चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०९ जून २०१९

Date : 9 June, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पंतप्रधान नरेंद्र मोदींना मालदीवचा सर्वोच्च नागरी पुरस्कार :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मालदीवच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरव होणार आहे. प्रसारभारतीने याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. मोदी सध्या दोन दिवसीय मालदीव आणि श्रीलंकेच्या विशेष दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

  • ‘निशान इजुद्दीन’ असे मालदीवच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराचे नाव आहे. दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची धुरा सांभाळल्यानंतर मोदींचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. आज ते मालदीवला जातील त्यानंतर रविवारी ते श्रीलंकेच्या दौऱ्यावर असतील. श्रीलंकेत गेल्या महिन्यात झालेल्या भीषण दहशतवादी साखळी स्फोटांच्या पार्श्वभूमीवर भारत श्रीलंकेसोबत असल्याचे जाहीर करण्यासाठी मोदी हा दौरा करणार आहेत. दरम्यान, श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाला सिरीसेना यांनी गेल्या आठवड्यात मोदींच्या शपथविधी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. ‘नेबरहूड फर्स्ट’ हे दर्शवण्याचाही मोदींचा प्रयत्न असणार आहे.

  • मालदीव भारताचा एक चांगला मित्र असून या दोशासोबत आपली संस्कृती आणि इतिहास खोलवर जोडला गेला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात मालदीवसोबत भारताचे द्विपक्षीय संबंध खूपच मजबूत झाले आहेत. या भेटीमुळे हे नाते अधिकच घट्ट होईल असे मोदींनी या दौऱ्यावर भाष्य करताना म्हटले आहे.

‘एस. जयशंकर हे जगातील उत्तम राजनीतिज्ञांपैकी एक’ :
  • भारताचे नवे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांच्या नियुक्तीचे अमेरिकेतील माजी राजनीतिज्ञांनी स्वागत केले आहे. अमेरिका व भारत यांच्यातील धोरणात्मक संबंध त्यांच्या कारकीर्दीत आणखी वाढत जातील  असे त्यांनी म्हटले आहे.

  • जयशंकर (वय ६४)हे राजनयात वाकबगार असून त्यांच्याकडे वाटाघाटीची वेगळी कौशल्ये आहेत. २०१३-२०१५ दरम्यान ते अमेरिकेत भारताचे राजदूत होते.

  • दक्षिण व मध्य आशिया विषयक सहायक परराष्ट्र मंत्री निशा देसाई बिस्वाल यांनी सांगितले की, जयशंकर यांची परराष्ट्रमंत्रिपदावर नेमणूक झाली ही महत्त्वाची बाब आहे. ते निष्णात राजनीतीज्ञ असून त्यांचा  जागतिक अनुभव खूप मोठा आहे. जगात त्यांच्याविषयी आदराची भावना असून अमेरिकेबरोबरचे द्विपक्षीय संबंध सुधारण्यात त्यांनी मोठी भूमिका पार पाडली आहे. अमेरिका व भारत यांच्यातील संबंध त्यांच्या परराष्ट्र पदी नेमणुकीने आणखी वृद्धिंगत होतील.

  • भारतीय राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांच्या अटकेवरून दोन्ही देशात वाद सुरू होता, त्यावेळी जयशंकर हे भारताचे राजदूत  होते. बिस्वाल व जयशंकर यांनी या पेचप्रसंगात एकत्रित काम केले होते.

शेजारधर्माला प्राधान्य हेच भारताचे धोरण :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी मालदीव भेटीत ‘शेजारधर्माला प्राधान्य’ देण्याच्या आपल्या धोरणानुसार मालदीवशी सहा द्विपक्षीय करार केले. त्याच वेळी मालदीव संसदेतील भाषणात पाकिस्तानचे नाव टाळून, एका देशाने पुरस्कृत केलेल्या दहशतवादाचा मानवतेला सर्वात मोठा धोका असल्याचे निदर्शनास आणले.

  • एका देशाच्या पाठिंब्याने फोफावलेल्या दहशतवादाचा सध्या मानवतेला सर्वात मोठा धोका असल्याने त्याचा मुकाबला करण्यासाठी सर्वानी एकत्र यावे, असे आवाहन मोदी यांनी जगातील नेत्यांना केले. मालदीवच्या संसदेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध इतिहासाहूनही जुने आहेत. मालदीवमधील लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक भारतीय तुमच्यासोबत आहे.  पंतप्रधानपदी फेरनिवड झाल्यानंतर मोदी यांनी आपला पहिलाच परदेश दौरा मालदीव या शेजारी राष्ट्रात केला. मालदीवची राजधानी माले येथे मोदी यांचे शनिवारी संध्याकाळी आगमन झाले. विमानतळावर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. पंतप्रधान मोदी आणि मालदीवचे अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोली यांच्यात शनिवारी व्यापक चर्चा होऊन दोन्ही देशांनी संरक्षण आणि सागरी सुरक्षा यासह अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमधील द्विपक्षीय संबंध बळकटकरण्यासाठी सहा करारांवर स्वाक्षऱ्या केल्या.

  • दहशतवादाचा एखाद्या देशालाच धोका नाही तर संपूर्ण संस्कृतीलाच धोका आहे, चांगले दहशतवादी आणि वाईट दहशतवादी असे वर्गीकरण लोक अद्यापही करीत आहेत ही दुर्दैवाची बाब आहे, असेही मोदी म्हणाले.

  • पाकिस्तानच्या भूमीतील दहशतवादी संघटनांना पाठिंबा देणे त्या देशाने थांबवावे, असेही पाकिस्तानला बजावण्यात आले आहे. परंतु आता डोक्यावरून पाणी गेले आहे. त्यामुळे जगातील नेत्यांनी दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन मोदी यांनी केले.

यंदा महाराष्ट्राला मेडिकलच्या जागा वाढवून मिळणार, तात्याराव लहानेंची माहिती :
  • मुंबई : यंदा महाराष्ट्राला मेडिकलच्या 1740 जागा वाढवून मिळण्याची शक्यता आहे. काल दिल्ली दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊन मेडिकल प्रवेशाच्या जागा वाढवून देण्याची मागणी केली. त्यानुसार यावर्षी महाराष्ट्राला एमबीबीएसच्या अतिरिक्त जागा मिळणार असल्याची माहिती तात्याराव लहाने यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.

  • या शैक्षणिक वर्षात मेडिकल प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू होणार नाही. त्यामुळे या वाढलेल्या जागांचा फायदा मेडिकलमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी राजधानी दिल्लीत केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांची भेट घेतली. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना आरक्षणामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचं नुकसान भरुन काढण्यासाठी वैद्यकीय शाखेच्या जागा वाढवून देण्यात याव्यात, अशी आग्रही मागणी मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

  • केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचीही मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली. डॉ. हर्ष वर्धन यांना राज्य सरकारच्या वतीने एक विनंतीपत्र मुख्यमंत्र्यांनी यावेळी सादर केलं. त्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर शाखेच्या 813 जागा, तर पदवी शाखांमध्ये 1740 जागा वाढवून देण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली. या मागणीवर सकारात्मक आणि वेगाने कार्यवाही करण्याचं आश्वासन डॉ. हर्ष वर्धन यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना दिलं होतं.

 टीम इंडियासाठी दुसरा पेपर अवघड, आज ऑस्ट्रेलियाशी मुकाबला :
  • लंडन  : विराट कोहलीच्या टीम इंडियाचा विश्वचषक मोहिमेतला दुसरा सामना आज दुपारी खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघाचा मुकाबला ऑस्ट्रेलियाशी होत आहे. वन डे सामन्यांच्या क्रमवारीत भारत दुसऱ्या आणि ऑस्ट्रेलिया पाचव्या स्थानावर आहे.

  • पण त्याच ऑस्ट्रेलियानं भारत दौऱ्यातल्या पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत 0-2 अशा पिछाडीवरून 3-2 असा सनसनाटी विजय साजरा केला होता. त्या पार्श्वभूमीवर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधला विश्वचषकाचा सामना अतिशय चुरशीचा होण्याची चिन्हं आहेत.

  • भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आजवर 136 सामने खेळले आहेत. त्यात ऑस्ट्रेलिया संघ नेहमीच वरचढ राहिलेला आहे. ऑस्ट्रेलियाने 77 सामन्यात तर  भारताने 49 सामन्यात विजय साकारला आहे.

  • विश्वचषकात भारत आणि ऑस्ट्रेलिया 11 सामन्यात आमनेसामने आले असून ऑस्ट्रेलियाने 8 तर भारताने केवळ तीनदा विजय मिळवला आहे. विश्वचषकात देखील नेहमीच ऑस्ट्रेलियाचे पारडे जड असल्याचे दिसून आले आहे.

  • मात्र या विश्वचषकात ऑस्ट्रेलिया संघ सध्या डळमळीत अवस्थेत आहे. असे असले तरी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघासाठी हा पेपर म्हणावा तितका सोपा नाही. कारण ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या दोन सामन्यांमध्ये दमदार विजय मिळवला आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १६६५: मिर्झाराजे जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात पुरंदरचा तह झाला.

  • १६९६: छत्रपती राजाराम आणि महाराणी ताराबाई यांना तामिळनाडुतील जिंजी किल्ल्यावर पुत्ररत्‍न झाले. मुलाचे नाव शिवाजी असे ठेवले.

  • १७००: दख्खन स्वारीवर असलेल्या औरंगजेबाने सज्जनगड जिंकला.

  • १८६६: अलाहाबाद उच्च न्यायालयाची स्थापना.

  • १९००: भारतीय राष्ट्रवादी बिरसा मुंडा यांचे ब्रिटिशांच्या तुरुंगात निधन झाले.

  • १९०६: स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे लंडनला प्रयाण.

  • १९३१: रॉबर्ट गोडार्ड या शास्त्रज्ञाला अंतराळ प्रक्षेपणासाठी वापरल्या जाणार्‍या रॉकेटचे पेटंट मिळाले.

  • १९३४: डोनाल्ड डक पहिल्यांदा द व्हाइज लिटिल मर्न मध्ये दिसले.

  • १९३५: एडविन आर्मस्ट्राँगने पहिल्यांदा एफ.एम. लहरींचे प्रसारण केले.

  • १९४६: राजे भूमिबोल अतुल्यतेज थायलंडच्या राजसिंहासनावर विराजमान झाले. कोणत्याही देशावर सर्वात दीर्घकाळ राज्य करणारे हे राजे आहेत.

  • १९६४: भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून लाल बहादुर शास्त्री यांनी सूत्रे हाती घेतली.

  • १९७५: ब्रिटनमधील लोकसभेच्या (House of Commons) कामकाजाचे दूरचित्रवाणीवरुन थेट प्रसारण सुरू झाले.

  • १९९७: सुखोई-३० के ही रशियन बनावटीची विमाने भारतीय हवाई दलात दाखल.

  • २००१: भारताच्या लिअँडर पेस व महेश भूपतीने फ्रेन्च टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरी गटाचे विजेतेपद मिळवले.

जन्म 

  • १६७२: रशियाचा झार पीटर द ग्रेट (पहिला) यांचा जन्म. (मृत्यू: ८ फेब्रुवारी १७२५)

  • १८४५: भारताचे ३६वे गव्हर्नर-जनरल गिल्बर्ट इलियट-मरे-क्यंनमॉंड यांचा जन्म. (मृत्यू: १ मार्च १९१४)

  • १८९७: क्रांतिकारक रामप्रसाद बिस्मिल यांचा जन्म.

  • १९१२: संगीतकार वसंत देसाई यांचा जन्म. (मृत्यू: २२ डिसेंबर १९७५)

  • १९३१: भारतीय लेखक व राजकारणी नंदिनी सत्पथी यांचा जन्म. (मृत्यू: ४ ऑगस्ट २००६)

  • १९४९: सामाजिक कार्यकर्त्या व भारतातील पहिल्या महिला आय. पी. एस. अधिकारी किरण बेदी यांचा जन्म.

  • १९८१: इंग्लिश-भारतीय सतार वादक आणि संगीतकार अनुष्का शंकर यांचा जन्म.

मृत्यू 

  • १८३४: अर्वाचीन बंगाली व मराठी गद्यलेखनाचा पाया घालणारे धर्मप्रसारक पं. विल्यम केरी यांचे निधन. (जन्म: १७ ऑगस्ट १७६१)

  • १८७०: इंग्लिश कादंबरीकार व लेखक चार्ल्स डिकन्स यांचे निधन. (जन्म: ७ फेब्रुवारी १८१२)

  • १९००: आदिवासी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांचा ब्रिटिशांच्या कैदेत संशयास्पदरित्या मृत्यू. (जन्म: १५ नोव्हेंबर१८७५)

  • १९४६: थायलँडचा राजा आनंद महिडोल तथा राम (सातवा) यांचे निधन. (जन्म: २० सप्टेंबर १९२५)

  • १९९३: बंगाली व हिन्दी चित्रपट दिग्दर्शक व पटकथालेखक सत्येन बोस यांचे निधन. (जन्म: २२ जानेवारी १९१६)

  • १९९५: स्वातंत्र्यसैनिक, संसदपटू, शेतकरी चळवळीतील नेते प्रा. गोगिनेनी रंगा नायकुलू ऊर्फ एन. जी. रंगा यांचे निधन.(जन्म: ७ नोव्हेंबर १९००)

  • २०००: कॉँग्रेस नेता केंद्रीय मंत्री राजेश पायलट यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.