चालू घडामोडी - ०९ जानेवारी २०१९

Date : 9 January, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
अहमदाबादेत उभं राहतंय जगातलं सर्वात मोठं क्रिकेट मैदान :
  • क्रिकेट हा खेळ भारतीय लोकांसाठी एका धर्माप्रमाणे आहे. याच क्रिकेटवेड्या भारतीय प्रेक्षकांसाठी अहमदाबाद शहरात जगातलं सर्वात मोठं क्रिकेट मैदान उभं राहत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबाद मधील या मैदानाला सरदार पटेल यांचं नाव देण्यात आलं असून, आसनक्षमतेच्या बाबतीत हे मैदान कोलकात्याचं इडन गार्डन्स आणि मेलबर्न क्रिकेट क्लबच्या मैदानालाही मागे सोडणार आहे.

  • या नवीन मैदानाती आसनक्षमता ही 1 लाख 10 हजारांच्या घरात असणार आहे. मेलबर्न क्रिकेट क्लबच्या मैदानाची आसनक्षमता सध्या 1 लाख आहे, तर कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानाची आसनक्षमता 80 हजारांच्या घरात आहे.

  • गुजरात क्रिकेट असोसिएशने उपाध्यक्ष परिमल नथवानी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर या मैदानाच्या बांधकामाचे फोटो शेअर केले आहेत.

  • 3 एकर जमिनीवर या मैदानाचं बांधकाम सुरु असून यासाठी अंदाजे 700 कोटींचा खर्च येणार आहे. लार्सन अँड टुब्रो कंपनीला या मैदानाचं कंत्राट मिळालेलं आहे. 1982 साली बांधण्यात आलेलं हे मैदान गुजरात क्रिकेट असोसिएशनने 2015 साली संपूर्णपणे तोडून पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला. सुसज्ज ड्रेसिंग रुम, स्विमींग पूल आणि अनेक अत्याधुनिक सोयी-सुवीधा या मैदानात उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

भारत-नॉर्वे संबंधांना नवी दिशा देण्याबाबत मोदी-सोलबर्ग चर्चा :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी नॉर्वेच्या पंतप्रधान एर्ना सोलबर्ग यांच्याशी विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठीचे प्रयत्न आणि परस्पर संबंधांना नवी दिशा देण्याबाबत सहकार्य करण्यावर चर्चा केली.

  • मोदी आणि सोलबर्ग यांनी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली आणि भारत-नॉर्वे संबंधांचा आढावाही घेतला. सर्व क्षेत्रांमधील सहकार्याबाबत आम्ही आढावा घेतला आणि परस्पर संबंधांना नवी ऊर्जा आणि दिशा कशी देता येईल याबाबतही चर्चा केली, असे मोदी यांनी या चर्चेनंतर जारी केलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.

  • आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत आणि नॉर्वे यांच्यात चांगले सहकार्य आहे. संयुक्त राष्ट्र संघ सुरक्षा परिषद सुधारणांवर दोन्ही देश सहकार्य करीत आहेत, त्याचप्रमाणे दहशतवादावरही चर्चा करण्यात आली.

  • सोलबर्ग यांचे सोमवारी भारतात आगमन झाले, त्यांचे मंगळवारी राष्ट्रपती भवनामध्ये यथोचित स्वागत करण्यात आले.

  • मोदी यांच्यासमवेत ऊर्जा, हवामान बदल आणि पर्यावरण आदी प्रश्नांवरही चर्चा करण्यात आल्याचे सोलबर्ग यांनी जारी केलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनीही सोलबर्ग यांची भेट घेऊन चर्चा केली.

नासाच्या ‘टेस’ मोहिमेत नव्या ग्रहाचा शोध :
  • नासाने अलिकडेच सौरमालेबाहेर एक ग्रह शोधून काढला असून तो ५३ प्रकाशवर्षे दूर असलेल्या बटू ताऱ्याभोवती फिरत आहे. ट्रान्सिटिंग एक्सोप्लॅनेट सव्‍‌र्हे सॅटेलाइट म्हणजे टेस अंतर्गत एप्रिलपासून शोधण्यात आलेला हा तिसरा ग्रह आहे. या ग्रहाचे नाव एचडी २१७४९ बी असे आहे. तो बटू ताऱ्याभोवती फिरत असून हा तारा ५३ प्रकाशवर्षे दूर आहे.

  • ग्रहाचा कक्षा काळ हा आतापर्यंत शोधलेल्या तीन ग्रहात सर्वाधिक आहे. एचडी २१७४९ बी ग्रह हा ताऱ्याभोवती ३६ दिवसांत प्रदक्षिणा पूर्ण करतो. आधीच्या पाय मेन्सा बी या महापृथ्वी मानल्या जाणाऱ्या ग्रहाचा प्रदक्षिणा काळ ६.३ दिवस असून एलएचएस ३८४४ बी या खडकाळ ग्रहाचा प्रदक्षिणा काळ ११ तासांचा आहे.

  • सर्व तीन ग्रह टेस निरीक्षणांच्या पहिल्या तीन महिन्यांत शोधले आङेत. नव्या ग्रहावरचे तपमान ३०० अंश फॅरनहीट असण्याची शक्यता असून तो तुलनेने थंड आहे. सूर्याइतक्या तप्त ताऱ्याच्या जवळ असूनही त्याचे हे तपमान तुलनेने कमी मानले जाते.

  • या ताऱ्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांपैकी तो शीत ग्रह असल्याचे अमेरिकेतील एमआयटीच्या संशोधक डायना ड्रॅगोमीर यांनी सांगितले.

  • उष्ण ग्रहांच्या वातावरणाबाबत बरीच माहिती असली, तरी ताऱ्यापासून दूर अंतरावरून फिरणाऱ्या थंड ग्रहांच्या वातावरणाची माहिती अजून कमी आहेत.

  • आता सापडलेल्या ग्रहाच्या वातावरणाचा अभ्यास त्यामुळे महत्त्वाचा असून हा ग्रह पृथ्वीपेक्षा तिप्पट मोठा आहे. त्यामुळे तो उप नेपच्यून गटातील आहे. त्याचे वस्तुमान पृथ्वीच्या तीन पट आहे.  हा ग्रह खडकाळ असण्याची शक्यता कमी आहे. तेथे वायू जास्त असून त्याचे वातावरण नेपच्यून किंवा युरेनसपेक्षा घनदाट आहे. त्या ग्रहांप्रमाणेच या ग्रहावर वायू अधिक आहे.

निवडणुकांच्या तोंडावर आयोगाकडे ७ नव्या राजकीय पक्षांची नोंदणी :
  • आगामी २०१९च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडे मंगळवारी ७ नव्या राजकीय पक्षांची नोंदणी झाली.

  • भारतीय विकास दल, लोकतांत्रिक जनस्वराज पार्टी, नॅशनल अवामी युनायटेड पार्टी, पुर्वांचल नवनिर्माण पार्टी, राष्ट्रीय जनशक्ती समाज पार्टी, सकळ जनुला पार्टी आणि स्वतंत्रता पार्टी या नव्याने नोंदणी झालेल्या पक्षांची नावे आहेत.

  • याच वर्षांत एप्रिल ते मे दरम्यान लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत. निवडणुक आयोगाच्या आकडेवारीनुसार सध्या देशभरात २००० नोंदणीकृत राजकीय पक्ष असून यांपैकी काही मोजक्याच पक्षांना निवडणूक आयोगाची मान्यता आहे. या मान्यता असलेल्या एकूण पक्षांपैकी ७ राष्ट्रीय पक्ष आहेत. तर, ५९ पक्ष राज्य पातळीवर काम करीत आहेत.

डायनॉसॉर्सचा शोध ब्रह्मदेवाने लावला, पंजाबच्या भूगर्भशास्त्रज्ञाचा दावा :
  • नवी दिल्ली : सृष्टीचे निर्माते ब्रह्मदेवाने सर्वप्रथम डायनॉसॉरचा शोध लावला, असा दावा पंजाब विद्यापीठातील भूगर्भशास्त्रज्ञाने लावला आहे. डायनॉसॉर्सची नोंद ब्रह्मदेवाने वेदांमध्ये केल्याचं तर्कटही त्यांनी मांडलं आहे.

  • आशू खोसला हे पंजाब विद्यापीठातील भूगर्भशास्त्र विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ब्रह्मदेवाला माहित नाही, अशी कोणतीच गोष्ट नाही. डायनॉसॉर्सच्या अस्तित्वाबद्दलही त्यांना ज्ञात होतं. याविषयी त्यांनी वेदांमध्ये लिहिलं आहे, असा दावा खोसला यांनी केला.

  • इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये जैविक संयोजनाबाबत सादर केलेल्या शोधनिबंधात खोसला यांनी या गोष्टीचा उल्लेख केला आहे. पृथ्वीवर जे-जे अस्तित्वात आहे, त्या प्रत्येक गोष्टीविषयी वेदात लिहून ठेवलं आहे, असंही खोसला म्हणतात.

  • गुजरातमधील खेडा जिल्ह्यात 'भारतीय' डायनॉसॉरचा शोध खोसला आणि त्यांच्या पथकाने लावला होता. त्याचं 'राजसॉरस नर्मदा एन्सिस' असं अधिकृत नामकरण करण्यात आलं आहे.

  • साधारण 25 ते 30 हजार वर्षांपूर्वी वेद लिहिल्याचं मानलं जातं. डायनॉसॉरचं अस्तित्व मात्र साडेसहा कोटी वर्ष आधीपासून आहे. भूगर्भशास्त्रज्ञांनी या गोष्टीकडे लक्ष वेधलं असता, वेद कागदोपत्री लिहिले नसल्याने त्याला वैज्ञानिक आधार नसल्याचं उत्तर खोसलांनी दिला.

महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिवपदी ट्रान्सजेंडर व्यक्ती :
  • नवी दिल्ली : काँग्रेस महिला आघाडीच्या राष्ट्रीय महासचिवपदी ट्रान्सजेंडर कार्यकर्त्या अप्सरा रेड्डी यांची वर्णी लागली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी फोटो ट्वीट करुन याबाबत घोषणा केली.

  • महिला काँग्रेस अध्यक्षा सुषमा देव यांच्या उपस्थितीत अप्सरा रेड्डी यांना महासचिवपदाचा कार्यभार सोपवण्यात आला. ट्रान्सजेंडर व्यक्तीला एखाद्या राजकीय पक्षात महत्त्वाची जबाबदारी बहाल करण्याची ही पहिलीच वेळ आहे. 132 वर्षांचा इतिहास असलेल्या काँग्रेसने हे अनोखं पाऊल उचलल्यानंतर सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

  • अप्सरा रेड्डी यांनी मे 2016 मध्ये 'एआयएडीएमके' पक्षात प्रवेश केला होता. जयललिता यांच्या निधनानंतर त्या शशिकला यांच्या कंपूत शिरल्या. त्यानंतर रेड्डी भाजपमध्ये प्रवेश करणार होत्या, मात्र तिथे आपण फक्त फोटोपुरत्या राहिलो होतो, अशी खदखद त्यांनी व्यक्त केली.

  • 'ट्रान्सजेंडर महिला काहीच करु शकत नाहीत, असं मी आजवर ऐकत आले आहे. मात्र देशातील सर्वात जुन्या आणि मोठ्या राजकीय पक्षात प्रवेश करणं हा अत्यंत भावनिक क्षण आहे' अशा भावना तिने व्यक्त केल्या.

  • अप्सरा रेड्डी यांनी ब्रॉडकास्ट जर्नलिझमची पदवी मिळवली आहे. शोधपत्रकारितेमध्ये त्यांनी स्पेशलायझेशन केलं होतं. त्यानंतर त्यांनी काही वृत्तपत्रांमध्ये नोकरीही केली आहे.

भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथ आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञ :
  • मुंबई : भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथ यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) मुख्य अर्थतज्ज्ञपदाची सूत्रं स्वीकारली आहेत. 'आयएमएफ' (इंटरनॅशनल मॉनिटरी फंड) च्या इतिहासात पहिल्यांदाच महिलेला प्रमुखपद देण्यात आलं असून भारतीय महिलेला हा सन्मान मिळणं अभिमानास्पद आहे.

  • गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात गीता गोपीनाथ यांची या पदावर निवड झाली होती. मॉरिस ऑब्सफेल्ड 31 डिसेंबर रोजी मुख्य अर्थतज्ज्ञाच्या पदावरुन निवृत्त झाले. त्यानंतर गीता यांना पदभार स्वीकारला.

  • गीता गोपीनाथ यांचा जन्म म्हैसूरमध्ये झाला होता. हार्वर्ड विद्यापीठात त्या प्राध्यापक होत्या. गीता गोपीनाथ आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत कार्यरत आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने एक ऑक्टोबर रोजी त्यांची नियुक्‍ती जाहीर करताना गीता गोपीनाथ या जागतिक स्तरावरील अव्वल दर्जाच्या अर्थतज्ज्ञ असल्याचं म्हटलं होतं.

  • आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रमुखपद याआधी रघुराम राजन यांनीही भूषवलं आहे. त्यांच्यानंतर हा मान मिळणार्‍या त्या दुसर्‍या भारतीय ठरल्या आहेत.

दिनविशेष :
  • प्रवासी भारतीय दिन

महत्वाच्या घटना 

  • १७६०: बरारीघाटच्या लढाईत अहमद शाह दुर्रानी यांनी मराठ्यांचा पराभव केला.

  • १७८८: कनेक्टिकट हे अमेरिकेचे ५वे राज्य बनले.

  • १८८०: क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना राजद्रोहाच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि त्यांना तेहरान जहाजाने एडनला नेण्यात आले.

  • १९१५: महात्मा गांधी अफ्रिकेतुन भारतात आले.

  • २००१: नव्या सहस्रकातील पहिले खग्रास चंद्रग्रहण दिसले.

  • २००२: भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंड विरूद्ध एकदिवसीय मालिका जिंकली.

  • २००२: महात्मा गांधी भारतात परतल्या बद्दल ९ जानेवारी हा भारतीय प्रवासी दिन म्हणून साजरा करण्याचे योजण्यात आले.

  • २००७: स्टीव जॉब्स यांनी पहिला आयफोन प्रकाशित केला.

जन्म 

  • १९१३: अमेरिकेचे ३७वे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांचा जन्म. (मृत्यू: २२ एप्रिल १९९४)

  • १९१८: मार्क्सवादी विचारवंत लेखक प्रभाकर उर्ध्वरेषे यांचा जन्म.

  • १९२२: जन्माने भारतीय असलेले अमेरिकन नोबेल पारितोषिक विजेते हर गोबिंद खुराना यांचा जन्म. (मृत्यू: ९ नोव्हेंबर २०११)

  • १९२६: चित्रपट अभिनेते कल्याण कुमार गांगुली तथा अनुप कुमार यांचा जन्म. (मृत्यू: २० सप्टेंबर १९९७ – मुंबई)

  • १९२७: सौंदर्यशास्त्राचे अभ्यासक आणि समीक्षक रा. भा. पाटणकर यांचा जन्म.

  • १९३४: पार्श्वगायक महेंद्र कपूर यांचा जन्म. (मृत्यू: २७ सप्टेंबर २००८ – मुंबई)

  • १९५१: ख्यालगायक व पं. कुमार गंधर्व यांचे पट्टशिष्य पं. सत्यशील देशपांडे यांचा जन्म.

मृत्यू 

  • १८७३: फ्रांसचे पहिले अध्यक्ष लुई-नेपोलियन बोनापार्ट उर्फ नेपोलियन ३रा यांचे निधन. (जन्म: २० एप्रिल १८०८)

  • १९२३: पहिले भारतीय सनदी अधिकारी (ICS) सत्येंद्रनाथ टागोर यांचे निधन. (जन्म: १ जून १८४२)

  • २०१३: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थतज्ञ जेम्स बुकॅनन यांचे निधन. (जन्म: ३ ऑक्टोबर१९१९)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.