चालू घडामोडी - ०९ मार्च २०१९

Updated On : Mar 09, 2019 | Category : Current Affairsनॉर्वे चषक बुद्धिबळ स्पर्धा - मुंबईच्या कुश भगतला कांस्यपदक :
 • मुंबई : नऊ वर्षांचा कँडिडेट मास्टर कुश भगत याने पॅरिस येथे रंगलेल्या खुल्या गटाच्या बुद्धिबळ स्पर्धेत कांस्यपदक पटकावण्याची किमया साधली.

 • सातव्या फेरीपर्यंत आघाडीवर असणाऱ्या कुश भगतला आठव्या फेरीत पराभव पत्करावा लागला आणि नवव्या फेरीतील डाव बरोबरीत सोडवल्यामुळे त्याला विजेतेपदापासून वंचित राहावे लागले. भगतने नवव्या फेरीअखेर सहा गुणांची कमाई करत तिसरे स्थान पटकावले.

 • १४०० ते २००० एलो रेटिंग गुण असलेल्या बुद्धिबळपटूंना या स्पर्धेत सहभाग देण्यात आला होता. जवळपास १२ देशांतील बुद्धिबळपटूंनी या स्पर्धेत भाग घेतला होता.

 • १८वे मानांकन मिळालेल्या कुशने दुसऱ्या फेरीत अव्वल मानांकित फावरे मॅथ्यू याच्यावर मात करत सर्वानाच धक्का दिला होता. त्यानंतर तिसऱ्या फेरीत त्याने तौरे शांथी याला हरवले होते. भगतने या स्पर्धेद्वारे ११८ एलो गुणांची कमाई करत आपली रेटिंग संख्या १८०० वर नेली.

पाकिस्तानात पहिल्यांदाच हिंदू महिलेकडे सभागृहाचे अध्यक्षपद :
 • पाकिस्तान संसद सभागृहाचे अध्यक्षपद भूषवण्याची संधी पहिल्यांदाच हिंदू महिलेला मिळाली आहे. कृष्णा कुमारी कोहली  उर्फ किशू बाई असे त्यांचे नाव आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत त्यांच्याकडे ही जबाबदारी दिली आहे. पाकिस्तानमधील श्रमिकांच्या अधिकारांसाठी कृष्णा कुमारी कोहली यांनी अनेक वर्षे काम केले. त्यानंतर २०१८ मध्ये त्या संसदेवर निवडून आल्या. पाकिस्तान संसदेमध्ये निवडून येणाऱ्या कृष्णा पहिल्या महिला हिंदू खासदार आहेत.

 • पाकिस्तानच्या संसदेच्या सभागृहातील सदस्य फैजल जावेद यांनी यासंदर्भात ट्विट करत ही माहिती दिली आहे. ‘सभागृहातील सहकारी कृष्णा कुमारी कोहली यांना जागतिक महिला दिनानिमित्त सभागृहाच्या अध्यक्षपदाचा मान देण्याचे सदस्यांनी ठरविले आहे, असे ट्विट फैजल जावेद यांनी केले आहे.  “मी आज या आसनावर बसून स्वत: ला फार भाग्यवान मानते “, असे म्हणून ४० वर्षीय कृष्णा कुमारी कोहली यांनी अधिवेशनाची सुरूवात केली.

 • कृष्णा कुमारी या सिंध प्रांतातील थार येथील सुदूर नगरपारकर जिल्ह्यातील राहणाऱ्या आहेत. ३९ वर्षीय कृष्णा कुमारी यांचं वयाच्या १६ व्या वर्षीच लग्न झालं होतं. त्यावेळी इयत्ता नववीत शिकत होत्या. लग्नानंतरही त्यांनी शिक्षण सुरूच ठेवलं होतं.

 • २०१३ मध्ये त्यांनी सिंध विद्यापीठातून समाजशास्त्राची पदवी घेतली होती. त्यानंतर त्यांनी त्यांच्या भावासोबत पाकिस्तान पीपल्स पार्टीमध्ये प्रवेश करून सामाजिक कार्याला प्रारंभ केला होता. कृष्णा यांनी पाकिस्तानमध्ये महिला आणि अल्पसंख्यांक्याच्या हक्कांसाठी महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे.

अयोध्या वादात मध्यस्थ नियुक्त :
 • नवी दिल्ली : राम जन्मभूमी-बाबरी मशीद जमीन वादाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी मध्यस्थीसाठी तिघांची नियुक्ती केली. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश फकीर महम्मद इब्राहिम खलिफउल्ला या मध्यस्थ समितीचे प्रमुख असून त्यात वरिष्ठ वकील श्रीराम पांचू आणि आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे हे तिघेही अयोध्या वादाच्या ‘प्रभावक्षेत्रा’बाहेरील तमिळनाडूचे आहेत.

 • सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने सांगितले की, या तीन सदस्यांना आणखी कुणाची गरज वाटली तर त्यांनाही या पथकात समाविष्ट करण्यात येईल. घटनापीठात न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण, न्या. एस. ए. नझीर यांचा समावेश आहे.

 • घटनापीठाने सांगितले की, मध्यस्थीची प्रक्रिया उत्तर प्रदेशातील फैजाबाद न्यायालयात होईल त्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने आवश्यक ती व्यवस्था करावी.

 • रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादाचे हे प्रकरण मध्यस्थीसाठी पाठवण्यात कुठलाही कायदेशीर अडथळा नसल्याचेही घटनापीठाने स्पष्ट केले. मध्यस्थीची प्रक्रिया शुक्रवारपासून म्हणजे आठवडाभरात सुरू करण्यात येईल आणि ती गोपनीय राखली जाईल.

 • अयोध्याप्रश्नी मध्यस्थीप्रकरणी न्यायालयाने बुधवारी निकाल राखून ठेवला होता. त्या वेळी विविध पक्षांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले होते.

आधार पडताळणीसाठी मोजावे लागणार २० रूपये :
 • नवी दिल्ली - युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडीयाने गुरूवारी परिपत्रक जारी केले. या परिपत्रकानुसार आधार सुविधेचा वापर करणाऱ्या खाजगी कंपन्यांना प्रत्येक व्यक्तीच्या आधार पडताळणीसाठी 20 रूपये मोजावे लागणार आहे. प्रोसेसिंग ऑफ आधार ऑथेंटिकेशन सर्व्हिस रेग्युलेशन 2019 अंतर्गत सरकारी संस्थांना यामधून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना किंवा संस्थांना कोणत्याही कामांसाठी पैसे मोजावे लागणार नाहीत. 

 • UIDAI च्या परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की, प्रत्येक E- KYC च्या व्यवहारासाठी 20 रूपये (करांसह) तर हो किंवा नाही या पडताळणीसाठी 50 पैसे जास्त मोजावे लागणार आहेत. तसेच खासगी कंपन्यांना १५ दिवसांच्या आत ही रक्कम द्यावी लागणार आहे. जर १५ दिवसापेक्षा अधिक दिवस झाली तर त्या पैशांवर व्याज आकरण्यात येणार आहे. त्याचसोबत पैसे किंवा व्याज न दिल्यास ऑथेटिंकेशन आणि ई-केवायसी सर्विस बंद केली जाण्याची शक्यता आहे.  

 • आधार कायद्यात संशोधन करण्यासाठी केंद्र सरकारने २८ फेब्रुवारीला एक अध्यादेश काढला होता. यात खाजगी कंपन्यांना अथवा संस्थांना UIDAI च्या प्रायव्हेसीच्या नियम आणि अटींचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या अध्यादेशावर UIDAI चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय भूषण पांडेय यांची स्वाक्षरी केली आहे. जर एखादी संस्था पडताळणीसाठी ठरवलेले दर देत नसतील तर त्यांना आधार ऑथेंटिकेशन सर्विसेसचा वापर तात्काळ बंद करणे गरजेचे आहे. किंवा तात्काळ आपल्या निर्णयाबद्दल UIDAI कळवणे गरजेचे आहे, असेही या अध्यादेशात म्हटले आहे. 

गोंदियात महिला राज, महिला अधिकारी चालवतात जिल्ह्याचं प्रशासन :
 • गोंदिया : पुरुषप्रधान संस्कृतीला फाटा देत मागील काही वर्षांत प्रत्येक क्षेत्रात महिलांचा पुढाकार वाढला आहे. गोंदियासारख्या आदिवासीबहुल भागातदेखील महिलांनी पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढली आहे. गोंदियात जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, झेडपी अध्यक्ष, जिल्हा सत्र न्यायाधीश आणि एसटी आगार प्रमुख आशी सगळी पदं महिला भूषवत आहेत. त्यामुळे गोंदिया जिल्ह्याची धुरा महिलांच्याच खांद्यावर आहे, असेच म्हणावे लागेल.

 • गोंदियात जिल्हाधिकरी म्हणून डॉ. कादंबरी बलकवडे तर पोलीस अधीक्षक म्हणून विनिता साहु कार्यरत आहेत. सीमा मडावी या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आहेत. जिल्हा सत्र न्यायाधीश म्हणून माधुरी आनंद तर संजना पटले या गोंदियातल्या एसटीच्या आगाराची संपूर्ण जबाबदारी सांभाळत आहेत.

 • स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50 टक्के अधिकार मिळाले. त्यातच शासनाच्या विविध उपक्रमांसह नोकरीमध्येही महिलांना संधी मिळत असून महिला सक्षम होत असल्याची अनेक उदाहरणे पाहायला मिळत आहेत. गोंदिया जिल्ह्याची सुरक्षा व विकास आता महिलांच्या हाती देण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.

 • गोंदिया जिल्ह्याच्या निर्मितीला 20 वर्षाचा कालावधी लोटला आहे. या 20 वर्षात पहिल्यांदाच गोंदियाच्या जिल्हाधिकारी पदावर आणि पोलीस अधीक्षक पदावर महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नीरव मोदीचे ब्रिटनमधील ७२ कोटींच्या सदनिकेत वास्तव्य :
 • ब्रिटन : पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार कोटींना चुना लावून परदेशात पलायन केलेला हिरेव्यापारी नीरव मोदी ब्रिटनमधील वेस्ट एंड भागात तब्बल 72 कोटींच्या आलिशान सदनिकेमध्ये राहत आहे. न्यायालयाच्य आदेशावरून शुक्रवारीच मोदीचा अलिबाग येथील 100 कोटींचा बंगला स्फोटकांनी पाडण्यात आला. इंग्रजी वृत्तपत्र टेलिग्राफनुसार नीरव मोदी या सदनिकेसाठी महिना 15.5 लाक रुपये भाडे देत आहे. भारताने त्याची बँक खाती गोठविली असली, इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस दिली असली तरीही तो खुलेआम व्यवसाय करत आहे. 

 • नीरव मोदीवर 13700 कोटी रुपयांचा पीएनबी घोटाळा केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी ईडी पैशांची अफरातफर केल्याची चौकशीही करत आहे. त्याने विशेष न्यायालयाला पत्र लिहिले होते, की तो सुरक्षेच्या कारणास्तव भारतात येऊ शकत नाही. 

 • टेलिग्राफच्या वृत्तानुसार नीरव मोदी याला ब्रिटनने नॅशनल इंश्योंरेंस नंबर जारी केल आहे. यामुळे तो ब्रिटनमध्ये केवळ व्यवसायच नाही तर तेथील बँकांची खातीही वापरू शकत आहे. 

 • ईडीने प्रिवेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग न्यायालयात नीरव विरोधात फरारी घोषित करण्यासाठी अर्ज दाखल केला होता. यासाठी न्यायालयाने नीरवच्या वकीलाकडे उत्तर मागितले होते. 

 • मोदीचा १०० कोटींचा बंगला पाडण्याच्या कारवाईचा प्रारंभ, मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणीअंती रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी गेल्या २५ जानेवारी रोजी केला. तेव्हा जेसीबीच्या माध्यमातून हा अत्यंत मजबूत बंगला पूर्णपणे उद्ध्वस्त करणे शक्य झाले नाही.

 • परिणामी, तो डायनामाइट्सच्या माध्यमातून स्फोट घडवून जमीनदोस्त करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. डायनामाइट्स स्फोटांच्या बाबतचे संपूर्ण सुनियोजित नियोजन तज्ज्ञांच्या मदतीने करून शुक्रवारी हा बंगला जमीनदोस्त करण्याचे काम सुरु झाले. कारवाईकरिता ५० तांत्रिक अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. बंगल्याच्या विविध भागांत एकूण 110 डायनामाइट्स लावण्याचे काम गुरुवारी संध्याकाळीच पूर्ण झाले.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

 • १९४५: दुसरे महायुद्ध: अमेरिकेच्या बी-२९ विमानांनी जपानच्या टोकियो शहरावर बॉम्बहल्ला केला. यात १ लाखाहुन अधिक लोक मृत्युमुखी पडले.

 • १९५९: बार्बी या जगप्रसिद्ध बाहुलीच्या विक्रीस सुरूवात झाली.

 • १९९१: युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष स्लोबोदान मिलोसोव्हिच यांच्याविरुद्ध राजधानी बेलग्रेड मधे प्रचंड निदर्शने.

 • १९९२: कवी आणि लेखक डॉ. हरिवंशराय बच्‍चन यांना नवी दिल्ली येथे के. के. बिर्ला प्रतिष्ठानद्वारा आयोजित समारंभात पहिला सरस्वती पुरस्कार उपराष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात आला.

जन्म 

 • १८६३: गायक आणि नट भाऊराव बापूजी कोल्हटकर यांचा जन्म. (मृत्यू: १३ फेब्रुवारी १९०१)

 • १८९९: महाराष्ट्र कवी यशवंत दिनकर पेंढारकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ नोव्हेंबर १९८५)

 • १९३०: संतसाहित्याचे अभ्यासक युसुफखान महंमद पठाण यांचा जन्म.

 • १९३१: माजी केंद्रीयमंत्री डॉ. करणसिंग यांचा जन्म.

 • १९३४: पृथ्वीप्रदक्षिणा करणारे पहिले अंतराळवीर युरी गागारीन यांचा जन्म. (मृत्यू: २७ मार्च १९६८)

 • १९४३: अमेरिकन बुद्धिबळपटू व ग्रँडमास्टर रॉबर्ट जेम्स ऊर्फ बॉबी फिशर यांचा जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी २००८)

 • १९५२: पहिल्या वैमानिक कप्तान सौदामिनी देशमुख यांचा जन्म.

 • १९५६: केन्द्रीय मंत्री व अर्थतज्ञ शशी थरूर यांचा जन्म.

मृत्यू 

 • १६५०: संत तुकाराम यांचा वैकुंठवास.

 • १९६९: उद्योगपती, प्रशासक व संसदपटू सर होर्मुसजी पेरोशॉ तथा होमी मोदी यांचे निधन. (जन्म: २३ सप्टेंबर १८८१)

 • १९७१: दिगदर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक के. आसिफ यांचे निधन. (जन्म: १४ जून १९२२)

 • १९९२: इस्त्रायलचे ६ वे पंतप्रधान व नोबेल पारितोषिक विजेते मेनाकेम बेगीन यांचे निधन. (जन्म: १६ ऑगस्ट १९१३)

 • १९९४: पद्मश्री, दादासाहेब फाळके व सोविएत लँड नेहरू पुरस्कार विजेत्या अभिनेत्री देविका राणी यांचे निधन. (जन्म: ३० मार्च१९०८)

टिप्पणी करा (Comment Below)