चालू घडामोडी- ०९ ऑगस्ट २०१८

Date : 9 August, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारतीय अर्थव्यवस्था धावणाऱ्या हत्तीप्रमाणे - आंतरराष्ट्रीय नाणेनिधी :
  • भारतीय अर्थव्यवस्था जगात सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर असल्याचे गौरवोद्गार आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) म्हटले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत करण्यात आलेल्या सुधारणांचे फायदे आता दिसून येत असल्याचे आयएमएफने म्हटले आहे.

  • २.६ ट्रिलियन डॉलर इतका अवाढव्य असलेला भारतीय अर्थव्यवस्थेच्या हत्तीने आता धावण्यास सुरूवात केली असल्याचे आयएमएफचे भारतीय मिशन प्रमुख रानिल साल्गादो यांनी म्हटले. आयएमएफच्या ताज्या अहवालानुसार, भारत मार्च २०१९ पर्यंत ७.३ टक्के आणि त्यानंतर ७.५ टक्के वेगाने विकास करेल. जागतिक वाढीत भारताचा १५ टक्के हिस्सा असेल, असेही या अहवालात म्हटले आहे.

  • एका वार्षिक अहवालानुसार साल्गादो म्हणाले की, परचेसिंग पॉवर पॅरिटी (पीपीपी) प्रकरणी एकूण जागतिक वाढीत भारताचा १५ टक्के हिस्सा असेल. पण ट्रेडिंग चीनप्रमाणे नसेल. दीर्घ काळापर्यंत जागतिक वाढीचा मुख्य स्त्रोत म्हणून भारताकडे पाहिले जाते.

  • पुढील तीन दशके किंवा त्यापेक्षाही अधिक भारत जागतिक अर्थव्यवस्थेतील महत्वाचा स्त्रोत असेल. तीन दशकात भारत तिथे असेल जिथे काही काळापर्यंत चीनने आपले स्थान निर्माण केले होते, असेही त्यांनी म्हटले.

नरेंद्र मोदींचा ‘अध्यात्मिक गुरु’ असल्याची बतावणी करणाऱ्याविरोधात गुन्हा :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अध्यात्मिक गुरू असल्याची बतावणी करणाऱ्या पुलकीत महाराजविरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चौकशीसाठी पुलकीत महाराजला बोलावणार असून यानंतरच अटकेची कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

  • पंतप्रधान कार्यालयात कार्यरत असलेल्या सहाय्यक संचालकांनी दिल्ली पोलीस आयुक्त अमूल्य पटनाईक यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती. ‘आचार्य पुलकीत महाराज उर्फ पुलकीत मिश्रा या व्यक्तीने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अध्यात्मिक गुरु असल्याचे बतावणी केली’, असे त्यांनी तक्रारीत म्हटले होते.

  • पंतप्रधान कार्यालयाला उत्तर प्रदेशमध्ये पुलकीत महाराज या व्यक्तीने जिल्हाधिकाऱ्यांना बोगस पत्र दिल्याचे समजले होते. या प्रकरणात सीतापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पंतप्रधान कार्यालयाच्या नावाने बनावट पत्र पाठवण्यात आले होते. या पत्रात पुलकीत नावाच्या व्यक्तीला सुरक्षा पुरवण्याचे आणि त्याच्या निवासाची व्यवस्था करावी, असे म्हटले होते.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाचा गैरवापर केला गेला असून संबंधितांवर कारवाई करावी, अशी विनंती सहाय्यक संचालकांकडून दिल्ली पोलीस आयुक्तांना करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करुन गुन्हा दाखल केला आहे.

आशियाईच्या तयारीला पुरेसा वेळ मिळाला नाही :
  • हैदराबाद : ‘आशियाई स्पर्धेची तयारी करण्यासाठी भारतीय बॅडमिंटनपटूंना पुरेसा वेळ मिळालेला नाही. असे असले तरी इंडोनेशियात १८ आॅगस्टपासून सुरू होत असलेल्या या स्पर्धेत पदक जिंकण्यास आम्ही सज्ज आहोत,’ असे स्टार खेळाडू पी. व्ही. सिंधू हिने म्हटले आहे.

  • भारतीय बॅडमिंटन संघाने चार वर्षांआधी इंचियोन येथे केवळ एक कांस्य जिंकले होते. पण यंदा पदकांचा रंग बदलेल, असे सिंधूला वाटते. रविवारी विश्व चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात स्वत:चे दुसरे रौप्य आणि एकूण चौथे पदक जिंकणारी सिंधू म्हणाली,‘आम्हाला सांघिक व्यतिरिक्त वैयक्तिक स्पर्धांमध्ये खेळायचे असल्याने पदकांचा रंग बदलेल. तयारीसाठी वेळ कमी असला तरी उत्कृष्ट निकाल येतील अशी अपेक्षा बाळगण्यास हरकत नाही.’

  • वैयक्तिकरीत्या माझी कामगिरी चांगली होईल, अशी अपेक्षा आहे. विश्व चॅम्पियनशिपच्या रौप्यपदकामुळे आत्मविश्वास वाढला आहे. भारताने आशियाईच्या महिला एकेरीत अद्याप पदक जिंकलेले नाही. १९९२ च्या दिल्ली आशियाडमध्ये सय्यद मोदी यांनी एकमेव वैयक्तिक पदक जिंकले होते. यंदा महिलांमध्ये सिंधू पदकाची दावेदार असल्याचे मत राष्टÑीय कोच गोपीचंद यांनी नुकतेच व्यक्त केले आहे. गोपीचंद म्हणाले, ‘सिंधूकडून आगामी दहा दिवसानंतर महिला गटात आशियाईचे पदक जिंकण्याची अपेक्षा बाळगली जाऊ शकते.’

  • विश्व स्पर्धेत अन्य भारतीय खेळाडूंबाबत गोपीचंद म्हणाले, ‘या स्पर्धेत आमचे चार खेळाडू उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाले हे आतापर्यंतची मोठे यश आहे. तरीही अजून सुधारणा करण्याची गरज आहे. प्रणय व किदाम्बी श्रीकांत आणखी चांगली कामगिरी करू शकले असते.’

  • विश्व चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकून मी फार आनंदी आहे. हा आठवडा चांगला राहिला. मला कठीण ड्रॉ मिळाला होता. पहिल्या फेरीपासूनच अटीतटीचे सामने झाले. माझ्याकडून मी शंभर टक्के योगदान दिले. सुवर्ण पदकासाठी मात्र मला कठोर मेहनत घ्यावी लागेल. एक दिवस सुवर्ण पदक नक्कीच मिळेल.

शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार :
  • मीरा रोड : शहीद मेजर कौस्तुभ राणे यांचे पार्थिव बुधवारी सायंकाळी आयएनएस हमला या सैन्यदलाच्या मुंबईतील तळावर विमानाने आणण्यात आले असून, उद्या सकाळी त्यांच्या मीरा रोड येथील घरी आणले जाणार आहे. सकाळी ९ पासून नागरिकांना अंत्यदर्शन घेता येणार आहे. त्यानंतर, मीरा रोडच्या वैकुंठभूमीत अंत्यसंस्कार केले जातील. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कौस्तुभ यांच्या वडिलांचे दूरध्वनीवरून सांत्वन केले.

  • काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लढताना शहीद झालेले २९ वर्षीय मेजर कौस्तुभ यांचे पार्थिव सकाळी काश्मीरहून दिल्लीला आणण्यात आले. दुपारी ३ वाजता दिल्लीहून त्यांचे पार्थिव मालाडच्या आयएनएस हमला या लष्करीतळावर आणण्यात आले.

  • बुधवारी त्यांचे पार्थिव येण्याची शक्यता पाहता, महापालिकेने परिसरात तसेच मीरा रोड वैकुंठभूमीत साफसफाई करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून ठेवल्या होत्या. दरम्यान, सायंकाळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार प्रताप सरनाईक यांनी राणे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव यांनी दूरध्वनीवरून मेजर राणे यांचे वडील प्रकाश यांचे सांत्वन केले.

  • मेजर राणे व तुम्हा कुटुंबीयांचा सार्थ अभिमान असून, मीरा-भार्इंदरमध्ये त्यांचे स्मारक उभारणार असल्याचे सांगितले. शिंदे यांनी एकूणच व्यवस्थेचा आढावा घेतला, तसेच मराठा समाजास शहरातील बंद मागे घेण्याचे आवाहन केले आहे. सकाळी पालकमंत्री विनोद तावडे यांनी राणे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. सकाळपासूनच नागरिकांनी राणे यांच्या निवासस्थानाजवळ गर्दी करण्यास सुरुवात केली होती. या वीरपुत्राला आदरांजली वाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने येत आहेत. सोशल मीडियावरूनही शहीद राणे यांना आदरांजली वाहिली जात आहे.

सहा महिन्यानंतर अक्षयकुमारसाठी आली ‘गोल्ड’न मोमेंट, बनला सर्वाधिक लोकप्रिय :
  • यंदा फेब्रुवारी माहिन्यात रिलीज झालेल्या आपल्या पॅडमॅन चित्रपटामुळे अक्षय कुमार स्कोर ट्रेन्ड्स इंडियाच्या चार्टवर सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता  बनला होता. त्यानंतर सहा महिन्यात बहुतेक आठवड्याच्या अखेरीस सलमान खानच नंबर वन स्थानी असल्याचं दिसून येतं होतं. मात्र आता सहा महिन्यानंतर पुन्हा एकदा खिलाडी कुमारने बाजी मारली आहे.

  • आपल्या गोल्ड सिनेमाच्या लोकप्रियतेमूळे अक्षय कुमार पून्हा एकदा स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टवर सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रिटी बनला आहे. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे. 

  • स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या माहितीनूसार, अक्षयकुमार 81 गुणांसह सर्वोच्च स्थानी पोहोचला आहे. तर दबंग खान 69 गुणांसह दूस-या स्थानी आणि अमिताभ बच्चन 67 गुणांसह तिस-या स्थानावर आहेत. किंग खान 37 गुणांसह चौथ्या स्थानी तर संजय दत्त 32 गुणांसह पांचव्या स्थानी आहे.

  • स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल म्हणतात,, “जेव्हा जेव्हा अक्षयकुमारचा चित्रपट येतो, तेव्हा लोकप्रियतेमध्ये कोणी त्याला मागे टाकू शकत नाही, हे ह्या गोष्टीने सिध्द झालंय. सहा महिन्यांपूर्वी जेव्हा अक्षयकुमारचा पॅडमॅन सिनेमा आला होता तेव्हा संपूर्ण फेब्रुवारी महिन्यात सर्वत्र खिलाडीकुमारच दिसत होता. आता सुध्दा जेव्हा गोल्ड चित्रपट रिलीज होतोय. सहा महिन्यांपासून जवळ जवळ प्रत्येक आठवड्यामध्ये नंबर वन असलेल्या सलमान खानला त्याने मागे टाकले आहे.” 

मराठा क्रांती मोर्चाकडून आज महाराष्ट्र बंद :
  • महाराष्ट्र बंद मुंबई : गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या मराठा क्रांती मोर्चाने आज म्हणजेच 9 ऑगस्ट रोजी 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे. या बंदमध्ये मुंबईचा समावेश असला, तरी नवी मुंबई आणि ठाण्यातील मराठा समाज सहभागी होणार नाही. मराठा समाज समन्वयक आणि पोलिसांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. वारंवार नागरिकांना वेठीस धरणं योग्य नसल्याचं सांगून नवी मुंबई आणि ठाण्यातील मराठा संघटनांनी बंदमधून माघार घेतली आहे. या ठिकाणी बंदऐवजी ठिय्या करुन निषेध नोंदवला जाणार आहे.

  • मराठा समाजाला आरक्षण द्यावं, आरक्षण जाहीर होईपर्यंत मेगा भरती स्थगित करावी, कोपर्डी बलात्कारातील आरोपींना फाशी द्यावी या प्रमुख मागण्यात मराठा आंदोलकांच्या आहेत. त्यापैकी मेगा भरती स्थगित करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5 ऑगस्ट रोजी केली.

  • मराठा आरक्षण मागणीसाठीच्या आंदोलनादरम्यान औरंगाबादमध्ये आंदोलक काकासाहेब शिंदे या तरुणाचा 23 जुलैला गोदावरी नदीत पडून मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधासाठी मराठा क्रांती मोर्चाने 24 जुलैला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली होती. त्यानंतर 25 जुलैला मुंबई बंदची हाक देण्यात आली होती.  त्यानंतर आज 9 ऑगस्ट अर्थात क्रांती दिनाचं औचित्य साधत, मराठा मोर्चाने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

दिनविशेष :
  • भारतीय स्वतंत्र चळवळीचा क्रांतिदिन

महताच्या घटना

  • ११७३: पिसाच्या मनोर्‍याचे बांधकाम सुरू झाले. हा मनोरा बांधण्यास २०० वर्षे लागली आणि चुकीने तो तिरका बांधला गेला.

  • १८९२: थॉमस एडिसन यांना दुहेरी तार यंत्राचे पटेंट मिळाले.

  • १९२५: चंद्रशेखर आझाद आणि त्यांच्या सहकार्यांनी काकोरी रेल्वेस्थानकावर सरकारी खजिना लुटला.

  • १९४२: क्रांतिदिन. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याच्या क्रांतीचे पर्व मुंबई येथून सुरु झाले.

  • १९४२: चले जाव चा नारा दिल्याबद्दल महात्मा गांधींना अटक करण्यात आली.

  • १९४५: अमेरिकेने दुसरा अणुबाँब जपानच्या नागासाकी या शहरावर टाकला.

  • १९६५: मलेशियातुन बाहेर काढल्यामुळे सिंगापूर हा देश स्वतंत्र झाला. आपल्या इच्छेविरुद्ध स्वतंत्र झालेला हा जगातील एकमेव देश आहे.

  • १९७४: वॉटरगेट प्रकरण – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी राजीनामा दिला.

  • १९९३: छोडो भारत चळवळीच्या सुवर्णजयंती सांगतासमारंभानिमित्ताने सरहद गांधी खान अब्दुल गफार खान यांच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन.

  • १९७५: पंतप्रधानांच्या विरुध्द कोर्टात जाण्यास मनाई करणारे विधेयक संसदेत मंजूर करण्यात आले. या वेळी बरेच विरोधी पक्षनेते तुरुंगात होते.

  • २०००: भाभा अणूसंशोधन केन्द्राचे (BARC) संचालक डॉ. अनिल काकोडकर यांना दिल्ली येथील इन्स्टिट्युट ऑफ इंडस्ट्रियल रिसर्च या संस्थेचा सुवर्णमहोत्सवी गौरव पुरस्कार जाहीर.

जन्म

  • १७५४: वॉशिंग्टन शहराचे रचनाकार फ्रेन्च अमेरिकन वास्तुविशारद आणि स्थापत्य अभियंता पिअर चार्ल्स एल्फांट यांचा जन्म. (मृत्यू: १४ जून १८२५)

  • १८९०: संगीत सौभद्र मधील धैर्यधराच्या भूमिकेत गाजलेले गायक अभिनेते संगीतसूर्य केशवराव भोसले यांचा जन्म. (मृत्यू: ४ आक्टोबर १९२१)

  • १९०९: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड साहित्यिक, शिक्षणतज्ञ व इंग्रजी वाङ्‍मयाचे गाढे अभ्यासक डॉ. विनायक कृष्ण गोकाक यांचा जन्म. (मृत्यू: २८ एप्रिल १९९२)

  • १९२०: घाल घाल पिंगा वार्‍या, माझ्या परसात या कवितेमुळे परिचित असलेले भावकवी कृ. ब. निकुम्ब यांचा जन्म.

मृत्यू

  • १९०१: मराठी रंगभुमीचे जनक विष्णूदास अमृत भावे यांचे निधन.

  • १९४८: हुगो बॉस कानी चे संस्थापक हुगो बॉस यांचे निधन. (जन्म: ८ जुलै १८८५)

  • १९७६: ऊर्दू शायर व गीतकार जान निसार अख्तर यांचे निधन. (जन्म: १४ फेब्रुवारी १९१४)

  • १९९६: जेट इंजिन चे शोधक फ्रॅंक व्हाटलेट यांचे निधन. (जन्म: १ जुन १९०७)

  • २००२: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी शांताबाई दाणी यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १९१८)

  • २०१५: भारतीय पत्रकार, लेखक, आणि कवी काययार सिंहनाथ राय यांचे निधन. (जन्म: ८ जून १९१५)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.