चालू घडामोडी - ०९ फेब्रुवारी २०१९

Updated On : Feb 09, 2019 | Category : Current Affairs३९ वर्षांत अण्णा हजारे यांचे २०वे उपोषण :
 • ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे २० वे उपोषण तब्बल सात दिवसांनंतर सुटले. त्यांनी आतापर्यंत ३९ वर्षांत १९ वेळा १४५ दिवस उपोषण केले होते. या वेळच्या आंदोलनापासून राजकारण्यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला असला तरी पडद्याआडून राजकारण खेळले गेलेच.

 • ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडून १९७९ मध्ये विजेच्या प्रश्नावर नगर-पुणे महामार्गावर वाडेगव्हाण (ता. पारनेर) येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. त्यात कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार बाबासाहेब ठुबे व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरुण कडू हे सहभागी झाले होते. या आंदोलनात कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता. आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर पोलिसांनी गोळीबार केला. त्यात दोघांचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. या आंदोलनापासून हजारे यांनी धडा घेतला अन् रस्ता रोकोऐवजी गांधीवादी पद्धतीने उपोषण करण्याचा मार्ग अवलंबिला.

 • अण्णांचे पहिले उपोषण हे जून १९८० मध्ये गावातील शाळेला मान्यता मिळावी म्हणून नगरला करण्यात आले. नंतरची ११ उपोषणे ही राळेगणसिद्धी येथे करण्यात आली. तीन वेळा त्यांनी आळंदीला उपोषण केले. मुंबईत दोन, दिल्लीत तीन अशी त्यांच्या उपोषणाची ठिकाणे होती. पहिली चार उपोषणे ही ग्रामीण विकास, ठिबक योजना, विजेचा प्रश्न, वन विभागातील भ्रष्टाचार आदी स्थानिक प्रश्नांवर झाली. मात्र २३ नोव्हेंबर १९९६ पासून त्यांनी राज्यातील मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध उपोषण केले. त्यामुळे शिवसेना, भारतीय जनता पक्षाच्या चार मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले. सुरेश जैन, बबनराव घोलप, महादेव शिवणकर, शशिकांत सुतार यांचा त्यामध्ये समावेश होता. पुढे २००९ मध्ये त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध उपोषण केले.

 • अण्णांच्या उपोषणामुळे राज्य सरकारमधील सहा मंत्री, सुमारे पाचशेहून अधिक अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई झाली. अण्णांनी माहिती अधिकाराचा १९ वर्षे पाठपुरावा केला. त्यामुळे प्रथम राज्याने व नंतर केंद्राने कायदा केला. आता लोकपालसाठी त्यांचे आंदोलन सुरू आहे. एप्रिल २०११ मध्ये त्यांनी दिल्लीत जंतरमंतरवर लोकपालसाठी पहिले उपोषण केले. तेव्हापासून ते लोकपालसाठी उपोषण करत आहेत.

७ ते २० एप्रिल दरम्यान जेईई मेनची दुसरी परीक्षा :
 • पुणे : देशभरातील भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी), राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (एनआयटी) आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांतील प्रवेशासाठी अनिवार्य असलेली ‘जेईई मेन’ची दुसरी ऑनलाइन परीक्षा ७ ते २० एप्रिलदरम्यान होणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ७ मार्चपर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येईल.

 • नव्यानेच स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय चाचणी संस्थेतर्फे (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) ही परीक्षा घेण्यात येत आहे. यंदापासून ‘जेईई मेन’ परीक्षा वर्षांतून दोन वेळा घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानुसार जानेवारीत झालेल्या पहिल्या परीक्षेचा निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आला. त्यानंतर आता दुसऱ्या परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना एनटीए किंवा जेईई मेनच्या संकेतस्थळावरून नोंदणी करता येईल. जानेवारीत झालेली जेईई मेन देता न आलेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या परीक्षेसाठी प्रविष्ट होण्याची संधी मिळणार आहे. या परीक्षेतील प्रश्नपत्रिका १ आणि प्रश्नपत्रिका २ या दोन्ही प्रश्नपत्रिका ऑनलाइन पद्धतीनेच सोडवाव्या लागणार आहेत.

 • केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी जेईई मेनच्या दुसऱ्या परीक्षेच्या निकालानंतर पहिल्या आणि दुसऱ्या परीक्षेची मिळून निकालाची एकत्रितक्रमवारी जाहीर केली जाणार असल्याचे जाहीर केले होते.

 • तसेच पहिल्या परीक्षेत समाधानकारक कामगिरी करता न आलेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या परीक्षेत अधिक चांगली कामगिरी करण्याची संधी मिळेल. त्यामुळे दुसरी परीक्षा देशभरातील अनेक विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे. जेईई मेनमध्ये या वर्षी पहिल्यांदाच पर्सेटाइल पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे.

रणजी करंडक विजेता विदर्भ संघ ठरला करोडपती :
 • सलग दुसऱ्यांदा रणजी करंडक स्पर्धेचं विजेतेपद पटकावणाऱ्या विदर्भाला त्यांच्या धडाकेबाज कामगिरीसाठी रोख रकमेचं इनाम घोषित करण्यात आलं आहे. विदर्भ क्रिकेट असोसिएशनने ३ तर बीसीसीआयने विदर्भासाठी २ कोटी रुपयांचं पारितोषिक जाहीर केलं आहे.

 • अवश्य वाचा – विदर्भ संघ रणजी स्पर्धेत विजयी हॅट्ट्रिक साधेल

 • अंतिम फेरीत विदर्भाने सौराष्ट्रावर ७८ धावांनी मात करत सलग दुसऱ्यांदा रणजी करंडक स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. पहिल्या हंगामात विदर्भाने दिल्लीवर मात करुन आपलं पहिलं विजेतेपद मिळवलं होतं. रणजी करंडकानंतर विदर्भाच्या संघासमोर आता इराणी करंडकाचं आव्हान असणार आहे.

ICAI IPC CA Result 2018: दिल्लीचा शुभम मल्होत्रा, अर्जुन मिनोचा देशात अव्वल :
 • ICAI IPC CA Result 2018: द इन्सिट्टयूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटटस ऑफ इंडियाने चार्टर्ड अकाऊंटट इंटरमिजिएट (जुना आणि नवा अभ्यासक्रम) परीक्षेचा निकाल आज (शुक्रवार) जाहीर केला आहे. जुन्या अभ्यासक्रमात अर्जुन मिनोचा याने ७४.१४% टक्क्यांसह तर नवीन अभ्यासक्रमात दिल्लीचा शुभम मल्होत्रा हा पहिल्या क्रमांकाने ८२.१३% उत्तीर्ण झाला आहे.

 • या निकालाबरोबर संस्थेने गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. ICAI IPC चा निकाल खालील वेबसाइटवर उपलब्ध आहे- icaiexam.icai.org, caresults.icai.org and icai.nic.in. देशभरातून १.५७ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. नोव्हेंबर महिन्यात ही परीक्षा झाली होती.

 • जुन्या अभ्यासक्रमात अर्जुन मिनोचा याने ७०० पैकी ५१९ गुणांसह (७४.१४%)प्रथम क्रमांक पटकावला आहे. पंजाबच्या दिव्या गुप्ता ७१.४३ टक्क्यांसह द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. तर नवी दिल्लीचा परमांशु शर्मा ७० टक्क्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

 • तर नवीन अभ्यासक्रमात दिल्लीचा शुभम मल्होत्रा हा पहिल्या क्रमांकाने (८२.१३%) उत्तीर्ण झाला आहे. द्वितीय क्रमांक कोलकाताचा प्रन्शू बागरोडिया (८१.१३%), हरयाणातील सिरसाच्या पुष्प गोयल तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.

अमेरिकेतील ‘ग्रीन कार्ड’साठीची मर्यादा रद्द :
 • वॉशिंग्टन : ग्रीन कार्डबाबत प्रत्येक देशाबाबत असलेली मर्यादा संपुष्टात आणण्याबाबतची विधेयके अमेरिकेच्या लोकप्रतिनिधी आणि सिनेटमध्ये मांडण्यात आली आहेत. या विधेयकांचे कायद्यामध्ये रूपांतर झाल्यास अमेरिकेमध्ये कायमस्वरूपी कायदेशीर वास्तव्याच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो भारतीय व्यावसायिकांना त्याचा लाभ होणार आहे.

 • सिनेटमध्ये रिपब्लिकन नेते माइक ली आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या, अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या नेत्या कमला हॅरिस यांनी फेअरनेस फॉर हाय-स्किल्ड इमिग्रण्ट्स अ‍ॅक्ट (एचआर १०४४) विधेयक बुधवारी मांडले. त्यामुळे रोजगारावर आधारित ग्रीन कार्डसाठी प्रत्येक देशाबाबत असलेली मर्यादा दूर होणार आहे.

 • लोकप्रतिनिधी सभागृहात काँग्रेस नेते झो लॉफग्रेन आणि केन बक यांनी मांडले. हे विधेयक काँग्रेसने मंजूर केल्यास आणि त्याचे कायद्यात रूपांतर झाल्यास एच१बी व्हिसा असलेल्या हजारो भारतीय व्यावसायिकांना लाभ होणार आहे.

भारत-पाकिस्तान युद्धातील 'ते' विमान ७५ वर्षांनंतर भरारी घेणार :
 • नाशिक : दुसरे महायुद्ध आणि भारत-पाकिस्तान युद्धात अमूल्य कामगिरी बजावलेले डकोटा हे लढाऊ विमान तब्बल 75 वर्षांनंतर फिनिक्स भरारी घेणार आहे. हवाई दलाने या विमानाचे आधुनिकीकरण केले असून, बंगळुरुतील एअरो इंडिया शोमध्ये हे विमान कवायती सादर करणार आहे. व्हिंटेज ठेवा म्हणून हवाई दल या विमानाची जपणूक करणार आहे.

 • दुसरे महायुद्ध आणि भारत-पाकिस्तान युद्धात अमूल्य कामगिरी बजावलेले डकोटा हे लढाऊ विमान आज नाशिकच्या ओझर विमान तळावर दाखल झालं आहे. हवाई दलाने या विमानाचे आधुनिकीकरण केले आहे.

 • युनायटेड किंग्डम अर्थात इंग्लंडमध्ये निर्मिती झालेल्या डकोटा विमानाने दुसऱ्या महायुद्धासह 1947-48 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धातही महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. तत्कालीन रॉयल इंडियन एअर फोर्समध्ये डकोटाचे खास महत्त्व होते. इंग्रजांनी भारत सोडल्यानंतर भारतीय हवाई दलाकडेच यातील काही विमाने होती.

 • मात्र, काळाच्या ओघात त्यांचा वापर बंद झाला. या विमानांची देखभाल-दुरुस्ती करतानाच त्यात अपग्रेडेशन करण्याच्या हालचाली गेल्या तीन-चार दशकांपूर्वी सुरू झाल्या. अखेर यात यश आले असून, एक डकोटा विमान फिनिक्स भरारीसाठी सज्ज झाले आहे. हे विमान येत्या 20 ते 24 फेब्रुवारीदरम्यान बेंगळुरु येथे होणाऱ्या एअरो इंडिया-2019 शोमध्ये सहभागी होणार आहे. त्यामुळे हे विमान यंदाच्या शोमधील आकर्षणाचा केंद्रबिंदू राहणार असल्याचे विंग कमांडर अनुपम बॅनर्जी यांनी सांगितले.

युवा जेरेमीने जिंकले रौप्य :
 • नवी दिल्ली : युवा आॅलिम्पिकमधील सुवर्ण पदक विजेता जेरेमी लालरिनुगाने शुक्रवारी पुरूष गटात ६७ किलो मध्ये रौप्य पदकाची कमाई करत थायलंडच्या चियांग माईमध्ये सुरू असलेल्या ईजीएटी कप आंतरराष्ट्रीय भारोत्तोलन स्पर्धेत भारतासाठी दुसरे पदक मिळवले आहे.

 • १६ वर्षीय जेरेमीने स्नॅचमध्ये १३१ किलो आणि क्लिन अ‍ॅण्ड जर्कमध्ये १५७ किलो वजन उचलले. एकुण २८८ किलो वजन उचलले. मिझोरामचा हा भारोत्तलक इंडोनेशियाच्या सुवर्णपदक विजेत्या डेनी पेक्षा खुप मागे राहिला. त्याने ३०३ किलो (१३२ आणि १७१ किलो) वजन उचलले. रुबेन काटोयाताऊने २८५ किलो (१२५ आणि १६० किलो) वजन उचलले.

 • ही स्पर्धा सिल्व्हर लेव्हल आॅलिम्पिक क्वालिफाईंग स्पर्धा आहे. यातील गुण टोकियो २०२० मध्ये कट मिळवणाऱ्यांच्या अंतिम रँकिंगमध्ये मिळवले जातील. स्वाती सिंग (१९५ किलो) व कोपार्थी शिरीषा (१८९ किलो) ५९ किलो गटात अनुक्रमे सहा आणि नवव्या स्थानी राहिले.

 • गुरूवारी विश्व चॅम्पियन साईखोम मीराबाई चानू हीने महिला गटात ४९ किलो मध्ये सुवर्ण पदक मिळवले होते.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

 • १९३३: साने गुरुजी यांनी नाशिकच्या कारागृहात असताना श्यामची आई या पुस्तकाच्या लेखनाला सुरुवात केली.

 • १९५१: स्वतंत्र भारताची पहिली जनगणना सुरू.

 • १९६९: बोइंग-७४७ विमानाचे पहिले चाचणी उड्डाण झाले.

 • २००३: संगीतकार रवींद्र जैन यांना मध्यप्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार प्रदान.

जन्म 

 • १७७३: अमेरिकेचे ९वे अध्यक्ष विल्यम हेन्री हॅरिसन यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १८४१)

 • १८७४: स्वातंत्र्यशाहीर गोविंद त्र्यंबक दरेकर उर्फ कवी गोविंद यांचा जन्म. (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९२६ – नाशिक)

 • १९१७: गांधीवादी नेते, सिक्‍कीमचे पहिले राज्यपाल, मंत्री व आमदार होमी जे. एच. तल्यारखान यांचा जन्म. (मृत्यू: २७ जून१९९८)

 • १९२२: भारतीय उद्योगपती लीला पॅलेस हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स चे संस्थापक सी. पी. कृष्णन नायर यांचा जन्म. (मृत्यू: १७ मे२०१४)

 • १९२९: महाराष्ट्रचे ८वे मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांचा जन्म. (मृत्यू: २ डिसेंबर २०१४)

मृत्यू 

 • १९७९: चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते राजा परांजपे यांचे निधन. (जन्म: २४ एप्रिल १९१०)

 • १९८१: न्यायाधीश, मुत्सद्दी आणि केंद्रीय मंत्री एम. सी. छागला यांचे निधन. (जन्म: ३० सप्टेंबर १९००).

 • १९८४: भरतनाट्यम नर्तिका तंजोर बालसरस्वती यांचे निधन. (जन्म: १३ मे १९१८).

 • २००१: माजी हवाई दल प्रमुख, एर चीफ मार्शल दिलबागसिंग यांचे निधन.

 • २००८: कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक डॉ. मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे यांचे निधन. (जन्म: २६ डिसेंबर १९१४)

टिप्पणी करा (Comment Below)