चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०९ मे २०१९

Date : 9 May, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
संयुक्त राष्ट्रात भारताचा वरचष्मा, INCBच्या लढाईत चीनला पछाडत मिळवला विजय :
  • वॉशिंग्टनः संयुक्त राष्ट्रात भारतानं पुन्हा एकदा वरचष्मा राखला आहे. भारताच्या जगजित पोवाडिया यांची इंटरनॅशनल नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डा(INCB)च्या सदस्यपदी पुन्हा निवड झाली आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी असलेल्या चीनच्या हाओ वेई यांचा पराभव करत लक्षणीय मतांसह विजय मिळवला आहे.  संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या पहिल्या फेरीच्या मतदानात जगजित पोवाडिया यांना 44 मतं मिळाली. खरं तर निवडणूक जिंकण्यासाठी फक्त 28 मतांची गरज असते.

  • मंगळवारी 54 सदस्यीय इकोनॉमिक अँड सोशल काऊंसिलच्या 5 सदस्यांच्या निवडीसाठी मतदान घेण्यात आलं. या 5 सदस्य जागांसाठी 15 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. संयुक्त राष्ट्रात भारताचे राजदूत असलेल्या सैय्यद अकबरुद्दीन यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. जगजित पोवाडिया यांनी INCBच्या सदस्यपदी पुन्हा निवड झाल्यानं आनंद व्यक्त केला आहे. तसेच निष्पक्षरीत्या मी सेवा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

  • चीननं आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी विकसनशील देशांबरोबर लॉबिंग करण्याचा प्रयत्न केला होता. तरीसुद्धा चीनला पराभव पत्करावा लागला आहे. चीनच्या हाओ वेई यांना पहिल्या टप्प्यात फक्त 22 मतं मिळाली, तर दुसऱ्या टप्प्यात फक्त 19 मतं मिळाली. ते निवडणूक जिंकण्यासाठी लागणारी 28 मतं मिळवू शकले नाहीत. तर दुसरीकडे भारताच्या जगजित पोवाडिया यांना 44 मतं मिळाली आहेत.

  • पोवाडिया यांच्याबरोबरच फ्रान्स आणि कोलंबोचे उमेदवार निवडणूक जिंकण्यात यशस्वी ठरले. त्यांचा कार्यकाळ 2 मार्च 2020मध्ये सुरू होणार असून, 2025मध्ये ते त्या पदावर राहणार आहेत.

राजीव गांधींनी नौदलाचे जहाज कुटुंबाला फिरण्यासाठी वापरले होते :
  • नवी दिल्ली : देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या भारतीय नौदलाच्या विराट नौकेचा वापर आपल्या कुटुंबाच्या खासगी सुट्यांसाठी माजी पंतप्रधानांनी केला होता, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा राजीव गांधी यांचे नाव घेऊन काँग्रेसला लक्ष्य केले. येथील रामलीला मैदानावर बुधवारी मोदी यांनी प्रचारसभेत म्हटले की, आयएनएस विराटला सागरी सीमांच्या रक्षणासाठी तैनात केले गेले आहे. राजीव गांधी आणि त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या सुट्यांसाठी एका बेटावर घेऊन जाण्यासाठी विराटला पाठवले गेले होते. एवढे काय त्यांच्या सासरवाडीचेही लोक आयएनएस विराटवर होते. हा प्रकार राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करणारा नव्हता का? असा प्रश्न मोदी यांनी विचारला. ते म्हणाले, ‘काँग्रेसने नेहमीच देशाच्या सुरक्षेशी खेळ केला आहे. २०१४ च्या आधीची परिस्थिती आठवून बघा त्यावेळी लोकांना भीती असायची की कुठे काही होतेय का? परंतु, आता देश बदलला आहे.’

  • घराणेशाहीच्या राजकारणावरून मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली. ते म्हणाले, काँग्रेसचे नामदार काँग्रेसच्या चौथ्या पिढीला बघत आहेत. परंतु, वंशवादी मानसिकतेला फक्त एका कुटुंबापुरते मर्यादित ठेवले गेले नाही तर या कुटुंबाच्या जवळच्या सगळ््या लोकांनी घराणेशाहीचा झेंडा पुढे नेला आहे.

  • मोदी म्हणाले, दिल्लीत शीला दीक्षित, हरियाणात हुड्डा, भजनलाल, बन्सीलाल आणि लालू यांचे घराणे आहे. पंजाबमध्ये बेअंत सिंग यांचे कुटुंब, राजस्थानात गहलोत आणि पायलट, मध्य प्रदेशात शिंदे, कमलनाथ यांचे कुटुंब आणि दिग्विजय सिंह यांचे कुटुंब वंशवाद बळकट करीत आहे.

  • नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांच्या सरकारवरही टीका केली. केजरीवाल यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध मोठ्या आंदोलनाला निष्फळ ठरवले व नंतर जो विडा उचलला त्यात ते पूर्णपणे अपयशी ठरले, असे ते म्हणाले. दिल्लीतील सर्व सातही मतदारसंघांसाठी मोदी यांची ही एकमेव सभा ठेवली गेली होती. १२ मे रोजी या मतदारसंघांत मतदान होणार असून दिल्लीकरांना त्यांनी भाजपला विजयी करण्याचे आवाहन केले.

राज्यात बारामतीमध्ये सर्वाधिक दोन लाख ३२ हजार मतांची वाढ :
  • राज्यातील मतदानाच्या टक्केवारीवरून बरेच चर्वित-चर्वण झाले असले तरी प्रत्येक मतदारसंघातील प्रत्यक्ष मतदानाची आकडेवारी पाहता सर्वच ४८ मतदारसंघात २०१४ च्या तुलनेत मतदान वाढले असून सर्वाधिक दोन लाख ३२ हजार ८२९ मतांची वाढ बारामतीमध्ये झाली आहे. तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात केवळ ८४० मतांची वाढ झाल्याचे निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवरून दिसून येते.

  • यंदाच्या लोकसभा निवडणुकीत २०१४ च्या तुलनेत जवळपास तेवढेच मतदान झाल्याचे टक्केवारी सांगत आहे. राजकीय पक्षांनी मतदारसंघनिहाय प्रत्यक्ष मतदानाची आकडेवारी समोर घेत आडाखे बांधण्यास सुरुवात केली आहे.

  • पहिल्या टप्प्यात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व कॉंग्रेसचे नाना पटोले यांच्यात लढत असलेल्या नागपूरमध्ये मागच्या निवडणुकीपेक्षा सुमारे तीन टक्के कमी मतदान झाल्याचे दिसले. मात्र, प्रत्यक्ष मतदानाची आकडेवारी पाहता तेथील मतदानात २०१४ च्या तुलनेत ९६ हजार ७४२ मतांची वाढ झाली आहे. तर राज्यात प्रतिष्ठेच्या ठरलेल्या बारामतीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे पवार कुटुंबाचा बालेकिल्ला लढवत आहेत.

  • त्या मतदारसंघात राज्यातील सर्वाधिक दोन लाख ३२ हजार ८२९ मतांची वाढ नोंदवली गेली आहे. बारामती मतदारसंघातील हे वाढलेले मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार? नवमतदार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मतदार असल्याचा भाजपचा दावा खरा ठरणार की पवारांची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी बारामतीकर हिरिरीने बाहेर पडल्याचे स्पष्ट होणार याबाबत आता उत्सुकता आहे.

राष्ट्रीय नागरिक नोंदणीची मुदत एका दिवसानेही वाढवणार नाही :
  • नवी दिल्ली : आसाममधील राष्ट्रीय नागरिक नोंदणीला (एनआरसी) अंतिम रूप देण्याची ३१ जुलै ही मुदत आपण एका दिवसानेही वाढवणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्टपणे सांगितले. यासोबतच, या संदर्भातील तक्रारी हाताळण्यासाठी न्यायालयाने समन्वयकांना ‘संपूर्ण मोकळीक’ दिली.

  • राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या आराखडय़ात ज्या नागरिकांची नावे चुकीने समाविष्ट करण्यात आली किंवा वगळण्यात आली, त्यांचे दावे आणि आक्षेप यांच्याबाबत निर्णय घ्यावा, असे सरन्यायाधीश रंजन गोगोई व न्या. आर. एफ. नरिमन यांच्या खंडपीठाने आसाम एनआरसीचे समन्वयक प्रतीक हाजेला यांना सांगितले.

  • एनआरसीच्या आराखडय़ात काही व्यक्तींच्या नावांचा समावेश करण्यास अनेक लोकांनी आक्षेप घेतला आहे; मात्र अशा तक्रारींचा निपटारा करणाऱ्या समितीपुढे ते येत नाहीत, असे हाजेला यांनी न्यायालयाला सांगितल्यानंतर खंडपीठाने हे निर्देश दिले.

  • एनआरसीच्या आराखडय़ात समाविष्ट झालेल्या नावांबाबत आक्षेप घेणाऱ्या व्यक्ती या आक्षेपांचा पाठपुरावा करत नसतील, तर कायदा त्याचे काम करील. तुम्हीच याबाबत निर्णय घ्या. मात्र तुम्ही जे काय कराल, त्याची मुदत ३१ जुलै असेल. ती एक दिवस आधी असू शकते, मात्र एक दिवस नंतर नाही, असे खंडपीठाने हाजेला यांना सांगितले.

आधुनिक विधि शिक्षणाचे प्रणेते एन.आर माधव मेनन यांचे निधन :
  • तिरूअनंतपुरम : आधुनिक विधि शिक्षणाचे प्रणेते व नॅशनल लॉ स्कूलचे संस्थापक  एन.आर.माधव मेनन (वय८४) यांचे येथील  रूग्णालयात निधन झाले, अशी माहिती त्यांच्या कु टुंबीयांनी दिली. गेला आठवडाभर त्यांच्यावर वृद्धत्वामुळे  झालेल्या आजारांवर उपचार सुरू होते. मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता त्यांचे निधन झाले.

  • बुधवारी दुपारी शांती कवादम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या निधनाबाबत दु:ख व्यक्त केले आहे. मेनन यांच्या निधनाने शिक्षणतज्ज्ञ, विद्वान व आधुनिक कायदा शिक्षण क्षेत्रातील मोठे व्यक्तिमत्त्व हरपले आहे. बंगळुरू येथे नॅशनल लॉ स्कूल युनिव्हर्सिटी स्थापन करण्यात त्यांचा मोठा हातभार होता, असे कोविंद यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

  • केरळचे राज्यपाल पी.सदाशिवम यांनी मेनन यांच्या निधनाबाबत दु:ख व्यक्त केले असून कायदेशीर व घटनात्मक बाबींवरील एक तज्ज्ञ व्यक्ती गमावल्याचे म्हटले आहे. मेनन यांनी कायद्यातील कारकीर्द केरळ उच्च न्यायालयातून वयाच्या एकविसाव्या वर्षी सुरू केली होती.

  • नंतर ते दिल्लीला गेले. कालांतराने १९६० मध्ये अलिगड मुस्लीम विद्यापीठात अध्यापन केले. १९८६ मध्ये त्यांनी बंगळुरू येथे नॅशनल लॉ इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी ही संस्था स्थापन केली, तेथे ते १२ वर्षे कु लगुरू होते.

टेपे सिगमन बुद्धिबळ स्पर्धा : निहाल जेतेपदाच्या शर्यतीत :
  • माल्मो (स्वीडन) : भारताचा युवा ग्रँडमास्टर निहाल सरिन याने जोमाने पुनरागमन करत जागतिक कनिष्ठ गटातील विजेत्या परहॅम माघसोडलो याच्यावर मात करत टेपे सिगमन अँड कंपनी बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या फेरीअखेर जेतेपदाच्या शर्यतीतील आव्हान कायम राखले आहे.

  • १७-श्रेणीतील गटाच्या दोन फेऱ्या शिल्लक असून निहाल हा जर्मनीचा लिविऊ-डायटर निसिपेनू आणि स्वीडनच्या निल्स ग्रँडेलियस याच्यासह संयुक्तपणे तिसऱ्या स्थानी आहे. निहालने सुरेख सुरुवात करत सुरुवातीच्या चालींपासूनच इराणच्या माघसोडलो याच्यावर दडपण आणले. केरळच्या निहालने डावाच्या मध्यात माघसोडलोचा वजीर पटकावला आणि त्यानंतर विजय संपादन केला.

  • भारताचा अव्वल मानांकित बुद्धिबळपटू पी. हरिकृष्ण याने क्रोएशियाच्या इव्हान सारिकविरुद्धची लढत बरोबरीत सोडवत ३.५ गुणांसह अग्रस्थान कायम राखले आहे. इंग्लंडच्या गवैन जोन्स याने निसिपेनूविरुद्धची लढत बरोबरीत सोडवत ३.५ गुणांची कमाई केली आहे.

मेडिकल पीजी प्रवेश प्रक्रियेतील मराठा कोट्याचा फैसला उद्या :
  • मुंबई : मराठा आरक्षण लागू झाल्यास वैद्यकीय पद्युत्तर प्रवेशात खुल्या वर्गातील किती विद्यार्थ्यांना फटका बसणार?, तसंच मराठा समाजातील किती विद्यार्थ्यांना वगळल्याचा तोटा सहन करावा लागणार? असा सवाल उपस्थित करत सर्वोच्च न्यायालयाने बुधवारची सुनावणी तहकूब केली. तसंच ही माहिती गुरुवारच्या सुनावणीत सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारला देण्यात आले आहेत. न्यायमूर्ती नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे यावर सुनावणी सुरु आहे.

  • मराठा आरक्षण आणि वैद्यकीय पद्युत्तर अभ्याक्रमाच्या प्रवेशासंदर्भातील सुनावणीनंतर, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत 16 टक्के मराठा कोट्याच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली. या स्थगितीला राज्य सरकार आणि समर्थक पक्षकारांतर्फे सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. राज्य सरकारतर्फे ज्येष्ठ कायदेतज्ञ मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली तर समर्थक याचिकाकर्ता विनोद पाटील यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील परविंदर पटवारिया यांनी बाजू मांडली.

  • मराठा आरक्षणाबाबतचा कायदा तयार होण्यापूर्वीच ही प्रवेश प्रक्रिया सुरु झाली होती. त्यामुळे यंदाच्या वर्षी होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेत 16 टक्के मराठा आरक्षण लागू करणं योग्य ठरणार नाही, असा निर्वाळा देत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षण लागू करण्यास मनाई केली. परिणामी राज्य सरकारची पहिली यादी रद्द ठरवली आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १८७४: मुंबईत घोड्यांनी ओढल्या जाणार्‍या ट्राम सुरू झाल्या.

  • १८७७: पेरू देशाच्या किनारपट्टीवरील झालेल्या ८.८ तीव्रतेच्या भूकंपामुळे २५४१ लोक ठार झाले.

  • १९०४: वाफेवर चालणारे सिटी ट्रुरो हे इंजिन १६० किमी / ताशी पेक्षा जास्त वेगाने धावणारे यूरोपमधील पहिले इंजिन बनले.

  • १९३६: इटलीने इथिओपिया देश बळकावला.

  • १९५५: पश्चिम जर्मनी देशाचा नाटो (NATO) मधे प्रवेश.

  • १९९९: अटलांटा ग्रांप्री नेमबाजी स्पर्धेत भारताच्या रुपी उन्नीकृष्णनने प्रोन गटात रौप्यपदक पटकाविले.

  • १९९९: ग्वाटेमालाच्या ज्युलिओ मार्टिनेझ याने ग्रॅन्ड प्रिक्स स्पर्धेतील वीस किलोमीटर चालण्याची शर्यत १ तास १७ मिनिटे व ४६ सेकंदात पूर्ण करुन नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला.

जन्म 

  • १५४०: मेवाड चे सम्राट महाराणा प्रताप यांचा जन्म. (मृत्यू: २९ जानेवारी १५९७)

  • १८१४: अव्वल इंग्रजीतील मराठी व्याकणकार दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा जन्म. (मृत्यू: १७ ऑक्टोबर १८८२)

  • १८६६: थोर समाजसेवक गोपाल कृष्ण गोखले यांचा कातळूक, रत्नागिरी येथे जन्म. (मृत्यू: १९ फेब्रुवारी १९१५)

  • १८८६: स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक प्रमुख नेते, शेतकरी कामगार पक्षाचे एक संस्थापक केशवराव मारुतराव जेधे यांचा जन्म. (मृत्यू: १२ नोव्हेंबर १९५९ – पुणे)

  • १९२८: समाजवादी कामगारनेते, लेखक व समाजवादाचे अभ्यासक वसंत नीलकंठ गुप्ते यांचा जन्म. (मृत्यू: ९ सप्टेंबर २०१०)

मृत्यू 

  • १३३८: भगवद्‍भक्त चोखा मेळा हा मंगळवेढे येथील गावकुस बांधत असताना कोसळणार्‍या कुसबाखाली सापडला.

  • १९१७: डॉक्टर, कवी व शास्त्रज्ञ कान्होबा रणझोडदास यांचे निधन.

  • १९१९: रेव्हरंड नारायण वामन टिळक यांचे निधन. (जन्म: ६ डिसेंबर १८६१)

  • १९३१: वर्णपटाद्वारे प्रकाशाच्या मापनासंबंधीच्या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक अल्बर्ट मायकेलसन यांचे निधन. (जन्म: १९ डिसेंबर १८५२)

  • १९५९: थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे निधन. (जन्म: २२ सप्टेंबर १८८७)

  • १९८६: एवरेस्ट शिखर सर करणारा शेरपा तेलसिंग नोर्गे यांचे निधन. (जन्म: २९ मे १९१४)

  • १९९५: दिग्दर्शक अनंत माने यांचे निधन. (जन्म: २२ सप्टेंबर १९१५)

  • १९९८: पार्श्वगायक व अभिनेता, गझलचे बादशहा तलत महमूद यांचे निधन. (जन्म: २४ फेब्रुवारी १९२४ – लखनौ, उत्तर प्रदेश)

  • १९९९: उद्योगपती करमसीभाई जेठाभाई सोमय्या यांचे निधन.

  • २००८: किराणा घराण्याचे शास्त्रीय गायक पं. फिरोझ दस्तूर यांचे निधन.

  • २०१४: भारतीय राजकारणी नेदुरुमल्ली जनार्दन रेड्डी यांचे निधन. (जन्म: २० फेब्रुवारी १९३५)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.