चालू घडामोडी - ०९ मार्च २०१८

Date : 9 March, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पेटीएमचे संस्थापक फोर्ब्सच्या यादीत, सर्वात तरुण अब्जाधीश :
  • न्यूयॉर्क : फोर्ब्जने ग्लोबल बिलियनेअर्स म्हणजेच जागतिक अब्जाधीशांची यादी नुकतीच प्रसिद्ध केली आहे. या यादीत यंदा 119 भारतीयांचा समावेश झाला आहे. विशेष म्हणजे, या यादीत पेटीएमचे संस्थापक विजय शर्मा सर्वात तरुण अब्जाधीश ठरले आहेत. तर सर्वात ज्येष्ठ व्यक्ती म्हणून एल्केम लॅबोरेटरीजचे निवृत्त संचालक संप्रदा सिंह यांचा समावेश झाला आहे.

  • फोर्ब्सच्या या यादीत 119 भारतीयांपैकी रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी 19 व्या स्थानी मिळाले आहे. गेल्या वर्षी ते 33 व्या स्थानावर होते. पण यंदा त्यांच्या संपत्तीत 16.9 अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास 1.1 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. सध्या त्यांच्याकडे 40.1 अब्ज डॉलर ( जवळपास 2.61 लाख कोटी रुपये) संपत्ती असल्याचे फोर्ब्सने जाहीर केलेल्या यादीत सांगितले आहे.

  • विशेष म्हणजे, या यादीत सर्वात कमी तरुण व्यक्ती म्हणून पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा (39) यांचा समावेश झाला आहे. विजय शर्मा यांना 1394 वे स्थान मिळाले आहे. त्यांच्याकडे 1.7 अब्ज डॉलर संपत्ती आहे.

  • तर एल्केम लॅबोरेटरीजचे निवृत्त संचालक संप्रदा सिंह (92) हे सर्वात ज्येष्ठ भारतीय ठरले आहेत. त्यांना 1867 वे स्थान मिळाले आहे. त्यांनी आपल्या एल्केम लॅबोरेटरीजची स्थापना 45 वर्षांपूर्वी केली होती. स्वत: चा व्यावसाय सुरु करण्यापूर्वी ते एका मेडिकलमध्ये काम करत होते.

  • दरम्यान, या यादीत काही महिलांनाही स्थान मिळाले आहे.यात सावित्री जिंदल, किरण मजुमदार-शॉ, स्मिता कृष्णा गोदरेज, लीना तिवारी, अनु आगा, शीला गौतम आणि मधु कपूर आदींचा समावेश आहे.(source :abpmajha)

रिओ चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदी :
  • कोहिमा - नॅशनालिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे (एनडीपीपी) नेते नैफियु रिओ यांनी गुरुवारी नागालँडच्या मुख्यमंत्रीपदाची चौथ्यांदा शपथ घेतली. राज्यपाल पद्मनाभआचार्य यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. उपमुख्यमंत्रीपदी भाजपाचे वाय. पॅट्टन यांनाही शपथ दिली गेली. राज्यपालांनी रिओ यांना सभागृहात १६ मार्चला बहुमत सिद्ध करून दाखवण्यास सांगितले आहे.

  • रिओ यांचा पक्ष राज्यात भाजपासोबत पीपल्स डेमोक्रॅटिक अलायन्सच्या नावाखाली सत्तेत आला आहे. ‘आम्ही बदल घडवू, आम्ही सगळ्या घटकांसाठी काम करू. आम्ही कोणालाही मागे राहू देणार नाही,’ असे रिओ शपथविधीनंतरच्या भाषणात म्हणाले.

  • आचार्य यांनी दहा मंत्र्यांनाही पदाची शपथ दिली, त्यात सहा जुने आहेत. ६० सदस्यांच्या विधानसभेत ३२ आमदारांच्या पाठिंब्यावर रिओ यांनी सरकार स्थापन करण्यासाठी ४ मार्च रोजी दावा केला होता.(source :lokmat)

जेएनपीटी बीएमसीटी बंदरात पहिल्यांदाच महिला आॅपरेटर :
  • उरण - जेएनपीटी बंदराअंतर्गत उभारण्यात आलेल्या चौथ्या बंदरात (बीएससीटी) उपकरण आॅपरेटर म्हणून १३ महिला काम करीत आहेत. आंतरराष्टÑीय मानांकनानुसार उपकरण आॅपरेटर म्हणून करीत असलेले बीएमसीटी हे देशातील पहिले बंदर ठरले आहे.

  • जेएनपीटीच्या चौथ्या बंदरात काम करणाºया महिलांमध्ये व्यावसायिक, अभियांत्रिकी, वित्त, मनुष्यबळ, माहिती तंत्रज्ञान, परिचालन आदि विभागामध्ये या १३ महिला कार्यरत आहेत. कंपनीने उद्योगामध्ये महिलांना प्राधान्य देवून पारंपरिक पुरुषी काम समजल्या जाणाºया विचाराला छेद देण्याचे काम केल्याबद्दल महिला आंतरराष्टÑीय शिपिंग अ‍ॅण्ड ट्रेडिंग असोसिएशनच्या अध्यक्षा संजाम शाही यांनी कौतुक केले आहे. तर बीएमसीटीचे सीईओ सुरेश अमिरपू यांनी महिला कर्मचाºयांना यशस्वी होताना पाहून आनंद होत असल्याचे सांगितले.

  • महिला कर्मचाºयांनीच आमच्या सुरक्षित आणि उत्पादनशील वातावरणाला सहाय्य केले आहे. कंटेनर क्षेत्रात काम करणाºया महिलांनी अत्यंत कमी वेळात आवश्यक ज्ञान आत्मसात केले आहे. याआधी पुरुषांची मक्तेदारी समजल्या जाणाºया या कंटेनर क्षेत्रात महिलांनीही समाधानकारक काम करणाºया बीएमसीटीच्या महिलांना आंतरराष्टÑीय महिला दिनाच्या शुभेच्छाही सुरेश अमीरपू यांनी दिल्या आहेत.

  • बीएमसीटीमध्ये विविध पदावर कार्यरत असलेल्या सारिका कोळी, वैशाली तांडेल, प्रतीक्षा म्हात्रे, भावना भोईर, प्रियांका ठाकूर, दर्शना पाटील, ऐश्वर्या कडू, त्रिशा ठाकूर आदि महिलांनी बंदर आणि कंटेनर हाताळणी क्षेत्रातील नोकरीचा अनुभव कथन करताना आनंद व्यक्त केला आहे.(source :lokmat)

बांगलादेशचा धुव्वा उडवत टीम इंडिया विजयी :
  • कोलंबो : टीम इंडियानं बांगलादेशचा 6 विकेट्सनी धुव्वा उडवून, ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या तिरंगी मालिकेत आपलं आव्हान कायम राखलं. श्रीलंकेतल्या कोलंबोत या मालिकेचं आयोजन करण्यात आलं आहे.

  • या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेला आठ बाद 139 धावांत रोखून टीम इंडियाच्या विजयाचा पाया रचला होता. मग शिखर धवननं 55 धावांची खेळी उभारुन भारताला विजयपथावर नेलं. त्यानं ही खेळी पाच चौकार आणि दोन षटकारांनी सजवली.

  • धवननं सुरेश रैनाच्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी रचून भारताच्या डावाला आकार दिला.

  • त्याआधी, भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशला वीस षटकांत 8 बाद 139 धावांत रोखलं. भारताकडून जयदेव उनाडकटनं 38 धावांत तीन फलंदाजांना माघारी धाडलं. विजय शंकरनं दोन, तर यजुवेंद्र चहल आणि शार्दूल ठाकूरनं प्रत्येकी एकेक विकेट काढली.(source :abpmajha)

तुकाराम मुंढे इन अॅक्शन; नाशिक महानगरपालिकेच्या ४ अधिकाऱ्यांना अल्टिमेटम :
  • नाशिक: आपल्या धडाकेबाज आणि निर्भीड कार्यशैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या तुकाराम मुंढे यांनी अवघ्या महिन्याभरातच नाशिक महानगरपालिकेतील सुस्त प्रशासकीय अधिकाऱ्यांना खडबडून जागे केले आहे.

  • मुंढे यांनी शुक्रवारी पालिकेच्या चार अधिकाऱ्यांना अल्टिमेटम देत प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केली आहे. या अधिकाऱ्यांवर अनियमत कारभाराचे आरोप आहेत. या सगळ्याबद्दल अधिकाऱ्यांना 10 दिवसांत स्पष्टीकरण देण्याचे आदेश मुंढे यांनी दिले आहेत. 

  • मुंढे यांनी 9 फेब्रुवारी रोजी नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे हातात घेतली होती. त्यानंतर मुंढे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीप्रमाणे प्रशासकीय साफसफाईला सुरुवात केली होती. अवघ्या काही दिवसांमध्येच त्यांनी अनेक अधिकाऱ्यांवर धारेवर धरायला सुरुवात केली होती.

  • यामुळे पुन्हा एकदा प्रशासन विरुद्ध लोकप्रतिनिधी असा सामना रंगण्यास सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वीच मुंढे यांनी कर्मचा-यांना मिळणा-या वैद्यकीय भत्त्यात कपात करण्याची तयारी सुरू केल्याने कर्मचारी संघटनांनीही आयुक्तांविरोधात दंड थोपटले होते. आयुक्तांकडून गेल्या काही दिवसात घेतल्या गेलेल्या निर्णयाविरुद्ध मान्यताप्राप्त म्युनिसिपल कर्मचारी-कामगार संघटना एकवटल्या असून त्याविरूद्ध एकत्रित लढा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.(source :lokmat)

ट्रम्प यांचा स्वदेशी बाणा, भारतीय उद्योगांना मोठा फटका बसण्याची शक्यता :
  • वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या 'नेशन फर्स्ट' या धोरणाला अनुसरून एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी अमेरिकेत आयात केल्या जाणाऱ्या स्टील आणि अॅल्युमिनियमवर मोठ्याप्रमाणावर कर लादला आहे. फक्त कॅनडा आणि मेक्सिको या दोन देशांना यामधून सूट देण्यात आली आहे.

  • ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय उद्योगक्षेत्रात मोठी खळबळ माजली असून त्यामुळे भविष्यात जागतिक व्यापारयुद्ध छेडले जाण्याची शक्यता आहे. सध्या अमेरिकन उद्योगांना काही चुकीच्या व्यापार धोरणांमुळे झळ सोसावी लागत आहे.

  • स्टील आणि अॅल्युमिनियच्या आयातीवर कर लादल्याने या क्षेत्रातील अमेरिकन उद्योगांना चालना मिळेल, असे ट्रम्प यांनी सांगितले. मात्र, अनेक देशांनी ट्रम्प यांच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार, या निर्णयाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे पडसाद उमटू शकतात. भारतालाही याचा खूप मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे भविष्यात जागतिक व्यापारयुद्ध छेडले जाण्याची शक्यता आहे. 

  • ट्रम्प यांच्या नव्या धोरणानुसार पोलादावर 25 टक्के आणि अॅल्युमिनियमवर 10 टक्के इतका कर आकारला जाईल. येत्या 15 दिवसांत या निर्णयाची अंमलबजावणी होईल. फक्त कॅनडा आणि मेक्सिको या दोन देशांना यामधून वगळण्यात आले आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयाला रिपब्लिकन पक्षातील अनेक सिनेटर्स आणि अमेरिकेशी व्यापारी भागीदारी असणाऱ्या कंपन्यांनी विरोध केला आहे.(source :lokmat)

त्रिपुरामध्ये आज विप्लव देब यांचा शपथविधी :
  • आगरतळा : त्रिपुरामध्ये आज भाजपच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. तब्बल 25 वर्षांनंतर डाव्यांची सत्ता बदलली आहे. त्यामुळे येथील भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.

  • त्रिपुराचे भापजचे प्रदेश अध्यक्ष विल्पव कुमार देव हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. आज (शुक्रवार) दुपारी 12 वाजता असम रायफल्स मैदानात हा शपथविधी पार पडणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहा यांच्यासह भाजपशासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्रीही या शपथविधीला उपस्थित राहणार आहेत.

  • दरम्यान, या शपथविधी सोहळ्याला माजी मुख्यमंत्री माणिक सरकार आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्रीही उपस्थित राहणार आहेत.(source :abpmajha)

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १७९६: नेपोलियन बोनापार्ट यांनी पहिली बायको जोसेफिना शी लग्न केले.

  • १९४५: दुसरे महायुद्ध: अमेरिकेच्या बी-२९ विमानांनी जपानच्या टोकियो शहरावर बॉम्बहल्ला केला. यात १ लाखाहुन अधिक लोक मृत्युमुखी पडले.

  • १९५९: बार्बी या जगप्रसिद्ध बाहुलीच्या विक्रीस सुरूवात झाली.

  • १९९१: युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष स्लोबोदान मिलोसोव्हिच यांच्याविरुद्ध राजधानी बेलग्रेड मधे प्रचंड निदर्शने.

  • १९९२: कवी आणि लेखक डॉ. हरिवंशराय बच्‍चन यांना नवी दिल्ली येथे के. के. बिर्ला प्रतिष्ठानद्वारा आयोजित समारंभात पहिला सरस्वती पुरस्कार उपराष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात आला.

जन्म

  • १८२४: अमेरिकन स्टॅनफर्ड विद्यापीठाचे संस्थापक अमासा लेलंड स्टॅनफर्ड यांचा जन्म. (मृत्यू: २१ जून१८९३)

  • १८६३: गायक आणि नट भाऊराव बापूजी कोल्हटकर यांचा जन्म. (मृत्यू: १३ फेब्रुवारी १९०१)

  • १८९९: महाराष्ट्र कवी यशवंत दिनकर पेंढारकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ नोव्हेंबर १९८५)

  • १९३०: संतसाहित्याचे अभ्यासक युसुफखान महंमद पठाण यांचा जन्म.

  • १९३१: माजी केंद्रीयमंत्री डॉ. करणसिंग यांचा जन्म.

  • १९३३: अमेरिकन गायक-गीतकार लॉईड प्राईस यांचा जन्म.

  • १९३५: क्वालकॉम कंपनी चे सहसंस्थापक अँड्र्यू वितेर्बी यांचा जन्म.

  • १९४३: अमेरिकन बुद्धिबळपटू व ग्रँडमास्टर रॉबर्ट जेम्स ऊर्फ बॉबी फिशर यांचा जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी २००८)

  • १९५१: प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म.

  • १९५२: पहिल्या वैमानिक कप्तान सौदामिनी देशमुख यांचा जन्म.

  • १९५६: केन्द्रीय मंत्री व अर्थतज्ञ शशी थरूर यांचा जन्म.

  • १९७०: भारतीय उद्योगपती नवीन जिंदाल यांचा जन्म.

मृत्यू

  • १६५०: संत तुकाराम यांचा वैकुंठवास.

  • १८५१: डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ हान्स क्रिस्टियन ओरस्टेड यांचे निधन. (जन्म: १४ ऑगस्ट १७७७)

  • १९५७: मुंबई राज्याचे माजी मुख्यमंत्री बाल गंगाधर खेर यांचे निधन.

  • १९६९: उद्योगपती, प्रशासक व संसदपटू सर होर्मुसजी पेरोशॉ तथा होमी मोदी यांचे निधन. (जन्म: २३ सप्टेंबर १८८१)

  • १९७१: दिगदर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक के. आसिफ यांचे निधन. (जन्म: १४ जून १९२२)

  • १९९२: इस्त्रायलचे ६ वे पंतप्रधान व नोबेल पारितोषिक विजेते मेनाकेम बेगीन यांचे निधन. (जन्म: १६ ऑगस्ट १९१३)

  • १९९४: पद्मश्री, दादासाहेब फाळके व सोविएत लँड नेहरू पुरस्कार विजेत्या अभिनेत्री देविका राणी यांचे निधन. (जन्म: ३० मार्च १९०८)

  • २०००: अभिनेत्री उषा मराठे – खेर ऊर्फ उषा किरण यांचे निधन. (जन्म: २२ एप्रिल १९२९)

  • २०१२: चित्रपट कलाकार आणि दिग्दर्शक जॉय मुखर्जी यांचे निधन. (जन्म: २४ फेब्रुवारी १९३९)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.