चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०९ एप्रिल २०१९

Date : 9 April, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
८ वर्षांपासून गवंडीकाम करणारा सुमित बनला 'कलेक्टर' :
  • भोपाळ - मध्य प्रदेशच्या सिवनी जिल्ह्यातील सुमित विश्वकर्माने आयएएस परीक्षेत दैदिप्यमान यश मिळवले आहे. सुमितच्या या यशाबद्दल अवघ्या मध्य प्रदेशला कौतुक आहे. कारण, गरिबीचे चटके सोसत आणि परिस्थितीशी दोन हात करत सुमितने हे यशाचे एव्हरेस्ट पार केले आहे. दिवसा वडिलांसोबत मिस्त्री काम करुन रात्री 8 ते 10 तास अभ्यास, असा दिनक्रम सुमितचा असे. सुमितच्या या यशानंतर त्याच्या गावात उत्साह असून अनेकांनी मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला. 

  • मध्य प्रदेशच्या सिवनी जिल्ह्यातील घंसौर तालुक्यातील एका 250 वस्ती असलेल्या गावचा रहिवासी असलेल्या सुमित विश्वकर्माने युपीएससी परीक्षेत 53 वी रँक मिळवली आहे. सुमित बांधकामावर मिस्त्रीकाम करणाऱ्या कामगार बापाचा मुलगा आहे. तर, त्याने स्वत:ही बांधकाम क्षेत्रात मजदूर बनून काम केलं आहे. बांधकामावर मजदुरीचे काम करतच, त्याने या यशाला गवसणी घातली आहे.

  • मध्य प्रदेशमध्ये बांधकाम करणाऱ्या सुमितला 'मिस्त्री' असे संबोधतात. आपल्या मेहनतीच्या जोरावर आणि जिद्दीवर सुमितने यंदा युपीएससी परीक्षा क्रॅक केली. आपल्या मुलाखतीवेळी सुमितला OK या शब्दाचा अर्थ विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना, सुमितने Objection killed असे वेगळ्याच धाटणीचे उत्तर दिले. आपल्या याच वेगळ्या विचाराच्या जोरावर सुमितने अशक्य ते शक्य करुन दाखवले. ज्या कॉलेजमध्ये सुमितने शिक्षण घेतले, त्याच कॉलेजमध्ये सुमित मजदुरीचे काम करत होता.

देशभरातल्या विद्यापीठांच्या यादीत पुणे विद्यापीठ ९ व्या तर मुंबई विद्यापीठ  व्या स्थानी :
  • नवी दिल्ली : मानव संसाधन विकास मंत्रालयाने (HRD) उच्च शैक्षणिक संस्थांची क्रमवारी (NIRF 2019 Rankings) घोषित केली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्था, सर्वोतृष्ट विद्यापीठं आणि सर्वोत्कृष्ट अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थांच्या यादीमध्ये पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाला 10 वे स्थान प्राप्त झाले आहे तर मुंबई विद्यापीठाला पहिल्या 100 मध्येदेखील स्थान मिळवता आलेले नाही.

  • सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या यादीत पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाला नववे स्थान प्राप्त झाले आहे तर मुंबई विद्यापीठ 81 व्या स्थानी आहे. विद्यापीठांच्या यादीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरुने पहिला क्रमांक पटकावला आहे तर टॉप 10 विद्यापीठांच्या यादीत महाराष्ट्रातील केवळ पुणे विद्यापीठाला स्थान मिळवता आले आहे.

  • अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या यादीत आयआयटी मद्रासने पहिला क्रमांक पटकावला आहेत. तर या या यादीत आयआयटी बॉम्बे या महाराष्ट्रातल्या एकमेव अभियांत्रिकी संस्थेला स्थान मिळवता आले आहे. आयआयटी बॉम्बेला तिसरा क्रमांक मिळाला आहे. ही क्रमवारी ठरवण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूशनल रॅन्किंग फ्रेमवर्कने (NIRF)संपूर्ण भारतातील सर्व विद्यापीठ, महाविद्यालय, मॅनेजमेंट, फार्मसी, मेडिकल, आर्किटेक्चर आणि विधी महाविद्यालयांचा अभ्यास केला होता.

भाजप आणि काँग्रेसचे जाहीरनामे, कोण काय देणार :
  • नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 2 एप्रिल रोजी काँग्रेसने त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. खूप प्रतीक्षेनंतर आज भारतीय जनता पक्षानेदेखील जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. कॉंग्रेसच्या जाहीरनाम्याची सुरुवात रोजगाराने करण्यात आली आहे, तर भाजपच्या जाहीरनाम्याची सुरुवात ही दहशतवादाविरोधात झिरो टाँलरन्सने केली आहे.

  • काय आहे काँग्रेसच्या जाहीरनाम्यात - काँग्रेस सत्तेत आल्यास शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करण्याची घोषणा काँग्रेसने केली. प्रत्येक वर्षी 20 टक्के गरिबांच्या खात्यात 72,000 रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले आहे. काँग्रेसने या योजनेसाठी 'गरीबी पर वार, हर साल 72 हजार' चा नारा दिला आहे. 22 लाख सरकारी नोकऱ्यांचे आश्वासन काँग्रेसने दिलं आहे. 10 लाख लोकांना ग्रामपंचायतींमध्ये रोजगार देण्याचं वचन दिलं आहे. जीडीपीचा 6 टक्के भाग शिक्षण क्षेत्रावर खर्च केला जाईल. यासोबतच काँग्रेसने सत्तेत आल्यावर देशद्रोहाचे कलम रद्द करण्याचे आश्वासन दिले आहे.

  • काय आहे भाजपच्या जाहीरनाम्यात - भाजपने यावेळी पुन्हा एकदा राम मंदिर बांधण्याचे आश्वासन दिले आहे. 75 वैद्यकीय महाविद्यालय, विद्यापीठ स्थापन करणार. 2022 पर्यंत देशातील सर्व रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण, छोट्या दुकानदारांना पेन्शनची योजना, कृषी क्षेत्रातील उत्पादकता वाढवण्यासाठी 25 लाख कोटी रुपये गुंतवणूकीचे आश्वासन, शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये, तसेच 60 वर्षांवरील शेतकऱ्यांना पेन्शनची सुविधा देण्याचे आश्वासन, 1 लाखांपर्यंतच्या कृषी कर्जावर 5 वर्षांपर्यंत व्याज नाही, तीन तलाकविरोधात कायदा आणून मुस्लिम महिलांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन, पायाभूत सुविधांसाठी 100 लाख कोटी रुपये गुंतवणूक आणि सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांसाठी 1 लाख कोटी रुपये देण्याचे आश्वासन भारतीय जनता पक्षाने त्यांच्या जाहीरनाम्याद्वारे दिले आहे.

भाजपने ३७० कलम रद्द केले तर आम्ही भारतापासून वेगळे होऊ, फारुक अब्दुल्लाह यांचा इशारा :
  • श्रीनगर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 आणि कलम 35 ए हटवण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे. भाजपाच्या या घोषणेनंतर जम्मू-काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि खासदार फारुख अब्दुल्लाह यांनी भारतापासून वेगळे होण्याचा इशारा दिला आहे.

  • अब्दुल्लाह म्हणाले की, कलम 370 आणि कलम 35 अ हटवलं तर आम्हाला भारतापासून वेगळं होणं सोपं जाईल. तसेच आम्हाला स्वतंत्र होणेदेखील सोपे होईल. त्यांना (भाजपला)ते कलम हटवायचे आहे. हे कलम हटवल्यानंतर काश्मीरबाहेरचे लोक काश्मीरमध्ये राहू शकतील, येथे जमीन खरेदी करु शकतील. त्यामुळे ते (भाजप) काश्मीरमध्ये बाहेरची माणसं आणून इथे त्यांना वास्तव्य करायला देतील. हळूहळू आमची संख्या कमी होईल आणि बाहेरुन आलेल्या लोकांची संख्या वाढेल, पण तोवर आम्ही काय झोपा काढत बसणार आहोत का? असा सवालही अब्दुल्लाह यांनी भाजपला विचारला आहे.

  • अब्दुल्लाह म्हणाले की, अशा परिस्थितीत आम्ही त्यांच्याशी दोन हात करु. 370 कलम ते कसं हटवतात ते पाहतोच, अल्लाह शपथ सांगतो, जर असं झालं, तर आम्ही भारतापासून स्वतंत्र होऊ आणि मी पाहतोच कोण यांचा झेंडा (तिरंगा)फडकावतो.

अनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या इलेक्शन ड्युटीबाबत धोरण सादर करा - हायकोर्ट :
  • मुंबई : निवडणुकीच्या काळात अनुदानित शाळांमधील शिक्षकांना प्रतिदिन किती तास इलेक्शन ड्युटीसाठी बोलावणार? त्याचबरोबर शिक्षकांसोबत शाळेतील इतर कर्मचाऱ्यांनाही निवडणुकीचे काम लागू शकतं का? असा सवालही सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला विचारला आहे. अनुदानित शाळा संघटनेच्यावतीने यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकांवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती मनोज संकलेचा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरु आहे.

  • निवडणूक आयोगाकडून याचिकाकर्त्यांना इलेक्शन ड्युटीवर तात्काळ रुजू होण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र शाळांमध्येही इतर कामं असतात, त्यामुळे याची पूर्वसूचना देणे गरजेचं आहे. तसंच या कामाचा निश्चित अवधी या नोटीसमध्ये दिलेला नसल्यामुळे अनेकदा कर्मचाऱ्यांना कामाच्या वेळेपेक्षा अधिक काम करावं लागतं, असा आरोप करत याबाबत संघटनेने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

  • यावर संबंधित शाळा या अनुदानित असल्यामुळे त्यांच्या शिक्षकांना आयोग निवडणुकीच्या कामासाठी बोलावू शकतं, असा खुलासा आयोगाच्यावतीने करण्यात आला आहे. मात्र नियमानुसार या कामासाठी निश्‍चित वेळ मर्यादेबाबत काही धोरण आहे का? असा प्रश्‍न हायकोर्टाने उपस्थित केला आहे. यावर बुधवारीच्या सुनावणीत आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश हायकोर्टाने आयोगाला दिले आहेत.

वर्ल्डकपसाठी १५ एप्रिलला भारतीय संघाची घोषणा, चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजावरुन डोकेदुखी :
  • मुंबई : इंग्लंडमधल्या आगामी वन डे विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा 15 एप्रिल रोजी मुंबईत होणार आहे. आज झालेल्या बीसीसीआयच्या प्रशासकीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भारतीय निवड समितीचे अध्यक्ष एम एस के प्रसाद संघाची घोषणा करतील.

  • आयसीसीने विश्वचषकात सहभागी होणाऱ्या सर्व देशांना 23 एप्रिलपर्यंत संघ जाहीर करण्याची मुदत दिली आहे. बीसीसीआयने या मुदतीच्या आठ दिवस अगोदरच संघ जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • भारतीय संघात कर्णधार विराट कोहलीसह अनेक खेळाडूंची जागा निश्चित आहे. तर काही खेळाडू असे आहेत की निवड समितीने आपल्यावर विश्वास दाखवावा, अशी त्यांची अपेक्षा आहे. संघात चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजावरुन निवड समितीची डोकेदुखी वाढली आहे. निवड समिती रिषभ पंत किंवा अंबाती रायुडू यांच्यावर विश्वास दाखवू शकते.

  • विजय शंकरनेही मागील काही महिन्यात दमदार कामगिरी केली आहे आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यालाही संघात जागा मिळू शकते. तसंच संघात चौथ्या फलंदाजाची जागाही रिकामी आहे आणि आयपीएलमध्ये आरसीबीसाठी शानदर कामगिरी करणाऱ्या नवदीप सैनीवरही निवड समितीची नजर असेल.

उर्मिला मातोंडकर ६९ कोटींच्या धनी :
  • चित्रपटसृष्टीत एकेकाळी रंगीला, जुदाई सारख्या हिट्ट चित्रपटांच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर अधिराज्य गाजविणारी आणि राजकीय पटलावर प्रथमच आपले भाग्य आजमाविण्यास सज्ज झालेल्या काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर या तब्बल ६९ कोटींच्या धनी आहेत. रुपारेल महाविद्यालयातून एसवायबीएपर्यंत शिक्षण घेतलेल्या मातोंडकर यांच्यावर कोणताही गुन्हा नाही.

  • मातोंडकर दाम्पत्याकडे तब्बल ४१ कोटी २५ लाखांची जंगम तर २७ कोटी ६४ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यामध्ये तब्बल ६६ लाखांची आलिशान मर्सिडिज, १६ लाखांची टाटा स्टार्म, सात लाखांची हय़ुंदाई आय-२० तसेच दोन लाखांची रॉयल ईनफिल्ड अशा महागडय़ा गाडय़ा असून एक कोटी २७ लाखांचे हिरे १७ लाखांचे दागिने आणि वसईत एक कोटी ६८ लाखांची नऊ एकर शेतजमीन आहे. त्याचप्रमाणे मुंबईत राहत्या घरासह व्यापारी, निवासी गाळे अशी २५ कोटींची मालमत्ता असून ५० लाखांचे कर्ज आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १८६७: रशियाकडून अलास्का हा प्रांत खरेदी करण्याच्या प्रस्तावास अमेरिकेत एक मताने मंजुरी मिळाली.

  • १९४०: दुसरे महायुद्ध – जर्मनीने नॉर्वे व डेन्मार्क पादाक्रांत केले.

  • १९६७: बोइंग-७६७ या विमानाने पहिले उड्डाण केले.

  • १९९४: सूक्ष्मजीवशास्त्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल शास्त्रज्ञ पी. एम. भार्गव यांना आर. डी. बिर्ला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

  • १९९५: लता मंगेशकर यांना अवधरत्न आणि साहू सूरसन्मान प्रदान करण्यात आले.

जन्म 

  • १३३६: मंगोल सरदार तैमूरलंग यांचा जन्म. (मृत्यू: १८ फेब्रुवारी १४०५)

  • १७७०: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ थॉमस योहान सीबेक यांचा जन्म.

  • १८२८: समाजसुधारक गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांचा जन्म. (मृत्यू: २५ जुलै १८८०)

  • १८८७: पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक विष्णू गंगाधर तथा दादासाहेब केतकर यांचा जन्म. (मृत्यू: १९ ऑक्टोबर १९५०)

  • १८९३: बौद्धधर्माचे भाष्यकार आणि इतिहासकार राहुल सांकृत्यायन यांचा जन्म. (मृत्यू: १४ एप्रिल १९६३)

  • १९२५: अमेरिकन ज्योतिषी व लेखिका लिंडा गुडमन यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑक्टोबर १९९५).

मृत्यू 

  • १६९५: पंडितकवी वामनपंडित यांनी भोगाव येथे समाधी घेतली.

  • १९९४: स्वातंत्र्यसैनिक, तेलंगणच्या लढ्याचे प्रवर्तक तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस चंद्र राजेश्वर राव यांचे निधन.

  • १९९८: महानुभाव पंथाचे अभ्यासक, विचारवंत व तत्त्वज्ञ, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विष्णू भिकाजी तथा वि. भि. कोलते यांचे निधन. (जन्म: २२ जून १९०८)

  • २००१: पत्रकार आणि स्तंभलेखक बेहराम काँट्रॅक्टर ऊर्फ बिझी बी यांचे निधन. (जन्म: ११ ऑक्टोबर १९३०)

  • २००१: दलित साहित्यिक तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू शंकरराव खरात यांचे निधन. (जन्म: ११ जुलै १९२१)

  • २००९: लोककलांचे अभ्यासक आणि गीतकार अशोकजी परांजपे यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.