चालू घडामोडी - ०९ ऑक्टोबर २०१८

Date : 9 October, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
आशियाई शरीरसौष्ठव - सुनीत जाधव ठरला ‘मि. एशिया’, भारताला १५ पदकांसह विजेतेपद :
  • पुणे : ५२व्या आशियाई बॉडीबिल्डिंग अँड फिजिक स्पोर्ट्स चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राच्या सुनीत जाधवने ‘मि. एशिया’ हा किताब पटकावला. तीनवेळचा ‘मि. इंडिया’ असलेल्या सुनीतचे आशियाई स्तरावरील हे पहिलेच विजेतेपद ठरले.

  • म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात ही स्पर्धा रविवारी रात्री उशीरा संपली. या स्पर्धेत यजमान भारताने पुरूष शरीरसौष्ठवगटामध्ये ५ सुवर्ण, ६ रौप्य आणि ४ कांस्य अशी एकूण १५ पदके तर जिंकली, शिवाय या गटातील विजेतेपदही पटकावले.

  • ‘पत्नी स्वप्नाली हिने दिलेल्या पाठिंब्यामुळे आशियाई स्पर्धेत किताब पटकावणे शक्य झाले,’असे मुळचा मुंबईचा असलेल्या सुनीतने आवर्जुन नमूद केले. यंदाच्या या स्पर्धेत मिक्स्ड पेअर श्रेणीचा पुन्हा समावेश करण्यात आला होता. दिव्यांग ही नवी श्रेणीदेखील सुरु करण्यात आली.

  • स्पर्धेचे पारितोषिक वितरण इंडियन बॉडीबिल्डर्स फेडरेशनचे अध्यक्ष प्रेमचंद डोग्रा, फेडरेशनचे सरचिटणीस आणि एशियन बॉडीबिल्डर्स फेडरेशनचे सहसचिव चेतन पठारे, अध्यक्ष आणि वर्ल्ड बॉडीबिल्डिंग अँड फिजिक स्पोटर््स फेडरेशनचे सरचिटणीस दतुक पॉल चुआ,इंडियन बॉडीबिल्डर्स फेडरेशनचे कार्यकारी उपाध्यक्ष मधुकर तळवलकर आणि भारतीय आॅलिम्पिक महासंघाचे सहसचिव सहसचिव नामदेव शिरगावकर यांच्या हस्ते झाले.

  • ‘खूप परिश्रमानंतर मिळालेले हे विजेतेपद माझ्यासाठी संस्मरणीय आहे. आता माझा प्रयत्न भारतासाठी ‘मि.युनिव्हर्स’ हा किताब जिंकण्याचा असेल,’ असे सुनीत जाधव म्हणाला.

अमेरिकेच्या F-15 फायटर विमान प्रकल्पाची धुरा भारतीय व्यक्तीच्या हाती :
  • हवाई उद्योग क्षेत्रातील आघाडीची अमेरिकन कंपनी बोईंगने एफ-१५ या फायटर विमानांच्या कार्यक्रमाची सूत्रे प्रत्युष कुमार या भारतीय व्यक्तीकडे सोपवली आहेत. प्रत्युष कुमार हे बोईंगचे भारतातील प्रमुख आहेत. प्रत्युष कुमार हे एफ-१५ च्या अमेरिकेतील आणि जागतिक व्यवसायावर लक्ष केंद्रीत करणार आहेत. बोईंगचे भारतातील प्रमुख या नात्याने त्यांच्या नेतृत्वाखाली मागच्या पाच वर्षात बोईंगने भारतात चांगला व्यावसायिक विस्तार केला.

  • सरकारसोबत कंपनीचे उत्तम संबंध प्रस्थापित केले. प्रत्युष कुमार यांच्या कार्यकाळात बंगळुरुमध्ये नवीन शोध आणि कल्पकतेला प्रोत्साहन देण्यासाठी इंजिनिअरिंग आणि टेक्नोलॉजी सेंटर उभारण्यात आले. हैदराबादमध्ये टाटा कंपनीसोबत संयुक्त प्रकल्पातून अपाची या लढाऊ हेलिकॉप्टरसाठी डिझाईन तयार करण्याचा कारखाना स्थापन केला.

  • संरक्षण व्यवसायात बोईंगला भारतात स्थापित करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. अपाची, चिनूक आणि पी-८आय टेहळणी विमानांच्या विक्रीचे भारताबरोबर महत्वाचे करार केले असे बोईंगने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

  • भारतातील बोईंगच्या व्यवसाय विस्तारासाठी बोईंगचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष मार्क अॅलन यांनी प्रत्युष कुमार यांचे आभार मानले आहेत. बोईंगच्या भारतातील भविष्याबद्दल मी प्रचंड उत्सुक आहे. भारतात पाळंमुळं भक्कम करण्यासाठी आम्ही भारतात मोठया प्रमाणावर गुंतवणूक करत आहोत. तंत्रज्ञान, नवीन शोध आणि उत्पादन विस्तार कायम ठेवणार आहोत. बोईंगने माझा सन्मान केला असून माझ्या नव्या भूमिकेबद्दल मी प्रचंड उत्सुक आहे असे प्रत्युष कुमार म्हणाले.

भारतीय लायसन्समुळे ९ देशांत चालवता येते वाहन; अमेरिकेसह फ्रान्स, इंग्लंडचा समावेश :
  • नवी दिल्ली : अनेकदा आपल्याकडे ड्रायव्हिंगचे लायसन्स असते; पण परदेशात वाहन चालवण्यासाठी आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्सची गरज असते, असे आपणास सांगण्यात येते; पण भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सच्या आधारे तुम्ही जगातील तब्बल ९ देशांमध्ये तीन महिने ते एक वर्षापर्यंत वाहन चालवू शकता. अर्थात अनेक देशांत वाहने उजवीकडून चालवतात, तर आपल्याकडे डाव्या बाजूने. त्यामुळे ही नवी शिस्त तिथे शिकावीच लागते.

  • अनेक देशांत वाहने भाड्याने मिळतात. त्यापैकी ९ देशांत तुमच्याकडे लायसन्स असल्यास तुम्ही वाहन भाड्याने घेऊ न त्या देशाच्या कोणत्याही भागात ते चालवू शकतात. अगदी अमेरिकेतही तुम्हाला एक वर्ष वाहन चालवण्यासाठी परवानगी आहे; पण अट एकच, तुमचे भारतीयड्रायव्हिंग लायसन्स इंग्रजीतील असायला हवे. शिवाय ते लायसन्स असले तरी तुम्हाला आय-९४ फॉर्म सोबत ठेवावा लागतो. त्यावर तुम्ही अमेरिकेत कधी आलात, याचा उल्लेख असतो. अर्थात या सर्व ९ देशांत केवळ इंग्रजीतील भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स चालते.

  • त्यावर तुमचे छायाचित्र असणेही अनिवार्य आहे. तसेच वाहन भाड्याने घेताना तुमच्याकडे लायसन्स आहे का, हे पाहिले जाते. प्रादेशिक भाषेत छापलेले वा त्यावर प्र्रादेशिक भाषेत तुमचा नाव, पत्ता आदी माहिती असेल, तर ते तिथे ग्राह्य धरले जात नाही. जर्मनीमध्ये तुम्ही सहा महिने वाहन चालवू शकता, तर स्वीत्झर्लंडमध्ये एक वर्ष तशी परवानगी आहे. दक्षिण आफ्रिकेमध्येही भारतातील ड्रायव्हिंग लायसन्सआधारे १ वर्ष चारचाकी वाहन चालविण्याची परवानगी देण्यात आली. नॉर्वे, आॅस्ट्रेलिया या दोन देशांत भारतीय लायसन्स असेल, तर केवळ तीनच महिने वाहन चालवण्याची परवानगी दिली जाते.

आव्हानांना सामोरे जात ‘टपाल’ प्रगतीच्या मार्गावर :
  • मुंबई : अनेक आव्हानांना सामोरे जात भारतीय टपाल विभाग मार्गक्रमण करत आहे. पोस्टमनच्या जबाबदाऱ्यांत आमूलाग्र बदल झाले आहेत. केवळ टपाल बटवडा करण्याचे काम करणा-या पोस्टमनच्या हातात आता हँड हेल्ड मशिन, मोबाइल देऊन पेमेंट बँकेपर्यंतचे काम आले आहे. या सर्व माध्यमातून टपाल खात्याची प्रगतीच्या मार्गावर घोडदौड सुरू असल्याचे महाराष्ट्र व गोवा सर्कलचे मुख्य पोस्ट मास्टर जनरल हरीश अग्रवाल यांनी सांगितले.

  • जागतिक टपाल दिनानिमित्ताने मंगळवारपासून टपाल सप्ताह सुरू होत आहे. त्या निमित्ताने माहिती देताना अग्रवाल म्हणाले की, इंडिया पोस्ट पेमेंट बँक, आधार केंद्रे, पासपोर्ट सेवा केंद्रे या माध्यमातून अधिकाधिक नागरिकांना विभागाशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे.

  • माय स्टॅम्पसारख्या योजनांच्या माध्यमातून तरुणाई व ज्येष्ठ नागरिकांसहित सर्वांमध्ये टपाल खात्याविषयी आत्मीयता वाढविण्यात यश आले आहे. नागरिकांची पत्रे पाठविण्याची सवय कमी झाली असली, तरी कॉर्पोरेट व सरकारी कामांसाठी रजिस्टर्ड पत्रे पाठविणे बंधनकारक असल्याने काम वाढले आहे.

  • टपाल विभागाचे संगणकीकरण करण्यात आले. महाराष्ट्रातील ७,१५१ शाखा कार्यालयांना याद्वारे जोडण्यात आले. सेव्हिंग बँक विभागात जूनपर्यंत महाराष्ट्र सर्कलमध्ये ६ लाख ९६ हजार ४७ खाती, सुकन्या समृद्धी योजनेमध्ये ३०,१८० खाती, प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजनेमध्ये १ लाख ७१ हजार ३४ खाती, तर प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजनेमध्ये ७,६७१ खाती उघडली आहेत. स्पीडपोस्टच्या महसुलात गत वर्षी १४ टक्के, तर बिझनेस पोस्टच्या महसुलात ११ टक्के वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.

मृत्यूच्या खोट्या, नकारात्मक बातमीने रचला नोबेल पुरस्काराचा पाया :
  • जगातील सर्वोच्च पुरस्कार असलेला नोबेल हा जरी विविध क्षेत्रातील सकारात्मक योगदानासाठी देण्यात येत असला तरीही या पुरस्कारची सुरुवात मात्र एका नकारात्मक बातमीमुळे झाली होती. स्वीडनचे थोर शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या मृत्यूची ही बातमी होती. या खोट्या बातमीमुळे अल्फ्रेड नोबेल यांना एवढा मोठा धक्का बसला की त्यांनी आपल्या कमाईचा सर्वात मोठा भाग चांगल्या लोकांचा सन्मान करण्यासाठी देऊन टाकला.

  • नोबेल फाऊंडेशनद्वारे शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शांती, साहित्य, भौतिकी, रसायन, संशोधन आणि अर्थशास्त्रामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी दिला जातो. 

  • घटना 1888 मधील आहे जेव्हा अल्फ्रेड नोबेल हे त्यांनी लावलेल्या शोधांमुळे चर्चेत होते. त्यांनी एकूण 355 शोध लावले. मात्र, 1867 मध्ये त्यांनी लावलेल्या डायनामाईटच्या शोधाने अख्ख्या जगाला हादरवून सोडले. यानंतर 1988 मध्ये एका वृत्तपत्राने त्यांच्या या डायनामाईटच्या शोधावर टीका करत मृत्यूच्या सौदागराचा मृत्यू या मथळ्याखाली बातमी दिली. या नंतर जगही त्यांना याच नावाने ओळखायला लागले. 

  • या बातमीवरून नोबेल यांना एवढा मोठा धक्का बसला की त्यांना त्यांच्या मृत्यूनंतरही जग याच नजरेने पाहील याची भीती वाटू लागली. यानंतर त्यांनी 27 नोव्हेंबर, 1895 मध्ये मृत्यूपत्र तयार केले आणि त्यांच्या संपत्तीचा एक मोठा हिस्स्याची त्यांनी ट्रस्ट बनवून टाकली. या रकमेतून मानव जातीसाठी चांगले काम करणाऱ्या लोकांना सत्कार केला जावा अशी त्यांची इच्छा होती. 

आज पुन्हा इंधनाचे दर वाढले, पाहा आजचे दर :
  • पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. मुंबईमध्ये पेट्रोलच्या दरात प्रति लिटर २३ पैशांनी वाढ झाली आहे. तर डिझेलच्या दरात प्रति लिटर ३१ पैशांनी वाढ झाली आहे. आज मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत प्रति लिटर ८७ रूपये ७३ पैसे तर डिझेलची किंमत प्रति लिटर ७७ रुपये ६८ पैसे झाली आहे. राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल प्रति लिटर २३ पैशांनी तर डिझेल प्रति लिटर २९ पैशांनी महागले आहे. दिल्लीमध्ये पेट्रोल प्रति लिटर ८२.२६ तर डिझेल प्रति लिटर ७४.११ रूपये झाले आहे.

  • मुंबईसह पालघर, डहाणू, तलासरीमध्ये पेट्रोलचा दर ८७ ते ८८ रुपये आहे, मात्र शेजारच्या गुजरात राज्यात पेट्रोलचा दर ८० रुपये असल्याने सीमाभागातील अनेक वाहनचालक इंधन भरण्यासाठी गुजरातकडे जात असल्याचे चित्र आहे. गुजरातकडे जाणारा वाहनचालकही महाराष्ट्रात पेट्रोल भरण्यापेक्षा गुजरामध्ये पेट्रोल भरणे अधिक पसंद करत आहे. गुजरातपेक्षा महाराष्ट्रातील डिजेल दर स्वस्त असल्याने डिजेलवर चालणाऱ्या वाहनांचे चालक मात्र महाराष्ट्रात डिजेल भरत आहेत.

  • महाराष्ट्राच्या सीमेलगत असणाऱ्या चारोटी येथे डिझेलचा दर ७६.४४ रुपये आहे, तर गुजरातमध्ये वापी येथे डिझेलचा दर ७८.०६ प्रतिलिटर आहे. डिझेलचे दर राज्यात कमी असल्याने अवजड वाहेन तसेच डिझेलवर चालणारी वाहने वसई आणि पालघर तालुक्यात इंधन भरताना दिसून येत आहेत. महाराष्ट्रात डिझेल गुजरातपेक्षा स्वस्त मिळते म्हणून आम्ही डिझेलसाठी महाराष्ट्रातील पंपावर जातो, असे गुजरातमधून महाराष्ट्रात येणाऱ्या ट्रकचालकांनी सांगितले.

जागतिक तापमानवाढीचा भारताला मोठा धोका :
  • नवी दिल्ली : जागतिक तापमानवाढीचा आणि प्रदूषणाचा भारतावर मोठा परिणाम होऊ शकतो, असे मत सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट (सीएसई) या संस्थेने संयुक्त राष्ट्रांच्या इंटर-गव्हर्नमेंटल पॅनेल फॉर क्लायमेट चेंज (आयपीसीसी) या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या ताज्या अहवालावर व्यक्त केले आहे.

  • आताचा प्रदूषणाचा दर आणि अन्य कारणांमुळे २०३० ते २०५० सालापर्यंत जगाचे तापमान १.५ अंश सेल्सिअसने वाढेल, असे आयपीसीसीने त्यांच्या अहवालात म्हटले आहे. त्यावर भाष्य करताना सीएसईने म्हटले की, जगाचे तापमान १ अंश सेल्सिअसने वाढल्यास त्याचे मोठे परिणाम भारतावर होणार होते. ते जर १.५ अंशांनी वाढले तर गंभीर परिणाम होतील. पृथ्वीचे तापमान २ अंश सेल्सिअसने वाढले तर ते खूपच धोकादायक असेल.

  • भारतासारख्या मोठय़ा किनारपट्टीच्या देशाला हिमनग वितळून समुद्राची पातळी वाढल्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. त्यासह अतिवृष्टी, वादळे, उष्णतेची लाट, दुष्काळ असे परिणामही अधिक जाणवतील, असे सीएसईने म्हटले आहे.

  • ही परिस्थिती निवारण्यासाठी अमेरिकेचा मोठा अडसर आहे. भारताने हवामान बदलाच्या विषयावर ठोस भूमिका घेतली पाहिजे, असेही सीएसईचे म्हणणे आहे.

दिनविशेष :
  • जागतिक पोस्ट दिन

महत्वाच्या घटना

  • १८०६: पर्शिया ने फ्रान्सविरुद्ध युद्ध पुकारले.

  • १९६०: विद्याधर गोखले यांच्या पंडितराज जगन्नाथ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.

  • १९६२: युगांडा  देशाला युनायटेड किंग्डमकडून स्वातंत्र्य मिळाले.

  • १९८१: फ्रान्समधे मृत्यूदंडाची शिक्षा रद्द करण्यात आली.

जन्म 

  • १८५२: रासायनिक प्रक्रियेद्वारे शर्करा रेणूंच्या निर्मितीसाठी १९०२ मध्ये नोबेल पुरस्कार मिळालेले जर्मन रसायनशास्त्रज्ञ एमिल फिशर यांचा जन्म. (मृत्यू: १५ जुलै १९१९)

  • १८७६: बौद्ध धर्माचे अभ्यासक पंडित धर्मानंद कोसंबी यांचा जन्म. (मृत्यू: ४ जून १९४७)

  • १८७७: ओरिसातील समाजसुधारक, सामाजिक कार्यकर्ते, स्वातंत्र्यसेनानी, कवी व लेखक पण्डित गोपबंधूदास तथा उत्कलमणी यांचा जन्म. (मृत्यू: १७ जून १९२८)

  • १८९७: मद्रास राज्यचे ६वे मुख्यमंत्री एम. भक्तवत्सलम यांचा जन्म. (मृत्यू: १३ फेब्रुवारी १९८७)

  • १९२४: भारतीय सैनिक इमानुवेल देवेन्द्रर यांचा जन्म. (मृत्यू: ११ सप्टेंबर १९५७)

  • १९६६: प्लाझा मॅगझीनचे संस्थापक क्रिस्टोफर ओस्टलंड यांचा जन्म.

मृत्यू  

  • १८९२: पत्रकार, समाजसुधारक व इतिहासकार रावबहादूर गोपाळ हरी देशमुख यांचे निधन. (जन्म: १८ फेब्रुवारी १८२३)

  • १९५५: हार्मोनियम वादक, अभिनेते व संगीतकार, नाट्यसंगीताचे पहिले शिल्पकार, पहिल्या बोलपटाचे संगीत दिग्दर्शक, संगीत क्षेत्रातील पहिले सौंदर्य मीमांसक, संगीतिकांचे प्रवर्तक गोविंदराव टेंबे यांचे निधन. (जन्म: ५ जून १८८१)

  • १९८७: कथकली नर्तक गुरू गोपीनाथ यांचे निधन. (जन्म: २४ जून १९०८)

  • १९९८: छायालेखक (Cinematographer) जयवंत पाठारे यांचे निधन.

  • १९९९: नारद मुनींच्या भूमिकेद्वारे नाट्यरसिकांच्या सदैव स्मरणात असलेले रंगभूमीवरील रंगकर्मी मा. अनंत दामले तथा नूतन पेंढारकर यांचे निधन.

  • २०००: व्हिक्टोरिया क्रॉस प्राप्त इंडियन-स्कॉटिश कर्नल पॅट्रिक अँथनी पोर्टिअस यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी१९१८)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.