चालू घडामोडी - ०९ डिसेंबर २०१८

Date : 9 December, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
शेवटच्या देशातही उगवली इंटरनेट स्वातंत्र्याची नवी पहाट :
  • अमेरिकेसारख्य़ा महासत्तेला अनेक दशके कडवी टक्कर देणाऱ्या कॅरेबियन बेटांवरील छोटासा देश क्युबामध्ये नुकतीच सार्वजनिक इंटरनेटसुविधा सुरु झाली. या देशातील नागरिक अनेक वर्षे इंटरनेटपासून दूर होते. या देशात आधीही इंटरनेट होते. मात्र, त्याचा वापर मर्यादित होता. इंटरनेट सेवा नसणारा हा जगातील शेवटचा देश होता. 

  • क्युबामध्ये थ्रीजी इंटरनेट सेवा सुरु करण्यात आली असून टेलिकॉम कंपनी ETECSA ही सेवा देत आहे. या कंपनीने इंटरनेटचा प्लॅनही जाहीर केला असून नागरिकांना प्रती महिन्यासाठी 30 डॉलर म्हणजेच 2100 रुपये भरावे लागणार आहेत. यामध्ये केवळ 4 जीबी डेटा मिळणार आहे. 

  • क्युबाची लोकसंख्या 1.12 कोटी आहे. यातील केवळ 50 लाख लोकच मोबाईल वापरतात. येथील सर्वाधिक लोक मजुरी करून उदरनिर्वाह करतात. महत्वाचे म्हणजे क्युबातील नागरिकांची सरासरी मजुरी 30 डॉलर आहे. मात्र, काही मजुरांना यापेक्षाही कमी मजुरी मिळते. अशा वेळी येथील लोकांना इंटरनेटचा प्लॅन हा आवाक्याबाहेरचाच ठरणार आहे. 

  • क्युबामध्ये याआधीही इंटरनेट सुविधा मिळत होती. मात्र, त्याचा वापर सर्वच करू शकत नव्हते. 2013 पर्यंत इंटरनेट केवळ महागड्या हॉटेलांमध्येच मिळत होते. कारण पर्यटक त्याचा वापर करू शकतील. यानंतर 2017 मध्ये देशभरात वाय-फाय आणि इंटरनेट कॅफे सुरु करण्यात आले. सध्या क्युबामध्ये 1200 वायफाय हॉटस्पॉट आहेत ज्याचा वापर 20 लाख लोकच करतात.

भारतीय शेअर बाजार जपान, चीनपेक्षा सक्षम; सेबी प्रमुखांचा दावा :
  • मुंबई : भारतीय शेअर बाजार जपान, चीनसारख्या प्रगत राष्टांच्या शेअर बाजारापेक्षाही सक्षम आहे. तसेच रुपया डॉलरसमोर कमकुवत झाला असला तरी, जगातील अन्य चलनांच्या तुलनेत तो बराच सक्षम आहे, असा विश्वास सेबीचे अध्यक्ष अजय त्यागी यांनी व्यक्त केला.

  • भारतीय उद्योग महासंघातर्फे शुक्रवारी घेतलेल्या परिषदेत भारतीय शेअर बाजार सध्या प्रचंड अस्थिर असल्याची चिंता वक्त्यांनी मांडली. त्यागी यांनी मात्र अन्य देशांच्या तुलनेत भारतीय शेअर बाजार सर्वाधिक सुरक्षित असल्याचे मत मांडले. ते म्हणाले की, एप्रिल ते सप्टेंबर या काळात राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने ६.५० टक्के परतावा दिला. पण याच काळात ब्रिटनमधील शेअर बाजारातील परताव्यात एक टक्का व चीनमधील बाजारांच्या परताव्यात १८ टक्के घसरण झाली.

  • ब्राझिल व जपानच्या बाजारांचा परतावा अनुक्रमे ५.७ व ४.५ टक्के होता. भारतीय शेअर बाजार सध्या १२ टक्के अस्थिर आहे. पण अमेरिका, चीन, जपान, दक्षिण कोरीया, हाँगकाँग व ब्राझिल येथील बाजार भारतापेक्षा अस्थिर आहेत.

राम मंदिरासाठी आज दिल्लीमध्ये शक्तीप्रदर्शन :
  • नवी दिल्ली : राम मंदिराच्या निर्मितीसाठी गेल्याच महिन्यात शिवसेना आणि विहिंपने अयोध्येला जाऊन पुन्हा आंदोलन उभारण्याची घोषणा केलेली असतानाच आज दिल्लीमध्ये विहिंपने धर्मसभेचे आयोजन केले आहे. यामुळे रामलीला मैदान पूर्णत: भगवेमय होऊन गेले आहे. देशभरातून कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता आहे. 

  • जवळपास 5 ते 8 लाख रामभक्त या धर्मसभेला येण्याचा दावा केला जात आहे. अनेक राज्यांतून हे कार्यकर्ते दिल्लीत पोहोचले असून त्यांची विविध मंदिरे, धर्मशाळांमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अयोध्या, मुंबई आणि नागपूरसारख्या शहरांमधून हे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले आहेत. 

  • 11 डिसेंबरपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. यामुळे भाजपसह अन्य राजकीय पक्षांवर दबाव आणण्यासाठी हिंदू संघटना कसून कामाला लागल्या आहेत. शक्तीप्रदर्शन पाहून हे पक्ष घाबरून तरी राम मंदिर बनविण्यासाठी कायदा आणतील अशी आशा या संघटनांना आहे. 

इशा-आनंदच्या विवाहापूर्वी अंबानी-पिरामल कुटुंबाची अन्नसेवा :
  • मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची कन्या इशा अंबानी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. लग्नाची धामधूम सुरु असताना अंबानी कुटुंबाकडून राजस्थानातील उदयपूरमध्ये अन्नदान करण्यात आलं.

  • उदयपूरमध्ये 7 ते 10 डिसेंबरदरम्यान ही अन्नसेवा सुरु राहणार आहे. यावेळी शहरातील 5100 जणांना जेवण दिलं जात आहे. उदयपूर शहराप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आणि नागरिकांचे आशीर्वाद घेण्यासाठी अंबानी परिवाराकडून या अन्नसेवेचं आयोजन करण्यात आलं आहे.

  • 12 डिसेंबर 2018 रोजी इशा अंबानी आणि आनंद पिरामल विवाहबद्ध होणार आहेत. आनंद हे पिरामल इंटरप्रायजेसचे मालक अजय पिरामल यांचे पुत्र आहेत.

  • लग्नाआधी अंबानी आणि पिरामल कुटुंबीय सेलिब्रेशनसाठी उदयपूरमध्ये दाखल झाले आहेत. संगीत, मेहंदी आणि इतर विधी 8 आणि 9 डिसेंबरला पार पडणार आहेत.

  • 'अन्न सेवा' करण्यासाठी मुकेश अंबानी, नीता अंबानी, अजय पिरामल, स्वाती पिरामल यांच्यासह इशा अंबानी आणि आनंद पिरामलही उपस्थित होते. 12 डिसेंबरला अंबानी यांचं मुंबईतील निवासस्थान अॅटिंलिया बंगल्यावर विवाहसोहळा पार पडणार आहे.

चंद्राचा वेध घेण्यासाठी चीनचे यान झेपावले :
  • चीनचे चांद्रयान शनिवारी सकाळी यशस्वीरीत्या झेपावले असून ते चंद्राच्या आतापर्यंतच्या सर्वात दूरच्या भागात उतरणार आहे. अवकाश क्षेत्रात महाशक्ती होण्याची चीनची महत्त्वाकांक्षा असून त्या दिशेने हे पाऊल आहे. चेंज ४ हे चांद्र शोधक यान असून मार्च ३ बी  प्रक्षेपकाच्या मदतीने ते नैर्ऋत्य चीनमधील शिचांग  प्रक्षेपण केंद्रावरून मार्गस्थ झाले.

  • नवीन वर्षांत हे यान चंद्रावर उतरण्याची शक्यता असून त्याच्या मदतीने तेथे अनेक प्रयोग केले जाणार आहेत. चंद्राच्या अद्याप अभ्यासल्या न गेलेल्या भागात चीनचे बग्गीसारखी रोव्हर गाडी असलेले हे यान उतरणार असून चंद्राची एक बाजू कधीच पृथ्वीला सामोरी येत नाही त्या अंधाऱ्या बाजूकडील भागात हे यान उतरणार असून १९५९ मध्ये सोविएत युनियनने त्याच्या पहिल्या प्रतिमा घेतल्या होत्या.

  • या भागात यान उतरवणारा चीन हा पहिला देश ठरणार आहे. चीन गेली १० ते २० वर्षे अमेरिका व सोविएत रशिया यांनी १९६०-१९७० या काळात जी प्रथमोचित कामगिरी केली त्यावर मात करण्याचा प्रयत्न करीत आहे, असे हार्वर्ड स्मिथसॉनियन सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रोफिजिक्सचे जोनाथन मॅकडॉवेल यांनी सांगितले.

  • चंद्राच्या अंधाऱ्या बाजूवर यान उतरवणे ही सोपी गोष्ट नसून चीनने अनेक वर्षांच्या तयारीनंतर हे  धाडस केले आहे. यात यंत्रमानवरूपी लँडरशी संपर्क साधणे हे आव्हान आहे. कारण चंद्राची ही बाजू पृथ्वीस सामोरी नसते. त्यामुळे तेथून थेट संदेश मिळत नाही. चीनने यावर उपाय म्हणून मॅगपी ब्रिज म्हणजे क्वेकियाओ नावाचा उपग्रह चंद्राच्या कक्षेत सोडून त्याच्या मार्फत लँडर व पृथ्वी यांच्यात संपर्क प्रस्थापित करण्याची कल्पना राबवली आहे.

मेक्सिकोची व्हेनेसा पोन्स डे लियॉन ठरली मिस वर्ल्ड २०१८ :
  • मेक्सिकोच्या व्हेनेसा पोन्स डे लियॉन या वर्षीचा मिस वर्ल्डचा किताब पटकावला. मागील वर्षीची मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरने व्हेनेसाच्या डोक्यावर क्राऊन घातला. चीनच्या सान्या या शहरामध्ये ही स्पर्धा रंगली होती. व्हेनेसा पोन्स डे लियॉन ही 68 व्या मिस वर्ल्ड स्पर्धेतली विजेती स्पर्धक ठरली आहे. थायलँडची निकोलेन पिशापा ही फर्स्ट रनर अप ठरली आहे.

  • जेव्हा मिस वर्ल्डचा मुकुट मानुषीने व्हेनेसाच्या डोक्यावर घातला तेव्हा तिने आपल्या आठवणींनाही उजाळा दिला. या स्पर्धेत भारतातर्फे तामिळनाडूच्या अनुकृती वासनेही सहभाग घेतला होता. ती टॉप 30 मध्येही पोहचली. मात्र टॉप 12 मध्ये अनुकृती पोहचू शकली नाही.

  • मिस वर्ल्ड 2018 हा किताब मिळवलेल्या व्हेनेसाने इंटरनॅशनल बिझनेस कोर्स केला आहे. सध्या ती मुलींसाठी चालवण्यात येणाऱ्या एका पुनर्वसन केंद्राच्या संचालकांपैकी एक संचालक आहे. आपल्याला हा किताब मिळाल्याचा मनस्वी आनंद झाल्याची प्रतिक्रिया व्हेनेसाने दिली आहे.

अवयवदानाच्या इच्छेची ड्रायव्हींग लायसन्सवर होणार नोंद :
  • अवयवदान हे अतिशय महत्त्वाचे असून त्यामुळे अनेकांना जीवदान मिळू शकते. अवयवदानासाठी मागील अनेक दिवसांपासून शासनाच्या आरोग्य विभागाकडूनही जनजागृती करण्यात येणार आहे. रस्त्यांवर होणारे अपघात आणि त्यामध्ये होणारे मृत्यू यांचेही प्रमाण भारतात जास्त आहे.

  • ही गोष्ट लक्षात घेऊन एक महत्त्वाचा निर्णय शासनाकडून घेतला जाणार आहे. अवयवदानाची इच्छा असणाऱ्या व्यक्तीच्या ड्रायव्हिंग लायसन्सवर या गोष्टीची नोंद यापुढे होणार आहे. केंद्रिय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत माहिती दिली. एका कार्यक्रमात बोलत असताना गडकरी यांनी याबाबतची माहिती दिली.

  • रस्ते अपघातामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर सहा तासांच्या आत अवयवदान करता यावे याची सोय केली जाणार आहे. त्यासाठी व्यक्तीच्या लायसन्सवर त्याची इच्छा असल्याची नोंद असणे आवश्यक आहे.

  • गरजू रुग्णांचे जीव वाचण्यासाठी या गोष्टीची अतिशय चांगली मदत होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. योग्य वेळी आवश्यक असणारे अवयव मिळत नसल्याने विविध कारणांनी मृत्यू होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हे प्रमाण कमी होण्यासाठी अशाप्रकारे काही उपक्रम राबविल्यास त्याचा निश्चितच फायदा होईल.

इशा अंबानीच्या लग्नासाठी हिलरी क्लिंटन भारतात :
  • भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि प्रसिद्ध उद्योगपती म्हणून ओळख असलेले रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांची मुलगी इशा अंबानी हिचा लग्नसोहळा आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. आनंद पिरामल इंटरप्रायजेसचे मालक अजय पिरामल यांचा मुलगा आनंद याच्यासोबत इशा लग्नगाठ बांधणार आहे.

  • या सोहळ्यासाठी देशातीलच नाही तर जगातील नामांकित व्यक्ती हजेरी लावणार असून अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या पत्नी हिलरी क्लिंटन या लग्नासाठी भारतात आल्या आहेत. यावेळी हिलरी क्लिंटन यांनी लग्नाच्या आधीच्या सोहळ्याला उपस्थित राहून नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांच्यासोबत फोटो काढला आहे.

  • १२ डिसेंबरला इशा आणि आनंद यांचे लग्न होणार असले तरीही लग्नसोहळ्यातील इतर विधींना सुरुवात झाली आहे. उदयपूर येथे हा भव्यदिव्य विवाहसोहळा पार पडणार असून हिलरी क्लिंटन याठिकाणी पोहोचल्या आहेत.

  • याबरोबरच या सोहळ्याला मित्तल समुहाचे लक्ष्मी मित्तल, बीपी ग्रुपचे बॉब डुडले, २१ सेच्युरी फॉक्स समुहाचे सीईओ जेम्स मरडॉक, diageo चे सीईओ इव्हान मेंझेस उदयपूर येथे या जंगी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. याबरोबरच बॉलिवूडमधील कलाकार आणि वरिष्ठ राजकीय नेते हेही या सोहळ्याला हजेरी लावतील.

  • याबरोबरच जगभरातील नामांकित कंपन्यांचे अधिकारी या सोहळ्याला चार चाँद लावतील. नुकताच अंबानी कुटुंबियांनी उदयपूर येथे ‘अन्न सेवे’चा कार्यक्रम घेतला. हा उपक्रम ७ ते १० डिसेंबपर्यंत सुरु राहणार असल्याचे कुटुंबियांकडून सांगण्यात आले. १२ तारखेपर्यंत संगीत, डान्स, मेहंदी हे कार्यक्रम होणार आहेत.

दिनविशेष :
  • आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन

महत्वाच्या घटना 

  • १७५३: थोरले माधवराव पेशवे यांचा रमाबाई यांच्याशी विवाह झाला

  • १८९२: इंग्लिश फुटबॉल क्लब न्यूकॅसल युनायटेडची स्थापना झाली

  • १९००: अमेरिकेतील सर्वधर्म परिषदेत भाग घेऊन स्वामी विवेकानंद भारतात मुंबईमध्ये परतले.

  • १९००: डेव्हीस कप टेनिस स्पर्धेची सुरवात.

  • १९४६: दिल्लीमध्ये घटना परिषदेची पहिली बैठक.

  • १९६१: पोर्तुगीज यांच्या ताब्यात असलेले दिव व दमण हे प्रांत भारतात समाविष्ट केले.

  • १९६१: ब्रिटन पासुन स्वतंत्र होऊन टांझानिया देशाचा जन्म.

  • १९६६: बार्बाडोसचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश.

  • १९७१: संयुक्त अरब अमिरातींचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश.

  • १९९५: बारामती-पुणे थेट रेल्वेचा शुभारंभ.

जन्म 

  • १५०८: डच गणिती आणि नकाशे तज्ञ गेम्मा फ्रिसियस यांचा जन्म.

  • १६०८: कवी विद्वान आणि मुत्सद्दी जॉन मिल्टन यांचा जन्म. (मृत्यू: ८ नोव्हेंबर १६७४)

  • १८६८: नायट्रोजनपासून मोठ्या प्रमाणावर अमोनिआ वायू मिळवण्याची पद्धत शोधल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळालेले जर्मन रसायनशास्त्रज्ञ फ्रिटझ हेबर यांचा जन्म. (मृत्यू: २९ जानेवारी १९३४ – बाझेल, स्वित्झर्लंड)

  • १८७८: कोल्हापूर संस्थानचे दिवाण व शिक्षणमंत्री अण्णासाहेब लठ्ठे यांचा जन्म. (मृत्यू: १६ मे १९५०)

  • १८७०: भारतीय डॉक्टर आणि मिशनरी आयडा एस स्कडर यांचा जन्म. (मृत्यू: २३ मे १९६०)

  • १९१९: केरळचे मुख्यमंत्री ई. के. नयनार यांचा जन्म.

  • १९४६: कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी उर्फ अँटोनिया एडवीज अल्बिना मैनो यांचा जन्म.

  • १९४६: जन्माने इटालियन असलेल्या भारतीय राजकारणी सोनिया गांधी यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९४२: हिंदी-चीनी मैत्रीचे प्रतिक डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचे निधन. (जन्म: १० ऑक्टोबर १९१०)

  • १९९३: चित्रपट अभिनेत्री स्नेहप्रभा प्रधान यांचे निधन.

  • १९९७: कन्नड लेखक, चित्रपट निर्माते आणि विचारवंत तसेच ज्ञानपीठ पारितोषिक विजेते, पद्मभूषण आणि साहित्य अकादमी अवॉर्ड विजेते के. शिवराम कारंथ यांचे निधन. (जन्म: १० ऑक्टोबर १९०२ – कोटा, दक्षिण कन्नडा, कर्नाटक)

  • २०१२: बारकोडचे सहनिर्माते नॉर्मन जोसेफ वोंडलँड यांचे निधन. (जन्म: ६ सप्टेंबर १९२१)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.