चालू घडामोडी - ०९ मे २०१८

Date : 9 May, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘फ्लिपकार्ट’ला वॉलमार्ट विकत घेणार, आज होणार घोषणा :
  • ई-कॉमर्स क्षेत्रात अ‍ॅमेझॉनला ‘काँटे की टक्कर’ देणाऱ्या फ्लिपकार्ट या भारतीय कंपनीला वॉलमार्ट विकत घेणार आहे. १५ अब्ज डॉलरमध्ये हा व्यवहार झाल्याची माहिती समोर येत असून वॉलमार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाउज मॅकमिलन हे देखील भारतात आले आहेत. बुधवारी या कराराबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

  • फ्लिपकार्ट आणि वॉलमार्टमध्ये गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होती. फ्लिपकार्ट घेण्यासाठी अॅमेझॉननेही रस दाखवला होता. मात्र, अॅमेझॉनऐवजी फ्लिपकार्टने वॉलमार्टचा प्रस्ताव स्वीकारला. वॉलमार्टचे सीईओ मॅकमिलन यांचे बंगळुरुत आगमन झाले असून ते दिल्लीत प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन या कराराबाबत चर्चा देखील करणार आहेत.

  • फ्लिपकार्टच्या संचालक मंडळाने नुकताच तिचा ई- कॉमर्स व्यवसाय वॉलमार्टला १५ अब्ज डॉलरला विकण्याचा प्रस्ताव मंजूर केला. या व्यवहारापोटी फ्लिपकार्टच्या प्रवर्तकांना २० टक्के भांडवली लाभ कर देय असेल, असे मानले जाते. फ्लिपकार्ट ७५ ते ८० टक्के हिस्सा विकणार असून त्यापोटी होणाऱ्या लाभापोटी कर भरणे क्रमप्राप्त होईल, असेही सांगितले जाते. 

  • कंपनीतील किरकोळ गुंतवणूकदारांकडील १८ लाख समभागांची खरेदी करताना फ्लिपकार्टने ३५ कोटी डॉलर मोजले. परिणामी फ्लिपकार्टचे मूल्य १७.६९ अब्ज डॉलर गणले गेले. वॉलमार्टबरोबर गुगलची अल्फाबेट ३ अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीसह फ्लिपकार्टकरिता सहखरेदीदार बनली आहे.

रेल्वेचं ऑनलाइन तिकीट बुक करणा-यांसाठी महत्त्वाची बातमी :
  • आयआरसीटीसी संकेतस्थळाद्वारे रेल्वेचं ऑनलाइन तिकीट बुक करण्यासाठी आता लवकरच आधार कार्ड सक्तीचं होण्याची शक्यता आहे. रेल्वेच्या ऑनलाइन तिकीट आरक्षणामधील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आधार कार्ड लिंक करण्याचा निर्णय होऊ शकतो, तसा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे आला असून त्याच्यावर विचार सुरू आहे. हिंदुस्थान टाइम्सने याबाबत वृत्त दिलं आहे.

  • रेल्वे सुरक्षा दलाने मुंबईत ३ मे रोजी सॉफ्टवेअरच्या माध्यमाने ऑनलाइन तिकिटांमध्ये फेरफार करणाऱ्या एजंटला अटक केली होती. त्यावेळी आरोपीची चौकशी करण्यासाठी आणि कार्यपद्धती जाणून घेण्यासाठी रेल्वेचे दिल्लीस्थित वरिष्ठ अधिकारी सोमवारी मुंबईत आले होते.

  • आरोपीची कार्यपद्धती समजून घेऊन तयार केलेला प्रस्ताव त्यांनी रेल्वे बोर्डाला सादर केला आहे. त्यामध्ये आधार लिंक करण्याच्या सूचनेचाही प्रस्ताव आहे. एका आयपी अ‍ॅड्रेसवरून (संगणकाची सांकेतिक ओळख) किमान तिकिटांची मर्यादा ठेवण्याचीही सूचना आहे.

  • व्यावसायिक आयपी अ‍ॅड्रेस असल्यास त्याची नोंद आयआरसीटीसीकडे करण्यात यावी, यानंतर संबंधित व्यावसायिक आयपी अ‍ॅड्रेसला अनेक तिकिटे आरक्षित करण्याची मुभा मिळेल, अशी सूचना करण्यात आली आहे. तसंच, तिकीट आरक्षित करताना ‘कॅप’ अधिक सुरक्षित करण्याच्या सूचनादेखील प्रस्तावित आहे.

केजीबी एजंट ते राष्ट्राध्यक्ष, व्लादिमिर पुतीन यांची चौथी टर्म सुरु :
  • मॉस्को- गुप्तहेर संघटना केजीबीपासून करिअरची सुरुवात करणाऱ्या आणि प्रदीर्घकाळ रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी राहाणाऱ्या व्लादिमिर पुतीनयांच्या कार्यकाळाची चौथी टर्म सुरु झाली आहे. 18 वर्षांपुर्वी त्यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतली होती. आता आणखी 6 वर्षे त्यांना यापदावर राहाता येणार आहे. मॉस्को येथे ग्रँड क्रेमलिन पॅलेस येथे झालेल्या सरकारी कार्यक्रमात त्यांनी चौथ्या कार्यकाळाची सूत्रे स्वीकारली.  ते २०२४ सालापर्यंत अध्यक्षपदाची धुरा वाहतील.

  • स्टॅलिननंतर रशियाचे अध्यक्षपद सर्वात जास्त काळ पुतीन यांनीच भूषविले आहे. अध्यक्षपदासाठी निवडणुकीत पुतीन यांच्याविरोधात सात उमेदवार होते. पुतीन यांचे कडवे टीकाकार अलेक्झी नवल्नी यांना निवडणूक लढविण्यास बंदी घातली होती.

  • पुतीन यांना कार्यकाळासाठी निवडून येताना 76 टक्के इतकी भरघोस मते मिळाली त्यामुळे तेच पुन्हा राष्ट्राध्यक्ष होणार यावर शिक्कामोर्तब झाले. कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार पावेल ग्रुडिनिन यांना 11.8 टक्के मते मिळाली तर व्लादिमिर झिरिनोवस्की यांना 5.6 टक्के मते मिळाली.

  • सरकारी कार्यक्रमानंतर पुतीन म्हणाले, रशियाच्या वर्तमानासाठी आणि भविष्यासाठी काम करणे हे माझे कर्तव्य आहे. शांतता आणि संपन्न भविष्यासाठी तसेच प्रत्येक रशियन कुटुंबाच्या कल्याणासाठी मी काम करेन. व्लादिमिर पुतीन पुर्वी केजीबीचे एजंट होते.

अर्जेंटिनातील विश्व योग स्पर्धेत नेहर्नचा ‘सुवर्ण चौकार’ :
  • पणजी : अर्जेंटिना येथे झालेल्या २६व्या विश्व योगा चॅम्पियनशीपमध्ये गोव्याच्या मास्टर नेहर्न आचार्य याने चार सुवर्णपदकांची कमाई केली. अत्यंत लवचिक आणि तितकाच तीक्ष्ण असलेल्या नेहर्न याने स्पर्धेत अनेकांची मने जिंकली. त्याच्या सादरीकरणालाही उत्कृष्ट दाद मिळाली. ६ ते ८ मे दरम्यान ही स्पर्धा झाली. 

  • नेहर्न हा आंतरराष्ट्रीय योगपटू असून तो लिटील पेन्ग्वीन, हेडगेवार हायस्कूल, पीपल्स हायस्कूल आणि धेंपे उच्च माध्यमिक विद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे. त्याने स्पर्धेत योगासन, आर्टिस्टिक योगा डिस्प्ले या प्रकारात भाग घेतला होता.  नेहर्नने राष्ट्रीय, फेडरेशन चषक, आशियाई चॅम्पियनशीप, आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशीप तसेच उरूग्वे, इटली, अर्जेंटिना, रशिया, थायलंड आणि मलेशिया येथे झालेल्या विश्व चॅम्पियनशीपमध्येही भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.  आर्टिस्टिक योगा हा नेहर्नचा कसलेला विषय आहे. यातील त्याचे सादरणीकरणातील कौशल्य अनेकांना प्रभावित करते. 

  • उल्लेखनीय म्हणजे, यापूर्वीही विश्व योगा स्पर्धेत नेहर्नने त्याने ४ सुवर्ण मिळवले होते. याच इतिहासाची त्याने पुनरावृत्ती केली. २००७ ते २०१७ दरम्यान नेहर्न याने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके मिळवली आहेत. सध्या तो एनआयटीटीई येथे फिजिओ आणि योगाचा अभ्यास करीत आहे.

  • त्याने विद्यापीठातर्फे २८ सुवर्ण, ५ रौप्य आणि ५ कांस्य पदके पटकाविली आहेत. त्याला योगा फेडरेशन ऑफ इंडियाचे अशोक कुमार अग्रवाल यांचे पूर्ण सहकार्य मिळत असून ते त्याच्या कौशल्यावर प्रभावित आहेत. मंगलोर येथील वेणू गोपाल आचार्य हे नेहर्नचे कोरियोग्राफर असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली तो आपल्या सादरीकरणाने छाप सोडत आहे. 

रेल परिषदेचे अध्यक्ष बिपीन गांधी यांचं हृदय विकाराच्या झटक्यानं निधन :
  • नाशिक: रेल परिषदेचे अध्यक्ष बिपीन गांधी यांचं हृदय विकाराच्या झटक्यानं निधन झालंय. रेल्वे प्रवाशांसाठी झटणाऱ्या बिपीन गांधी यांनी 'आदर्श - पंचवटी एक्सप्रेस' सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. आजपासून ही गाडी प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.

  • मात्र ही एक्स्प्रेस नाशिक रोड रेल्वे स्थानकात येण्याच्या पाच मिनिटं आधीच बिपीन गांधी यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. 

  • रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी 'आदर्श - पंचवटी एक्सप्रेस'ची निर्मिती करण्यात आली. पंचवटीच्या २२ नवीन बोगींची बांधणी चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीत करण्यात आली. प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन या बोगींची निर्मिती करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच  'आदर्श - पंचवटी एक्सप्रेस' येवल्यात दाखल झाली.

  • त्यावेळी गांधी यांनी तिथे जाऊन या गाडीची पाहणीदेखील केली होती. ही एक्सप्रेस आज नाशिक रोड रेल्वे स्थानकात येणार असल्यानं खासदार हेमंत गोडसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार होते. यावेळी गांधीदेखील उपस्थित होते. मात्र रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस पोहोचण्याआधीच त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला. 

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १८७४: मुंबईत घोड्यांनी ओढल्या जाणार्‍या ट्राम सुरू झाल्या.

  • १८७७: पेरू देशाच्या किनारपट्टीवरील झालेल्या ८.८ तीव्रतेच्या भूकंपामुळे २५४१ लोक ठार झाले.

  • १९०४: वाफेवर चालणारे सिटी ट्रुरो हे इंजिन १६० किमी / ताशी पेक्षा जास्त वेगाने धावणारे यूरोपमधील पहिले इंजिन बनले.

  • १९३६: इटलीने इथिओपिया देश बळकावला.

  • १९५५: पश्चिम जर्मनी देशाचा नाटो (NATO) मधे प्रवेश.

  • १९९९: अटलांटा ग्रांप्री नेमबाजी स्पर्धेत भारताच्या रुपी उन्नीकृष्णनने प्रोन गटात रौप्यपदक पटकाविले.

  • १९९९: ग्वाटेमालाच्या ज्युलिओ मार्टिनेझ याने ग्रॅन्ड प्रिक्स स्पर्धेतील वीस किलोमीटर चालण्याची शर्यत १ तास १७ मिनिटे व ४६ सेकंदात पूर्ण करुन नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला.

जन्म

  • १५४०: मेवाड चे सम्राट महाराणा प्रताप यांचा जन्म. (मृत्यू: २९ जानेवारी १५९७)

  • १८१४: अव्वल इंग्रजीतील मराठी व्याकणकार दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा जन्म. (मृत्यू: १७ ऑक्टोबर १८८२)

  • १८६६: थोर समाजसेवक गोपाल कृष्ण गोखले यांचा कातळूक, रत्नागिरी येथे जन्म. (मृत्यू: १९ फेब्रुवारी १९१५)

  • १८८६: स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक प्रमुख नेते, शेतकरी कामगार पक्षाचे एक संस्थापक केशवराव मारुतराव जेधे यांचा जन्म. (मृत्यू: १२ नोव्हेंबर १९५९ – पुणे)

मृत्यू

  • १९१९: रेव्हरंड नारायण वामन टिळक यांचे निधन. (जन्म: ६ डिसेंबर १८६१)

  • १९३१: वर्णपटाद्वारे प्रकाशाच्या मापनासंबंधीच्या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक अल्बर्ट मायकेलसन यांचे निधन. (जन्म: १९ डिसेंबर १८५२)

  • १९५९: थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे निधन. (जन्म: २२ सप्टेंबर १८८७)

  • १९९९: उद्योगपती करमसीभाई जेठाभाई सोमय्या यांचे निधन.

  • २०१४: भारतीय राजकारणी नेदुरुमल्ली जनार्दन रेड्डी यांचे निधन. (जन्म: २० फेब्रुवारी १९३५)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.