामानावर परिणाम करणारे सूर्याच्या पृष्ठभागावरील घटक यांचा अभ्यास या मोहिमेत करण्यात येईल. पार्कर सोलार प्रोब अंतराळयानाला थर्मल प्रोटेक्शन सीस्टिम किंवा हिट शिल्ड बसविण्याचेही काम लवकरच पूर्ण करण्यात येईल. सूर्यावर प्रचंड उष्णता असून, त्यापासून हिट शिल्ड या अंतराळयानाचे संरक्षण करेल.

  • सात वर्षे चालणार मोहीम अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स अप्लाइड फिजिक्स लॅबोरेटरीतील प्रार्कर सोलार प्रोब प्रकल्पाचे व्यवस्थापक व शास्त्रज्ञ अँडी ड्राईजमन यांनी सांगितले की, हा प्रकल्प साकारण्यासाठी अनेक शास्त्रज्ञांनी अतिशय परिश्रम घेतले आहेत. नासाच्या फ्लोरिडा येथील केनेडी अंतराळ केंद्रातून या प्रोब सोलार प्रोबचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या मोहिमेचा कालावधी सात वर्षांचा आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १८६७: रशियाकडून अलास्का हा प्रांत खरेदी करण्याच्या प्रस्तावास अमेरिकेत एक मताने मंजुरी मिळाली.

  • १९४०: दुसरे महायुद्ध – जर्मनीने नॉर्वे व डेन्मार्क पादाक्रांत केले.

  • १९६७: बोइंग-७६७ या विमानाने पहिले उड्डाण केले.

  • १९९४: सूक्ष्मजीवशास्त्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल शास्त्रज्ञ पी. एम. भार्गव यांना आर. डी. बिर्ला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

  • १९९५: लता मंगेशकर यांना अवधरत्न आणि साहू सूरसन्मान प्रदान करण्यात आले.

जन्म

  • १७७०: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ थॉमस योहान सीबेक यांचा जन्म.

  • १८२८: समाजसुधारक गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांचा जन्म. (मृत्यू: २५ जुलै१८८०)

  • १८८७: पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक विष्णू गंगाधर तथा दादासाहेब केतकर यांचा जन्म. (मृत्यू: १९ ऑक्टोबर १९५०)

  • १८९३: बौद्धधर्माचे भाष्यकार आणि इतिहासकार राहुल सांकृत्यायन यांचा जन्म. (मृत्यू: १४ एप्रिल१९६३)

  • १९२५: अमेरिकन ज्योतिषी व लेखिका लिंडा गुडमन यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑक्टोबर १९९५)

  • १९३०: अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ एफ. अल्बर्ट कॉटन यांचा जन्म.

  • १९४८: हिंदी चित्रपट अभिनेत्री जया भादुरी बच्चन यांचा जन्म.

मृत्यू

  • १६२६: इंग्लिश तत्त्ववेत्ते व मुत्सद्दी सर फ्रँन्सिस बेकन यांचे निधन. (जन्म: २२ जानेवारी १५६१)

  • १६९५: पंडितकवी वामनपंडित यांनी भोगाव येथे समाधी घेतली.

  • १९९४: स्वातंत्र्यसैनिक, तेलंगणच्या लढ्याचे प्रवर्तक तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस चंद्र राजेश्वर राव यांचे निधन.

  • १९९८: महानुभाव पंथाचे अभ्यासक, विचारवंत व तत्त्वज्ञ, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विष्णू भिकाजी तथा वि. भि. कोलते यांचे निधन. (जन्म: २२ जून १९०८)

  • २००१: पत्रकार आणि स्तंभलेखक बेहराम काँट्रॅक्टर ऊर्फ बिझी बी यांचे निधन. (जन्म: ११ ऑक्टोबर१९३०)

  • २००१: दलित साहित्यिक तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू शंकरराव खरात यांचे निधन. (जन्म: ११ जुलै १९२१)

  • २००९: हिंदी व बंगाली चित्रपट दिग्दर्शक निर्माते शक्ती सामंत यांचे निधन. (जन्म: १३ जानेवारी १९२६)

  • २००९: लोककलांचे अभ्यासक आणि गीतकार अशोकजी परांजपे यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.