चालू घडामोडी - ०९ नोव्हेंबर २०१८

Date : 9 November, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
अटर्नी जनरल पदावरून जेफ सेशन्स बडतर्फ, ट्रम्प यांचे पाऊल :
  • वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विदेशी हस्तक्षेपाबाबत सुरू असलेल्या संवेदनशील अशा तपासावर अप्रत्यक्षरीत्या ताबा मिळविताना बुधवारी अटर्नी जनरल जेफ सेशन्स यांना तडकाफडकी बडतर्फ करण्याचे पाऊल उचलले. ट्रम्प यांनी २०१६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत रशियाची मदत घेतल्याचा आरोप झाल्यानंतर त्याबाबत तपास सुरू आहे.

  • सेशन्स यांनी या तपासापासून स्वत:ला वेगळे केल्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून ट्रम्प यांच्यावर जाहीररीत्या टीका चालविली होती. काळजीवाहू अटर्नी जनरल आणि रिपब्लिकन पक्षाशी निष्ठ असलेले मॅथ्यू जी व्हिटकर हे आता सेशन्स यांची जागा घेतील.

  • रशियाने अमेरिकेच्या निवडणुकीत हस्तक्षेप केल्याप्रकरणी तपास करणाऱ्या चमूचे नेतृत्व रॉबर्ट मुल्लर यांच्याकडे असून व्हिटकर हे त्यांचे विरोधक मानले जातात. सेशन्स यांना पदावरून हटविल्यानंतर ट्रम्प यांनी टिष्ट्वट जारी करीत म्हटले की, न्यायालयीन विभागाचे अटर्नी जनरल जेफ सेशन्स यांच्या जागी चीफ आॅफ स्टाफ मॅथ्यू जी व्हिटकर यांची नियुक्ती करताना मला आनंद होत आहे. ते आपल्या देशाची चांगल्या प्रकारे सेवा करतील. व्हिटकर यांच्या सेवेसाठी मी त्यांचे आभार मानतो आणि शुभेच्छा देतो. यानंतर त्यांच्या कायम नियुक्तीची घोषणा केली जाईल.

  • सीएनएनच्या पत्रकाराचा पास निलंबित - सीएनएन वाहिनीचे व्हाईट हाऊसमधील वार्ताहर जिम अकोस्टा यांचा पास व्हाईट हाऊसने निलंबित केल्यामुळे माध्यम जगतात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. हा लोकशाहीला धोका असल्याची प्रतिक्रिया सीनएनएनने दिली आहे.

  • बुधवारी पत्रकार परिषदेत ट्रम्प यांची अकोस्टा यांच्याशी शाब्दिक चकमक झडल्यानंतर व्हाईट हाऊसने अकोस्टा यांचे वर्तन निंदनीय आणि संतापजनक असल्याचे स्पष्ट केले होते. अमेरिकेच्या सीमेकडे आगेकूच करणाºया मध्य अमेरिकींच्या लोंढ्यांबाबत अकोस्टा यांना ट्रम्प यांना सातत्याने प्रश्न विचारून भंडावून सोडले होते. त्यानंतर ट्रम्प यांनी त्यांना शांतपणे बसण्यास सांगितले मात्र अकोस्टा यांनी पुन्हा प्रश्न विचारल्याने ट्रम्प यांनी संतप्त होत ‘‘आता खूप झाले’’ या शब्दांत सुनावले.

विद्यार्थ्यांना मोफत एसटी प्रवास, दुष्काळात सवलत १५ नोव्हेंबरपासून लागू :
  • अविनाश साबापुरे यवतमाळ - राज्य शासनाने दुष्काळी स्थिती जाहीर केल्याने बाधीत परिसरातील नागरिकांना विविध सवलती लागू झाल्या आहेत. त्यातच राज्य परिवहन महामंडळ सामाजिक बांधिलकी जपत १५ नोव्हेंबरपासून विद्यार्थ्यांना शंभर टक्के मोफत एसटी प्रवासाची सवलत देणार आहे. मात्र, सध्या मासिक पास असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच ही सवलत मिळणार आहे.

  • राज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. अशा तालुक्यांमध्ये विविध सवलती लागू करण्यात आल्या आहेत. अशा तालुक्यातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आले आहे. तर शिक्षणासाठी परगावात ‘अप-डाउन’ करणाºया विद्यार्थ्यांना १०० टक्के मोफत एसटी प्रवास करता येणार आहे. याबात एसटीच्या सर्व विभाग नियंत्रकांना सोमवारी महाव्यवस्थापकांनी लेखी निर्देश दिले आहेत.

  • सध्या महामंडळातर्फे विद्यार्थ्यांना मासिक पासात ६६.६७ टक्के रकमेची सूट दिली जाते. तर ३३.३३ टक्के तिकिट दर वसूल केला जातो. परंतु, आता ही ३३.३३ टक्के रक्कमही आकारण्यात येऊ नये, असे निर्देश विभाग नियंत्रकांना देण्यात आले आहे. ही सवलत २०१८-१९ च्या उर्वरित शैक्षणिक सत्राकरिता म्हणजे १५ नोव्हेंबरपासून तर १५ एप्रिल २०१९ या सहा महिन्यांपर्यंत लागू राहणार आहे.

  • शून्य मूल्याच्या नव्या पास छापा- एसटीचा मासिक पास घेऊन शिक्षणासाठी प्रवास करणाºया विद्यार्थ्यांना आता नव्या पास दिल्या जाणार आहे. या पासेसवर वसूल करण्यात येणाºया रकमेच्या रकान्यात ०० असे मूल्यांकित केले जाणार आहे. त्यासाठी तातडीने नव्या पासेस छापून घेण्याबाबत परिवहन महामंडळाच्या भांडार व खरेदी खात्याला निर्देश देण्यात आले आहेत. नव्या पासचा नमुनाही महाव्यवस्थापकांनी जारी केला आहे.

अमिताभ संपविणार रेल्वे अनारक्षित तिकिटांच्या रांगा, तिकीट खरेदीसाठी अ‍ॅप :
  • नवी दिल्ली - अमिताभ बच्चन यांचा ‘कालिया’हा गाजलेला चित्रपट आहे. यात बिग बींचा एक सदाबहार डायलॉग आहे. ‘हम जहा खडे होते है,वहीसे लाईन शुरु होती है’. लवकरच रेल्वेत सुद्धा हा डायलॉग ऐकायला मिळणार असून लोकांना बच्चनप्रमाणेच रांगेत उभे न राहता अनारक्षित-यूटीएस तिकीट खरेदीचे आवाहन करण्यात येईल.

  • रेल्वे स्थानकांवरील अनारक्षित तिकिटांसाठीच्या रांगा संपविण्यासाठी रेल्वेकडून अशाप्रकारचे इतरही काही संवाद आणि व्हिडिओ जारी केले जाणार आहेत. रेल्वेने यूटीएस अथवा अनारक्षित तिकीट देशभरात अ‍ॅपच्या माध्यमाने देणे सुरू केले आहे. आणि नोव्हेंबरपासून इंटरझोन अनारक्षित तिकीट अ‍ॅपद्वारे उपलब्ध करून देणे सुरू केल्यापासून दर दिवसाला जवळपास ८० हजार तिकिटांची विक्री अ‍ॅपद्वारे होते आहे. पुढील वर्षी मार्चपर्यंत सुमारे दीड लाखावर तिकिटे यूटीएस अ‍ॅपने विकल्या जातील,अशी अपेक्षा आहे. यामुळे स्थानकांवर तिकीट खिडक्यांपुढील रांगा कमी करण्यास निश्चितच मदत मिळेल.

  • रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या आदेशानुसार लोकांच्या सुविधेसाठी सुरू करण्यात आलेल्या या अ‍ॅपवर प्रारंभी केवळ एका झोनमध्येच प्रवासाचे तिकीट दिले जात होते. परंतु १ नोव्हेंबरपासून यावर इंटरझोन अनारक्षित तिकीटही मिळत आहे. कोणत्याही रेल्वे स्टेशनच्या पाच किमी अंतरापर्यंत या अ‍ॅपवर तिकीट खरेदी केले जाऊ शकते. ग्रामीण, शहर,गाव,खेड्याच्या प्रत्येक स्टेशनवर ते कार्यरत आहे.

  • अमिताभ आणि इतर सिनेकलावंत, नामांकित लोक संदेशाद्वारे यूटीएसचा लाभ सांगतील तेव्हा लोक तासन्तास रांगेत उभे राहण्याऐवजी आपल्या मोबाईलवर अ‍ॅपच्या माध्यमाने अनारक्षित तिकीट खरेदीस प्राधान्य देतील,अशी आशा रेल्वेला आहे. यासोबतच लोकांना एका क्लिकवर तिकीट देण्याचे गोयल यांचे उद्दिष्टही साध्य होईल. लोक अ‍ॅपवर तिकीट खरेदी करून थेट गाडीत बसू शकतील.

सौरभ चौधरीचा आशियाई एअरगन स्पर्धेत सुवर्णवेध :
  • कुवैतसिटी - भारताचा युवा नेमबाज सौरभ चौधरी याने शानदार कामगिरी कायम राखून गुरुवारी येथे आशियाई एअरगन चॅम्पियनशिपच्या दहा मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्ण पदक जिंकले. वैयक्तिक स्पर्धेत चार माहिन्यात हे त्याचे चौथे सुवर्ण आहे.

  • मेरठचा १६ वर्षांचा सौरभ याने अर्जुनसिंग चिमा तसेच अनमोल जैन यांच्यासोबतीने १७३१ गुणांसह सांघिक स्पर्धेत सुवर्णाचा मानकरी ठरला.आठ खेळाडूंच्या वैयक्तिक फायनलमध्ये सौरभने २३९.८ गुणांसह दुसरे सुवर्ण पटकविले. अर्जुनने २३७.७ गुणांसह रौप्य आणि चायनीज तायपेईचा हुआंग वेई-ते याने २१८ गुणांसह कांस्य जिंकले. अनमोल १९५.१ गुणांसह चौथ्या स्थानी राहिला.

  • सौरभने याआधी आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण जिंकले होते. नंतर त्याने विश्व चॅम्पियनशिप आणि युवा आॅलिम्पिकमध्येही सुवर्णमय कामगिरी केली होती. या स्पर्धेत भारताच्या पदकांची संख्या दहा झाली असून त्यात तीन सुवर्ण, पाच रौप्य आणि दोन कांस्यचा समावेश आहे.

चीन भारताकडून वीस लाख टन कच्ची साखर खरेदी करणार :
  • नवी दिल्ली : पंधरा लाख टन कच्ची साखर जानेवारी महिन्यात चीनला निर्यात होणार आहे. दोन देशांदरम्यानची व्यापारी तूट भरून काढण्यासाठीच्या प्रयत्नांचा हा एक भाग बासमती नंतर चीनने भारताची साखर खरेदी केली. वाणिज्य विभागाचे प्रतिनिधी मंडळ पाच ते आठ नोव्हेंबर दरम्यान चीनमध्ये होते त्या शिष्टमंडळाशी चीन सरकारचा करार झाला आहे.  चीनच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातले ऊस उत्पादक आणि साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

  • कच्च्या साखरेच्या निर्यातीमुळे पांढऱ्या साखरेचे उत्पादन कमी होईल बाजारात साखरेचे दर स्थिर राहतील. त्यामुळे ऊस उत्पादकांना एफआरपी किंवा त्याहून अधिक पैसे मिळू शकतात. साखर उद्योगाकडून आजच्या कराराचे जोरदार स्वागत केले आहे.

  • साखरेचे दर स्थिर राहावेत यासाठी केंद्र सरकारला एकूण पन्नास लाख टन साखर निर्यात करायची आहे. त्यापैकी वीस लाख टन साखर चीन खरेदी करतोय. वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत भारतीय शुगर मिल्स असोसिएशन आणि चीन सरकार दरम्यान याबाबत करार करण्यात आला.

ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचं निधन :
  • पुणे : ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचं शुक्रवारी पहाटे वृद्धापकाळानं निधन झालं आहे. पुण्यात वयाच्या 79 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लालन सारंग यांच्या जाण्यानं सिनेसृष्टी आणि मराठी रंगभूमीवर शोककळा पसरली आहे.

  • लालन सारंग या 1968 पासून नाट्यक्षेत्रात काम करत होत्या. अनेक गाजलेल्या नाटकांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या. त्यांनी केलेल्या 'सखाराम बाइंडर' नाटकातील चंपा, 'सहज जिंकी मना' नाटकातील मुक्ता, 'आक्रोश' नाटकाली वनिता, 'आरोप' नाटकातील मोहिनी इत्यादी भूमिका प्रचंड गाजल्या.

  • 2006 मध्ये कणकवली येथे पार पडलेल्या 87 व्या मराठी नाट्यसंमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या.

  • लालन सारंग यांचा ग.दि. माडगूळकर प्रतिष्ठानचा विद्याताई माडगूळकरांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या 'गृहिणी सखी सचिव' या पुरस्कारानं सन्मान करण्यात आला होता. याशिवाय पिंपरी-चिंचवडच्या कलारंग सांस्कृतिक संस्थेतर्फे दिला जाणारा कलागौरव पुरस्कार आणि अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे जीवनगौरव पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला होता.

दिनविशेष :
  • धन्वंतरी दिन / कायदाविषयक सेवा दिन

महत्वाच्या घटना 

  • १९०६: आपल्या कार्यकालात देशाबाहेर जाणारे थिओडोर रुझव्हेल्ट हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष बनले. त्यांनी पनामा कालव्याला भेट दिली.

  • १९२३: दिनचर्या नावाचे एक पत्र दतात्रय गणेशजी यांनी पुण्यात सुरु केले.

  • १९३७: जपानी सैन्याने चीनमधील शांघाय शहराचा ताबा घेतला.

  • १९४७: भारत सरकारने जूनागढ संस्थान बरखास्त करुन ताब्यात घेतले.

  • १९५३: कंबोडियाला फ्रान्सपासुन स्वातंत्र्य मिळाले.

  • १९६०: रॉबर्ट मॅकनामारा हे फोर्ड मोटर कंपनीचे अध्यक्ष बनले.

  • १९६५: इलेक्ट्रिसिटी ग्रिड खराब झाल्याने न्यूयॉर्क शहरासह पूर्व अमेरिकेतील बर्‍याच भागाचा वीजपुरवठा १२ तास खंडित झाला.

  • १९६७: रोलिंग स्टोन मासिकांचा पहिला अंक प्रकाशित झाला.

  • १९८८: मुंबईतील भारत पेट्रोलियमच्या शुद्धीकरण संकुलातील दुर्घटना, भीषण आगीत १२ जण मृत्युमुखी.

  • १९९७: साहित्यिक गंगाधर गाडगीळ यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठान चा जनस्थान पुरस्कार प्रदान.

  • २०००: उत्तराखंड उच्‍च न्यायालयाची स्थापना.

  • २०००: न्यूयॉर्क येथे झालेल्या एका लिलावात पाब्लो पिकासो यांचे एक चित्र पाच कोटी छप्पन्न लाख डॉलरला विकले गेले. पिकासोच्या चित्रासाठी मिळालेली ही विक्रमी किंमत आहे.

जन्म 

  • १८०१: आटवलेल्या दुधाचे शोधक गेल बोर्डन यांचा जन्म. (मृत्यू: ११ जानेवारी १८७४)

  • १८६७: जैन तत्त्वज्ञानी, विद्वान, कवी श्रीमद राजचंद्र यांचा जन्म. (मृत्यू: ९ एप्रिल १९०१)

  • १८७७: इटली प्रजास्ताक चे पहिले अध्यक्ष इरिको डी निकोला यांचा जन्म. (मृत्यू: १ ऑक्टोबर १९५९)

  • १८७७: सारे जहाँन से अच्छा चे पाकिस्तानी कवी, तत्त्वज्ञ आणि राजकीय नेते कवी मोहम्मद इक़्बाल यांचा जन्म. (मृत्यू: २१ एप्रिल १९३८)

  • १९०४: सपुष्प वनस्पतींतील पुनरुत्पादन क्रियेसंबंधी संशोधन करणारे वनस्पतीशास्त्रज्ञ पंचानन माहेश्वरी यांचा जन्म. (मृत्यू: १८ मे १९६६)

  • १९१८: तायक्वोंडो मार्शल आर्ट चे निर्माते चोई हाँग हाय यांचा जन्म. (मृत्यू: १५ जून २००२)

  • १९२४: ख्यालगायक, गुरु व बंदिशकार पं. चिंतामणी रघुनाथ तथा सी. आर. व्यास यांचा जन्म. (मृत्यू: १० जानेवारी २००२)

  • १९३१: लोकसभा सदस्य, कायदेपंडित, विद्वान, मुत्सद्दी व भारताचे इंग्लंडमधील राजदूत एल. एम. सिंघवी यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑक्टोबर २००७)

  • १९३४: अमेरिकन अंतराळतज्ञ, लेखक व विज्ञानप्रसारक कार्ल सगन यांचा जन्म. (मृत्यू: २० डिसेंबर १९९६- सिअ‍ॅटल, वॉशिंग्टन, यु. एस. ए.)

  • १९४४: भारतीय कोरिओग्राफर चितेश दास यांचा जन्म. (मृत्यू: ४ जानेवारी २०१५)

  • १९८०: अभिनेत्री व मॉडेल पायल रोहतगी यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९४०: इंग्लंडचे पंतप्रधान नेव्हिल चेंबरलेन यांचे निधन. (जन्म: १८ मार्च १८६९)

  • १९५२: इस्त्राएलचे पहिले राष्ट्राध्यक्ष चेम वाइझमॅन यांचे निधन. (जन्म: २७ नोव्हेंबर १८७४)

  • १९६२: भारतरत्न पुरस्कार विजेते धोंडो केशव कर्वे यांचे निधन. (जन्म: १८ एप्रिल १८५८)

  • १९६७: मराठी रंगभूमीचे खलनायक व चित्रपट अभिनेते बाबुराव पेंढारकर यांचे निधन.

  • १९७०: फ्रेंच राष्ट्राध्यक्ष आणि सेनापती चार्ल्स द गॉल यांचे निधन. (जन्म: २२ नोव्हेंबर १८९०)

  • १९७७: सुप्रसिद्ध संगीत समीक्षक, संगीतकार, संगीत दिगदर्शक व लेखक केशवराव भोळेे यांचे निधन. (जन्म: २३ मे १८९६)

  • २०००: मिस वर्ल्ड स्पर्धेचे निर्माते एरिक मॉर्ले यांचे निधन. (जन्म: २६ सप्टेंबर १९१८)

  • २००३: मैथिली भाषेतील लेखक व कवी विनोद बिहारी वर्मा यांचे निधन.

  • २००५: भारताचे १०वे राष्ट्रपती के. आर. नारायणन यांचे निधन. (जन्म: २७ ऑक्टोबर १९२०)

  • २०११: भारतीय-अमेरिकन नोबेल पारितोषिक विजेते हर गोविंद खुराना यांचे निधन. (जन्म: ९ जानेवारी १९२२)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.